माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या संगीत वारशाचा गौरव : 'हर कंठ में भारत’ या शास्त्रीय संगीत मालिकेच्या उद्घाटनासाठी आकाशवाणी आणि सांस्कृतिक मंत्रालय आले एकत्र

Posted On: 02 FEB 2025 4:43PM by PIB Mumbai

 

वसंत पंचमीच्या पावन प्रसंगी, आकाशवाणीच्या प्रसारण भवन मधील पंडित रविशंकर म्युझिक स्टुडिओ येथे, 'हर कंठ में भारत' या नवीन रेडिओ कार्यक्रमाच्या प्रारंभासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 'हर कंठ में भारत’ हा कार्यक्रम विशेषत्वाने भारतीय शास्त्रीय संगीताच्या असंख्य छटा आकाशवाणीवरून सादर करण्यासाठी  तयार करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय आणि सार्वजनिक सेवा प्रसारक, आकाशवाणी यांच्याकडून संयुक्तपणे सादर केली जाणारी ही मालिका सकाळी 9 वाजून 30 मिनीटांनी प्रसारित केली जाईल.  ही मालिका 16 फेब्रुवारी 2025 पर्यंत दररोज सकाळी विविध भागातील 21 केंद्रांवरून  देशाच्या बहुतांश भागात प्रसारित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

समारंभाची औपचारिक सुरुवात आज सकाळी 10:30 वाजता झाली. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव अरुणिश चावला, प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी, आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालिवाल गौर, सांस्कृतिक सहसचिव अमिता प्रसाद सारभाई आणि दूरदर्शनच्या महासंचालक कांचन प्रसाद यांनी देवी सरस्वतीला पुष्पांजली अर्पण करून या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात केली.

आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालिवाल गौर यांनी आपल्या स्वागतपर भाषणात वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच सरस्वती आणि लक्ष्मीच्या दुर्मिळ संगमाचे प्रतीक असलेल्या या वर्षीच्या वसंत पंचमीच्या अद्वितीय महत्त्वावर प्रकाश टाकला. 'हर कंठ में भारत' या संकल्पनेची आणि प्रसारण वेळापत्रकाची माहिती देताना, हा सहयोगी प्रयत्न फलदायी ठरेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

अरुणिश चावला आणि गौरव द्विवेदी यांनी टाळ्यांच्या गजरात 'हर कंठ में भारत' या मालिकेचे डिजिटल उद्घाटन केले. प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या विशेष उद्घाटन भाषणात, आकाशवाणीच्या गेल्या काही दशकांमधील देशभरातील उत्कृष्ट, ऐतिहासिक कामगिरीचा उल्लेख केला. अशा सर्जनशील भागीदारीमुळे नवीन संधी खुल्या  होण्यास मदत होऊ शकते, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

***

S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2098949) Visitor Counter : 49