अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आगामी 5 वर्षांत सरकारी शाळांमध्ये 50,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा सुरु करणार


भारतीय भाषा पुस्तक योजनेतून डिजिटल स्वरूपात भारतीय भाषेतील पुस्तके

खाजगी क्षेत्रातील संशोधन, विकास आणि नवोपक्रम लागू करण्यासाठी 20,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

प्रधानमंत्री संशोधन शिष्‍यवृत्ती योजनेअंतर्गत आयआयटी आणि आयआयएससीमध्ये तांत्रिक संशोधनासाठी 10,000 छात्रवृत्ती देण्‍यासाठी तरतूद

"मेक फॉर इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड" उत्पादनासाठी तरुणांना सुसज्ज करण्यासाठी कौशल्य विकसनाच्या 5 राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रांची करणार स्थापना

कृत्रिम प्रज्ञा उत्कृष्टता केंद्र स्‍थापून शिक्षणासाठी 500 कोटी रुपये खर्चाचा आराखडा

Posted On: 01 FEB 2025 1:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2025

 

आज संसदेत 2025-26  चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारमण यांनी नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विकास उपाययोजना प्रस्तावित केल्या. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुढील 5  वर्षांत सरकारी शाळांमध्ये पन्नास हजार अटल टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन करण्याची घोषणा केली. यामुळे शालेय मुलांमध्ये  जिज्ञासा निर्माण होईल  आणि त्यांच्या  नवोन्मेषी कल्पना साकार करणे शक्य होईल आणि मुलांमध्‍ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होईल. भारतनेट प्रकल्पांतर्गत ग्रामीण भागातील सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचाही केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्ताव आहे.

उच्च शिक्षणाबाबत, 2025-26  च्या केंद्रीय अर्थसंकल्पात असे म्हटले आहे की,  गेल्या 10  वर्षांत 23 आयआयटीमधील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 65,000 वरून 100  टक्के वाढून आता ती  1.35  लाख झाली आहे. 2014  नंतर सुरू झालेल्या 5 आयआयटींमध्ये 6,500 पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांना शिक्षण सुलभ करण्यासाठी अतिरिक्त पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आयआयटी, पाटणा येथे वसतिगृह आणि इतर पायाभूत सुविधांची क्षमता देखील वाढवली जाईल.

विद्यार्थ्यांना त्यांचे विषय चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत मिळावी, या  उद्देशाने, शालेय आणि उच्च शिक्षणासाठी डिजिटल स्वरूपातील भारतीय भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देणयात येणार आहेत. यासाठी  भारतीय भाषा पुस्तक योजना राबविण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थ मंत्री  निर्मला सीतारमण यांनी मांडला आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जागतिक कौशल्य आणि भागीदारीसह कौशल्य विकासासाठी पाच राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रे स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या भागीदारींमध्ये अभ्यासक्रम रचना, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कौशल्य प्रमाणन चौकट आणि नियतकालिक पुनरावलोकन यांचा  समावेश असणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कृत्रिम प्रज्ञा उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे असे केंद्र स्थापण्‍यासाठी  एकूण 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्प सादर करताना, अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी खाजगी क्षेत्राद्वारे संशोधन, विकास आणि नवोपक्रम राबविण्यासाठी 20,000 कोटी रुपयांचा निधी देण्‍याची  घोषणा केली. आगामी  पाच वर्षांत, प्रधानमंत्री   संशोधन छात्रवृत्ती  योजनेअंतर्गत, आयआयटी आणि आयआयएससीमध्ये तांत्रिक संशोधनासाठी वाढीव आर्थिक सहाय्य देण्‍यात येणार आहे. तसेच दहा हजार छात्रवृत्तींची तरतूद अर्थसंकल्पात प्रस्तावित केली आहे.

For related information on Skill development, Click here- https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2098551

 

* * *

G.Chipalkatti/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2098622) Visitor Counter : 29