Posted On:
31 JAN 2025 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 जानेवारी 2025
केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2024-25अनुसार आर्थिक वर्ष 25 मध्ये वीज व बांधकाम क्षेत्रातील भरीव प्रगतीमुळे औद्योगिक क्षेत्रात 6.2 टक्के या वेगाने वाढ अपेक्षित आहे. संशोधन व विकासातील तसेच नवोन्मेषातील गुंतवणूक वाढ व छोट्या उद्योजकांच्या प्रगतीवर दिलेला भर यामुळे विविध क्षेत्रातील प्रगतीला चालना मिळत असल्याचे सर्वेक्षणात नमूद केले आहे. वाहने, इलेक्ट्रॉनिक्स व औषधनिर्मिती सारख्या ग्राहककेंद्री क्षेत्रांचा विकासाला मोठा हातभार लागल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर 2.8 टक्के हिस्सा असल्यामुळे, शिवाय भारत व चीन सारख्या वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांकडे उत्पादनाची अधिकाधिक जबाबदारी येत असल्याने या जागतिक औद्योगिक विकेंद्रीकरणाचा मोठा फायदा भारताला मिळू शकतो.

महत्वाचे उत्पादक उद्योग :
- सिमेंट उद्योग
- पोलाद उद्योग
- भांडवली उत्पादने
- वाहन उद्योग
- इलेक्ट्रॉनिक उद्योग: इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनात आर्थिक वर्ष 2015 मधील रु. 1.90 लाख कोटी च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024 मध्ये रु.9.52 लाख कोटी इतकी वाढ झाली असून एकत्रित वार्षिक विकास दर (CAGR) 17.5 टक्के आहे, असे निरीक्षण आर्थिक सर्वेक्षणात नोंदवले आहे.
- वस्त्रोद्योग: वस्त्रोद्योगात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली असून भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या एकूण मूल्यवर्धनात (GVA) त्या क्षेत्राचा 11टक्के हिस्सा आहे.
- औषधनिर्मिती: आर्थिक सर्वेक्षणाच्या अनुसार भारतातील औषधनिर्मिती उद्योग हा उत्पादन क्षमतेनुसार जगातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये या क्षेत्रात रु. 4.17 लाख कोटीची एकूण आर्थिक उलाढाल झाली असून गेल्या 5 वर्षात या क्षेत्राचा विकासदर 10.1 टक्के राहिला आहे. वैद्यकीय उपकरण निर्मिती उद्योग वेगाने प्रगती करत असून एकत्रित वार्षिक विकास दर 15 टक्के आहे.
संशोधन व विकास क्षेत्रात नवोन्मेषच्या साहाय्याने मोठी वाढ:
आर्थिक सर्वेक्षणानुसार भारतात बौद्धिक संपदा परिसंस्था बळकट आहे. विप्रो अहवाल 2022 नुसार जागतिक स्तरावर नव्या पेटंट्स साठी अर्ज करणाऱ्या देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक लागतो. राष्ट्रीय बौद्धिक संपदा धोरण 2016 आल्यानंतर पेटंट्स, आरेखन, कॉपी राईट्स व ट्रेड मार्क्स च्या नियमांमधील सुधारणांमुळे आवेदन प्रक्रिया सुलभ झाली असून अनुपालनाची गरज कमीत कमी भासत आहे. पेटंट सुधारणा नियम 2024 मुळे पेटंट प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याचे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.
* * *
G.Chipalkatti/U.Raikar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai