पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आंध्र प्रदेश मधल्या विशाखापट्टणम इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 08 JAN 2025 8:10PM by PIB Mumbai

भारत माता की जय! 

भारत माता की जय! 

भारत माता की जय! 

आंध्र प्रदेशचे  राज्यपाल सैयद अब्दुल नज़ीर जी, इथले  लोकप्रिय मुख्यमंत्री माझे  मित्र श्रीमान चंद्रबाबू नायडू जी, नेता अभिनेता उप मुख्यमंत्री , पवन कल्याण जी, केंद्र सरकार मधले माझे सहकारी मंत्री,राज्य सरकारचा मंत्रीवर्ग,सर्व खासदार आणि अन्य आमदार,इतर मान्यवर नागरिकगण, बंधू- भगिनींनो,   

 आंध्र प्रजला प्रेमा मरियु अभिमा-नानकि ना कृतज्ञतलु।

ना अभिमानान्नि चुपिनचे अवकासम इप्पुडु लभिन-चिन्धि।

सर्वप्रथम मी सिम्हाचलम वराह लक्ष्मी नरसिंहा स्वामी यांना  प्रणाम करतो.

मित्रहो,

आपल्या आशीर्वादाने 60 वर्षानंतर देशात सलग तिसऱ्यांदा एक सरकार निवडून आले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर एका प्रकारे माझा हा पहिला सरकारी कार्यक्रम आहे.आपण सर्वांनी जे शानदार स्वागत केले, रस्ताभर लोक ज्या प्रकारे आशीर्वाद देत होते आणि चंद्र बाबूंनी तर आपल्या भाषणात सारे षटकार मारले. त्यांच्या एक-एक शब्दाचा, त्यांच्या भावनेचा मी आदर करतो आणि आंध्र वासियांना,देशवासियांना खात्री देतो की चंद्र बाबू आज जी भावना व्यक्त करत होते, आम्ही सर्वजण मिळून ती उद्दिष्टे नक्कीच साध्य करू.

मित्रहो,

आपला आंध्र प्रदेश  शक्यता आणि संधींचे राज्य आहे.या शक्यता जेव्हा साकार होतील तेव्हा आंध्र प्रदेशही विकसित होईल आणि तेव्हा भारतही विकसित राष्ट्र बनेल. म्हणूनच आंध्र प्रदेशचा विकास हे आमचे उद्दिष्ट आहे. आंध्रच्या जनतेची सेवा हा आमचा संकल्प आहे. 2047 पर्यंत सुमारे 2.5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य आंध्र प्रदेशने ठेवले आहे.हे लक्ष्य गाठण्यासाठी चंद्रबाबू सरकारने सुवर्ण  Andhra@2047 हा उपक्रम हाती घेतला आहे.यामध्ये केंद्रातले रालोआ सरकारही आंध्र प्रदेशच्या प्रत्येक उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी त्यांच्या समवेत खांद्याला खांदा भिडवून वाटचाल करत आहे. म्हणूनच केंद्र सरकार लाखो करोडो रुपयांच्या योजनांमध्ये आंध्रला विशेष प्राधान्य देत आहे.आज इथे 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले आहे. हे प्रकल्प आंध्र प्रदेशचा  विकास नव्या शिखरावर नेतील. या विकास प्रकल्पांसाठी आंध्र प्रदेश सह संपूर्ण देशाचे मी अभिनंदन करतो.

मित्रहो,

आंध्र प्रदेश आपल्या नवोन्मेशी वृत्तीमुळे माहिती तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाचे इतके मोठे केंद्र आहे. आंध्र प्रदेशने आता  नव्या भविष्यवेधी तंत्रज्ञानाचे केंद्र बनण्याची ही वेळ आहे. जे तंत्रज्ञान आत्ताच विकसित होत आहे त्यामध्ये आपण आतापासूनच आघाडी घ्यावी.आज हरित हायड्रोजनचा वापर हे असेच उदयोन्मुख क्षेत्र आहे. देशाने 2023 मध्ये राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियानाचा प्रारंभ केला होता. 2030 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन हरित हायड्रोजनची निर्मिती हे आपले लक्ष्य आहे.यासाठी सुरवातीच्या टप्यामध्ये 2 हरित हायड्रोजन केंद्रे स्थापन केली जातील, ज्यापैकी एक आपले   विशाखापट्टणम आहे. भविष्यात विशाखापट्टणम जगातल्या अशा निवडक शहरांपैकी असेल जिथे इतक्या मोठ्या प्रमाणात हरित हायड्रोजन निर्मिती सुविधा असेल.या हरित हायड्रोजन केंद्रामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. त्याच बरोबर आंध्र प्रदेश मध्ये उत्पादन परिसंस्थाही विकसित होईल.

मित्रहो,

आज नक्कापल्ली मध्ये बल्क ड्रग पार्क प्रकल्पाचे भूमिपूजन करण्याची संधी प्राप्त झाली.देशात अशा प्रकारचे पार्क 3 राज्यांमध्ये स्थापन करण्यात येत आहे त्यापैकी आंध्र प्रदेश हे एक आहे.  उत्पादन आणि संशोधनासाठी या पार्क मध्ये उत्तम पायाभूत सुविधा उभारण्यात येतील.यातून गुंतवणूकदारांचा उत्साह वाढेल आणि इथल्या फार्मा कंपन्यांनाही लाभ होईल.  

मित्रहो,

आमचे सरकार शहरीकरणाकडे एक संधी म्हणून पाहते.आंध्र प्रदेश, नव्या युगाच्या शहरीकरणाचे एक उदाहरण ठरावे असा आमचा प्रयत्न आहे. हा दृष्टीकोन साकारण्यासाठी आज कृष्णापट्टणम  औद्योगिक क्षेत्र म्हणजेच क्रिस सिटीची पायाभरणी करण्यात आली आहे. ही स्मार्ट सिटी चेन्नई-बेंगलुरू औद्योगिक कॉरिडॉरचा भाग बनेल. यातून आंध्रप्रदेशमध्ये हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक येईल आणि लाखो औद्योगिक रोजगार निर्माण होतील.

मित्रहो,श्री सिटी या रूपाने आंध्रप्रदेशला आधीपासूनच उत्पादन केंद्राचा फायदा मिळत आहे. औद्योगिक आणि उत्पादन क्षेत्रात देशाच्या सर्वोच्च शहरांमध्ये आंध्रप्रदेशचा समावेश व्हावा अशी आमची इच्छा आहे. उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आमचे सरकार पीआयएलसारख्या योजना राबवत आहे. परिणामी आज अनेक उत्पादनांच्या निर्मिती मध्ये जगातल्या सर्वोच्च देशांमध्ये भारताची गणना होऊ लागली आहे.

मित्रहो,

आज नव्या विशाखापट्टणम शहरात दक्षिण किनारा रेल्वे विभाग मुख्यालयाचीही पायाभरणी करण्यात येत आहे. आंध्रप्रदेशच्या विकासाच्या  दृष्टीकोनातून हे अतिशय महत्वाचे आहे. दीर्घ काळापासून एका वेगळ्या रेल्वे विभागाची मागणी होत होती. दक्षिण किनारा रेल्वे विभाग मुख्यालय झाल्यानंतर या संपूर्ण क्षेत्रात कृषी आणि व्यापाराशी निगडीत घडामोडींचा विस्तार होईल.याशिवाय पर्यटन क्षेत्र आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही प्रगतीच्या नव्या संधी निर्माण होतील. कनेक्टीव्हिटीशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी आज इथे झाली आहे. रेल्वे क्षेत्रात 100 % विद्युतीकरण झालेल्या राज्यांमध्ये आंध्रप्रदेशचा समावेश झाला आहे. आंध्रप्रदेशमधल्या सत्तरहून अधिक रेल्वे स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत विकास करण्यात येत आहे. आंध्रप्रदेशच्या जनतेचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून सात वंदे-भारत रेल्वे आणि अमृत भारत रेल्वे गाड्या चालवण्यात येत आहेत.

मित्रहो,

आंध्रमधली ही पायाभूत सुविधा क्रांती,उत्तम कनेक्टीव्हिटी,उत्तम सुविधा यामुळे या संपूर्ण भागाचा कायापालट होईल.यातून जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढेल.हाच विकास आंध्रच्या सुमारे 2.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा आधार ठरेल.

मित्रहो,

विशाखापट्टणम आणि आंध्रप्रदेशचे किनारे शेकडो वर्षांपासून भारताच्या व्यापाराचे प्रवेशद्वारे राहिले आहेत. आजही विशाखापट्टणमचे तितकेच महत्व आहे. सागराशी संबंधित संधीचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी आम्ही नील अर्थव्यवस्थेला मिशन मोडवर प्रोत्साहन देत आहोत.यासाठी आंध्रप्रदेशमधल्या मच्छिमारिशी संबंधित आमच्या बंधू-भगिनींचे उत्पन्न आणि व्यवसाय वाढवा या दिशेने आम्ही अतिशय संवेदनशीलतेने काम करत आहोत.मच्छिमारांना आम्ही किसान क्रेडीट कार्ड सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सागरी सुरक्षेसाठीही आम्ही महत्वाची पाऊले उचलत आहोत.

मित्रहो,

देशाच्या  प्रत्येक वर्गाला विकासाचा लाभ मिळावा या दृष्टीने देशाच्या प्रत्येक क्षेत्रात समावेशक आणि सर्वांगीण विकास व्हावा असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी रालोआ सरकार समृद्ध आणि आधुनिक आंध्रप्रदेशच्या उभारणीसाठी कटीबद्ध आहे.आज ज्या प्रकल्पांचा शुभारंभ होत आहे त्यातून आंध्रच्या जनतेला नक्कीच समृद्धी प्राप्त होईल.या सर्व प्रकल्पांसाठी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

आपणा सर्वाना खूप-खूप धन्यवाद !

 ***

SonalT/NC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2091401) Visitor Counter : 9