पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नियुक्त झालेल्या नवनियुक्तांना रोजगार मेळ्या अंतर्गत केले 71,000 पेक्षा जास्त नियुक्तीपत्रांचे वितरण


रोजगार मेळे युवा वर्गाचे सक्षमीकरण करत आहेत आणि त्यांच्या क्षमतांचा सुयोग्य वापर करत आहेत,नवनियुक्तांना माझ्याकडून शुभेच्छा : पंतप्रधान

भारताचा आजचा युवा वर्ग नव्या आत्मविश्वासाने भरलेला आहे, प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहेः पंतप्रधान

नव्या भारताची उभारणी करण्यासाठी एका आधुनिक शिक्षण प्रणालीची देशाला अनेक दशकांपासून प्रतीक्षा होती,राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून देश आता त्या दिशेने आगेकूच करत आहे : पंतप्रधान

आज आमच्या सरकारची ही धोरणे आणि निर्णयांमुळे, ग्रामीण भारतातही रोजगारांच्या आणि स्वयंरोजगारांच्या नव्या संधी निर्माण होत आहेत, त्यांना त्यांच्या पसंतीचे काम करण्याची एक संधी प्राप्त झाली आहे : पंतप्रधान

महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे : पंतप्रधान

Posted On: 23 DEC 2024 2:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याला संबोधित केले आणि सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नवनियुक्त 71,000 हून अधिक युवांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. हा रोजगार मेळा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत असून युवकांना राष्ट्रउभारणी आणि आत्मसक्षमीकरणात योगदान देण्यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करेल.

या मेळ्याला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की काल रात्री ते कुवेतहून परत आले, जिथे त्यांनी भारतीय युवा आणि व्यावसायिकांसोबत प्रदीर्घ चर्चा केल्या. तिथून परतल्यावर देशाच्या युवा वर्गासोबत पहिला कार्यक्रम असणे हा एक अतिशय सुखद योगायोग असल्याचे त्यांनी नमूद केले."देशातल्या हजारो युवांसाठी आज एक नवी सुरुवात होत आहे.तुमची अनेक वर्षांपासूनची स्वप्ने सत्यात उतरली आहेत, अनेक वर्षांच्या कष्टांचे चीज झाले आहे”, पंतप्रधान म्हणाले.

रोजगार मेळ्यासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून भारताच्या युवा वर्गाच्या गुणवत्तेचा पुरेपूर वापर करण्याला सरकार प्राधान्य देत असल्यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या 10 वर्षात विविध मंत्रालये आणि विभागात सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी अतिशय ठामपणे प्रयत्न केले जात आहेत. आज 71,000 पेक्षा जास्त युवांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.गेल्या दीड वर्षात सुमारे 10 लाख स्थायी सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या असून यामुळे एक उल्लेखनीय विक्रम प्रस्थापित झाला आहे. या नोकऱ्या संपूर्ण पारदर्शकता राखून दिल्या जात आहेत आणि नवे नियुक्त कर्मचारी समर्पित वृत्ती आणि एकात्मतेने देशाची सेवा करत आहेत,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

देशाचा विकास हा तरुणांचे  कठोर परिश्रम, युवकांमध्‍ये असलेली अपार  क्षमता आणि त्यांच्या नेतृत्वावर अवलंबून असतो, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनण्यासाठी देश वचनबद्ध आहे; आणि यासाठी आपल्या प्रतिभावान तरुणांना सक्षम बनवायचे आहे, हा विचार केंद्रस्थानी ठेवूनच  देशाची धोरणे निश्चित करताना निर्णय घेण्‍यात येत आहेत. पंतप्रधान पुढे  म्हणाले की, गेल्या दशकभरात ‘मेक इन इंडिया’ , आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, स्टँड-अप इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांमध्‍ये  तरुणांना आघाडीवर ठेवण्‍यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी  नमूद केले की,भारत आता जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था  आहे.आज भारतीय तरुण नव्या आत्मविश्वासाने भरलेले आहेत. ते प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. आज स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुण उद्योजकांना कार्यप्रणालीचा मजबूत पाठिंबा मिळत असल्यामुळे, फायदा होतो. त्याचप्रमाणे, खेळात करिअर करणाऱ्या तरुणांना विश्वास आहे की,  ते अपयशी ठरणार नाहीत कारण त्यांना आता आधुनिक प्रशिक्षण सुविधा आणि स्पर्धांमध्‍ये सहभागी होण्‍याची संधी मिळते. मोबाईल उत्पादनात भारत  दुसऱ्या क्रमांकाचा देश बनत आहे, तसेच विविध क्षेत्रात परिवर्तन घडून येत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. भारत नवीकरणीय ऊर्जा,सेंद्रिय शेती,  अंतराळ, संरक्षण, पर्यटन आणि आरोग्य निरामयता  या क्षेत्रातही प्रगती करत आहे. विविध क्षेत्रात  नवीन संधी निर्माण करत आहे आणि प्रत्येक क्षेत्रात नवीन उंची गाठत आहे.

देशाच्या प्रगतीसाठी आणि नवीन भारताच्या उभारणीसाठी तरुण प्रतिभेला  अधिकाधिक संधी  देवून, प्रोत्साहन  देणे  महत्त्वाचे आहे आणि ही जबाबदारी शिक्षण व्यवस्थेची आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले. राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) भारताला आधुनिक शिक्षण व्यवस्था प्रदान करण्‍यासाठी  मार्गदर्शन करणारे  आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी मिळू शकणार आहेत. यावेळी पंतप्रधान  मोदी म्हणाले की, पूर्वी ही प्रणाली प्रतिबंधात्मक होती;  परंतु आता ती अटल टिंकरिंग लॅब आणि पीएम-श्री शाळांसारख्या उपक्रमांद्वारे नाविन्यपूर्णतेला चालना देणारी आहे. “सरकारने मातृभाषेत शिक्षण घेण्‍याची  आणि परीक्षाही देण्‍याची  परवानगी दिली आहे. तसेच यासाठी 13 भाषांमध्ये भरती परीक्षेची सुविधा उपलब्ध करून  देऊन ग्रामीण तरुण आणि उपेक्षित समुदायांसाठी भाषेतील अडथळे दूर केले आहेत. याव्यतिरिक्त, कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्यांसाठी विशेष भरती मेळाव्यासह सीमावर्ती भागातील तरुणांचा कोटा वाढविण्यात आला आहे. आज, 50,000 हून अधिक तरुणांना केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांसाठी नियुक्ती पत्रे मिळाली, ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी आहे,” असे  पंतप्रधान पुढे म्हणाले.

चौधरी चरणसिंग जी यांना यावर्षी भारतरत्न देऊन सन्मानित करणे हा सरकारसाठी विशेष क्षण आहे, असे पंतप्रधान चरणसिंग यांच्या जयंतीबद्दल बोलताना म्हणाले. “आपल्याला अन्न पुरवणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान म्हणून हा दिवस आपण शेतकरी दिनाच्या रुपात साजरा करतो. भारताची प्रगती ग्रामीण भारताच्या प्रगतीवर अवलंबून आहे, असा चौधरी साहेबांचा असा विश्वास होता.  आमच्या सरकारच्या धोरणांमुळे ग्रामीण भागात विशेषत: कृषी क्षेत्रातील तरुणांसाठी नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत,” असेही पंतप्रधान पुढे म्हणाले.

गोबर-धन योजनेसारख्या उपक्रमांद्वारे बायोगॅस संयंत्रे उभारली तसेच ऊर्जा निर्मिती करताना रोजगार निर्माण केल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. कृषी बाजारांना जोडणाऱ्या ई-नाम योजनेमुळे रोजगाराचे नवीन मार्ग खुले झाले आहेत आणि इथेनॉल मिश्रणात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे तसेच साखर क्षेत्रात नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, असेही ते म्हणाले. सुमारे 9,000 शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPOs) स्थापनेमुळे बाजारपेठेतील उपलब्धता कशी सुधारली आहे आणि ग्रामीण रोजगार कसा निर्माण झाला आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  तसेच, हजारो धान्य साठवणूक गोदामे बांधण्यासाठी सरकार एक मोठी योजना राबवत आहे, त्यामुळे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होतील, असेही ते म्हणाले.

सरकारने प्रत्येक नागरिकाला विमा संरक्षण देण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली, ज्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला.  ड्रोन दीदी, लखपती दीदी आणि बँक सखी योजना यासारख्या उपक्रमांमुळे कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातही रोजगार निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले.  “आज हजारो महिलांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत आणि त्यांचे यश इतरांना प्रेरणा देत आहे.  महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.  26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळण्याचा नियम लागू केल्याने लाखो महिलांच्या करिअरचे रक्षण झाले आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्वच्छ भारत अभियानाने महिलांच्या प्रगतीतील अडथळे कसे दूर केले आहेत यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. स्वतंत्र स्वच्छतागृहांच्या अभावामुळे अनेक विद्यार्थिनींना शाळा सोडावी लागत होती, असे  ते म्हणाले. सुकन्या समृद्धी योजनेमुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळाले आहे.  तसेच, महिलांसाठी 30 कोटी जनधन खात्यांनी सरकारी योजनांचा थेट लाभ दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. “मुद्रा योजनेच्या माध्यमातून महिला आता तारणमुक्त कर्ज मिळवू शकतात.  प्रधानमंत्री आवास योजनेने हे सुनिश्चित केले आहे की वाटप करण्यात आलेली बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत.  पोषण अभियान, सुरक्षित मातृत्व अभियान आणि आयुष्मान भारत यांसारखे उपक्रम महिलांना उत्तम आरोग्य सेवा देत आहेत,” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.

नारी शक्ती वंदन अधिनियमाने महिलांना विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण सुनिश्चित केले आहे. त्यामुळे महिलांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

आज नियुक्तीपत्रे मिळवणारे तरुण तरुणी नव्या बदललेल्या सरकारी व्यवस्थेत सामील होत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या दशकात, सरकारी कर्मचाऱ्यांच्या समर्पण आणि कठोर परिश्रमामुळे सरकारी कार्यालयांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकतेत लक्षणीय सुधारणा झाल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नवनियुक्त तरुणांनी हे लक्ष्य गाठले कारण त्यांच्यात शिकण्याची आणि स्वतःचा विकास साधण्याची उत्सुकता आहे. या तरुण तरुणींनी ही वृत्ती आयुष्यभर टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  iGOT कर्मयोगी व्यासपीठावर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांच्या उपलब्धतेवर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला आणि या कर्मचाऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार या डिजिटल प्रशिक्षण मॉड्यूलचा वापर करण्यास पंतप्रधानांनी प्रोत्साहित केले.  “ आज नियुक्तीपत्रे प्राप्त झालेल्या उमेदवारांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो”, असे सांगून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

पार्श्वभूमी

रोजगार मेळा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. रोजगार मेळा युवकांना राष्ट्र उभारणी आणि आत्मसशक्तीकरणात सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल.

देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळा आयोजित केला जात आहे.  केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांसाठी ही भरती होत आहे.  देशभरातून निवडलेले नवीन कर्मचारी गृह मंत्रालय, टपाल विभाग, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग, यासह विविध मंत्रालये किंवा विभागांमध्ये सामील होतील.

S.Tupe/S.Patil/S.Bedekar/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2087242) Visitor Counter : 60