माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उद्याच्या प्रतिभावंत चित्रपट निर्मात्यांसाठी लाँचपॅडच्या रुपात इफ्फी उदयाला येत आहे
भारतीय चित्रपटसृष्टीच्या भवितव्याचा सोहळा – ‘क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो’ हा उपक्रम युवा प्रतिभा आणि केवळ 48 तासांत रचलेल्या सर्जनशील कथांचे सादरीकरण करतो
यावर्षीचा इफ्फी महोत्सव भूतकाळातल्या तसेच भविष्यकाळातल्या दिगज्जांना समर्पित असून आपल्या देशातील तरुण याचे प्रतिनिधित्व करत आहेत – केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू
‘गुल्लू’ – अदृश्य मोबाईल फोनच्या माध्यमातून माणसे आणि तंत्रज्ञान यांच्यातील नाजूक नातेसंबंधांचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटाने सीएमओटीमध्ये मिळवली मोठी प्रशंसा
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2024
युवा वर्गाचा चैतन्याने भरलेला जोश, उत्साहपूर्ण वातावरण आणि अथक आणि तरीही अविस्मरणीय अशा 48 तासांची चुरस – असा होता 55 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी) ‘क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो’ या उपक्रमाच्या समारोप सोहोळ्यामध्ये आज मॅक्वीनेझ पॅलेस येथील नजारा.
‘क्रिएटिव्ह माइंडस ऑफ टुमारो’ (सीएमओटी) हा भारताच्या सर्वात आश्वासक तरुण चित्रपट निर्मात्यांचा शोध आणि संगोपन यांसाठीचा प्रमुख मंच म्हणून उदयाला आला आहे. यावर्षी या कार्यक्रमाच्या आवाक्याचा विस्तार करत त्यामध्ये चित्रपट निर्मिती प्रक्रियेतील 13 शाखांमधील 100 युवा प्रतिभावंतांचा समावेश करून एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी याच उपक्रमाअंतर्गत 10 कलाप्रकारांमध्ये 75 सहभागींनी आपले कौशल्य सादर केले होते, त्यात यावर्षी लक्षणीय वाढ दिसून आली. या उपक्रमाला यावर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला. यासाठी देशभरातून चित्रपटांशी संबंधित 13 प्रकारांमध्ये आपापली प्रतिभा सादर करणाऱ्या सुमारे 1,070 कलाकारांच्या प्रवेशिका आल्या होत्या.
48 तासांमध्ये चित्रपट निर्मिती करण्याचे आव्हान हे यावर्षीच्या कार्यक्रमाचे खास आकर्षण होते. यासाठी प्रत्येकी 20 सदस्य असलेल्या पाच संघांनी “तंत्रज्ञानाच्या युगातील नातेसंबंध” या विषयावर आधारित लघुपटांची निर्मिती केली. दिनांक 21 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत गोव्यात पणजीपासून 4 किलोमीटरच्या परिघात वेगवेगळ्या 12 ठिकाणी पार पडलेल्या या आव्हानवजा स्पर्धेत सहभागी संघांची सर्जनशीलता आणि लवचिकता यांचा कस लागला.
यावर्षी सीएमओटी’ मधील 48 तासांमध्ये चित्रपट निर्मितीचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण करणारे विजेते पुढीलप्रमाणे आहेत :
1. सर्वोत्कृष्ट चित्रपट : गुल्लू
सर्वोत्कृष्ट चित्रपट (उपविजेता): वुई हियर द सेम म्युझिक
2. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : आर्शली जोस (गुल्लू)
3. सर्वोत्कृष्ट कथा : अधिराज बोस (लव्हपिक्स सबस्क्रिप्शन)
4. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विशाखा नायर (लव्हपिक्स सबस्क्रिप्शन)
5. सर्वोत्कृष्ट अभिनेता : पुष्पेंद्र कुमार (गुल्लू)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवणाऱ्या आर्शली जोस यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “हे यश माझ्या संपूर्ण संघाचे आहे. या चित्रपटाची कथा हाच या चित्रपटाचा खरा हिरो होता आणि ज्या क्षणाला मी ही कथा वाचली, त्याच वेळी मला समजले की आमच्या हाती काहीतरी खास लागले आहे. या अत्युत्कृष्ट संघासोबत काम करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता."
या युवा कलाकारांना मार्गदर्शन करण्यासाठी मागील वर्षीच्या CMOT चॅम्पियन म्हणून गौरवण्यात आलेल्या चिदानंद नाईक, अखिल लोटलीकर, सुवर्णा दाश, अक्षिता वोहरा आणि कृष्णा दुसाने या माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते.
“प्रचंड दबावाखाली 48 तासांच्या आत अशा अनुकरणीय चित्रपटांची निर्मिती करणे ही मुळातच एक मोठी कामगिरी आहे. इथला प्रत्येक सहभागी हा विजेता आहे.” असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू सहभागींचे कौतुक करताना म्हणाले.
“या वर्षी आम्ही भूतकाळातील आणि भविष्यातील दिग्गजांना इफ्फी समर्पित केला आहे, ज्यांचे प्रतिनिधित्व आपल्या देशातील तरुणांनी केले आहे. CMOT, फिल्म बाजार आणि रेड कार्पेट सारखे उपक्रम इच्छुक चित्रपट निर्मात्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी एक प्रवेशद्वार प्रदान करतात.” असे त्यांनी पुढे सांगितले,
चित्रपट उद्योगातील संधी थेट देशभरातील तरुण चित्रपट निर्माते आणि कलाकारांपर्यंत पोहोचवल्याबद्दल या सोहळ्याला उपस्थित असलेले अभिनेते अमित साध यांनी IFFI चे कौतुक केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विशेष सचिव नीरजा शेखर, एनएफडीसीचे प्रसारण सहसचिव आणि व्यवस्थापकीय संचालक प्रितुल कुमार, चित्रपट सहसचिव वृंदा देसाई, आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे माजी सचिव अपूर्वा चंद्रा यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रथितयश लेखक आणि ग्रँड ज्युरी सदस्य सम्राट चक्रवर्ती यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.
उत्साही जनसमुदायाच्या साक्षीने विजेत्यांची घोषणा होत असताना, शॉर्ट्स इंटरनॅशनलचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्टर पिल्चर यांनी सहभागींचे कौतुक केले. "या वर्षी निर्मिती झालेल्या चित्रपटांची गुणवत्ता आणि यात अंतर्भूत बाबी उत्कृष्ट आणि उच्च दर्जाच्या आहेत." असे ते म्हणाले.
यूके-आधारित नेटवर्क शॉर्ट्स इंटरनॅशनलच्या सहकार्याने आयोजित केलेले, 48-तासातील चित्रपट निर्मितीचे आव्हान युवा चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या सर्जनशीलता, कथाकथन कौशल्ये आणि वेळेच्या तीव्र मर्यादेत सांघिक कौशल्ये तपासण्याची एक अनोखी संधी देते. शॉर्ट्स टीव्हीने CMOT मध्ये या चित्रपटांच्या पूर्व-निर्मिती, निर्मिती आणि निर्मिती पश्चात कामकाजाची संपूर्ण जबाबदारीही घेतली आहे.
CMOT ने यावर्षी केवळ तरुण चित्रपट निर्मात्यांच्या झळाळत्या प्रतिभेचा गौरव केला नाही तर या चित्रपट निर्मात्यांसाठी एक व्यासपीठ म्हणून इफ्फीची भूमिका सशक्त केली आहे.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | G.Chippalkatti/Sanjana/Sandesh/Darshana | IFFI 55
(Release ID: 2076602)
Visitor Counter : 14