मंत्रिमंडळ सचिवालय
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने बंगालच्या उपसागरात येणाऱ्या संभाव्य चक्रीवादळाचा मुकाबला करण्यासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी केले बैठकीचे आयोजन
Posted On:
21 OCT 2024 8:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024
कॅबिनेट सचिव, डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एनसीएमसी अर्थात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची आज बैठक झाली. या बैठकीत बंगालच्या सागरातल्या संभाव्य चक्रीवादळासाठीच्या सज्जतेचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) महासंचालकांनी पूर्व मध्य बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या सद्यस्थितीची माहिती समितीला दिली. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम-वायव्य दिशेकडे सरकण्याची आणि 22 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत त्याच्या तीव्रतेत आणखी वाढ होण्याची तर 23 ऑक्टोबर 2024 पर्यंत पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर, ते वायव्येकडे सरकून 24 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून वायव्येला बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता आहे.वायव्येकडे सरकत राहणारे हे वादळ,24 तारखेच्या रात्रीपासून ते 25 ऑक्टोबर 2024 च्या पहाटेपर्यंत पुरी आणि सागर बेट दरम्यान उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगाल किनारपट्टी ओलांडण्याची दाट शक्यता आहे. या काळात 100-110 किमी ते 120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.
ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांनी चक्रीवादळाच्या अपेक्षित मार्गावर राहणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी केलेल्या पूर्वतयारी उपायांची आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती समितीला देण्यात आली.
एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने पश्चिम बंगालमध्ये 14 तुकड्या तर ओडिशामध्ये 11 तुकड्या तैनातीसाठी सज्ज ठेवल्या आहेत. जहाजे आणि विमानांसह लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.
कॅबिनेट सचिवांनी केंद्रीय संस्था तसेच ओडिशा आणि पश्चिम बंगाल सरकारच्या प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करताना, राज्य सरकारे आणि केंद्रीय संस्थांद्वारे सर्व आवश्यक प्रतिबंधात्मक आणि सावधगिरीच्या उपाययोजना करण्यावर भर दिला. जीवितहानी शून्य राखणे तसेच मालमत्तेचे आणि पायाभूत सुविधांचे नुकसान कमी राखणे हे उद्दिष्ट ठेवतानाच जर नुकसान झाले तर कमीत कमी वेळात अत्यावश्यक सेवा पुन्हा बहाल कराव्यात अशी सूचना त्यांनी दिली.
N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2066841)
Visitor Counter : 50
Read this release in:
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada