गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'पोलीस स्मृती दिना' निमित्त नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकावर शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना वाहिली आदरांजली


हा देश कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सदैव ऋणात राहील

आपला देश सध्या ड्रोन्स, अंमली पदार्थांचा व्यापार, सायबर गुन्हे तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अशांतता पसरवण्याचे प्रयत्न यांसारख्या अनेक आव्हानांना तोंड देत आहे

कितीही मोठे धोके आणि आव्हाने समोर उभी ठाकली तरी आपल्या सैनिकांच्या अविचल निर्धारापुढे ती टिकू शकणार नाहीत

Posted On: 21 OCT 2024 4:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2024

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी 'पोलीस स्मृती दिना'निमित्त आज नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकावर  शहीद पोलिस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की पोलीस दलांतील जवान भारतातील काश्मीर ते कन्याकुमारी आणि कच्छ ते किबीथु अशा सर्व प्रदेशांतील सीमांचे रक्षण करत आहेत. हे कर्मचारी अहोरात्र, सणासुदीच्या किंवा आपत्तींच्या काळात, तीव्र ऊन, पाऊस किंवा थंडीच्या लाटांमध्ये सदैव आपले आणि देशाच्या सीमांचे रक्षण करत असतात याचा त्यांनी विशेष उल्लेख केला.

वर्ष 1959 मध्ये आजच्याच दिवशी म्हणजे 21 ऑक्टोबर रोजी, केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ)10 जवानांनी अत्यंत धाडसाने  चिनी सैन्याशी लढा देत  हौतात्म्य पत्करले असे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत 36,468 पोलीस कर्मचाऱ्यांनी देशाचे संरक्षण आणि सुरक्षितता यासाठी त्यांच्या प्राणांचे बलिदान दिले असून त्यांच्यामुळे देश प्रगती करू शकला आहे. गेल्या वर्षभरात, 216 पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आहे आणि हा देश सदैव त्यांच्या ऋणात राहील असे देखील त्यांनी आवर्जून सांगितले.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की देशाचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची परंपरा आपल्या पोलीस दलांनी जपली आहे. ते पुढे म्हणाले की आपल्या देशाला हिमालयातील बर्फाच्छादित आणि अवघड पर्वत शिखरांपासून कच्छ आणि बारमेरच्या वाळवंटात तसेच अथांग महासागरांमध्ये देशाच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासाठी निर्भयतेने देशाच्या संरक्षणाचे कार्य करणाऱ्या शूर सैनिकांचा इतिहास लाभला आहे.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, आपल्या देशाला आज ड्रोन्स, अंमली पदार्थांचा व्यापार, सायबर गुन्हे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून अशांतता पसरवण्याचे प्रयत्न, धार्मिक भावना भडकावण्याचे षडयंत्र, घुसखोरी, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी तसेच दहशतवाद यांसारख्या नव्याने उदयाला येणाऱ्या अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. कितीही मोठे धोके आणि आव्हाने समोर उभी ठाकली तरी आपल्या सैनिकांच्या अविचल निर्धारापुढे ती टिकू शकणार नाहीत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की आपले पोलीस कर्मचारी, विशेषतः केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांचे जवान, देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच देशाच्या सुरक्षिततेची सुनिश्चिती करण्यासह इतर अनेक कार्ये पार पाडत असतात. वर्ष 2019 ते 2024 या कालावधीत केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाच्या  जवानांनी सुमारे 5 कोटी 80 लाख   90 हजारांहून अधिक रोपट्यांची लागवड केली असून स्वतःच्या मुलांप्रमाणे हे सैनिक त्या झाडांची काळजी घेत आहेत अशी माहिती शाह यांनी दिली.

 N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2066717) Visitor Counter : 42