गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत राजभाषा हीरक महोत्सव आणि चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला केले संबोधित


राजभाषेला संवाद, लोक, तंत्रज्ञानाची भाषा बनवण्याचा आणि तिचा आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून प्रसार करण्याचा हिंदी दिवसाचा उद्देश

नव्या शिक्षण धोरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर

हिंदी आणि इतर भाषांमध्ये कधीही स्पर्धा होऊ शकत नाही, हिंदी सर्व भारतीय भाषांना पूरक पाठबळ देते

आज हिंदी भाषा संयुक्त राष्ट्रांची भाषा बनत आहे, हिंदी भाषा 10 पेक्षा जास्त देशांमध्ये द्वितीय  भाषा आहे

ज्या दिवशी आपण आपली भाषा गमावू, त्या दिवशी देशाची एकता धोक्यात येईल

गृहमंत्र्यांनी केले ‘राजभाषा भारती’ नियतकालिकाच्या हीरक महोत्सवी विशेष आवृत्तीचे, स्मृती टपाल तिकीट आणि स्मृती नाण्याचे प्रकाशन आणि भारतीय भाषा विभागाचा केला शुभारंभ

Posted On: 14 SEP 2024 4:52PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे राजभाषा हीरक महोत्सव समारंभ आणि चौथ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला संबोधित केले.

या सोहळ्यासाठी विशेषत्वाने तयार करण्यात आलेल्या ‘राजभाषा भारती’ नियतकालिकाच्या हीरक महोत्सवी विशेषांकाचे गृहमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.  अमित शाह यांनी हीरक महोत्सवानिमित्त एक स्मृती टपाल तिकीट आणि स्मृती नाण्याचे प्रकाशन केले. शाह यांनी राजभाषा गौरव आणि राजभाषा कीर्ती पुरस्कारही प्रदान केले. यावेळी गृहमंत्र्यांनी भारतीय भाषा अनुभाग (भारतीय भाषा विभाग) या विभागाचा शुभारंभ केला.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, गेल्या 75 वर्षांचा प्रवास हिंदीचा अधिकृत भाषा म्हणून स्वीकार करत  यातून  आपल्या परंपरा, संस्कृती, भाषा, साहित्य, कला आणि व्याकरण यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा आणि त्या माध्यमातून देशातील सर्व स्थानिक भाषांना जोडण्याचा  प्रवास आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, आज भारतीय भाषा विभागाचे उद्घाटन करण्यात आले आहे.  हा भारतीय भाषा विभाग येत्या काही वर्षांत आपल्या भाषांच्या संरक्षणाचे केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हिंदी आणि स्थानिक भाषांमध्ये कधीही स्पर्धा होऊ शकत नाही कारण हिंदी ही सर्व स्थानिक भाषांची सखी आहे, असे अमित शाह म्हणाले. हिंदी आणि स्थानिक भाषा एकमेकांना पूरक असल्याचे त्यांनी सांगितले.

जे स्वराज्य, स्वधर्म आणि स्वभाषा यांचा आदर करत नाहीत ते कधीही आपल्या भावी पिढ्यांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करू शकत नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. स्वराज्याच्या व्याख्येतच स्वभाषेचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की जे देश आणि लोक आपल्या भाषेचे रक्षण करू शकत नाहीत ते इतिहास, साहित्य, संस्कृती यापासून फारकत घेतात आणि त्यांच्या भावी पिढ्या गुलामीच्या मानसिकतेने जगत राहतात. ते पुढे म्हणाले की, नवीन शिक्षण धोरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर दिला आहे.

आपल्या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत हिंदीचे प्रचंड मोठे योगदान आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 1857 ची क्रांती अपयशी ठरण्यामागे एक मुख्य कारण होते ते म्हणजे त्या काळात सर्वांना जोडणाऱ्या भाषेचा अभाव, असे ते म्हणाले.  आपल्या देशाची एकतेची बांधणी ही संस्कृतीवर झालेली आहे.  आपली संस्कृती भाषांनी जोडलेली  आणि बांधलेली आहे आणि ज्या दिवशी आपण आपल्या भाषा गमावून बसू, त्यावेळी देशाची एकात्मता धोक्यात येईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

आपल्या भाषा जर कोणी वाचवू शकत असेल तर त्या आहेत केवळ माता, असे त्यांनी सांगितले. आपल्या लहानग्यांसोबत मातृभाषेतूनच बोलण्याची त्यांनी सर्व पालकांना विनंती केली. जर आपण हे करू शकलो तर आपल्या भाषेला कोणताही धोका उत्पन्न होणार नाही, असे ते म्हणाले.

शब्द सिंधू शब्दकोशात आम्ही भारतातील प्रत्येक भाषेतील शब्द समाविष्ट केले आहेत, असे गृहमंत्री म्हणाले. ते म्हणाले की आपण हिंदीला स्वीकारार्ह, लवचिक आणि संभाषणात्मक बनवले पाहिजे. पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी शब्द सिंधू शब्दकोश हा जगातील सर्वात मोठा शब्दकोश बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शिक्षण, तंत्रशिक्षण आणि न्यायव्यवस्थेत हिंदीचा वापर करण्याच्या दिशेने काम करत आहे, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.

आज हिंदी ही संयुक्त राष्ट्रांची भाषा बनली आहे आणि 10 हून अधिक देशांची दुसरी भाषा बनली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. हिंदी आता आंतरराष्ट्रीय भाषा होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2055032) Visitor Counter : 44