पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रुनेईच्या सुलतानातर्फे आयोजित राजकीय मेजवानी प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

Posted On: 04 SEP 2024 12:32PM by PIB Mumbai

 

 

आदरणीय महाराज,

आदरणीय शाही मान्यवर,

राजघराण्यातील सन्माननीय सदस्य,

आदरणीय मान्यवरहो,

सभ्य स्त्री पुरूषहो,

स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आदरणीय महाराज आणि संपूर्ण राजघराण्याचे हृदयपूर्वक अनेकानेक आभार व्यक्त करतो. भारतीय पंतप्रधानांनी ब्रुनेईला दिलेली ही पहिलीच द्विपक्षीय भेट आहे. मात्र इथे मिळालेल्या आपुलकीच्या भावनेमुळे मला आपल्या दोन्ही देशांमधील शतकांपूर्वीचे जुने नाते प्रत्येक क्षणाला जाणवते आहे.

 

आदरणीय महाराज,

या वर्षी ब्रुनेईच्या स्वातंत्र्याचा 40 वा वर्धापन दिन आहे. आपल्या नेतृत्वाखाली ब्रुनेईने परंपरा आणि सातत्याचा महत्त्वपूर्ण संगम साधून प्रगती केली आहे. ब्रुनेईसाठी आपले "वावासन 2035" व्हिजन कौतुकास्पद आहे, 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी तुम्हाला आणि ब्रुनेईच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो.

 

मित्रहो,

भारत आणि ब्रुनेई यांच्यात गहिरे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. या वर्षी आम्ही आमच्या राजनैतिक संबंधांचा चाळीसावा वर्धापन दिन साजरा करत आहोत, या निमित्ताने आम्ही आमच्या संबंधांना वर्धित भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.

आमच्या भागीदारीला धोरणात्मक दिशा देण्यासाठी आम्ही सर्व पैलूंवर व्यापक चर्चा केली. आर्थिक, वैज्ञानिक आणि धोरणात्मक क्षेत्रात आमचे सहकार्य मजबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्ही कृषी उद्योग, फार्मा आणि आरोग्य तसेच फिनटेक आणि सायबर सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऊर्जा क्षेत्रात, आम्ही LNG मध्ये दीर्घकालीन सहकार्याच्या शक्यतांवर चर्चा केली. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी आम्ही संरक्षण उद्योग, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण करण्याच्या शक्यतांबाबत सकारात्मक विचार केला.

अंतराळ क्षेत्रात आमचे सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी उपग्रह विकास, रिमोट सेन्सिंग आणि प्रशिक्षणाबाबत आमच्यात एकमत झाले आहे.  दोन्ही देशांदरम्यान लवकरच थेट उड्डाणे सुरू केली जातील.

 

मित्रहो,

आमचे दोन्ही देशांमधल्या लोकांचे परस्परसंबंध हा आमच्या भागीदारीचा पाया आहे. भारतीय समुदाय ब्रुनेईच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजात सकारात्मक योगदान देत आहे, याचा मला आनंद वाटतो. काल भारतीय दूतावासाच्या लोकार्पणामुळे भारतीय समुदायाला एक कायमचा पत्ता मिळाला आहे.

भारतीय समुदायाचे कल्याण आणि हित जपल्याबद्दल आम्ही आदरणीय महाराज आणि त्यांच्या सरकारचे आभारी आहोत. मित्रहो, भारताच्या Act East Policy आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनमध्ये ब्रुनेई हा एक महत्त्वाचा भागीदार आहे.

भारताने नेहमीच आसियान केंद्रस्थानी असण्याला प्राधान्य दिले आहे आणि यापुढेही ते देत राहील. आम्ही UNCLOS सारख्या आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत फ्रीडम ऑफ नेव्हीगेशन आणि ओव्हर फ्लाईटचे समर्थन करतो. या क्षेत्रात आचारसंहितेवर एकमत असले पाहिजे. यावरही आमचे एकमत आहे. आमचा विस्तारवादाला नाही तर विकासाच्या धोरणाला पाठिंबा आहे,.

 

आदरणीय महाराज,

भारतासोबतच्या संबंधांप्रति आपल्या वचनबद्धतेसाठी आम्ही आपले आभारी आहोत. आज आपल्या ऐतिहासिक संबंधांमध्ये एक नवा अध्याय जोडला जातो आहे. पुन्हा एकदा, मला दिलेल्या सन्मानाबद्दल मी आपला खूप आभारी आहे. मी आपल्या, राजघराण्यातील सर्व सदस्यांच्या आणि ब्रुनेईच्या लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभेच्छा देतो.

अनेकानेक आभार!!!

***

S.Patil/M.Pange/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2052796) Visitor Counter : 33