पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी एईएम सिंगापूरला दिली भेट

Posted On: 05 SEP 2024 10:22AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग यांच्या समवेत सिंगापूरमधील सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील आघाडीची  कंपनी एईएम  ला भेट दिली. यावेळी त्यांना जागतिक सेमीकंडक्टर मूल्य साखळीतील एईएम ची भूमिका, तिचे कार्य आणि भारतासाठीच्या योजना यांबाबत माहिती देण्यात आली. सिंगापूर सेमीकंडक्टर उद्योग संघटनेनें  सिंगापूरमधील सेमीकंडक्टर परिसंस्थेचा विकास आणि भारताबरोबर सहकार्याच्या संधी याविषयी थोडक्यात माहिती दिली. या क्षेत्रातील सिंगापूरमधील अन्य विविध  कंपन्यांचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते. ग्रेटर नोएडा येथे 11-13 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या  सेमिकॉन इंडिया प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सेमीकंडक्टर कंपन्यांना आमंत्रित केले.
भारतात सेमीकंडक्टर उत्पादन व्यवस्था विकसित करण्याचे भारताचे प्रयत्न आणि या क्षेत्रातील सिंगापूरची ताकद लक्षात घेत, दोन्ही देशांनी  द्विपक्षीय सहकार्य आणखी विस्तारण्याचा  निर्णय घेतला आहे. भारत-सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषदेच्या दुसऱ्या बैठकीदरम्यान, द्विपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी एक आधारस्तंभ म्हणून सेमीकंडक्टर्सवर  लक्ष केंद्रित करून प्रगत निर्मितीची  जोड देण्याबाबत उभय देशांमध्ये  सहमती झाली. दोन्ही देशांनी  भारत-सिंगापूर सेमीकंडक्टर परिसंस्था भागीदारीबाबत  सामंजस्य करारही केला आहे.
एईएम येथे दोन्ही पंतप्रधानांनी सिंगापूरमध्ये प्रशिक्षण घेत असलेले ओदिशाच्या जागतिक कौशल्य केंद्रातील  भारतीय प्रशिक्षणार्थी तसेच सीआयआय -एंटरप्राइझ सिंगापूर इंडिया रेडी टॅलेंट कार्यक्रम अंतर्गत भारताला  भेट दिलेल्या सिंगापूरच्या इंटर्नशी आणि एईएम मध्ये काम करणाऱ्या भारतीय अभियंत्यांशी संवाद साधला.
दोन्ही पंतप्रधानांच्या या भेटीतून या क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याप्रति  दोन्ही देशांची वचनबद्धता अधोरेखित होते. या भेटीत सहभागी झाल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान वाँग यांचे आभार मानले.

***

SonalT/SushamaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2052062) Visitor Counter : 55