पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स 2024 मधील सहभागी भारतीय पथकाशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून साधलेला संवाद
Posted On:
19 AUG 2024 11:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 ऑगस्ट 2024
सूत्रसंचालक: नमस्कार सर, यानंतर सर्वप्रथम आपण आपल्या धनुर्धारी शीतल देवी जी यांच्याशी संवाद साधू. शीतल देवी
पंतप्रधान: नमस्ते शीतल,
शीतल: नमस्ते सर, जय माता दी.
पंतप्रधान: जय माता दी.
शीतल: मी शीतल.
पंतप्रधान: शीतल, तुम्ही भारतीय संघातील सर्वात तरुण खेळाडू आहात आणि हे तुमचे पहिले पॅरालिम्पिक असेल. मनात खूप काही विचारचक्र सुरू असेल. काय ते सांगता येईल का? तुम्हाला काही ताण तर वाटत नाही ना?
शीतल: नाही सर, कोणताही ताण नाही आणि इतक्या लहान वयात, अल्पावधीत मी पॅरालिम्पिक खेळणार याचा मला खूप आनंद आहे. आणि सर, इतक्या कमी वेळात आणि इतक्या लहान वयात मी पॅरालिम्पिकमध्ये खेळणार ही खूप आनंदाची बाब आहे. आणि त्यात श्राइन बोर्डाचाही मोठा वाटा आहे, त्यांनी मला चांगली साथ दिली आहे. सर्वांचा खूप चांगला पाठिंबा होता. तेव्हाच मी इथवर पोहोचू शकले सर.
पंतप्रधान: ठीक आहे शीतल, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये तुमचे लक्ष्य काय आहे आणि तुम्ही त्यासाठी काय आणि कशी तयारी केली आहे?
शीतल: हो सर, माझी तयारी खूप छान चालली आहे, प्रशिक्षण पण उत्तम मिळत आहे सर. आणि इथे माझ्या देशाचा तिरंगा फडकवण्याचा माझा उद्देश आहे. आपल्या राष्ट्रगीताची धून कानी पडावी हे माझे ध्येय आहे. आणि याहून महत्वाचे माझ्यासाठी काहीच नाही सर.
पंतप्रधान: शीतल, मी आधीच म्हटल्याप्रमाणे, या पथकातील तुम्ही सर्वात लहान खेळाडू आहात. माझा तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धेचे दडपण घेऊ नका. जिंकणे किंवा हरण्याचे दडपण न घेता तुमची सर्वोत्तम कामगिरी करा. संपूर्ण देशाच्या वतीने आणि माझ्याकडून सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आणि माताजींचा आशीर्वाद सदैव आहे, माता वैष्णोदेवीचा कृपाशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहे. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.
शीतल: धन्यवाद सर, माता राणीनेही मला भरभरून आशीर्वाद दिला आहे, म्हणूनच मी इतक्या अल्पावधीत इथपर्यंत पोहोचले आहे. सर, माता राणीचे अनेक आशीर्वाद आहेत. आणि सर, तमाम भारतीयांचा आशीर्वाद आहे सर, ज्यांच्यामुळें आज मी इतक्या तरुणपणी इथवर पोहोचले. तुमचेही आशीर्वाद मला लाभले आहेत सर. धन्यवाद सर.
पंतप्रधान: खूप खूप शुभेच्छा.
सूत्रसंचालक: कु. अवनी लेखरा
पंतप्रधान: नमस्कार अवनी.
अवनी लेखरा: नमस्कार सर!
पंतप्रधान: अवनी, गेल्या पॅरालिम्पिकमध्ये तुम्ही एका सुवर्णपदकासह दोन पदके जिंकून संपूर्ण देशाचा गौरव वाढवला. यावेळी कोणते लक्ष्य ठेवले आहे?
अवनी लेखरा: सर, मागच्या वेळी माझी पहिली पॅरालिम्पिक स्पर्धा होती, त्यामुळे मी चार स्पर्धांमध्ये भाग घेतला. अनुभव घेत होते. यावेळी खेळ आणि तंत्र या दोन्ही बाबतीत ऑलिम्पिकसाठी बरीच परिपक्वता आली आहे. यावेळीही मी ज्या काही क्रीडाप्रकारात भाग घेत आहे त्यात माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. आणि संपूर्ण भारताकडून जो पाठिंबा, अपार प्रेम मिळाले आहे, गेल्या पॅरालिम्पिकनंतर तुमचाही खूप पाठिंबा मिळाला आहे; त्यातून मला खूप प्रेरणा मिळते. तिथे जाऊन स्वतःची सर्वोत्तम कामगिरी करणे आणि चांगले निकाल देणे ही जबाबदारीही असते.
पंतप्रधान: अवनी, टोकियोमधून विजयी होऊन परतल्यावर तुमच्या आयुष्याला कशी कलाटणी मिळाली? नवीन स्पर्धेसाठी तुम्ही स्वत:ला सतत कसे तयार ठेवले?
अवनी लेखरा: सर, मागच्या वेळी मी जेव्हा सहभागी झाले होते, तेव्हा मला हे जमणार की नाही अशी धाकधूक होती पण त्यात मी दोन पदके जिंकल्यावर ती काळजी एकप्रकारे मिटली. आणि मी विचार केला की मी हे एकदा करू शकले तर, कठोर परिश्रम केल्यास मी यापुढेही करू शकेन. आणि जेव्हा मी भारतासाठी भाग घेते, विशेषत: व्हील चेअरवरून जेव्हा मी देशाचे प्रतिनिधित्व करते, तेव्हा माझ्या भावना उचंबळून येतात आणि पुन्हा पुन्हा सहभागी होण्याची शक्ती मिळते.
पंतप्रधान: अवनी, तुम्हाला स्वतःकडून आणि देशाला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. पण मला एवढेच सांगायचे आहे की या अपेक्षांचे ओझे होऊ देऊ नका. आशेला तुमची शक्ती बनवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
अवनी लेखरा: धन्यवाद सर!
सूत्रसंचालक: श्री. मरियप्पन थांगावेलू
मरियप्पन थांगावेलू: वनकम्म सर.
पंतप्रधान: मरियप्पन जी, वनकम्म. मरियप्पन, तुम्ही टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले. यावेळी रौप्य पदकाच्या ऐवजी सुवर्ण पदकप्राप्तीचे तुमचे ध्येय असेल. तुमच्या मागील अनुभवातून तुम्हाला आणखीन काय काय शिकता आले?
मरियप्पन: सर, माझे जर्मनीत प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षण चांगले झाले. गेल्या वेळी जराशा चुकीने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. यावेळी 100% सुवर्ण पदक मिळेल.
पंतप्रधान: नक्की?
मरियप्पन: नक्की सर, 100 टक्के
पंतप्रधान: ठीक आहे मरियप्पन, तुम्ही खेळाडू आणि प्रशिक्षक दोन्ही आहात. 2016 मधील आणि आत्तापर्यंतची दिव्यांग खेळाडूंची संख्या पाहता, या संख्येत मोठी वाढ झाली आहे. हा बदल तुम्हाला कसा वाटतो?
मरियप्पन: सर, 2016 मध्ये मी पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये प्रवेश केला होता. मला थोडी भीती वाटत होती की फक्त सुवर्ण पदक मिळत नाहीये, ते हुलकावणी देताय. बहुतेक खेळाडू, पॅरालिम्पिकचे संपूर्ण कर्मचारी, क्रीडा क्षेत्रात जे काही घडले आहे ते पाहून माझ्या नावाचे समर्थन करण्यासाठी अधिकाधिक लोक पुढे येत आहेत. आता मी भारतासाठी 100 पदके आणावीत, ती मी भारताच्या नावावर करून दाखवावीत असे त्यांना वाटते आणि हे 100% साध्य होणार सर. (09:47)
पंतप्रधान: मरियप्पन, आमच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. तुम्ही फक्त तुमच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करा. देश तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
मरियप्पन: धन्यवाद सर.
सूत्रसंचालक: श्री. सुमित अंतिल
पंतप्रधान: नमस्कार सुमित.
सुमित अंतिल: नमस्कार सर. ठीक आहे सर.
पंतप्रधान: सुमित, तुम्ही आशियाई पॅरा गेम्स आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून एकामागून एक जागतिक विक्रम केले आहेत. स्वतःचाच विक्रम मोडण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळते?
सुमित अंतिल: सर, मला असे वाटते की भारतात प्रेरणास्थानांची उणीव नाही, आमचे पीसीआय अध्यक्ष देवेंद्र झांझरिया भाई साहेब, नीरज चोप्रा भाई साहेब, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी माझ्या आधी देशाचा गौरव वाढवला आहे. प्रेरणा दिली आहे, त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळते सर. पण प्रेरणेपेक्षा, स्वयंशिस्त आणि स्वयंप्रेरणेने एकामागून एक जागतिक विक्रम मोडण्यात अधिक काम केले आहे, सर.
पंतप्रधान: कसे आहे ना सुमित, सोनीपतची तर मातीच खूप खास आहे. आणि तुमच्यासारखे अनेक विश्वविक्रम धारक आणि खेळाडू येथेच घडले आहेत. हरियाणाच्या क्रीडा संस्कृतीतून तुम्हाला किती मदत मिळाली?
सुमित अंतिल: हो सर, नक्कीच. इथले लोक ज्या प्रकारे समर्थन करतात आणि सरकार ज्या प्रकारे पाठबळ देते, त्याचा खूप मोठा प्रभाव आहे सर कि हरियाणातील अनेक खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करतात आणि देशाचा गौरव वाढवतात. सरकारने सुद्धा खूप साथ दिली आहे सर, लोक इथे ज्या प्रकारे क्रीडा संस्कृती निर्माण करत आहेत, मला वाटतं सर त्याचा जास्त फायदा होतोय.
पंतप्रधान: सुमित, तुम्ही जगज्जेते आहात. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहात. माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी असतील. तुमची उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवा. संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. खूप खूप शुभेच्छा!
सुमित अंतिल: खूप खूप धन्यवाद सर.
सूत्रसंचालक: अरुणा तंवर
अरुणा तंवर: नमस्कार सर! रक्षाबंधनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!
पंतप्रधान: अरुणा जी, तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा!
अरुणा तंवर: धन्यवाद सर!
पंतप्रधान: अरुणा तुमच्या यशात तुमच्या वडिलांचा मोठा वाटा असल्याचं मी ऐकलं आहे. त्यांच्या पाठिंब्याबद्दल आणि तुमच्या प्रवासाबद्दल काही सांगाल का?
अरुणा तंवर: सर, कुटुंबाशिवाय आपण सामान्य स्पर्धा देखील खेळू शकत नाही. मी तर दुसऱ्यांदा पॅरालिम्पिक खेळणार आहे. पप्पांनी सुरुवातीपासूनच खूप साथ दिली. यासोबतच माझ्या आईनेही खूप साथ दिली कारण सामाजिक दबाव असतो, ही तर दिव्यांग आहे तर ती काय करू शकणार असा लोकांचा वेगळा दृष्टिकोन असतो, पण मी खूप काही करू शकते, असा विश्वास माझ्या आई-वडिलांनी मला दिला. आज, माझ्या घरात माझ्या भावांप्रमाणेच मला वागवले जाते. आई सांगते की, आम्ही तिघे भाऊ आहोत, त्यामुळे घरच्यांचा मला सुरुवातीपासून खूप पाठिंबा मिळाला, सर.
पंतप्रधान: अरुणा, गेल्या पॅरालिम्पिकमध्ये एका महत्त्वाच्या सामन्यापूर्वी तुम्ही जखमी झाला होता. या दुखापतीनंतर तुम्ही स्वतःला कसे प्रेरित केले आणि त्यावर मात कशी करता आली?
श्रीमती अरुणा तन्वर: सर, जेव्हा तुम्ही मुख्य स्पर्धेचे प्रतिनिधित्व करता, जेव्हा तुम्ही भारताचे प्रतिनिधित्व करता तेही एका क्रीडाप्रकारात!. पॅरालिम्पिकमध्ये मी संपूर्ण तायक्वांदो समितीचे प्रतिनिधित्व केले होते, पण दुखापतीमुळे मी मागे पडले. पण सर, दुखापत तुमचा खेळ थांबवू शकत नाही कारण माझे ध्येय खूप मोठे आहे. जोपर्यंत तुम्हाला दुखापत होत नाही तोपर्यंत तुम्हाला खेळाचा आनंदही घेता येणार नाही. दुखापती हा तर खेळातील एक दागिना आहे सर, त्यामुळे एका खेळाडूला पुनरागमन करणे इतके अवघड नव्हते सर, मी फक्त स्वतः खंबीर राहिले. माझ्या प्रशिक्षक, ज्या सध्या भारती मॅडम आहेत त्यांनी आणि माझ्या पालकांनी मला सांगितले की एक पॅरालिम्पिक तुमचे भविष्य ठरवत नाही, अजून अनेक पॅरालिम्पिक खेळायचे आहेत.
पंतप्रधान: अरुणा, तुम्ही दुखापतीला दागिना मानता, हीच तुमची मानसिकता सर्वांना प्रेरणा देणारी आहे. पण तुम्ही असा दागिना घालावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. अरुणा तुम्ही लढाऊ बाण्याच्या आहात. तुमच्या खेळात आणि तुमच्या आयुष्यात, दोन्हीत! तुम्ही देशासाठी पदके तर जिंकलीत पण सोबत लाखो मुलींना प्रेरणाही दिली. पॅरिसमध्ये लढाऊ मानसिकतेसह तुम्ही चमकदार कामगिरी करा. संपूर्ण देशाच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.
श्रीमती अरुणा तन्वर: खूप खूप आभार, सर!
पंतप्रधान: अच्छा मंडळी, आता काही प्रश्न मी स्वतः विचारु इच्छितो, ज्यांचे उत्तर तुमच्यापैकी कोणीही देऊ शकते. विशेषत: जे लोक अद्याप काहीच बोललेले नाहीत, त्यांनी बोलायला हवे, अशी माझी अपेक्षा आहे. बरं, तुमच्यापैकी बरेच खेळाडू तुमच्या पहिल्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पॅरिसला जात आहेत. प्रथमच अशा जागतिक स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करताना तुम्हाला कसे वाटते हे कोणी सांगू शकेल का? जे अजून बोललेले नाहीत ते बोलतील!
अशोक मलिक: सर, माझे नाव अशोक आहे! सर, मी पहिल्यांदाच जात आहे सर! प्रत्येक खेळाडूचे एक स्वप्न असते...
पंतप्रधान: पूर्ण नाव काय तुमचे?
अशोक मलिक: अशोक मलिक सर!
पंतप्रधान: अशोक जी, हं सांगा!
अशोक मलिक: प्रत्येक खेळाडूचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न असते आणि सर, माझे हे स्वप्नही पूर्ण होणार आहे. मीही माझ्या देशासाठी पॅरिस पॅरालिम्पिकला जात आहे सर. मी तिथे माझी सर्वोत्तम कामगिरी करेन सर, शक्य झाल्यास मी माझ्या देशासाठी पदकही आणीन सर.
पंतप्रधान: अशोक तुम्ही कुठून आहात?
अशोक मलिक: सर मी हरयाणाचा आहे, सोनीपतचा!
पंतप्रधान: सोनीपतचे, तुम्हीही सोनीपतचे आहात!
अशोक मलिक: हो सर!
पंतप्रधान: बरं, तुमच्यापैकी किती जण तुमच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पॅरालिम्पिक किंवा त्याहून अधिक वेळा पॅरालिम्पिकला जाणार आहात? किंवा तुमच्या पहिल्या पॅरालिम्पिकमध्ये किती वेगळं वाटत होतं…आणि आता… कारण तुम्ही आधीही तिथे गेला होता, आताही जात आहात…..कोण सांगू शकेल?
अमित सरोहा: नमस्कार सर!
पंतप्रधान: नमस्कार हो!
अमित सरोहा: सर, मी अमित सरोहा आहे सर.. आणि ही माझी चौथी पॅरालिम्पिक स्पर्धा आहे आणि मी संघातील वयाने सर्वात ज्येष्ठ खेळाडू आहे, जो चौथ्यांदा पॅरालिम्पिकसाठी जात आहे. सर, सर्वात मोठा बदल हा झाला आहे की 2012 मध्ये आम्ही गेलो होतो तेव्हा आम्हाला एकच पदक मिळाले होते आणि त्यानंतर मी दुसरे-तिसरे ऑलिम्पिक खेळले होते, मी पॅरालिम्पिक खेळांना गेलो होतो, सर, तिथे आमची पदकांची आणि संघाची कामगिरी वाढतच गेली आणि आता आमच्याकडे 84 खेळाडू आहेत सर. सर, यात SAI (स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया- भारतीय क्रीडा प्राधिकरण) ने मोठी भूमिका बजावली आहे कारण आमच्या चमुला मिळणारा पाठिंबा आणि आर्थिक मदत खूप वाढली आहे, सर. आणि कुठेतरी 2015 नंतर, TOPS(टार्गेट ऑलिंपिक पोडीयम स्कीम अर्थात ऑलिंपिक खेळण्याचे ध्येय योजना) च्या आगमनाने, आम्हाला इतका पाठिंबा मिळाला आहे की सर, आता आम्ही परदेशात कुठेही प्रवास करू शकतो आणि कुठेही प्रशिक्षण घेऊ शकतो. आमच्याकडे वैयक्तिक प्रशिक्षक, वैयक्तिक भौतिकोपचार तज्ञ (फिजिओ), वैयक्तिक सहाय्यक कर्मचारी वर्गही आहेत, ज्या काही गरजा आहेत, त्या पूर्ण केल्या जात आहेत आणि त्यामुळेच आम्ही एवढी चांगली कामगिरी करू शकत आहोत आणि आज आम्हाला आशा आहे की सर, यावेळी आम्ही नक्कीच मागील विक्रमापेक्षा अधिक पदके जिंकू शकू सर.
पंतप्रधान: बरं, मला आपल्या या पथकात अनेक तरुण मंडळी दिसतेय जे अजूनही शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात आहेत. तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत खेळाचे व्यवस्थापन कसे करता?
रुद्रांश खंडेलवाल: माझे नाव रुद्रांश खंडेलवाल आहे. मी भरतपूर राजस्थानचा आहे आणि या वर्षीच मी 12 वी बोर्डाची परीक्षा दिली आणि खूप चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो…..मला 83% मिळाले आणि त्या वेळी नवी दिल्लीत विश्वचषक सुरु होता, त्यामुळे मी दोन्ही गोष्टी एकाच वेळी करत होतो. सांभाळत होतो. त्यामुळे मला वाटते की शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टी जीवनात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण खेळामुळे तुमचे व्यक्तिमत्त्व विकसित होते, तुमचा दिवसेंदिवस विकास होतो आणि शिक्षणामुळे तुम्हाला जीवन कसे जगायचे आणि तुमचे अधिकार काय आहेत, या सर्व गोष्टी कळतात. त्यामुळे मला वाटतं सर, दोन्ही सांभाळणे इतके अवघड नाही आणि दोन्हीही बाबी खूप महत्त्वाच्या आहेत.
पंतप्रधान: बरं, पॅरा ऍथलीट्सच्या (दिव्यांग क्रीडापटू) सूचनेवरुनच, आम्ही डिसेंबर 2023 मध्ये पहिल्यांदा खेलो इंडिया पॅरा गेम्स चे (राष्ट्रीय दिव्यांग क्रीडा स्पर्धा) आयोजन केले. अशा कार्यक्रमामुळे क्रीडा परिसंस्थेला कशी मदत होते हे कोणी मला सांगू शकेल का?
भाविना: नमस्कार सर!
पंतप्रधान: नमस्कार!
भाविना: मी भाविना आहे सर!
पंतप्रधान: हो भाविना, कशा आहात?
भाविना: मी ठीक आहे सर, आपण कसे आहात?
पंतप्रधान: हो भाविना, सांगा!
भाविना: सर खेलो इंडिया अभियानाने गेल्या काही वर्षांत भारतातील क्रीडा विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, त्यामुळे तळागाळातून अनेक गुणवान क्रीडापटू उदयास आले आहेत. खेलो इंडियामध्ये पॅरा स्पोर्ट्सचा (दिव्यांग क्रीडास्पर्धा) समावेश झाल्यापासून पॅरा खेळाडूंना (दिव्यांग क्रीडापटू) चांगले व्यासपीठ आणि नवीन दिशा मिळाली आहे. आपल्या खेलो इंडिया स्पर्धेतून 16 खेळाडू पॅरिस पॅरालिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत, हे मी सर्वात उत्तम उदाहरण देऊ शकते.
पंतप्रधान: व्वा छान! मला दुसरे असे सांगा… चांगल्या खेळाडूंसाठी दुखापत ही मोठी समस्या असते. पॅरालिम्पिकची तयारी करताना खेळाडू दुखापतींना कसे सामोरे जातात? तुम्ही स्वतःला प्रेरित कसे ठेवता?
तरुण ढिल्लन: नमस्कार सर!
तरुण धिल्लन: सर, माझे नाव तरुण धिल्लन आहे. मी हिसार, हरियाणाचा आहे सर! सर, माझा खेळ बॅडमिंटन आहे, आणि सर तुम्ही दुखापतीबद्दल विचारले तर मी तुम्हाला माझा एक अनुभव सांगेन सर. सर, 2022 मध्ये कॅनडा इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या सामन्यादरम्यान, माझ्या गुडघ्यातील लिगामेंट तुटले होते, सर, बॅडमिंटनपटूसाठी ही एक गंभीर दुखापत आहे, सर, मी खूप भाग्यवान आहे की मी एक TOPS ऍथलीट आहे. आणि सर्व खेळाडूंना आणि सरांना, मी तुम्हाला हे सांगेन की, त्या वेळी TOPS मध्ये असल्यामुळे, माझ्या दुखापतीपासून, SAI अधिकारी आणि Sports SAI च्या टीमने मला खूप मदत केली आणि तिथून मला बिझनेस क्लासचे विमानाचे तिकीट देऊन विशेष विनंती करून भारतात आणण्यात आले आणि माझी शस्त्रक्रिया सर्वोत्तम डॉक्टरांनी केली. डॉ. दिनशॉ सर ते मुंबईत आहेत.
आणि अतिशय कमी वेळात, माझ्या दुखापतीवर माझी शस्त्रक्रिया झाली आणि माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी SAI च्या अधिकाऱ्यांनी मला दिलेले पाठबळ, या शस्त्रक्रियेनंतर, जे खेळाडूसाठी सर्वात महत्वाचे जे असते, ते म्हणजे खेळात पुनरागमन करणे. तर त्यासाठी, सर, पुनर्वसनासाठी, मला ग्राउंडवर एक फिजिओ देण्यात आला, सर, SAI कडून सर, TOPS योजनेद्वारे. आणि सर माझ्या डॉक्टरांनी मला सांगितले की बरे होण्यासाठी 10-11 महिने लागतील पण सर SAI च्या पाठबळामुळे मी सांगेन सर मी 7 महिन्यात बरा झालो आणि 8व्या महिन्यात सर मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेलो आणि मी तेथे सुवर्णपदक जिंकलो सर. त्यामुळे सर, मला असे वाटते की, आजच्या काळात, TOPS योजनेमुळे, आमच्यासारखे लोक जे मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, अशा मोठ्या दुखापतींवर सहज उपचार करू शकतात आणि त्यांचे पुन्हा क्रीडा क्षेत्रात जाण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतात, सहजपणे साध्य करू शकतात.
पंतप्रधान: तुमचे खूप खूप अभिनंदन! बरं, तुमच्यापैकी अनेकांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोअर्स आहेत, तुमच्यापैकी कोणी मला सांगू शकेल का की सोशल मीडिया खेळासाठी कशी मदत करतो?
योगेश कथुनिया: नमस्कार सर! हर हर महादेव ! माझे नाव योगेश कथुनिया आहे, मी बहादूरगड, हरियाणाचा आहे. तर सर, तसं बघितलं तर, सोशल मीडियाचा परिणाम पॅरा स्पोर्ट्सवर खूप सकारात्मक झाला आहे, अनेक गोष्टी पहिल्या क्रमांकावर येतात, लोकांमध्ये पूर्वी नसलेली जागरुकता वाढली आहे, हळूहळू भारतातील लोकांच्या लक्षात येत आहे. पॅरा स्पोर्ट्स ही सुद्धा एक गोष्ट आहे आणि अनेक नवीन खेळाडू ज्यांना यायचे आहे, म्हणजे ते सोशल मीडियावरून पाहातात आणि पॅरा स्पोर्ट्सकडे वळतात. त्यामुळे अनेक दिव्यांग लोक ज्यांना असे वाटायचे की आपण फक्त अभ्यास केला पाहिजे आणि फक्त हेच केले पाहिजे, पण हळूहळू आपण पाहात आहोत की संख्या वाढत आहे आणि अनेक लोक पॅरा स्पोर्ट्सकडेही वळत आहेत. आणि पॅरा स्पोर्ट्स पाहण्याची सवय सोशल मीडियामुळे खूप वाढू लागली आहे आणि आम्हाला सोशल मीडियाद्वारे लोकांशी जोडले जाण्याची एक संधी मिळते, सोशल मीडियावर आमचे जितके चाहते आहेत आणि जितके लोक आहेत जे जे आमचे व्हिडिओ पाहतात, ते आमचा व्हिडिओ पाहून प्रेरित होतात. तळागाळातील जे क्रीडापटू भावी खेळाडू हे व्हिडिओ पाहतात, ते त्यांच्या सरावातही त्यांचा समावेश करतात. म्हणजे पॅरा स्पोर्ट्सच्या वृद्धीवर सोशल मीडियाचा खूप प्रभाव पडला आहे.
सादरकर्ता: सर, आमच्या खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करावे अशी विनंती आहे, सर. धन्यवाद सर.
पंतप्रधान: देशाचे क्रीडा मंत्री श्री मनसुख मांडविया जी, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जी. जगाच्या कानाकोपऱ्यात उपस्थित पॅरालिम्पिक खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारीगण हो. आज तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली आहे. आपण सर्वजण आता VC च्या माध्यमातून दूर-दूरवर फायनल कोचिंगच्या स्थितीत आहोत, त्यावेळी मलाही तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. बघा, तुम्ही सर्वजण भारताचे ध्वजवाहक म्हणून पॅरिसला जात आहात. हा प्रवास तुमच्या आयुष्यातील आणि तुमच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा प्रवास असणार आहे आणि तुमचा हा प्रवास देशासाठीही तितकाच महत्त्वाचा आहे. देशाचा अभिमान पॅरिसमधील तुमच्या उपस्थितीशी जोडलेला आहे. म्हणून, आज संपूर्ण देश तुम्हाला आशीर्वाद देत आहे, आणि आपल्याकडे अशी परंपरा आहे, की जेव्हा अशा प्रकारे आशीर्वाद दिला जातो तेव्हा लोक म्हणतात – विजयी भवः, 140 कोटी देशवासी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत – विजयी भवः तुमचा उत्साह दर्शवतो की तुम्ही सर्वजण टोकियो आणि आशियाई पॅरा गेम्स सारखे नवीन विक्रम रचण्यास आतुर आहात. तुमची वाटचाल सुरू करा आणि हिंमत आणि धैर्याची शक्ती काय आहे ते दाखवा. पॅरिस पॅरालिम्पिकसाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. मित्रांनो कोणत्याही खेळातील खेळाडू जेव्हा एवढ्या मोठ्या मंचावर पोहोचतो तेव्हा त्याच्यामागे धैर्य, समर्पण आणि त्यागाची संपूर्ण गाथा असते. खेळाडू कोणताही असो, त्याचा पाया धैर्यावर उभा असतो. शिस्तीच्या सामर्थ्याने खेळाडू पुढे जातो. त्याचे यश, त्याचा आत्मविश्वास आणि आत्म-नियंत्रणाचा दाखला असतो. पण पॅरा ॲथलीट्सचा विचार केला तर हे सत्य आणि हे आव्हान कितीतरी पटीने मोठे होते. तुमची इथपर्यंत पोहोचणे हेच दर्शवते की तुम्ही आतून किती मजबूत आहात. तुमचे यश हे दर्शवते की तुमच्यात केवळ प्रतिकूल वाऱ्यांनाच नाही तर प्रतिकूल वादळांनाही तोंड देण्याची क्षमता आहे. तुम्ही समाजाच्या प्रस्थापित विचारसरणींचा पराभव केला आहे, शरीराच्या आव्हानांना तुम्ही पराभूत केले आहे. त्यामुळे यशाचा मंत्र तुम्हीच आहात, तुम्हीच यशाचे उदाहरण आहात आणि तुम्हीच यशाचा दाखला आहात. तुम्ही संपूर्ण आत्मविश्वासाने मैदानात उतरा, मग तुम्हाला जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
मित्रांनो,
भारताच्या यशामध्ये आणि पॅरा गेम्समध्ये भारताचा दबदबा गेल्या काही वर्षांत कशा प्रकारे वाढला आहे याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. 2012 च्या लंडन पॅरालिम्पिकमध्ये भारताला फक्त एकच पदक मिळाले होते. आपल्याला एकही सुवर्णपदक मिळाले नाही. 2016 मध्ये भारताने रियोमध्ये 2 सुवर्ण आणि एकूण 4 पदके जिंकली होती. आणि…आपण टोकियो पॅरालिम्पिकमध्ये विक्रमी 19 पदके जिंकली. भारताने 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्यपदके जिंकली होती. तुमच्यातील सध्याचे अनेक खेळाडू आपल्या त्या पथकात सहभागी होते आणि त्यांनी पदकेही मिळवली होती. पॅरालिम्पिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंत जिंकलेल्या 31 पदकांपैकी 19 पदके एकट्या टोकियोमध्ये मिळाली आहेत. गेल्या 10 वर्षात भारताने खेळात आणि पॅरा गेम्समध्ये किती उंच भरारी घेतली आहे याची तुम्ही कल्पना करू शकता.
मित्रांनो,
क्रीडा क्षेत्रातील भारताचे यश हे समाजाच्या खेळाविषयीच्या बदललेल्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे. एक काळ असा होता की, खेळ म्हणजे फावल्या वेळात करायचे काम मानले जात होते. जो कोणी रिकामा असेल तो खेळ खेळायचा आणि आज जो खेळतो तो विकास करतो. कुटुंबातही कोणी जास्त खेळला तरी त्याला बोलणी खावी लागायची, खेळाला करिअर समजले जात नव्हते, करिअरमध्ये तो अडथळा मानला जायचा, खेळात संधी नगण्य होत्या. माझ्या दिव्यांग बांधवांनाही कमकुवत आणि आश्रित मानले जात होते. आम्ही ही विचारसरणी बदलली आणि त्यांच्यासाठी अधिक संधी निर्माण केल्या. आज पॅरा स्पोर्ट्सलाही इतर खेळांप्रमाणेच प्राधान्य मिळते. आता देशात ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ही सुरू झाले आहेत. पॅरा ऍथलीट्सना मदत करण्यासाठी ग्वाल्हेरमध्ये पॅरा क्रीडा प्रशिक्षण केंद्र देखील स्थापन करण्यात आले आहे. आमच्या पॅरा ॲथलीट्सना TOPS आणि खेलो इंडिया सुविधांचा लाभ मिळत आहे. मला आनंद आहे की या समूहात देखील 50 खेळाडू TOPS योजनेशी संबंधित आहेत आणि 16 खेळाडू खेलो इंडियाचे खेळाडू आहेत. तुमच्या विशेष गरजा लक्षात घेऊन परदेशी प्रशिक्षक, तज्ज्ञ आणि सपोर्ट स्टाफचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आणि यावेळी तुम्हाला पॅरिसमध्ये आणखी एक अद्भुत गोष्ट पाहायला मिळेल. पॅरिस पॅरालिम्पिक गेम्स व्हिलेजमध्ये तुमच्या सर्वांसाठी एक विशेष recovery center देखील तयार करण्यात आले आहे. मला आशा आहे की हे recovery center देखील आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
मित्रांनो,
पॅरिस 2024 पॅरालिम्पिक देशासाठी इतर अनेक प्रकारे विशेष आहे. अनेक खेळांमध्ये आपले स्लॉट वाढले आहेत, आपली भागीदारी वाढली आहे. मला विश्वास आहे की पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा भारताच्या स्वर्णिम प्रवासातील एक मोठा मैलाचा दगड ठरेल. नवनवे विक्रम प्रस्थापित करून तुम्ही जेव्हा मायदेशी परत याल तेव्हा आपण पुन्हा एकदा भेटू. तुम्हा सर्वांना देशाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि देश तुमच्यासाठी एकच मंत्र म्हणत आहे - विजयी भवः, विजयी भवः, विजयी भवः
धन्यवाद.
* * *
S.Tupe/Vasanti/Ashutosh/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2048521)
Visitor Counter : 105