महिला आणि बालविकास मंत्रालय

हवाई दलापासून ते प्रत्येक क्षेत्रात महिला अतुलनीय उत्कृष्टता दाखवत आहेत, त्यांचे यश नारी शक्ती आणि सामर्थ्याचा पुरावा आहे: पंतप्रधान


आपले भविष्य घडवण्यात आणि आपल्या समाजाची प्रगती करण्यात महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून ‘विकसित भारता' साठी आपण प्रयत्नशील असताना, आपण महिलांचे सक्षमीकरण आणि उन्नती करत राहणे आवश्यक आहे: महिला आणि बालविकास मंत्री

महिलांचे सक्षमीकरण म्हणजेच विकसित भारताची निर्मिती - मंत्रालयाने स्वातंत्र्य दिनासाठी 161 लाभार्थ्यांचा विशेष अतिथी म्हणून केला सन्मान

Posted On: 15 AUG 2024 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 ऑगस्ट 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 15 ऑगस्ट 2025 रोजी नवी दिल्लीतील प्रतिष्ठित लाल किल्ल्यावरून 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात देशाचे नेतृत्व केले. या समारंभात त्यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि या ऐतिहासिक किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधला.

(फोटो कॅप्शन: देशभराच्या विविध क्षेत्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी लाल किल्ला येथे स्वातंत्र्य दिवस समारंभ साजरा केला)

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात सांगितले की, “ हवाई दलापासून ते प्रत्येक क्षेत्रात महिला अतुलनीय उत्कृष्टता दाखवत आहेत. त्यांची कामगिरी नारी शक्ती आणि सामर्थ्याचा पुरावा आहे. म्हणूनच जसजसे आपण पुढे जात आहोत, तसतसे आपण आपल्या राष्ट्राच्या प्रगतीत त्यांच्या उल्लेखनीय योगदानाला पाठिंबा देत राहू या.”

पंतप्रधान म्हणाले की, “नोकरदार महिलांसाठी प्रसूती रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्यात आली आहे. आम्ही केवळ महिलांचा आदर करत नाही, तर त्यांच्यासाठी संवेदनशील निर्णयही घेतो. आमचे उद्दिष्ट असे आहे की, एका मातेला तिच्या मुलाला एक गुणवत्तापूर्ण नागरिक बनविण्यात सरकार अडथळा ठरू नये. गेल्या 10 वर्षात 10 कोटी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊन बचत गटांमध्ये सामील झाल्या आहेत. जेव्हा स्त्रिया आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करतात, तेव्हा त्या घरगुती निर्णय प्रक्रियेत सक्रीय सहभागी होतात, ज्यामुळे सामाजिक बदल घडतात. आजपर्यंत देशभरातील बचत गटांना 9 लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.”

स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, “स्वातंत्र्य दिनाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगी आम्ही केवळ आमच्या देशाच्या स्वातंत्र्याचाच नव्हे तर आमच्या प्रगतीला चालना देणाऱ्या महिलांच्या अतुलनीय योगदानाचाही सन्मान करतो. त्यांचे अतूट समर्पण आणि त्यांची लवचिकता ह्यातच नारी शक्तीचे सार दिसून येते. आपले भविष्य घडवण्यात आणि आपल्या समाजाची प्रगती करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून आपण 'विकसित भारत' घडवण्यासाठी प्रयत्न करत असताना, आपण महिलांचे सशक्तीकरण आणि उन्नती करत राहुया.

(फोटो कॅप्शन: देशभराच्या विविध क्षेत्रातून आलेल्या कार्यकर्त्यांनी लाल किल्ला येथे स्वातंत्र्य दिवस समारंभ साजरा केला)

या वर्षी, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने (एमडबल्यूसीडी) 161 लाभार्थी आणि त्यांच्या जोडीदारांना लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून मान दिला. या मान्यवर अतिथींमध्ये डब्ल्यूसीडी मंत्रालया अंतर्गत विविध सक्षमीकरण आणि कल्याणकारी योजनांतील समर्पित महिला कामगारांचा समावेश होता. शिवाय या गटात अंगणवाडी सेविका, वन-स्टॉप सेंटर्स (ओएससी), महिला सक्षमीकरणासाठी संकल्प केंद्र आणि जिल्हा बाल संरक्षण युनिट (डीसीपीयू) यांच्याशी निगडित कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

दिल्लीतील या कार्यकर्त्यांच्या भेटीदरम्यान, संसद भवन आणि प्रधान मंत्री संग्रहालय यासारख्या प्रमुख स्थळांचे दौरे समाविष्ट होते. याचबरोबर पाहुण्यांनी विज्ञान भवनातील चहापान कार्यक्रमासह आपल्या सर्वसमावेशक वेळापत्रकाचा आनंद घेतला. त्यांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि एमडबल्यूसीडीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संवाद साधला.

हे विशेष पाहुणे आणि त्यांचे सहकारी 13 ते 16 ऑगस्ट 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे असतील. 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा हा केवळ भारताच्या स्वातंत्र्याचा उत्सवच नाही तर देशाच्या प्रगतीसाठी अथक योगदान देणाऱ्या व्यक्तींना एक श्रद्धांजली सुद्धा आहे. सामूहिक कामगिरीचा सन्मान करण्याचा आणि आशा आणि समृद्धीने भरलेल्या भविष्याची अपेक्षा करण्याचा हा दिवस आहे.

 

* * *

S.Patil/G.Deoda/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2045684) Visitor Counter : 5