राष्ट्रपती कार्यालय

78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताच्या माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्राप्रती संदेश

Posted On: 14 AUG 2024 7:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

स्वातंत्र्यदिनानिमित्त माझ्याकडून तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

1. सारे देशवासीय ७८वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची तयारी करत आहेत, हे पाहून मला खूप आनंद होत आहे. स्वातंत्र्यदिनाला लाल किल्ल्यावर, राज्यांच्या राजधान्यांच्या ठिकाणी किंवा आपल्या सभोवताली कुठेही फडकणारा तिरंगा पाहताना आपलं अंतःकरण उत्साहानं भरून येतं. 140 कोटींहून अधिक देशवासीयांच्या सोबत आपल्या या महान देशाचा अंश असण्याचा आपला आनंद या उत्सवातून व्यक्त होतो. आपण ज्याप्रमाणे आपल्या कुटुंबाबरोबर वेगवेगळे सण साजरे करतो, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनही आपण आपल्या त्या कुटुंबासोबत साजरा करतो ज्याचे सर्व देशबांधव सदस्य आहेत.

2. पंधरा ऑगस्टला देश-विदेशात सर्व भारतीय, ध्वजारोहण समारंभांत भाग घेतात, देशभक्तीपर गीतं गातात आणि गोडधोड वाटतात. लहान मुलं सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घेतात. आपण मुलांना जेव्हा आपल्या महान राष्ट्राविषयी आणि भारतीय असण्याच्या महनीयतेविषयी बोलताना ऐकतो, तेव्हा त्यांच्या उद्गारांमध्ये महान स्वातंत्र्यसेनानींच्या भावनांचा प्रतिध्वनीच ऐकू येतो. स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्नं आणि आगामी वर्षांत आपल्या राष्ट्राचा संपूर्ण गौरव पुन्हा प्राप्त होताना पाहणाऱ्या भावी पिढ्यांच्या आकांक्षा- यांना एका शृंखलेत गुंफणाऱ्या परंपरेचा आपण एक अंश आहोत, याची आपल्याला प्रचीती येते.

3. 'इतिहासाच्या शृंखलेची एक कडी' असण्याचं भान आपल्यामध्ये विनय निर्माण करतं. या भानामुळे, आपला देश परकीय सत्तेच्या दास्यात असतानाच्या काळाचं स्मरण राहतं. राष्ट्रभक्त आणि शूर अशा देशप्रेमी व्यक्तींनी असंख्य धोके पत्करले आणि सर्वोच्च बलिदान दिलं. त्यांच्या पवित्र स्मृतींना आपण वंदन करूया. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारताचा आत्मा जणू शेकडो वर्षांच्या सुप्तावस्थेतून जागृत झाला. अंतःप्रवाहाच्या स्वरूपात सदैव अस्तित्वात असलेल्या आपल्या निरनिराळ्या परंपरा आणि मूल्यांना आपल्या महान स्वातंत्र्यसैनिकांनी पिढ्यानपिढ्या नवी अभिव्यक्ती प्रदान केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शन करून स्वातंत्र्यलढ्याच्या विविध परंपरा आणि त्यांच्या विविध अभिव्यक्तींना एकत्र आणलं.

4. त्याचबरोबर सरदार पटेल,नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाबासाहेब आंबेडकर, तसंच भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांच्यासारखे अनेक महान जननायकदेखील सक्रिय होते. हे एक राष्ट्रव्यापी आंदोलन होतं आणि त्यात सर्व समुदायांनी भाग घेतला. आदिवासींमध्ये तिलका मांझी, बिरसा मुंडा, लक्ष्मण नायक आणि फुलो-झानो यांच्यासारख्या कित्येक नायकांच्या बलिदानाची आता प्रशंसा होत आहे. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती, 'आदिवासी गौरव दिवस' म्हणून साजरी करायला आपण सुरुवात केली आहे. पुढच्या वर्षी त्यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी करताना , राष्ट्राच्या पुनरुत्थानात त्यांनी दिलेल्या योगदानाचा अधिक यथार्थ गौरव करण्याची संधी मिळेल.

माझ्या प्रिय देशवासीयांनो,

5. आज 14 ऑगस्टला आपल्या देशात 'विभाजन विभीषिका स्मृती दिवस' पाळला जातो. फाळणीच्या भयावह आठवणी जागवण्याचा हा दिवस. आपल्या महान देशाची फाळणी झाली तेव्हा, लक्षावधी लोकांना बळजबरीने स्थलान्तर करावं लागलं, लाखो लोक प्राणांना मुकले. स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या एक दिवस आधी आपण त्या अभूतपूर्व मानवी यातनांचं स्मरण करतो आणि त्यावेळी छिन्नविच्छिन्न करण्यात आलेल्या कुटुंबांच्या सोबत एकदिलानं उभे राहतो.

6. आपण आपल्या संविधानाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. आपल्या नवस्वतंत्र राष्ट्राच्या प्रवासात गंभीर संकटं येऊन गेली. संविधानातल्या न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या आदर्शांवर दृढ राहून आपण जगाच्या पडद्यावर भारताला त्याचं न्यायोचित आणि गौरवशाली स्थान पुन्हा प्राप्त करता येण्यासाठी एक मोहीम उघडली आहे.

7. यावर्षी आपल्या देशात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या गेल्या. त्यासाठीच्या पात्र मतदारांची संख्या जवळजवळ ९७ कोटी होती. हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला. अखिल मानवजातीनं आजवर पाहिलेल्या निवडणुकांपैकी ही सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया होती. अशा या विराट प्रक्रियेचं सुरळीत आणि निर्दोष संयोजन केल्याबद्दल भारताचा निवडणूक आयोग अभिनंदनास पात्र आहे. भीषण उन्हाळ्याला तोंड देत असतानाही मतदारांना मदत करणाऱ्या सर्व कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांना मी धन्यवाद देते. इतक्या प्रचंड संख्येने लोकांनी मताधिकाराचा उपयोग करणं म्हणजे वास्तविक पाहता, लोकशाहीच्या विचारधारेचं प्रबळ समर्थन आहे. भारतानं निवडणुकांचं यशस्वी आयोजन केल्यामुळे संपूर्ण जगात लोकशाही शक्तींना बळ मिळतं.

प्रिय देशवासीयांनो,

8. 2021 ते 2024 या काळात सरासरी 8 टक्के वार्षिक वृद्धीदर गाठणाऱ्या भारताचा समावेश जगात सर्वाधिक वेगानं वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये झाला आहे. यामुळे लोकांच्या हातात तर अधिक पैसा आलाच, शिवाय दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. जे लोक आत्ताही दारिद्र्यात पिचत आहेत, त्यांना मदत करण्याबरोबरच गरिबीतून वर उचलण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. उदाहरणार्थ, कोविड-19 च्या सुरुवातीच्या टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या पीएम गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत जवळपास 80 कोटी लोकांना विनामूल्य शिधा पुरवण्यात येतो. जे लोक नुकतेच दारिद्र्याच्या खाईतून वर आले आहेत, ते पुन्हा त्यात लोटले जाणार नाहीत, याची काळजी याद्वारे घेतली जाते.

9. भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि लवकरच आपण तीन सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याच्या तयारीत आहोत. शेतकऱ्यांचे आणि श्रमिकांचे अथक परिश्रम, धोरणकर्त्यांची आणि उद्योजकांची दूरदृष्टी तसंच दूरदर्शी नेतृत्व यांच्या बळावरच हे यश संपादन करणं शक्य झालं आहे.

10. शेतकऱ्यांनी म्हणजे आपल्या अन्नदात्यांनी शेतकी उत्पादन अपेक्षेपेक्षा अधिक राहील याची खबरदारी घेतली आहे. याद्वारे त्यांनी भारताला कृषी क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी आणि आपल्या देशवासीयांचं उदरभरण करण्यासाठी अमूल्य योगदान दिलं आहे. नजीकच्या भूतकाळात पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे. विचारपूर्वक आखलेल्या योजना आणि प्रभावी अंमलबजावणी यांमुळे रस्ते, महामार्ग, रेल्वे आणि बंदरं यांचं जाळं विणायला मदत मिळाली आहे. भविष्यकालीन तंत्रज्ञानाची अद्भुत क्षमता लक्षात घेऊन सरकारनं सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अनेक क्षेत्रांना चालना देण्यावर विशेष भर दिला आहे, शिवाय स्टार्ट अप उद्योगांसाठी एक आदर्श परिसंस्थाही निर्माण केली आहे, जेणेकरून त्यांच्या विकासाला गती मिळेल. यामुळे, गुंतवणूकदारांना भारताबद्दल अधिक आकर्षण वाटू लागलं आहे. वाढत्या पारदर्शकतेमुळे बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राच्या कार्यक्षमतेत वाढ झाली आहे. या सर्व बदलांमुळे आर्थिक सुधारणांच्या पुढच्या टप्प्यासाठी एक व्यासपीठ तयार झालं असून, तिथून झेपावून भारत विकसित देशांच्या श्रेणीमध्ये समाविष्ट होईल.

11. या जलद परंतु न्यायोचित प्रगतीमुळे भारताला जागतिक स्तरावर एक उच्च स्थान मिळालं आहे. आपली जी-ट्वेन्टीच्या अध्यक्षपदाची कारकीर्द यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर भारतानं ग्लोबल साऊथचा म्हणजे विकसनशील देशांचा आवाज म्हणून आपली भूमिका कणखर केली आहे. आपल्या प्रभावशाली स्थितीचा उपयोग जागतिक शांती आणि समृद्धीची व्याप्ती वाढविण्यासाठी करण्याची भारताची इच्छा आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

12. संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांचं आपण सदैव स्मरण राखलं पाहिजे. त्यांचे अगदी सुयोग्य उद्गार मी आता उद्धृत करते- "आपण आपल्या राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाही म्हणूनही घडवलं पाहिजे सामाजिक लोकशाहीचा आधार मिळेपर्यंत  राजकीय लोकशाही टिकू शकत नाही."- असं ते म्हणत.

राजकीय लोकशाहीची निरंतर प्रगती ही सामाजिक लोकशाहीला बळकटी देण्याच्या दिशेने केलेल्या प्रगतीची निदर्शक असते. आपल्या सामाजिक जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये सर्वसामावेशकतेची भावना दिसून येते. आपल्या विविधता आणि बहुलता सोबत घेऊन आपण एक राष्ट्र म्हणून एकजुटीने एकत्रितपणे पुढे जात आहोत. सर्वसमावेशकतेचं एक साधन म्हणून एफर्मेटिव्ह ऍक्शन अधिक बळकट केली पाहिजे. भारतासारख्या विशाल देशात तथाकथित सामाजिक स्तरांच्या आधारे भांडणांना खतपाणी घालणाऱ्या वृत्तीचा बीमोड करावा लागेल, असं माझं ठाम मत आहे.

13. सामाजिक न्यायाला सरकार सर्वोच्च प्राधान्य देत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि समाजाच्या अन्य उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी सरकारनं अनेक अभूतपूर्व पावलं उचलली आहेत. उदाहरणार्थ, प्रधानमंत्री सामाजिक उत्थान एवं रोजगार आधारित जनकल्याण अर्थात पीएम सूरज योजनेद्वारे उपेक्षित समुदायांच्या लोकांना थेट आर्थिक साहाय्य दिलं जातं. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान म्हणजेच पीएम जनमन या मोहिमेनं एका जन-अभियानाचं रूप घेतलं आहे. याअंतर्गत पीव्हीटीजी म्हणजे विशेषत्वाने असुरक्षित आदिवासी समूहांची सामाजिक-आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी निर्णायक  पावलं उचलली जात आहेत. नमस्ते योजना म्हणजे- स्वच्छताविषयक व्यवस्थेच्या यांत्रिकीकरणाच्या राष्ट्रीय कृती योजनेअंतर्गत, कोणत्याही स्वच्छता कर्मचाऱ्याला गटारं आणि मैलासफाईचं धोकादायक काम हाताने करावं लागू नये याची काळजी घेतली जात आहे .

14. न्याय या संज्ञेच्या व्याप्तीमध्ये अनेक सामाजिक आयामांचा समावेश होतो. त्यापैकी दोन आयामांवर मला विशेषत्वानं भर द्यायचा आहे- ते म्हणजे- स्त्रीपुरुषांदरम्यान न्यायपूर्ण समानता आणि हवामानबदलाविषयीचा न्याय.

15. आपल्या समाजात स्त्रियांना केवळ समानच नाही तर त्यापेक्षाही अधिक प्रतिष्ठा दिली जाते. मात्र, परंपरागत पूर्वग्रहाचाही त्रास त्यांना सोसावा लागला आहे. परंतु सरकारनं महिला कल्याण आणि महिला सक्षमीकरणाला समान महत्त्व दिल्याचं पाहून मला आनंद वाटतो. गेल्या दशकभरात या उद्दीष्टासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदीत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. श्रमिकांमध्येही त्यांचं प्रमाण वाढलं आहे. या संदर्भात जन्माच्या वेळच्या लिंग गुणोत्तरात झालेली सुधारणा ही सर्वात उत्साहवर्धक प्रगती म्हणता येईल. स्त्रियांना केंद्रस्थानी ठेवून सरकारनं अनेक विशेष योजनाही सुरु केल्या आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियमाचं उद्दिष्टच, स्त्रियांचं खरंखुरं सक्षमीकरण हे आहे.

16. हवामानबदल हे आजचं वास्तव आहे. विकसनशील देशांना त्यांचं आर्थिक प्रतिमान बदलणं अधिकच आह्वानात्मक असतं. तथापि आपण त्या दिशेनं अपेक्षेपेक्षा अधिक प्रगती केली आहे. जागतिक तापमानवाढीच्या सर्वात गंभीर दुष्परिणामांपासून पृथ्वीला वाचवण्यासाठी अखिल मानवजात करत असलेल्या संघर्षात आघाडीवर असल्याचा भारताला अभिमान आहे. आपण आपल्या जीवनशैलीत छोटेछोटे परंतु परिणामकारक बदल करावेत आणि हवामानबदलाविरुद्धच्या लढाईत आपलं महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असा माझा आपणां सर्वांना आग्रह आहे.

17. न्यायाबद्दल बोलायचं तर, यावर्षी जुलै महिन्यापासून भारतीय न्यायसंहितेचा अंगीकार केल्यापासून आपण वसाहतवादाच्या युगाचा आणखी एक अवशेष काढून टाकला आहे. केवळ शिक्षा करण्याऐवजी, त्या गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांना न्याय मिळवून देण्याची खबरदारी घेणं- असा नव्या संहितेचा उद्देश आहे. हे परिवर्तन म्हणजे, स्वातंत्र्यसैनिकांना अर्पण केलेली श्रद्धांजली आहे, असं मला वाटतं.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

18. आजची तरुणाई- अमृतकाळाला म्हणजे इथपासून स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंतच्या जवळपास पाव शतकाला आकार देणार आहे. त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाच्या बळावरच आपला देश नवनव्या शिखरांवर पोहोचेल. तरुणाईच्या मन आणि बुद्धीचा विकास करणं  तसंच परंपरा आणि समकालीन ज्ञानाचे सर्वश्रेष्ठ आयाम ग्रहण करण्याची नवी मानसिकता तयार करणं याला आपण प्राधान्य देत आहोत. या संदर्भात 2020 सालापासून अंमलात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा प्रभाव दिसून येऊ लागला आहे.

19. युवा प्रतिभेचा उचित उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने कौशल्य, रोजगार आणि अन्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रोजगार आणि कौशल्यासाठीच्या पंतप्रधानांच्या ५ योजनांच्या माध्यमातून ५ वर्षांत चार कोटी दहा लाख युवकांना लाभ मिळणार आहे. सरकारच्या एका नव्या उपक्रमाद्वारे पाच वर्षांत एक कोटी तरुण, नावाजलेल्या/ आघाडीवरच्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करतील. ही सर्व पावलं, विकसित भारताची पायाभरणी करण्यात मोलाचं योगदान देतील.

20. ज्ञानाचा शोध घेण्याबरोबरच मानवतापूर्ण प्रगतीचं साधन म्हणून विज्ञान-तंत्रज्ञानाकडे बघण्याचा आपल्या भारताचा दृष्टिकोन आहे. उदाहरणार्थ, डिजिटल ऍप्लिकेशनच्या क्षेत्रात आपल्या यशाचं प्रतिमान अन्य देशांमध्ये आदर्शभूत आहे. नजीकच्या काही वर्षांत, भारतानं अंतराळ संशोधनात अभूतपूर्व प्रगती केली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या गगनयान मोहिमेच्या शुभारंभाची तुमच्याप्रमाणेच मीही उत्सुकतेने वाट पाहत आहे. या मोहिमेअंतर्गत भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळयानातून भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात नेलं जाणार आहे.

21. क्रीडाक्षेत्रातही आपल्या देशाने गेल्या दशकात खूप प्रगती केली आहे. खेळांच्या पायाभूत सुविधांचा विकास करायला सरकारने उचित प्राधान्य दिलं आहे आणि याचा यथार्थ प्रभाव पडताना दिसतो आहे. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारतीय पथकानं उत्कृष्ट कामगिरी केली. खेळाडूंच्या निष्ठेचं आणि परिश्रमांचं मला कौतुक वाटतं. त्यांनी युवावर्गाला स्फूर्ती दिली आहे. क्रिकेटमध्ये भारताने टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकल्याचा क्रिकेटप्रेमींना आनंद झाला. बुद्धिबळातही विलक्षण प्रतिभासंपन्न अशा युवा खेळाडूंनी देशासाठी अभिमानास्पद कामगिरी करून दाखवली आहे. बुद्धिबळातल्या भारतीय युगाचा हा उदय मानला जात आहे. बॅडमिंटन, टेनिस आणि अन्य खेळांतही आपले युवा खेळाडू जागतिक पातळीवर आपली ओळख प्रस्थापित करत आहेत. त्यांच्या यशाने पुढच्या पिढीलाही प्रेरणा दिली आहे.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

22. सारा देश स्वातंत्र्यदिवस साजरा करण्यासाठी सिद्ध झाला आहे. या उल्हासपूर्ण क्षणी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते. स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण करणाऱ्या सैन्यदलांच्या शूरवीर जवानांना मी विशेष शुभेच्छा देते. साऱ्या देशात दक्ष राहून कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि सुरक्षादलांच्या कर्मचाऱ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. न्यायमंडळ आणि नागरी सेवांच्या सदस्यांसह आपल्या परदेशांतल्या दूतावासांमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही माझ्या शुभेच्छा. आपल्या अनिवासी भारतीय समुदायालाही शुभेच्छा - तुम्ही सर्व आपल्या कुटुंबाचा भाग आहात, तुमच्या यशाने तुम्ही आमचीही मान उंचावली आहे. तुम्ही परदेशांत भारताची संस्कृती आणि संपन्न वारसा यांचं साभिमान प्रतिनिधित्व करत आहात!

पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!

धन्यवाद! जय हिंद! जय भारत!

 

Jaydevi PS/DD Mumbai/PM

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2045391) Visitor Counter : 75