अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एकविसाव्या शतकातील ज्ञानचालित अर्थव्यवस्थेतून उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या आणि संधींचा लाभ उठवण्याच्या दृष्टीने युवकांना घडवण्याचे कार्य राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 करेल- आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2023-24

Posted On: 22 JUL 2024 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2024

2020 मध्ये दाखल करण्यात आलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) म्हणजे, शिक्षणासंबंधीच्या शाश्वत विकासोद्दिष्टांना सामावून घेणारा दस्तावेज तर आहेच, शिवाय,  एकविसाव्या शतकातील ज्ञानचालित अर्थव्यवस्थेतून उद्भवणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याच्या आणि संधींचा लाभ उठवण्याच्या दृष्टीने युवकांना घडवण्याचे कार्य त्याच्याद्वारे होणार आहे- असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2023-24 मध्ये व्यक्त करण्यात आला आहे.

सरकारी आणि खासगी शाळांचा समावेश असणारी भारतातील शालेय शिक्षण पद्धती देशभरातील विविध स्तरांतील जवळपास 26 कोटी विद्यार्थ्यांच्या गरजा भागवते आणि 3-18 वर्षे वयोगटातील सर्व अध्ययनकर्त्यांना उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न NEP 2020 करते. हे शिक्षण भारतीय संस्कृतीत रुजलेले असेल आणि भारताला जागतिक ज्ञानसत्ता म्हणून नावारूपाला आणण्याचे सामर्थ्य त्याच्या ठायी असेल, असे या सर्वेक्षणात म्हटले आहे.

'पोषणही आणि शिक्षणही'

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरून मे-2023 मध्ये 'पोषणही आणि शिक्षणही' (PBPB) हा कार्यक्रम सुरु करण्यात आला. अगदी लहान वयाच्या बालकांची काळजी घेणारा व त्यांना शिक्षण देणारा (ECCE) असा हा अत्यंत अभिनव आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम असून, यातून अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठे सार्वत्रिक आणि उच्च गुणवत्तापूर्ण शाळापूर्व नेटवर्क विकसित करण्यास भारताला मदत होईल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

0-3 वर्षे वयोगटासाठी चालना देण्याचे कार्य सरकारी कार्यक्रमाद्वारे होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे या सर्वेक्षणात नमूद केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाला दररोज किमान दोन तास शाळापूर्व शिक्षण दिले जाणार आहे. खेळ आणि कृतींवर आधारित असे बालकानुकूल शिक्षण देता येण्यासाठी राष्ट्रीय ECCE कृतिदलाच्या शिफारशींचे पालन सर्व राज्ये करतील. विशेषतः, 0-3 वर्षे आणि 3-6 वर्षे वयोगटाच्या विकासाचे महत्त्वाचे टप्पे व्यवस्थित गाठता यावेत असे याचे ध्येय आहे. दिव्यांग बालकांना विशेष सहाय्य पुरवण्याचाही यात समावेश आहे, असे सर्वेक्षणात म्हटले आहे.

अंगणवाड्यांचे देशव्यापी जाळे बळकट करण्यासाठी-

वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत मेंदूचा 85 टक्के विकास पूर्ण होतो याला जागतिक स्तरावर असणाऱ्या भक्कम पुराव्यांचा विचार करता, आपल्या बालकांचे समर्थ भविष्य घडवण्याच्या दृष्टीने अंगणवाडी परिसंस्था हा आत्यंतिक महत्त्वपूर्ण असा संपर्कबिंदू होय. अंगणवाड्यांच्या माध्यमातून PBPB यशस्वी करण्यासाठी अंगणवाड्या समर्थ असल्या पाहिजेत. त्यासाठी तेथे उच्च गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा, खेळण्याची उपकरणे, आणि सु-प्रशिक्षित अंगणवाडी कार्यकर्त्या/ शिक्षिका असल्या पाहिजेत. या संबंधाने, सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना ECCE तत्त्वांचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यात कृती आणि खेळांचा तसेच 'तुमच्या हाताने करा' अशा प्रकारच्या खेळण्यांचा समावेश असेल. 40,000 मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून त्यांना हे प्रशिक्षण दिले जाईल. जानेवारी 2024 मधील आकडेवारीनुसार, 25 राज्ये आणि 182 जिल्ह्यांत राज्यपातळीवरील 3735 मास्टर ट्रेनर्सना 95 प्रशिक्षण कार्यक्रमांतून प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती सर्वेक्षणात दिली आहे.

 
 
S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2035439) Visitor Counter : 105