राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेतील अभिभाषण

Posted On: 27 JUN 2024 12:13PM by PIB Mumbai

 

माननीय सदस्यहो,

1. मी 18 व्या लोकसभेच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते आणि शुभेच्छा देते.

देशातील मतदारांचा विश्वास जिंकून तुम्ही सर्वजण इथे आला आहात.

देशसेवा आणि जनसेवेचा हा बहुमान फार कमी लोकांना मिळतो.

मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही राष्ट्रभावनेने तुमची जबाबदारी प्रथम पार पाडाल आणि 140 कोटी देशवासियांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याचे एक माध्यम बनाल.

मी श्री ओम बिर्ला जी यांना लोकसभेच्या अध्यक्षपदाची भूमिका सन्मानाने निभावण्यासाठी शुभेच्छा देते.

सार्वजनिक जीवनाचा त्यांना मोठा अनुभव आहे.

मला विश्वास आहे की ते आपल्या कौशल्याने लोकशाही परंपरांना नव्या उंचीवर नेण्यात यशस्वी होतील.

माननीय सदस्यहो,

2. आज कोट्यवधी देशवासियांच्या वतीने मी भारतीय निवडणूक आयोगाचे आभार मानते.

ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती.

सुमारे 64 कोटी मतदारांनी आपले कर्तव्य उत्साहाने पार पाडले आहे.

यावेळीही महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतला आहे.  या निवडणुकीचे अत्यंत सुखद चित्र जम्मू-काश्मीरमधूनही समोर आले आहे.

काश्मीर खोऱ्यात मतदानाचे गेल्या अनेक दशकांमधील विक्रम मोडीत निघाले आहेत.

गेल्या 4 दशकांमध्ये काश्मीरमध्ये बंद आणि संप अशा वातावरणात कमी मतदान झाल्याचे दिवसच आपण पाहिले होते.

भारताचे शत्रू जागतिक व्यासपीठांवर जम्मू-काश्मीरमधील मतदारांचा कल असाच अनुत्साहीत आहे, असा अपप्रचार करत राहिले.

पण यावेळी काश्मीर खोऱ्याने देशातील आणि जगातील अशा प्रत्येक शक्तीला चोख प्रत्युत्तर दिले आहे.

या लोकसभा निवडणुकीत प्रथमच घरातूनही मतदानाची सोय उपलब्ध झाली आहे.

मी लोकसभा निवडणुकीशी संबंधित प्रत्येक कर्मचाऱ्याचे कौतुक करते, त्यांचे अभिनंदन करते.

माननीय सदस्यहो,

3. आज जगभरात भारतातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीची चर्चा होत आहे.

भारतातील जनतेने सलग तिसऱ्यांदा स्थिर आणि स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन केले आहे हे जग पाहत आहे.

सहा दशकांनंतर अशी घटना घडली आहे.

भारतातील लोकांच्या  आकांक्षा सर्वोच्च पातळीवर असताना, जनतेने माझ्या सरकारवर सलग तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे.

केवळ माझे सरकार त्यांच्या आकांक्षा पूर्ण करू शकते यावर भारतातील जनतेचा पूर्ण विश्वास आहे.

त्यामुळे 2024 ची ही निवडणूक धोरण, हेतू, निष्ठा आणि निर्णयावरील विश्वासाची निवडणूक ठरली आहे.

•    मजबूत आणि निर्णायक सरकारवर विश्वास,

•    सुशासन, स्थैर्य आणि सातत्य यावर विश्वास  

प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनतीवर विश्वास

•    सुरक्षा आणि समृद्धीवर विश्वास,

•    सरकारची हमी आणि कामगिरीवर विश्वास,

•    विकसित भारताच्या निर्धारावर विश्वास.

माझ्या सरकारने गेल्या 10 वर्षांपासून हाती घेतलेल्या सेवा आणि सुशासनाच्या मोहिमेवर, हे मान्यतेचे शिक्कामोर्तब आहे.

विकसनशील भारताचे कार्य न थांबता सुरू राहावे आणि भारताने आपले उद्दिष्ट साध्य करावे, असा हा आदेश आहे.

माननीय सदस्यहो,

4. 18वी लोकसभा ही अनेक अर्थाने ऐतिहासिक लोकसभा आहे.

अमृतकाळाच्या प्रारंभ काळात ही लोकसभा स्थापन झाली.

ही लोकसभा देशाने राज्यघटना स्वीकारल्याच्या 75 व्या वर्षाची साक्षीदार ठरणार आहे.

या लोकसभेत लोककल्याणकारी निर्णयांचा नवा अध्याय लिहिला जाईल, असा मला विश्वास आहे.

आगामी अधिवेशनात माझे सरकार आपल्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे.

हा अर्थसंकल्प सरकारच्या दूरगामी धोरणांचा आणि भविष्यकालीन दृष्टीचा प्रभावी दस्तऐवज असेल.

मोठ्या आर्थिक आणि सामाजिक निर्णयांसोबतच अनेक ऐतिहासिक पावलेही या अर्थसंकल्पात पाहायला मिळतील.

भारताच्या जलद विकासाच्या लोकेच्छांची पूर्तता करण्यासाठी सुधारणांचा वेग आता आणखी वेगवान केला जाईल.

जगभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राज्यांमध्ये निकोप स्पर्धा असली पाहिजे, असे माझे सरकार मानते.

स्पर्धात्मक सहकारी संघराज्यवादाचा हा खरा आत्मा आहे.

राज्याच्या विकासाच्या माध्यमातून देशाचा विकास याच भावनेने आम्ही आगेकूच करत राहू.

माननीय सदस्यहो,

5. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तनाच्या संकल्पाने आज भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनवले आहे.

10 वर्षात भारत 11 व्या क्रमांकावर असलेल्या अर्थव्यवस्थेवरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे.

2021 ते 2024 या काळात भारताचा विकास सरासरी 8 टक्के इतक्या वेगाने झाला आहे. आणि ही वाढ सामान्य काळात झालेली नाही.

गेल्या काही वर्षांत आपण 100 वर्षांतील सर्वात मोठी आपत्ती पाहिली आहे.

जीवघेण्या संसर्गजन्य रोगाची जागतिक महासाथ आणि जगाच्या विविध कोपऱ्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षांच्या काळातही भारताने हा विकास दर गाठला आहे.

गेल्या 10 वर्षांतील सुधारणा आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने घेतलेले मोठे निर्णय यामुळे हे शक्य झाले आहे.

आज जगाच्या विकासात भारताचा एकट्याचा वाटा 15 टक्के आहे. 

आता माझे सरकार भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात व्यग्र आहे.

हे उद्दिष्ट साध्य केल्यास विकसित भारताचा पायाही मजबूत होईल.

माननीय सदस्यहो,

6. उत्पादन, सेवा आणि कृषी या अर्थव्यवस्थेच्या तीनही स्तंभांना माझे सरकार समान महत्त्व देत आहे.

पीएलआय (उत्पादन आधारित प्रोत्साहन )योजना आणि व्यवसाय  सुलभतेमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढत आहेत.

पारंपरिक क्षेत्रांबरोबरच उगवत्या क्षेत्रांनाही (भविष्यात भरपूर उत्पन्न मिळवून देऊन महत्वपूर्ण ठरणार असलेली क्षेत्रे) एक वसा (मिशन मोड वर) म्हणून प्रोत्साहन दिले जात आहे.

अर्धवाहक( सेमीकंडक्टर)  असो वा सौरऊर्जा,

वीजेवर चालणारी वाहने असो वा इलेक्ट्रॉनिक वस्तू,

हरित हायड्रोजन असो किंवा विद्युतघट (बॅटरी),

विमानवाहू जहाज असो वा लढाऊ विमाने,

या सर्व क्षेत्रात भारताचा विस्तार होत आहे.

माझे सरकार मालवहतुकीवर  (लॉजिस्टिक) होणारा खर्च कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे.

सरकार, सेवा क्षेत्र मजबूत करण्यातही व्यग्र आहे.

आज भारत, माहिती-तंत्रज्ञान (आयटी) पासून पर्यटनापर्यंत, आरोग्यापासून ते निरोगीपणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहे.

आणि यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

माननीय सदस्यहो,

7. गेल्या 10 वर्षांत माझ्या सरकारने ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक पैलूवर भर दिला आहे.

खेड्यापाड्यात कृषी आधारित उद्योग, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसायावर आधारित उद्योगांचा विस्तार होत आहे.

यामध्येही सहकारितेच्या तत्वाला प्राधान्य देण्यात आले आहे.

सरकार, शेतकरी उत्पादक संघ(FPO-फार्मर्स प्रोड्युसर्स ऑर्गनायझेशन) आणि प्राथमिक कृषी पतसंस्था ( PACS-प्रायमरी अॅग्रीकल्चरल क्रेडिट सोसायटीज) सारख्या सहकारी संस्थांचे मोठे जाळे तयार करत आहे.

लहान शेतकऱ्यांची मोठी समस्या, साठवणुकीबाबत आहे.

त्यामुळे माझ्या सरकारने सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या साठवणूक योजनेवर काम सुरू केले आहे.

शेतकऱ्यांना त्यांचे छोटे खर्च भागवता यावेत, यासाठी त्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत 3 लाख 20 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.

माझ्या सरकारच्या नवीन कार्यकाळाच्या सुरुवातीच्या दिवसांत 20 हजार कोटींहून अधिक रक्कम शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे.

सरकारने खरीप पिकांसाठी किमान आधारभूत मूल्य (एमएसपी) मध्येही विक्रमी वाढ केली आहे.

माननीय सदस्यहो,

8. आजचा भारत सध्याच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या कृषी व्यवस्थेत बदल करत आहे.

आपण अधिक स्वावलंबी व्हावे आणि अधिकाधिक निर्यातीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, या विचाराने धोरणे आखली गेली आणि निर्णयही घेतले गेले आहेत.

उदाहरणार्थ, सरकार देशातील शेतकऱ्यांना डाळी आणि तेलबियांच्या बाबतीत इतर देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्य करत आहे.

जागतिक बाजारपेठेत कोणत्या प्रकारच्या अन्न उत्पादनाला अधिक मागणी आहे, त्या आधारावर नवीन रणनीती आखली जात आहे.

आज जगात सेंद्रिय उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

भारतीय शेतकऱ्यांकडे ही मागणी पूर्ण करण्याची क्षमता आहे.

त्यासाठी, सरकार सेंद्रिय शेती आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनांची पुरवठा साखळी मजबूत करत आहे.

अशा प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्चही कमी होईल, आणि त्यांचे उत्पन्नही वाढेल.

आदरणीय सदस्य गण,

9. आजचा भारत जगापुढील आव्हाने वाढवण्यासाठी नव्हे, तर जगाला उपाय देण्यासाठी ओळखला जातो.

जागतिक मित्र म्हणून भारताने जगातील अनेक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हवामान बदलापासून ते अन्नसुरक्षेपर्यंत, पोषणापासून ते शाश्वत शेतीपर्यंत, आपण अनेक उपाय देत आहोत.

आपले भरड धान्य श्री अन्न, हे सुपरफूड म्हणून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावे, यासाठी देखील एक अभियान सुरु करण्यात आले आहे.

भारताच्या पुढाकाराने, संपूर्ण जगाने 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरे केले.

तुम्ही पाहिलेच असेल की, नुकताच संपूर्ण जगाने आंतरराष्ट्रीय योग दिवसही साजरा केला.

भारताच्या या महान परंपरेची प्रतिष्ठा जगात सातत्याने वाढत आहे.

योग आणि आयुषला प्रोत्साहन देऊन, भारत निरोगी जग निर्माण करण्यामध्ये मदत करत आहे.

माझ्या सरकारने अक्षय ऊर्जेची क्षमताही अनेक पटींनी वाढवली आहे.

आपण आपली हवामान बदलाबाबतची उद्दिष्टे नियोजित वेळे पूर्वीच साध्य करून दाखवत आहोत.

आज नेट झिरोच्या दिशेने सुरु असलेले भारताचे प्रयत्न इतर अनेक देशांना प्रेरणा देत आहेत.

आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीसारख्या उपक्रमात जगातील देश विक्रमी संख्येने आपल्याशी जोडले गेले आहेत.

आदरणीय सदस्य गण,

10. येणारा काळ Green Era, म्हणजेच हरित युगाचा आहे.

माझे सरकार यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे.

आम्ही हरित उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढवत आहोत, त्यामुळे हरित रोजगारही वाढला आहे.

हरित ऊर्जा असो की हरित प्रवास, आम्ही प्रत्येक आघाडीवर मोठे उद्दिष्ट ठेवून काम करत आहोत.

आमच्या शहरांना जगातील सर्वोत्तम राहण्याजोगी जागा बनवण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध आहे.

प्रदूषणमुक्त, स्वच्छ आणि सुसज्ज शहरांमध्ये राहणे हा भारतातील नागरिकांचा हक्क आहे.

गेल्या 10 वर्षात विशेषत: लहान शहरे आणि कसब्यांमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक झाली आहे.

भारतामध्ये आज जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ आहे.

एप्रिल 2014 मध्ये, भारतात केवळ 209 हवाई मार्ग होते.

एप्रिल 2024 मध्ये त्यांची संख्या वाढून 605 वर पोहोचली आहे.

हवाई प्रवासाच्या या विस्ताराचा थेट फायदा टियर-2 आणि टियर-3 शहरांना होत आहे.

10 वर्षात देशातील 21 शहरांमध्ये मेट्रोची सुविधा पोहोचली आहे.

वंदे मेट्रोसारख्या अनेक योजनांवर काम सुरू आहे.

माझे सरकार भारतातील सार्वजनिक वाहतूक जगातील सर्वोत्तम बनवण्याचे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे.

आदरणीय सदस्य गण,

11. भारत विकसित देशांच्या बरोबरीने उभा राहावा यासाठी माझे सरकार आधुनिक मानकांवर काम करत आहे.

या दिशेने पायाभूत सुविधांचा विकास हे बदलत्या भारताच्या नव्या चित्राच्या स्वरुपात समोर आले आहे.

माझ्या सरकारने गेल्या 10 वर्षांत पीएम ग्रामीण सडक योजनेंतर्गत गावांमध्ये 3 लाख 80 हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते बांधले आहेत.

आज भारतात राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांचे जाळे विणले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचा वेगही दुपटीने वाढला आहे.

अहमदाबाद-मुंबई दरम्यान हाय-स्पीड रेल्वे परीसंस्थेचे बांधकामही वेगाने सुरू आहे.

माझ्या सरकारने उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारतात बुलेट ट्रेन कॉरिडॉरसाठी व्यवहार्यता अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात प्रथमच एवढ्या मोठ्या व्यापक स्तरावर अंतर्देशीय जलमार्गांच्या विकासाचे काम सुरू झाले आहे.

ईशान्येकडील राज्यांना याचा मोठा फायदा होईल.

माझ्या सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकास कामांचे वाटप 10 वर्षात 4 पटीहूनही अधिक वाढवले आहे.

ऍक्ट ईस्ट पॉलिसी अंतर्गत या क्षेत्राला धोरणात्मक प्रवेशद्वार बनविण्यासाठी सरकार काम करत आहे.

ईशान्येकडील राज्यांमध्ये सर्व प्रकारची दळणवळण सुविधा वाढवली जात आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यटन, रोजगार अशा प्रत्येक क्षेत्रात विकासकामे पुढे नेली जात आहेत.

आसाममध्ये 27 हजार कोटी रुपये खर्चाने एक सेमीकंडक्टर प्लांट तयार होत आहे.

म्हणजेच ईशान्येकडील राज्य हे मेड इन इंडिया चिप्सचे केंद्रही असणार आहे.

माझे सरकार ईशान्येकडील राज्यांमध्ये शाश्वत शांततेसाठी सतत काम करत आहे.

गेल्या दहा वर्षांत अनेक जुने वाद मिटवण्यात आले असून अनेक महत्त्वाचे करारही झाले आहेत.

ईशान्येतील अशांत भागात विकासाला गती देऊन टप्प्याटप्प्याने AFSPA हटवण्याचे कामही सुरू आहे.

देशाच्या प्रत्येक क्षेत्रातील विकासाचे हे नवे आयाम भारताच्या उज्ज्वल भविष्याची चाहूल देत आहेत.

आदरणीय सदस्य गण,

12. महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला समर्पित असलेल्या माझ्या सरकारने महिला सक्षमीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात केली आहे.

देशातील नारी शक्ती दीर्घकाळापासून लोकसभा आणि विधानसभेत अधिकाधिक सहभागाची मागणी करत होती.

आज त्यांच्याकडे नारी शक्ती वंदन अधिनियमाचे बळ आहे.

सरकारी योजनांमुळे गेल्या दशकात महिलांचे आर्थिक सामर्थ्य वाढले आहे.

आपल्याला माहिती आहे की, पीएम आवास योजने अंतर्गत गेल्या 10 वर्षांत बांधण्यात आलेल्या 4 कोटी घरांपैकी बहुतांश घरे महिलांच्या नावावर आहेत.

आता तिसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीलाच सरकारने 3 कोटी नवीन घरे बांधायला मंजुरी दिली आहे.

यातील बरीचशी घरे केवळ महिलांच्या नावावर दिली जातील.

गेल्या 10 वर्षात 10 कोटी महिला, बचत बटांशी जोडल्या गेल्या.

माझ्या सरकारने 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे मोठे अभियान सुरू केले आहे.

त्यासाठी बचतगटांसाठीच्या आर्थिक मदतीमधेही वाढ केली जात आहे.

महिलांचे कौशल्य वाढावे, त्यांच्या कमाईचे साधन वाढावे आणि त्यांचा सन्मान वाढावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

नमो ड्रोन दीदी योजना हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये सहाय्य करत आहे.

या योजनेंतर्गत बचत गटातील हजारो महिलांना ड्रोन दिले जात असून त्यांना ड्रोन पायलट बनण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

माझ्या सरकारने नुकताच कृषी सखी कार्यक्रमही सुरू केला आहे.

याअंतर्गत आतापर्यंत बचत गटांच्या 30 हजार महिलांना कृषी सखी म्हणून प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.

कृषी सखी महिलांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जात आहे, जेणेकरून शेतीचे आधुनिकीकरण करण्यामध्ये त्या शेतकऱ्यांना सहाय्य करतील.

आदरणीय सदस्य गण,

13. महिलांनी जास्तीतजास्त बचत करावी, यासाठीही माझे सरकार प्रयत्नशील आहे.

बँक खात्यांमध्ये जमा रकमेवर कन्यांना अधिक दराने व्याज देणाऱ्या सुकन्या समृद्धी योजनेची लोकप्रियता आम्ही जाणतो.

मोफत शिधा आणि स्वस्त गॅस सिलिंडर या योजनेचा महिलांना मोठा लाभ मिळत आहे.

आता माझ्या सरकारने वीज बिल शून्यावर आणण्याची आणि वीज विकून पैसे कमवण्याची योजनाही आणली आहे.

पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यात येत आहेत.

यासाठी माझे सरकार प्रति कुटुंब 78 हजार रुपयांपर्यंतची मदत देत आहे.

इतक्या कमी कालावधीत एक कोटीहून अधिक कुटुंबांनी या योजनेत नोंदणी केली आहे.

आता ज्या घरांवर सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत, त्या घरांचे वीज बिल शून्य झाले आहे.

 

माननीय सदस्यगण,

14. देशातील गरीब, तरुण, नारी शक्ती आणि कृषक सक्षम झाल्यावरच विकसित भारताची निर्मिती शक्य आहे.

त्यामुळे माझ्या सरकारच्या योजनांमध्ये या चार स्तंभांना सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.

प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि हा परिपूर्ती चा दृष्टिकोन आहे.

एकही व्यक्ती सरकारी योजनेपासून वंचित राहू नये, अशा इच्छाशक्तीने सरकार काम करते, तेव्हा त्याचा फायदा सर्वांनाच होतो.

सरकारच्या योजना आणि परिपूर्ती दृष्टिकोनामुळे 10 वर्षात 25 कोटी भारतीय दारिद्र्यमुक्त झाले आहेत.

यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय, प्रत्येक समाज आणि प्रत्येक प्रदेशातील कुटुंबांचा समावेश आहे.

10 वर्षांत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यावर लक्ष केंद्रित केल्याने या घटकांचे राहणीमान बदलले आहे.

हा बदल विशेषतः आदिवासी समाजात दिसून येतो.

पीएम-जनमन सारख्या 24 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या योजना आज अत्यंत मागासलेल्या आदिवासी गटांच्या उत्थानासाठी एक माध्यम बनत आहेत.

वंचित घटकांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार पीएम सूरज पोर्टलच्या माध्यमातून सुलभ कर्जही उपलब्ध करून देत आहे.

माझे सरकार आमच्या दिव्यांग बंधू आणि भगिनींसाठी स्वस्त आणि स्वदेशी सहाय्यक उपकरणे विकसित करत आहे.

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्रांचाही देशभर विस्तार करण्यात येत आहे.

वंचितांची सेवा करण्याचा हा संकल्पच खरा सामाजिक न्याय आहे.

 

माननीय सदस्यगण,

15. देशातील श्रमशक्तीच्या सन्मानार्थ श्रमिक बांधवांचे कल्याण आणि सक्षमीकरणाला माझे सरकार प्राधान्य देत आहे.

माझे सरकार कामगारांसाठीच्या सामाजिक सुरक्षा योजनांचे एकत्रीकरण करत आहे.

डिजिटल इंडिया आणि टपाल कार्यालयांच्या नेटवर्कचा वापर करून अपघात आणि जीवन विम्याची व्याप्ती वाढवण्याचे काम केले जात आहे.

पीएम स्वनिधीचा विस्तार केला जाईल आणि ग्रामीण आणि निमशहरी भागातील फेरीवाल्यांनाही त्याच्या कक्षेत आणले जाईल.

 

माननीय सदस्यगण,

16. बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचा असा विश्वास होता की कोणत्याही समाजाची उन्नती ही समाजातील खालच्या घटकांच्या प्रगतीवर अवलंबून असते.

गेल्या 10 वर्षात गरिबांच्या सक्षमीकरणाद्वारेच देशाची कामगिरी आणि विकास घडला आहे.

माझ्या सरकारने पहिल्यांदाच गरिबांना सरकार त्यांच्या सेवेत असल्याची जाणीव करून दिली.

कोरोनाच्या कठीण काळात सरकारने 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यासाठी पीएम गरीब कल्याण अन्न योजना सुरू केली.

दारिद्र्यमुक्त झालेल्या कुटुंबांनाही या योजनेचा लाभ दिला जात आहे जेणेकरून त्यांची पुन्हा पीछेहाट होऊ नये.

स्वच्छ भारत अभियानाने देखील गरिबांच्या जीवनाचा सन्मान आणि त्यांचे आरोग्य हा राष्ट्रीय महत्त्वाचा विषय बनवला आहे.

देशातील कोट्यवधी गरिबांसाठी प्रथमच शौचालये बांधण्यात आली.

या प्रयत्नांमुळे आज देश खऱ्या अर्थाने महात्मा गांधींच्या आदर्शांचे अनुकरण करत असल्याची ग्वाही देतो.

माझे सरकार आयुष्मान भारत योजनेंतर्गत 55 कोटी लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवाही देत आहे.

देशात 25 हजार जनऔषधी केंद्रे सुरू करण्याचे कामही वेगाने सुरू आहे.

आता या क्षेत्रात सरकार आणखी एक निर्णय घेणार आहे.

आता आयुष्मान भारत योजनेंतर्गत 70 वर्षांवरील सर्व वृद्धांनाही मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे.

 

माननीय सदस्यगण,

17. अनेकदा विरोधी मानसिकता आणि संकुचित स्वार्थामुळे लोकशाहीच्या गर्भितार्थाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचली आहे.

संसदीय प्रणाली आणि देशाच्या विकासयात्रेवरही त्याचा परिणाम होतो.

देशात अनेक दशके अस्थिर सरकारांच्या काळात अनेक सरकारे इच्छा असूनही सुधारणा करू शकली नाहीत किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकली नाहीत.

भारतातील जनतेने निर्णायक बनून ही परिस्थिती बदलली आहे.

गेल्या 10 वर्षात अशा अनेक सुधारणा झाल्या आहेत ज्यांचा आज देशाला खूप फायदा होत आहे.

या सुधारणा होत असतानाही त्यांना विरोध झाला आणि नकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न झाला, पण या सर्व सुधारणा काळाच्या कसोटीवर खऱ्या ठरल्या आहेत.

10 वर्षांपूर्वी, भारताच्या बँकिंग क्षेत्राला बुडण्यापासून वाचवण्यासाठी, सरकारने बँकिंग सुधारणा केल्या आणि आयबीसी सारखे कायदे केले.

आज या सुधारणांमुळे भारताचे बँकिंग क्षेत्र जगातील सर्वात बळकट बँकिंग क्षेत्रांपैकी एक बनले आहे.

आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आज बळकट आणि फायदेशीर आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा 2023-24 मध्ये 1.4 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत 35 टक्क्यांनी जास्त आहे. आमच्या बँकांची ताकद त्यांना त्यांच्या पतसंस्थेचा विस्तार करण्यास आणि राष्ट्राच्या आर्थिक विकासात योगदान देण्यास सक्षम करते.

सरकारी बँकांचा एनपीएही सातत्याने कमी होत आहे.

आज एसबीआय विक्रमी नफ्यात आहे.

आज एलआयसी पूर्वीपेक्षा कैकपट बळकट आहे.

आज एचएएल देशाच्या संरक्षण उद्योगाला बळ देत आहे.

आज जीएसटी हे भारताच्या अर्थव्यवस्थेला औपचारिक करण्याचे आणि व्यवसाय सुलभीकरणाचे एक माध्यम बनले आहे.

एप्रिल महिन्यात पहिल्यांदाच जीएसटी संकलनाने 2 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे राज्यांची आर्थिक ताकदही वाढली आहे.

आज संपूर्ण जग डिजिटल इंडिया आणि डिजिटल पेमेंटकडे आकर्षित होत आहे.

 

माननीय सदस्यगण,

18. सक्षम भारतासाठी आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकरण आवश्यक आहे.

युद्धजन्य परिस्थितीत आपली सर्वोत्तम कामगिरी होण्यासाठी, सैन्यात सुधारणांची प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे.

याच विचारसरणीने माझ्या सरकारने गेल्या 10 वर्षात संरक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या आहेत.

सीडीएस सारख्या सुधारणांमुळे आमच्या सैन्याला नवीन बळ मिळाले आहे.

संरक्षण क्षेत्राला आत्मनिर्भर बनवण्यासाठी माझ्या सरकारने अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत.

आयुध निर्माणीतील सुधारणांमुळे संरक्षण क्षेत्राला मोठा फायदा झाला आहे.

40 हून अधिक आयुध निर्मिती कारखान्यांचे 7 महामंडळात गठन केल्याने त्यांची क्षमता आणि कार्यक्षमता दोन्हीत वाढ झाली आहे.

अशा सुधारणांमुळे आज भारत 1 लाख कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे संरक्षण उत्पादन करत आहे.

गेल्या दशकात आपली संरक्षण निर्यात 18 पटीने वाढून 21 हजार कोटी रुपये झाली आहे.

ब्राह्मोस क्षेपणास्त्रासाठी फिलिपाइन्ससोबतचा संरक्षण करार संरक्षण निर्यातीच्या क्षेत्रात भारताची ओळख मजबूत करत आहे.

तरुणांना आणि त्यांच्या स्टार्टअप्सना प्रोत्साहन देऊन सरकारने आत्मनिर्भर संरक्षण क्षेत्राचा मजबूत पाया रचला आहे.

माझे सरकार उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन संरक्षण कॉरिडॉर सुद्धा विकसित करत आहे.

आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे की गेल्या वर्षी आपल्या लष्करी गरजांपैकी 70 टक्के खरेदी फक्त भारतीय उद्योगांकडूनच करण्यात आली.

आमच्या सैन्याने परदेशातून 500 पेक्षा जास्त लष्करी उपकरणे आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही सर्व शस्त्रे आणि उपकरणे आता फक्त भारतीय कंपन्यांकडूनच खरेदी केली जात आहेत.

माझ्या सरकारने नेहमीच जवानांच्या  हिताला प्राधान्य दिले आहे. म्हणूनच  4 दशकांनंतर समान पद समान निवृत्तीवेतन  लागू करण्यात आले. याअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 20 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. शहीद जवानांच्या सन्मानासाठी सरकारने कर्तव्यपथाच्या एका टोकाला राष्ट्रीय युद्ध स्मारक देखील उभारले आहे. हे प्रयत्न वीर जवानांप्रति कृतज्ञ राष्ट्राचे वंदनच नव्हे तर राष्ट्र प्रथमच्या अविरत प्रेरणेचा स्रोत देखील आहेत.

आदरणीय सदस्यगण,

19.  माझे सरकार देशातील प्रत्येक युवकाला  मोठी स्वप्ने पाहण्यासाठी आणि ती प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करण्याचे काम करत आहे. गेल्या 10 वर्षात असे प्रत्येक अडथळे दूर करण्यात आले आहेत ज्यामुळे युवकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पूर्वी स्वत:चे प्रमाणपत्र साक्षांकित करण्यासाठी युवकांना भटकावे लागत होते. आता युवक  स्व-साक्षांकन करून काम करतात. केंद्र सरकारच्या गट-क, गट-ड भरतीसाठी मुलाखती रद्द करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जे विद्यार्थी भारतीय भाषांमध्ये शिक्षण घेत होते, त्यांच्यावर अन्याय झाल्याची परिस्थिती होती.  माझ्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करून हा अन्याय दूर करण्यासाठी पावले उचलली आहेत.

युवकांना आता भारतीय भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. मागील 10 वर्षात देशात 7 नवीन आयआयटी, 16 आयआयआयटी, 7आयआयएम, 15 नवीन एम्स, 315 वैद्यकीय महाविद्यालये आणि 390 विद्यापीठे स्थापन करण्यात आली आहेत. माझे सरकार या संस्थांना आणखी मजबूत बनवून आवश्यकतेनुसार त्यांची संख्या देखील वाढवेल. डिजिटल विद्यापीठ तयार करण्याच्या दिशेनेही सरकार प्रयत्नशील आहे. अटल टिंकरिंग लॅब्स, स्टार्ट-अप इंडिया आणि स्टँड-अप इंडिया यांसारखे अभियान आपल्या युवकांचे सामर्थ्य वाढवत आहेत. या प्रयत्नांमुळे आज भारत जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्ट-अप व्यवस्था  बनला आहे.

आदरणीय  सदस्यगण,

20. देशातील युवकांना त्यांच्यातील प्रतिभेचे दर्शन घडवण्याची योग्य संधी मिळावी हा सरकारचा निरंतर प्रयत्न आहे. सरकारी भरती असो किंवा परीक्षा, कोणत्याही कारणाने त्यात व्यत्यय येणे  योग्य नाही. यामध्ये स्वच्छता आणि पारदर्शकता खूप आवश्यक  आहे. काही परीक्षांमधील पेपरफुटीच्या अलीकडील घटनांची निःपक्षपातीपणे चौकशी करून दोषींना अत्यन्त  कठोर शिक्षा देण्यासाठी माझे सरकार वचनबद्ध आहे. यापूर्वीही अनेक राज्यांमध्ये पेपरफुटीच्या घटना घडल्याचे आपण पाहिले आहे.

याबाबत पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन देशव्यापी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. संसदेनेही परीक्षेतील अनियमिततेविरोधात एक कठोर  कायदा केला आहे. माझे सरकार परीक्षांशी संबंधित संस्था, त्यांची कार्यपद्धती, परीक्षा प्रक्रिया इत्यादींमध्ये मोठ्या सुधारणा करण्याच्या दिशेने काम करत आहे.

आदरणीय  सदस्यगण,

21. माझ्या सरकारने राष्ट्र उभारणीत युवकांचा  सहभाग आणखी वाढवण्यासाठी 'मेरा  युवा भारत - माय भारत' अभियान देखील सुरू केले  आहे. यात आतापर्यंत दीड कोटींहून अधिक युवकांची  नोंदणी झाली आहे. या उपक्रमामुळे युवकांमध्ये  नेतृत्व कौशल्य आणि सेवाभावाची बीजे पेरली जातील. आज आपल्या युवकांना  खेळातही प्रगती करण्याच्या नवीन संधी मिळत आहेत.

माझ्या सरकारच्या प्रभावी प्रयत्नांचे परिणाम आहे की भारताचे युवा खेळाडू जागतिक मंचावर विक्रमी संख्येने पदके जिंकत आहेत. काही दिवसांतच पॅरिस ऑलिम्पिकही देखील सुरू होणार आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा आम्हाला अभिमान वाटतो.  मी त्यांना  शुभेच्छा देते. ही कामगिरी आणखी उंचावण्यासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटना 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्याची तयारी देखील करत आहे.

आदरणीय  सदस्यगण,

22. भारतीय न्याय संहिता एक जुलैपासून देशात लागू होईल. ब्रिटिश राजवटीत गुलामांना शिक्षा देण्याची मानसिकता होती. दुर्दैवाने, गुलामगिरीच्या काळातील शिक्षेची तीच  व्यवस्था स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके सुरू राहिली. हे बदलण्याबाबत चर्चा अनेक दशकांपासून होत होती, परंतु माझ्या सरकारने  हे धाडस करून दाखवले आहे. आता शिक्षेऐवजी न्यायाला प्राधान्य दिले जाईल, जो आपल्या राज्यघटनेचाही आत्मा आहे. या नवीन कायद्यांमुळे न्याय प्रक्रियेला गती मिळणार आहे.

आज देश विविध क्षेत्रांमध्ये  गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त होत असताना त्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल आहे. आणि हीच आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली आहे. माझ्या सरकारने सीएए कायद्यांतर्गत निर्वासितांना नागरिकत्व देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे फाळणीमुळे बाधित झालेल्या अनेक कुटुंबांना सन्मानाचे जीवन जगणे शक्य झाले आहे. ज्या कुटुंबांना सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळाले आहे त्यांच्या उत्तम भविष्यासाठी मी शुभेच्छा देते.

आदरणीय  सदस्यगण,

23. माझे सरकार भविष्य घडविण्याच्या प्रयत्नांबरोबरच भारतीय संस्कृतीचे वैभव आणि वारसा पुनर्स्थापित  करत आहे. अलिकडेच नालंदा विद्यापीठाच्या भव्य संकुलाच्या  रूपाने त्यात एक नवा अध्याय जोडला गेला आहे. नालंदा हे केवळ एक विद्यापीठ नव्हते, तर ते जागतिक ज्ञान केंद्र म्हणून भारताच्या गौरवशाली भूतकाळाची साक्ष होते.

मला विश्वास आहे की नवीन नालंदा विद्यापीठ भारताला जागतिक ज्ञान केंद्र बनवण्यात मदत करेल. आपला हजारो वर्षांचा वारसा भावी पिढ्यांना कायम प्रेरणा देत रहावा हा  माझ्या सरकारचा प्रयत्न आहे. म्हणूनच देशभरातील तीर्थक्षेत्रे, श्रद्धा आणि अध्यात्माच्या केंद्रांचे जतन आणि संवर्धन केले जात आहे.

आदरणीय सदस्यगण,

24. माझे  सरकार, विकासाबरोबरच  आपल्या वारशाचाही तितकाच अभिमान बाळगून काम करत आहे. वारशाबाबत अभिमानाचा हा संकल्प आज अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वंचित वर्ग आणि संपूर्ण समाजाच्या गौरवाचे प्रतीक बनत आहे. माझ्या सरकारने भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिन आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. आता पुढल्या  वर्षी भगवान बिरसा मुंडा यांची 150 वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

राणी दुर्गावती यांची 500 वी जयंतीही देश मोठ्या प्रमाणावर साजरी करत आहे. गेल्या महिन्यातच देशाने राणी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीचा वर्षभर चालणारा  उत्सव सुरू केला. यापूर्वी, सरकारने गुरू नानक देवजींची 550 वी जयंती आणि गुरु गोविंद सिंग जी यांचे  350 वे प्रकाश पर्व  देखील मोठ्या उत्साहात  साजरे केले होते. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेने माझ्या सरकारने काशी तमिळ संगमम , सौराष्ट्र तमिळ संगमम  सारख्या उत्सवांची  परंपराही सुरू केली आहे. अशा आयोजनांमुळे आपल्या नवीन पिढ्यांना राष्ट्र निर्मितीची  प्रेरणा मिळते आणि राष्ट्राविषयी अभिमानाची भावना अधिक बळकट होते.

आदरणीय सदस्यगण,

25. आपले यश हा आपला सामायिक वारसा आहे. त्यामुळे त्यांचा अंगीकार करताना संकोच नव्हे तर  स्वाभिमान असायला हवा. आज भारत अनेक क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करत आहे. ही कामगिरी  आपल्याला आपल्या प्रगतीचा आणि यशाचा अभिमान बाळगण्याची अपार संधी देते.

जेव्हा भारत डिजिटल पेमेंटच्या बाबतीत जगात चांगली कामगिरी करतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जेव्हा भारतीय वैज्ञानिक  चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान यशस्वीपणे उतरवतात तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जेव्हा भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि अराजकतेशिवाय  जेव्हा भारत एवढी मोठे  निवडणूक अभियान राबवतो तेव्हा आपल्याला अभिमान वाटायला हवा.

आज अवघे जग लोकशाहीची जननी या रूपाने आपला सन्मान करत आहे.भारताच्या जनतेने नेहमीच लोकशाही प्रती आपला विश्वास दर्शवला आहे, निवडणुकीशी संबंधित संस्थांवर आपला पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

निकोप लोकशाही कायम राखण्यासाठी आपल्याला हा विश्वास जतन करायचा आहे,त्याचे रक्षण करायचे आहे.

आपल्याला हे ध्यानात घ्यावे लागेल की लोकशाही संस्था आणि निवडणूक प्रक्रियेवरच्या लोकांच्या विश्वासाला धक्का पोहोचू देणे म्हणजे आपण ज्या फांदीवर बसलो आहोत ती  फांदीच छाटण्याप्रमाणे आहे.

आपल्या लोकशाहीच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचवण्याच्या प्रत्येक प्रयत्नाचा सामुहिक निषेध झाला पाहिजे.

आपणा सर्वांना  तो काळ आठवत असेल जेव्हा मतपत्रिका हिसकावल्या जायच्या, लुटल्या जायच्या.

मतदान प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला.

गेल्या काही दशकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांनी सर्वोच्च  न्यायालयापासून ते जनतेच्या न्यायालयापर्यंत प्रत्येक कसोटी पार केली आहे.

माननीय सदस्यगण,

26 ..मी आपणा सर्व सदस्यांसमवेत काही आणखी चिंताही मांडू  इच्छिते.

या विषयांवर आपण सर्वांनी चिंतन-मनन करून देशाला ठोस आणि सकारात्मक परिणाम द्यावेत अशी माझी इच्छा आहे.

आजच्या दळणवळण  क्रांतीच्या युगात फुटीर शक्ती, लोकशाही दुर्बल करण्याचे आणि समाजात फुट पाडण्याचे षडयंत्र आखत आहेत.

या शक्ती देशातही आहेत आणि देशाबाहेरूनही संचालित होत आहेत.

यांच्याकडून अफवा पसरवणे,जनतेत संभ्रम निर्माण करणे, खोटी माहिती पसरवणे यांचा आधार घेतला जात आहे.

ही स्थिती अशीच अनिर्बंध चालू देऊ शकत नाही.

आजच्या काळात तंत्रज्ञान दर दिवशी अधिक प्रगत होत आहे.

अशामध्ये मानवतेविरोधात तंत्रज्ञानाचा  गैर वापर अतिशय घातक आहे.

भारताने जागतिक व्यासपीठावरही याबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि एका जागतिक आराखड्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.

या प्रवृत्ती रोखणे, या आव्हानाला तोंड देण्यासाठी नवे मार्ग शोधणे ही  आपणा सर्वांची जबाबदारी आहे.       

माननीय सदस्यगण,

27.. एकविसाव्या शतकाच्या या तिसऱ्या दशकात आज जागतिक व्यवस्था  नवे रूप घेत आहे.

माझ्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आज भारत विश्व बंधू म्हणून जगाला नवा विश्वास देत आहे.

मानव केंद्री दृष्टीकोनामुळे भारत जगात कोणत्याही संकटाच्या काळात मदतीसाठी प्रथम धाव घेणारा आणि ग्लोबल साउथ चा बुलंद आवाज ठरला आहे.

कोरोनासारखे महासंकट असो,भुकंपासारखी आपत्ती असो किंवा युद्ध परिस्थिती, मानवतेचे रक्षण करण्यात भारत अग्रेसर राहिला आहे.

जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा बदलला आहे हे इटलीमध्ये झालेल्या जी-7 परिषदेत आपण सर्वांनी अनुभवले आहे.

भारताने आपल्या जी-20 अध्यक्षपदाच्या काळात अनेक मुद्यांवर जागतिक एकजूट केली.

भारताच्या अध्यक्षपदाच्या काळातच आफ्रिकन महासंघाला जी-20 चा स्थायी सदस्य करण्यात आले.

यामुळे आफ्रिका खंडाबरोबरच संपूर्ण ग्लोबल साउथचा विश्वास बळकट झाला आहे.

शेजारी सर्वप्रथम हे धोरण अनुसरत भारताने शेजारी राष्ट्रांसमवेत आपले संबंध भक्कम केले आहेत.

9 जूनला केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधी समारंभात सात शेजारी राष्ट्रांच्या प्रतिनिधींचा सहभाग हे प्राधान्य दर्शवते.

सबका साथ-सबका विकास या भावनेने भारत, हिंद-प्रशांत क्षेत्र देशांसमवेतही सहयोग वाढवत आहे.   

पूर्व आशिया असो,किंवा मध्य-पूर्व आणि युरोप माझे सरकार कनेक्टीव्हिटीवर मोठा भर देत आहे.

भारताच्या दूरदृष्टीतूनच भारत मध्य पूर्व युरोप आर्थिक कॉरीडॉर  आकार घेत आहे.

हा कॉरीडॉर  21 व्या शतकातला मोठा गेमचेंजर सिद्ध होईल.

माननीय सदस्यगण,

28.. येत्या काही महिन्यात भारत प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून 75 वर्षे पूर्ण करणार आहे.

भारताच्या संविधानाने, मागच्या दशकांमध्ये प्रत्येक आव्हान, प्रत्येक कसोटी पार केली आहे.

संविधान जेव्हा घडत होते तेव्हाही जगात अशा शक्ती होत्या ज्या भारत अयशस्वी होण्याची इच्छा बाळगत होत्या.

देशात संविधान अमलात आल्यानंतरही संविधानावर अनेकदा हल्ला  झाला.

आज 27 जून आहे.

25 जून 1975 ला लागू झालेली आणीबाणी, संविधानावर थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता.

तेव्हा संपूर्ण  देशात हाहाःकार उडाला होता.

मात्र अशा असंविधानिक शक्तींवर देशाने विजय प्राप्त करून दाखवला. कारण भारतामध्ये प्रजासत्ताक परंपरा मुळापासूनच राहिल्या आहेत.

माझे सरकार भारताचे संविधान म्हणजे केवळ शासनाचे माध्यम इतकेच मानत नाही तर आपले संविधान जन-चेतनेचा भाग राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.

हेच ध्येय ठेवून आमच्या सरकारने 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करायला सुरवात केली आहे.

आता भारताच्या या भूभागावर, आपल्या जम्मू-काश्मीर मधेही संविधान पूर्णपणे लागू झाले आहे जिथे कलम 370 मुळे परिस्थिती थोडी वेगळी होती.    

माननीय सदस्यगण,

29..आपण आपले दायित्व किती निष्ठेने निभावतो यावरून राष्ट्राची कामगिरी ठरते.

18 व्या लोकसभेत अनेक नवे सदस्य प्रथमच संसदीय प्रणालीचा भाग बनले आहेत.

जुने सदस्यही नव्या उत्साहाने आले आहेत.

सध्याचा काळ भारतासाठी सर्वच दृष्टीने अतिशय अनुकूल आहे हे आपण सर्वजण जाणतोच.

येत्या वर्षांमध्ये भारत सरकार आणि संसद कोणते निर्णय घेते, कोणती धोरणे आखते याकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे.

या अनुकूल काळाचा देशाला जास्तीत जास्त लाभ मिळावा ही सरकार बरोबरच प्रत्येक संसद सदस्याचीही जबाबदारी आहे.

गेल्या 10 वर्षात ज्या सुधारणा झाल्या आहेत,जो नवा आत्मविश्वास देशात प्राप्त झाला आहे, त्यातून विकसित भारत घडवण्यासाठी नवा वेग आपण प्राप्त केला आहे.

विकसित भारताची निर्मिती देशाच्या प्रत्येक नागरिकाची आकांक्षा आहे, संकल्प आहे हे आपण सदैव स्मरणात ठेवायचे आहे.

हा संकल्प साकारण्यासाठी अडथळा निर्माण होऊ नये हे आपण सर्वांचे दायित्व आहे. धोरणांना विरोध आणि संसदीय कामकाजाला विरोध या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत.  जेव्हा संसदेचे कामकाज सुरळीत चालते,जेव्हा इथे आशयघन चर्चा होतात, जेव्हा दूरगामी निर्णय घेतले जातात तेव्हा केवळ सरकारवरच नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेवर लोकांचा विश्वास दृढ होतो.

म्हणूनच संसदेच्या क्षणाक्षणाचा सदुपयोग होईल,जनहिताला प्राधान्य मिळेल असा मला विश्वास आहे.

माननीय सदस्यगण,

30..आपल्या वेदांमध्ये आपल्या ऋषींनी आपल्याला

समानो मंत्र: समिति: समानीही प्रेरणा दिली आहे.

म्हणजेच आम्ही समान विचार आणि लक्ष्य ठेवून एकजुटीने काम करावे.

संसदेचीही हीच मूळ भावना आहे.

म्हणूनच भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल तेव्हा देशाच्या या यशात आपलाही सहभाग असेल.

आपण 2047 मध्ये स्वातंत्र्याचा शतक महोत्सव विकसित भारत म्हणून साजरा करू तेव्हा या पिढीलाही याचे श्रेय जाईल.

आज आपल्या युवकांमध्ये जे सामर्थ्य आहे,

आज आपल्या संकल्पांमध्ये जी निष्ठा आहे,

अशक्यप्राय भासेल अशी आपली जी कामगिरी आहे,

येणारा काळ हा भारताचा काळ आहे याचेच हे द्योतक आहे.

हे शतक भारताचे शतक आहे आणि पुढच्या हजार वर्षांपर्यंत याचा प्रभाव राहील.

चला,आपण सर्वजण मिळून कर्तव्यनिष्ठेने, राष्ट्रीय संकल्प साकार करण्यासाठी काम करूया,विकसित भारत साकार करूया.

आपणा सर्वाना खूप खूप शुभेच्छा !

धन्यवाद,

जय हिंद !

जय भारत !

*****

JPS/HA/ST/AS/RA/VJ/SK/NC/PK

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031456) Visitor Counter : 180