पंतप्रधान कार्यालय

माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे जीवन आणि कारकीर्द यावरील  तीन पुस्तकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशन


“एम व्यंकय्या नायडू गारू यांची प्रज्ञा आणि देशाच्या प्रगतीची तळमळ मोठ्या प्रमाणात वाखाणण्यात आली ”

"ही 75 वर्षे विलक्षण आहेत आणि त्यात महत्त्वपूर्ण टप्पे समाविष्ट "

"व्यंकय्या नायडू जी यांचे जीवन हे कल्पना, दूरदृष्टी आणि प्रभावी व्यक्तिमत्व यांच्या संयोगाची एक परिपूर्ण झलक आहे"

"नायडू जी यांचा हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तता आणि मोजक्या शब्दात चोख उत्तर देण्याचे कसब बिनतोड "

"नायडूजींना गाव, गरीब आणि शेतकऱ्यांची सेवा करायची होती"

"व्यंकय्याजींच्या जीवनाचा प्रवास तरुण पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे"

Posted On: 30 JUN 2024 1:59PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणाली मार्फत माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांच्या जीवन आणि कारकीर्द यावरील तीन पुस्तकांचे प्रकाशन केले.

पंतप्रधानांनी जारी केलेल्या पुस्तकांमध्ये ((i) माजी उपराष्ट्रपतींचे चरित्र वेंकैया नायडू लाइफ इन सर्व्हिसहे द हिंदूंच्या हैदराबाद आवृत्तीचे माजी निवासी संपादक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले पुस्तक.  (ii) “सेलिब्रेटिंग भारत द मिशन अँड मेसेज ऑफ श्री एम व्यंकय्या नायडू ॲज थर्टींथ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया”, हे उपराष्ट्रपतींचे माजी सचिव डॉ. आय.व्ही. सुब्बाराव यांनी संकलित केलेले फोटो क्रॉनिकल आणि (iii) "महानेता - लाईफ अँड जर्नी ऑफ श्री एम. व्यंकय्या नायडू " नावाचे संजय किशोर यांनी लिहिलेले तेलुगु भाषेतील चित्रमय चरित्र, यांचा समावेश आहे.

एम. व्यंकय्या नायडू उद्या 1 जुलै रोजी आपल्या वयाची 75 वर्षे पूर्ण करत आहेत, असे पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. "त्यांची ही 75 वर्षे विलक्षण आहेत आणि त्यात महत्त्वपूर्ण टप्पे समाविष्ट आहेत" असेही पंतप्रधान म्हणाले. एम. व्यंकय्या नायडू यांचे चरित्र आणि त्यांच्या जीवनावर आधारित इतर दोन पुस्तकांचे प्रकाशन करताना पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.  ही पुस्तके लोकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतील आणि देशसेवेचा योग्य मार्गही उजळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माजी उपराष्ट्रपतींसोबतच्या त्यांच्या दीर्घ सहवासाची आठवण करत  पंतप्रधान म्हणाले की, त्यांना व्यंकय्याजी यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची संधी मिळाली.  भारतीय जनता पार्टीचे (बीजेपी) राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून व्यंकय्याजी यांच्या कार्यकाळात हे सहकार्य सुरू झाले, त्यानंतर मंत्रिमंडळातील त्यांची ज्येष्ठ  भूमिका, देशाचे उपराष्ट्रपती आणि नंतर राज्यसभेच्या सभापती पदाच्या त्यांच्या कार्यकाळात हे सहकार्य वृद्धिंगत होत राहिले असे पंतप्रधानांनी सांगितले.  एवढी महत्त्वाची पदे भूषवताना एका छोट्या गावातून आलेल्या व्यक्तीने किती अनुभवसंपदागोळा केली असेल याची कल्पना करु शकता, असे पंतप्रधान म्हणाले. आपणही व्यंकय्याजींकडून  खूप काही शिकल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

व्यंकय्या नायडू यांचे जीवन हे विचार, दूरदृष्टी आणि व्यक्तिमत्त्व यांच्या संयोगाची परिपूर्ण झलक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील भाजप आणि जनसंघाची दशकांपूर्वी कोणत्याही मजबूत पायाशिवायच्या स्थितीची सद्यस्थितीशी तुलना करत पंतप्रधानांनी आजच्या स्थितीबद्दल आनंद व्यक्त केला. "एवढ्या उणिवा असूनही, श्री नायडू यांनी "राष्ट्र प्रथम" या विचारसरणीसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणून परिश्रम केले आणि राष्ट्रासाठी कार्य  करण्याचा संकल्प केला होता."असे पंतप्रधानांनी सांगितले. देशात 50 वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात सुमारे 17 महिने तुरुंगवास भोगूनही, नायडू यांनी आणीबाणीच्या विरोधात प्राणपणाने लढा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले. आणीबाणीच्या काळात ज्यांचे धाडस कसाला लागले होते, नायडू हे असेच धडाडीचे कार्यकर्ते होते, आणि त्यामुळेच आपण नायडूंना खरे मित्र मानत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

आपल्याला मिळालेली सत्ता ही जीवनातील सुखसोयी प्रतिबिंबित करत नाही तर सेवेद्वारे संकल्प पूर्ण करण्याचे ते माध्यम आहे हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, नायडू यांनी जेव्हा वाजपेयी सरकारचा भाग बनण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी ग्रामविकास मंत्री पद निवडून स्वतःला सिद्ध केले. ग्रामविकास मंत्री  म्हणून नायडूंना गावांची,गरिबांची आणि शेतकऱ्यांची सेवा करायची होती.मोदी पुढे  म्हणाले कीनायडू यांनी मोदी सरकारमध्ये केंद्रीय शहरी विकास मंत्री म्हणून चांगले काम केले आणि आधुनिक भारतीय शहरांसाठी त्यांच्या वचनबद्धतेचे आणि दूरदृष्टीचे त्यांनी कौतुक केले. त्यांनी व्यंकय्या नायडू यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहीम, स्मार्ट सिटी मोहीम आणि अमृत योजनेचा यावेळी उल्लेख केला.

माजी उपराष्ट्रपतींच्या मृदु वृत्तीचे, वक्तृत्वाचे आणि बुद्धीचे कौतुक करताना पंतप्रधानांनी आठवण करून दिली की, व्यंकय्या नायडू यांची बुद्धी, उत्स्फूर्तता, हजरजबाबीपणा आणि त्यांचे वन लाईनर याची कोणीही बरोबरी करू शकत नाही.  मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान नायडू यांनी दिलेली घोषणा "एक हाथ में भाजपा का झंडा, और दुसरे हाथ में एनडीए का अजेंडा" ची आठवण करून दिली.या घोषणेत एका हातात पक्षाचा झेंडा आणि दुसऱ्या हातात  राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा झेंडा आहे. 2014 मध्ये, त्यांनी M.O.D.I. म्हणजे 'मेकिंग ऑफ डेव्हलप्ड इंडिया' हे शब्दरूप सादर केले. पंतप्रधान म्हणाले की व्यंकय्या नायडू यांच्या चिंतन क्षमतेमुळे मी आश्चर्यचकित झालो. माजी उपराष्ट्रपतींच्या शब्दांच्या ठायी  आशयघनता, गांभीर्य, ​​दूरदृष्टी, लय, विद्वत्ता यांचा संगम आहे अशा शब्दात राज्यसभेत त्यांच्या शैलीचे कौतुक केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

राज्यसभेचे सभापती असताना नायडू यांनी निर्माण केलेल्या सकारात्मक वातावरणाचे पंतप्रधानांनी कौतुक केले आणि सभागृहाने घेतलेल्या विविध महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. कलम 370 रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मांडण्यापूर्वी राज्यसभेत मांडण्यात आल्याची आठवण करून देतानासभागृहाचा आदर कायम राखत असे संवेदनशील विधेयक मंजूर करण्यात  नायडू यांच्या अनुभवी नेतृत्वाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधानांनी नायडू यांच्या दीर्घ, सक्रिय आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मोदींनी व्यंकय्या जींच्या स्वभावाच्या भावनिक बाजूवर प्रकाश टाकला आणि सांगितले की त्यांनी कधीही आपल्या निर्णयक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ दिला नाही. त्यांची साधी राहणी आणि लोकांशी संपर्क ठेवण्याच्या त्यांची खास पद्धतीही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. सणांच्या काळात व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमा ची आठवणही पंतप्रधानांनी  केली. पंतप्रधानांनी  नायडूंसारख्या व्यक्तींनी भारतीय राजकारणात दिलेल्या योगदानाचा यावेळी उल्लेख केला.आज प्रसिद्ध झालेल्या तीन पुस्तकांचा संदर्भ देताना पंतप्रधान म्हणाले की ही पुस्तके व्यंकय्या नायडू यांच्या जीवनाचा प्रवास मांडतात, जो  तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

पंतप्रधानांनी एकदा राज्यसभेत नायडूंना समर्पित केलेल्या एका कवितेच्या काही ओळी स्मरून आणि प्रेक्षकांसमोर मांडून भाषणाचा समारोप केला.  पंतप्रधानांनी  पुन्हा एकदा  व्यंकय्या नायडूंचे  75 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन केले आणि भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 2047 मध्ये विकसित भारत  आपले "स्वातंत्र्य शतक" साजरे करेल, तर नायडूजी त्यांचा शतकाचा टप्पा  साजरा करतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

***

N.Chitale/S.Mukhedkar/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2029709) Visitor Counter : 23