आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली श्रीनगरमध्ये 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम


"स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास" ही या वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना, योगाभ्यासाद्वारे जागतिक आरोग्य आणि निरामयतेला प्रोत्साहन देण्याचा संदेश देते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामप्रधानांशी साधला संवाद ,योग ही लोकांच्या नेतृत्वाखालील चळवळ बनवण्याचे केले आवाहन

"अंतराळासाठी योग" सारख्या उल्लेखनीय कार्यक्रमांसह जगभरात योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Posted On: 20 JUN 2024 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 20 जून 2024

21 जून 2024 रोजी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्रीनगरमध्ये एसकेआयसीसी इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली  आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

“स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाभ्यास ” ही या वर्षीची आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना वैयक्तिक तंदुरुस्ती  आणि सामाजिक सौहार्द वाढवण्यामध्ये योगसाधनेच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर देते. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री प्रतापराव गणपतराव जाधव आणि इतर अनेक मान्यवरही पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या कार्यक्रमात सहभागी होतील.

योगाभ्यासाद्वारे जागतिक आरोग्य आणि निरामयतेला प्रोत्साहन देण्याचा  संदेश देत हजारो सहभागींना एकत्र आणण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या प्रसंगी, पंतप्रधान उपस्थितांना  संबोधित करतील आणि शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक वाढीसाठी योगसाधनेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या सामायिक योग प्रोटोकॉल सत्रात सहभागी होतील.

योगसाधनेचे  सर्वसमावेशक लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व ग्रामप्रधानांना एक पत्र देखील लिहिले आहे की, “ सर्वांगीण आरोग्य, याविषयी अधिक जागरूकता पसरवून लोकांच्या नेतृत्वाखालील चळवळ बनवण्याची विनंती करतो.

योगाभ्यासाच्या फायद्यांची जास्तीत जास्त सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी सर्व ग्रामप्रधानांना एक पत्र देखील लिहिले आहे .“योग आणि भरड धान्ये याविषयी तळागाळात अधिक जनजागृती करून सर्वांगीण आरोग्य ही लोकांच्या नेतृत्वाखालील चळवळ बनवण्याची मी तुम्हाला  विनंती करतो.” यापूर्वीच्या,आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांप्रमाणे यावर्षीही पंतप्रधानांच्या पत्रामुळे पंचायत, अंगणवाड्या आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात योगसाधनेचे आयोजन होईल यात शंका नाही.

केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव गणपतराव जाधव यांच्यासह आयुष सचिव  वैद्य राजेश कोटेचा आणि जम्मू-काश्मीरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज श्रीनगर येथील 21 जूनच्या मुख्य कार्यक्रमाचे ठिकाण एसकेआयसीसी ला भेट दिली आणि तयारीची पाहणी केली.सर्व योग प्रेमींसाठी योगदिनाचा हा मुख्य कार्यक्रम उत्कंठावर्धक अनुभव देणारा ठरावा यासाठी  जोरात तयारी सुरू आहे.

2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात झाल्यापासून, पंतप्रधानांनी दिल्ली मध्ये कर्तव्य पथ, चंदीगड, डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय, यासारख्या प्रमुख ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून योग दिनाचा पुरस्कार करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे.

यंदा योग दिनाच्या उत्सवात संपूर्ण देश सहभागी होणार असून,‘अंतराळासाठी योग’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात इस्रो (ISRO), अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची सर्व केंद्रे, CYP, म्हणजेच सर्वसामान्य योग सरावामध्ये सहभागी होणार आहेत. इस्रोच्या स्वायत्त संस्था देखील 21 जून रोजी CYP सरावात सहभागी होतील. याबरोबरच, 21 जून रोजी या कार्यक्रमात गगनयान प्रकल्पाच्या टीमचा देखील सक्रीय सहभाग असेल. कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथे देखील आंतरराष्ट्रीय योग दिनाची जय्यत तयारी सुरु आहे.

जागतिक स्तरावर, परदेशातील दूतावास आणि भारतीय मिशनचा या उत्सवातील सहभाग, योगसाधनेचा व्यापक प्रभाव प्रतिबिंबित करेल. यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाला इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या सहयोगाने ‘योग फॉर स्पेस’ यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष सोहळ्यासाठी विविध क्षेत्रांमधील 7,000 पेक्षा जास्त लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर श्रीनगर मधील दाल लेकच्या काठावर एकत्र येणार आहेत.

आयुषचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकत, आरोग्य, सामाजिक मूल्ये आणि समुदायाची भावना जागी करण्यामधील या दिवसाची भूमिका अधोरेखित केली.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील 'संपूर्ण सरकार' दृष्टिकोनामध्ये विविध सरकारी विभागांनी परस्पर समन्वयाने केलेले प्रयत्न तसेच राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचा सक्रीय सहभाग समाविष्ट आहे.

राष्ट्रीय आयुष मिशन टीम संपूर्ण आरोग्यावरील योग साधनेचा प्रभाव दाखवून देण्यासाठी देशभर कार्यक्रमांचे आयोजन करत आहे.

दिल्लीमध्ये, आयुष मंत्रालयाने सामूहिक योग कार्यक्रम आयोजित करण्यासाठी NDMC (नवी दिल्ली महानगरपालिका), ASI (भारतीय पुरातत्व सर्वेक्षण) आणि DDA (दिल्ली विकास प्राधिकरण) यांच्याशी भागीदारी केली आहे. लोकांचा मोठा सहभाग मिळवण्यासाठी आयुष मंत्रालयाने MyGov आणि MyBharat प्लॅटफॉर्मवर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या सहयोगाने, "कुटुंबासह योग" व्हिडिओ स्पर्धा, यासह अनेक स्पर्धांचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा जगभरातील कुटुंबांना योग साधनेचा आनंद प्रदर्शित करण्यासाठी आणि कौटुंबिक बंध मजबूत करण्यासाठी प्रोत्साहन देईल. 30 जून 2024 पर्यंत MyGov आणि MyBharat या प्लॅटफॉर्मवर आपला व्हिडीओ पाठवता येईल.

#YogaWithFamily स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना योग साधनेमधून आरोग्य आणि एकतेचा संदेश देऊन,आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल.कार्यक्रमासाठी प्रमुख हॅशटॅगमध्ये,#InternationalDayofYoga2024,#YogaForSelfAndSociety,#YogaWithFamily आणि #IDY2024 यांचा समावेश आहे.जगभरातील लोकांनी हे हॅशटॅग वापरून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या या महोत्सवात सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

 


S.Patil/S.Kane/R.Agashe/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2027206) Visitor Counter : 66