माहिती आणि प्रसारण मंत्रालय

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 15 ते 21 जून 2024 या कालावधीत आयोजन


मुंबईत होणाऱ्या या महोत्सवाचा उद्घाटनपर चित्रपट   दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे येथेही  प्रदर्शित होणार

61 भाषांमधील 39 देशांमधील 314 चित्रपट प्रदर्शनाकरिता 1000 हून अधिक चित्रपटांच्या विक्रमी प्रवेशिका

माहितीपटांना प्रोत्साहन  देण्याच्या उद्देशाने यंदाच्या महोत्सवात प्रथमच  डॉक फिल्म बाजार

प्रख्यात चित्रपट निर्माते 25 पेक्षा जास्त मास्टरक्लास, पॅनेल चर्चा आणि निवडक विषयांवरील खुल्या मंचांमध्ये होणार सहभागी

आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते ऑड्रिअस स्टोनीस, भरत बाला, डॉ बॉबी सरमा बरुआ, अ‍ॅना हेन्केल-डॉनर्समार्क आणि निर्माते अपूर्व बक्षी, ॲडेल सीलमन-एग्गेबर्ट, केको बँग आणि बार्थेलेमी फोगिया यांचा प्रतिष्ठित ज्युरी सदस्यांमध्ये समावेश

Posted On: 07 JUN 2024 4:10PM by PIB Mumbai

 

18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन मुंबईत 15 जून ते 21 जून 2024 या कालावधीत होणार असल्याची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज केली. महोत्सव स्थळ मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन- एनएफडीसी परिसरात असले तरी मिफ्फ मधल्या चित्रपटांचे  प्रदर्शन दिल्ली (सिरीफोर्ट प्रेक्षागृह), चेन्नई (टागोर फिल्म सेंटर), पुणे (एनएफएआय प्रेक्षागृह) आणि कोलकाता (एसआरएफटीआय प्रेक्षागृह) येथेही होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अतिरिक्त सचिव नीरजा शेखर, पत्र सूचना कार्यालयाच्या प्रधान महासंचालक शेफाली बी. शरण आणि एनएफडीसी चे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार उपस्थित होते.

मिफ चित्रपट कार्यक्रम

1. यावर्षी 1018 चित्रपटांच्या विक्रमी प्रवेशिका प्राप्त

2. आंतरराष्ट्रीय (25) आणि राष्ट्रीय (77) स्पर्धा विभागांसाठी प्रख्यात चित्रपट तज्ञांच्या 3 निवड समित्यांनी 118 चित्रपट निवडले. यावर्षी अतिशय उच्च दर्जाच्या चित्रपट प्रवेशिका प्राप्त झाले ज्यामुळे निवड करणे कठीण झाल्याचे निवड समितीने देखील एकमताने नमूद केले.

3.  या वर्षी मिफ कार्यक्रमात एकूण 314 चित्रपट

4. 8 वर्ल्ड प्रीमियर्स, 6 इंटरनॅशनल प्रीमियर्स, 17 एशिया प्रीमियर्स आणि 15 इंडिया प्रीमियर्स होतील.

5. यावर्षीच्या महोत्सवात विशेष पॅकेजेस ची निवड करण्यात आली आहे, ज्यात यांचा समावेश आहे  :

... ऑस्कर आणि बर्लिनेलचे पुरस्कार विजेते चित्रपट पॅकेज (प्रत्येकी 12 लघुपट)

.... रशिया, जपान, बेलारूस, इटली, इराण, व्हिएतनाम आणि माली या 7 देशांच्या सहकार्यातून स्पेशल कंट्री फोकस पॅकेजेस

... फ्रान्स, स्लोव्हेनिया, अर्जेंटिना आणि ग्रीस या 4 देशांमधून निवडलेले ॲनिमेशन पॅकेज

... देशभरातील नामांकित संस्थांमधील विद्यार्थ्यांचे चित्रपट (45 चित्रपट)

.. एनएफडीसी -एनएफएआय कडून पुनर्संचयित केलेले क्लासिक पॅकेज

... देशाची वाढ, विकास आणि समृद्धी दर्शवणारे अमृत काळातील भारताच्या विशेष संकल्पनेवर आधारित स्पर्धात्मक चित्रपट

... दृष्टिदोष असणाऱ्या दिव्यांगजनांसाठी श्राव्य वर्णन आणि सांकेतिक भाषेतील वर्णन तसेच श्रवणदोष असलेल्या  दिव्यांगांसाठी आणि छोट्या मथळ्यांसह चित्रपट.

... खालील संकल्पनेची देखील निवडक चित्रपटांची पॅकेजेस -

 i वन्यजीव

 ii मिशन लाइफ

 iii आशियाई महिला चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट

मिफ्फचा उद्घाटनपर आणि समारोपाचा  चित्रपट

6. 18 व्या मिफ्फमध्ये बिली अँड मॉली, अँन अटर लव्ह स्टोरी”, हा  मिफ्फचा उद्घाटनपर चित्रपट  असून 15 जून 2024 रोजी मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई येथे तो दाखवला जाणार आहे.

7. सुवर्ण शंख पटकावणारा चित्रपट हा  महोत्सवाचा  समारोपाचा  चित्रपट  म्हणून प्रदर्शित केला जाईल. 21 जून 2024 रोजी तो  दाखवला जाईल.

ज्युरी आणि पुरस्कार

8.आंतरराष्ट्रीय ज्युरींमध्ये केको बँग, बार्थेलेमी फोगिया, ऑड्रिअस स्टोनीस, भरत बाला आणि मानस चौधरी अशा जगभरातील प्रख्यात चित्रपट व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे. ते सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी सुवर्ण शंख, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय लघुकथेसाठी आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपटासाठी रौप्य शंख आणि सर्वात नाविन्यपूर्ण/प्रायोगिक चित्रपटासाठी प्रमोद पती पुरस्कार प्रदान करणार आहेत.

9. राष्ट्रीय ज्युरीमध्ये ॲडेल सीलमन-एग्गेबर्ट, डॉ बॉबी सरमा बरुआ, अपूर्व बक्षी, मुंजाल श्रॉफ आणि अ‍ॅना हेन्केल-डॉन नर्समार्क यासारख्या उल्लेखनीय नावांचा समावेश आहे. त्यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट भारतीय माहितीपट, लघुपट, ॲनिमेशन, सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठीचे पुरस्कार (महाराष्ट्र सरकार प्रायोजित) आणि सर्वोत्कृष्ट विद्यार्थी चित्रपट पुरस्कार (आयडीपीएद्वारा प्रायोजित), तांत्रिक पुरस्कार आणि "इंडिया इन अमृत काल" वरील सर्वोत्कृष्ट लघुपटासाठी विशेष पुरस्कार प्रदान करतील.

10. 1) सिनेमॅटोग्राफी, 2) एडिटिंग आणि 3) साउंड डिझाईनसाठी 3 तांत्रिक पुरस्कार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून दिले जातील.

11 ..इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स (एफआयपीआरईएससीआय) ज्युरीचे 3 प्रख्यात चित्रपट समीक्षक देखील राष्ट्रीय स्पर्धेतील माहितीपटासाठी पुरस्कार प्रदान करतील

12. एकूण 42 लाख रुपयांचे पुरस्कार.

महोत्सवातील विशेष सुविधा

13.दृष्टिदोष असणाऱ्या दिव्यांगजनांसाठी श्राव्य वर्णन आणि सांकेतिक भाषेतील वर्णन तसेच श्रवणदोष असलेल्या  दिव्यांगांसाठी आणि छोट्या मथळ्यांसह चित्रपट.

14. विशेष दिव्यांगांसाठी विशेष चित्रपट प्रदर्शित केले जातील. विशेष गरजा असलेल्या दिव्यांगांसाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने ( एनएफडीसी) ने स्वयंम या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने एनएफडीसी- एफडी परिसरात विशेष सोयी उपलब्ध केल्या आहेत. कार्यक्रमातील स्वयंसेवक उपस्थितांना चित्रपटांचा आनंद सलगपणे घेता यावा याची काळजी घेतील.

भव्य उद्घाटन/समारोप समारंभ

15. मुंबईत नरिमन पॉइंटच्या एनसीपीए येथे भव्य उद्घाटन आणि समारोप समारंभ आयोजित केला जाईल. या कार्यक्रमांमध्ये संस्कृती आणि कलेचा अनोखा मिलाफ पाहायला मिळेल. भारतीय ॲनिमेशनचा प्रवास दर्शवणारी कलाकृती आणि श्रीलंकेचा सांस्कृतिक कार्यक्रम उद्घाटनाच्या वेळी सादर केला जाईल. समारोप समारंभात अर्जेंटिनाचा सांस्कृतिक कार्यक्रम होईल तसेच यंदाच्या 77 व्या कान्स चित्रपट महोत्सवात पुरस्कार मिळवलेला आणि  भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था (एफटीआयआय) च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला लघुपट सनफ्लॉवर्स वेअर  द फर्स्ट वन्स टू नो दाखवला जाईल.

16. मुंबईतील एनएफडीसी- एफडी परिसरात 15 जून रोजी पहिल्या चित्रपटानंतर दररोज रेड कार्पेट  चित्रपट  दाखवले जाणार आहेत. इतर रेड कार्पेट मध्ये  पोचर, इनसाइड आऊट -2, द कमांडमेंट्स शॅडो, माय मर्क्युरी, श्रीकांत, ब्रँड बॉलीवूड अशा इतर चित्रपटांचा समावेश  आहे.

17.  दिल्ली (17 जून), चेन्नई (18 जून), कोलकाता (19 जून) आणि पुणे (20 जून) येथे दाखवले जाणारे विशेष रेड कार्पेट चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहतील.

मास्टरक्लास आणि पॅनेल डिस्कशन :

18.   18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मास्टरक्लास अर्थात तज्ञांचे मार्गदर्शन तसेच चर्चात्मक कार्यक्रम आणि निमंत्रितांसोबतच्या चर्चा अर्थात पॅनल डिस्कशनची एकूण 20 सत्रे आयोजित केली जाणार आहेत.  यात चित्रपट दिग्दर्शक संतोष सिवन, ऑड्रियस स्टोनीज, केतन मेहता, रिची मेहता, टी. एस. नागभरण, जॉर्जेस श्विजगेबेल हे आणि असे अनेक चित्रपट निर्मिती क्षेत्रातील दिग्गज मान्यवर सहभागी होणार आहेत.

19.   भारतीय माहितीपट निर्माते संघटनेच्या (आयडीपीए) सहकार्याने विविध घडमोडींचे केंद्रस्थान असलेल्या खुल्या प्रेक्षागृहात दररोज खुल्या गटचर्चांचे आयोजनही केले जाणार आहे. या गटचर्चांमध्ये चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी होणार आहेत.

20.   नोंदणीकृत सहभागींसाठी अॅनिमेशन आणि व्हीएफएक्स तंत्रज्ञानाच्या वापरासंबंधी अल्पकालावधीच्या अभ्यासक्रमाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

डॉक फिल्म बाजार :

21.   चित्रपट निर्मात्यांना एक विशिष्ट व्यासपीठ उपलब्ध करून देत, त्यांच्या प्रकल्पांसाठी खरेदीदार, प्रायोजक आणि भागिदार शोधण्यात मदत करता यावी, आणि या माध्यमातून चित्रपट निर्मितीला चालना देता यावी या उद्देशाने, यंदा प्रथमच डॉक फिल्म बाजारचे आयोजन करण्यात आले आहे.

22.   या अंतर्गत आत्तापर्यंत 10 देशांमधील 27 भाषांमधले सुमारे 200 प्रकल्प प्राप्त झाले आहेत.

23.   डॉक फिल्म बझार अंतर्गत चित्रपट निर्मिती प्रक्रियेत परस्परांना पुरक आणि परस्परांशी निगडित असलेल्या सहनिर्मिती बाजारपेठ (16 प्रकल्प), निर्मिती प्रक्रियेत असलेल्या प्रकल्पांसाठीच्या कार्यशाळा अर्थात वर्क इन प्रोग्रेस लॅब (6 प्रकल्प) आणि व्ह्यूइंग रूम   (106 प्रकल्प) अशा तीन टप्प्यांची मांडणी केली जाणार आहे.

24.   निवडक प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या या संधींव्यतिरिक्तविक्रिते आणि खरेदीदारांच्या बैठकीचे एक खुले सत्रही अर्थात 'ओपन बायर-सेलर मीट' चे आयोजनही केले जाणार आहे. चित्रपट निर्मात्यांसाठी हे सत्र निर्मिती, सिंडिकेशन (निर्मिती झालेली कलाकृती विविध व्यासपीठांवर दाखवण्यासाठी देणे), खरेदी, वितरण आणि विक्री अशा विविध टप्यांवर खरेदीदार आणि कॉर्पोरेट्ससोबत भागिदारी करण्यामध्ये सहकार्याचे ठरू शकणार आहे.

25.   माहितीपटांची निर्मिती आणि आणि कॉर्पोरेट ब्रँडिंग यांच्यामधील परस्पर सामायिक संबंधांवर चर्चा करण्यासाठी एक विशेष सत्रही आयोजित केले जाणार आहे. या सत्राच्या माध्यमातून व्यवसाय उद्योग क्षेत्राशी संबंधित फिक्की आणि यासारख्या अनेक संघटनांमधील प्रतिथयश उद्योजकांना, त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधी अर्थात सीएसआर फंडींगच्या माध्यमातून माहितीपटांसाठी निधी उपलब्ध करून देणे म्हणजे स्वतःचे ब्रँडिंग करण्यासोबतच, सकारात्मक सामाजिक परिणामांमध्ये स्वतःचे योगदान देण्याचे प्रभावी माध्यम असल्याच्या  शक्यतांबद्दल विचार विनिमय करता येईल.

केवळ मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी समर्पित विशेष पोर्टल आणि मोबाइल अॅप :

26.     या महोत्सवासाठी परस्पर संवादाची सोय उपलब्ध असलेले www.miff.in हे खास संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून महोत्सवात दाखवले जाणारे चित्रपट, आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रमांबद्दल उत्सुकता निर्माण करणारा तपशील दिला गेला आहे.

27 ..याशिवाय केवळ या महोत्सवासाठी समर्पित असलेले एक विशेष मोबाइल अॅपही विकसित केले गेले आहे. या अॅपच्या माध्यमातून महोत्सवासाठी येणाऱ्या विविध प्रतिनिधींकरता चित्रपट पाहण्यासाठीची आगाऊ नोंदणी करणे, मास्टरक्लास - खुल्या गटचर्चा अशा विविध उपक्रमांसाठीच्या स्वतःच्या सहभागाची नोंदणी सुलभरित्या करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.  या अॅपच्या माध्यमातून महोत्सवासाठी आलेल्या प्रतिनिधींचा महोत्सवाच्या आयोजनाबद्दलचा अमूल्य अभिप्राय मिळवण्यातही मदत होणार आहे.

प्रतिनिधी नोंदणी

28..प्रतिनिधी नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून महोत्सवात उपस्थित राहण्यासाठी अनिवार्य आहे. संकेतस्थळाद्वारे किंवा मिफ च्या प्रचार सामग्रीमध्ये प्रदान करण्यात आलेल्या QR कोडद्वारे प्रतिनिधी नोंदणी करता येईल.

29.. बुक माय शो द्वारे देखील प्रतिनिधी नोंदणी केली जाऊ शकते.

30.. कितीही चित्रपट किंवा मास्टरक्लास किंवा डॉक फिल्म बाजारला उपस्थित राहण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

31.. प्रतिनिधी नोंदणी शुल्क -

..मुंबई - संपूर्ण महोत्सवात सहभागी होण्यासाठी 500 रुपये.

.. दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि पुणे - मोफत

.. विद्यार्थी आणि प्रसार माध्यमे मोफत

..सर्व प्रतिनिधी नोंदणी पुढील 3 दिवसांसाठी विनामूल्यअसेल.

भागीदारी

32..यावर्षी प्रथमच, मिफ महोत्सवाला 20 हून अधिक कॉर्पोरेट ब्रँड्सकडून सहयोग प्राप्त झाला आहे.  या महोत्सवाच्या विविध पैलूंना प्रायोजित करण्यापासून ते महोत्सवाला बळकट करण्यासाठी कौशल्य प्रदान करण्यापर्यंत विविध पातळ्यांवर या ब्रँड्सनी महोत्सवाला सहकार्य केले आहे.

पार्श्वभूमी

मिफ्फ हा दक्षिण आशियातील नॉन -फिचर फिल्म (माहितीपट, शॉर्ट फिक्शन आणि ॲनिमेशन) साठीचा सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव आहे, 1990 मध्ये या महोत्सवाची सुरुवात झाल्यापासून माहितीपट जगतातील एक प्रमुख आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे. हा महोत्सव दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो.

मिफ्फ , जगभरातील माहितीपट चित्रपट निर्मात्यांना भेटण्यासाठी, विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी, माहितीपट, लघु आणि ॲनिमेशन चित्रपटांच्या सह-उत्पादनाच्या आणि विपणनाच्या नव्या संधी शोधण्यासाठी तसेच चित्रपट निर्मात्यांची जागतिक सिनेमाची दृष्टी व्यापक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.  हा महोत्सव माहितीपट, ॲनिमेशन आणि लघुपटांबाबत अधिक संभाषण आणि चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. कलात्मक अभिव्यक्ती वाढवणे तसेच चित्रपट निर्माते आणि उपस्थितांसाठी एक सर्जनशील उत्प्रेरक असल्याचे सिद्ध करणे हे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

***

N.Chitale/V.Joshi/P.Jambhekar/T.Pawar/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023483) Visitor Counter : 125