आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

तापमानातील वाढीची दखल घेत उष्णतेच्या लाटेचा सामना व रुग्णालयात अग्निप्रतिबंधक उपाययोजनांच्या सज्जतेबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची राज्यांबरोबर आढावा बैठक


उष्माघातावर उपचारांसाठी विशेष खोल्या, ओआरएस सुविधा आणि सावधानता बाळगण्यासाठी एकात्मिक आरोग्य माहिती मंच (आयएचआयपी) मार्फत वेळोवेळी आढावे घेण्याची राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सूचना

सर्व आरोग्य केंद्रामध्ये अग्निप्रतिबंधक आणि विद्युत सुरक्षेसाठी अत्यावश्यक उपाययोजना सज्ज ठेवण्याच्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना सूचना

Posted On: 06 JUN 2024 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोएल यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींची दूरदृश्य माध्यमातून बैठक घेतली. बैठकीत त्यांनी उष्णतेच्या लाटेच्या काळात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये आरोग्य सेवा व सुविधा केंद्रांमधील अग्निप्रतिबंधक व विद्युत सुरक्षेबाबत उपाययोजनांच्या आढावा घेतला.

भारतीय हवामान विभागाने 27 मे 2024 रोजी वर्तवलेल्या हवामानाच्या दूरगामी अंदाजानुसार, जून 2024 मध्ये देशात दक्षिण भारताचा भाग वगळता बहुतांश भागांत सामान्य कमाल तापमानापेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दक्षिण भागात मात्र कमाल तापमान सामान्य किंवा त्यापेक्षा कमी राहील, वायव्य भारताचा बहुतांश भाग आणि मध्य भारतासह लगतच्या भागांमध्ये तापमान सामान्य कमाल तापमानापेक्षा वर राहील, असा अंदाज आहे.

राज्य आरोग्य विभागांना दिलेल्या सूचनांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:

  • वाढलेल्या उष्णतेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य सेवा केंद्रांना मार्गदर्शक सूचना देण्याचा सल्ला
  • जनजागृतीपर फलकांद्वारे काय करावे व काय टाळावे याबाबत सार्वजनिक आरोग्य सल्ला व माहिती
  • उष्माघाताच्या गंभीर परिस्थितीत  शरीराचे तापमान तातडीने कमी करण्याबाबत उपाययोजनांची माहिती
  • एम्ससह देशभरातील वैद्यकिय महाविद्यालयांना उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांच्या शवविच्छेदनातील निरीक्षणे नोंदवण्याबाबत मार्गदर्शक सूचना
  • आरोग्य सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि आरोग्य सेवा महासंचालक यांच्यात आरोग्य सेवा केंद्रांतील अग्निविषयक सुरक्षेच्या उपायांबाबत परस्परसंवाद ठेवण्याबाबत सूचना
  • उष्माघाताचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आरोग्य सेवा आणि रुग्णवाहिकांच्या सज्जतेच्या निकषांची यादी

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तीव्र उष्णतेमुळे उद्भवू शकणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती 23 मार्च 2024 रोजी पत्राद्वारे केली होती. त्यानंतर 29 मे 2024 रोजी अजून एक पत्र पाठवून अग्निविषयक सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची सूचनाही केली.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडून अपेक्षित उपाययोजनांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली त्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • उष्णता आरोग्य कृती आराखड्यावर अंमलबजावणी
  • भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला उष्णतेच्या लाटेचा अंदाज लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवणे
  • उष्णतेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विषयक सर्व सेवा, सुविधा केंद्रे आणि रुग्णवाहिकांच्या सज्जतेचे मूल्यांकन
  • आयएचआयपी अर्थात एकात्मिक आरोग्य माहिती प्लॅटफॉर्मवर उष्णता-संबंधित विकार आणि मृत्यू बाबतचे संनिरीक्षण बळकट करणे.
  • सर्व आरोग्य सेवा सुविधा केंद्रात समर्पित उष्माघात कक्ष चालवणे.
  • आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना जारी करणे आणि आयईसी उपक्रमांचे नियोजन करणे.
  • एचआरआय लक्षणे, रुग्ण ओळखणे, क्लिनिकल व्यवस्थापन, आपत्कालीन कूलिंग आणि निरीक्षण अहवाल यासंबंधी आरोग्य सुविधांचे वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे प्रबोधन आणि क्षमता बांधणी करणे.
  • अति उष्णतेसाठी आरोग्य सुविधा लवचिक ठेवणे.
  • उष्णता संबंधित विकार केंद्रस्थानी ठेवून मेळावे/क्रीडा कार्यक्रमाची तयारी करणे.
  • संभाव्य असुरक्षित क्षेत्र ओळखण्यासाठी नियमित प्रतिबंधात्मक अग्नि जोखीम मूल्यांकन सराव  आयोजित करणे
  • योग्य आग प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी करणे, जसे की ज्वलनशील पदार्थांची योग्य साठवण आणि विद्युत जोडणी आणि यंत्रणांची नियमित आणि इष्टतम प्रतिबंधात्मक देखभाल करणे.
  • कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा नियमावली, बचाव प्रक्रिया आणि अग्निशामक उपकरणे वापरण्याचे प्रशिक्षण देणे.
  • स्मोक अलार्म, अग्निशामक यंत्रे आणि स्प्रिंकलरसह अग्नि शोधन आणि शमन प्रणालीची स्थापना आणि इष्टतम देखभाल करणे.
  • आगीच्या अनिष्ट घटनेत रुग्ण, कर्मचारी आणि अभ्यागतांना बाहेर काढण्यासाठी मानक कार्यप्रणालीसह आपत्कालीन प्रतिसाद योजना तयार करणे.
  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तडजोड न करता मॉक इमर्जन्सी ड्रिल म्हणजे आपत्कालीन प्रात्यक्षिकांचे नियमित संचालन करणे.

राज्यस्तरीय तयारी:

सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे उच्चस्तरीय अधिकारी परिस्थितीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली. मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये अग्नी -सुरक्षा अपघातांवर प्रात्यक्षिक सरावांचे आयोजन केले. अग्निसुरक्षेबाबत प्रात्यक्षिके आयोजित करण्यासाठी नागरी प्रशासन आणि अभियांत्रिकी विभाग यांच्यात समन्वय साधण्यात आला. कोड रेड प्रोटोकॉलही जारी करण्यात आला आहे. ओदिशामध्ये संपूर्ण राज्यात उष्णता लाट नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात जन जागृतीसाठी दस्तक (घरोघरी भेट देणे) मोहीम राबवली जात आहे. या राज्यातील जवळपास सर्व आरोग्य सुविधा केंद्रात अग्निसुरक्षा अधिकारी तैनात आहेत. हरियाणाने सर्व आरोग्य सेवा सुविधा केंद्रात आवश्यक औषधे आणि लॉजिस्टिक ची खातरजमा करण्यासाठी समर्पित आर्थिक सहाय्य केले आहे. राजस्थानमध्ये, 104 आणि 108 ला जोडलेल्या रुग्णवाहिका शीतन उपकरणांनी सुसज्ज आहेत. पश्चिम बंगालमध्ये, अग्निशमन विभागाकडून अग्निसुरक्षा प्रमाणपत्रांची खात्री केली जात असून प्रात्यक्षिकांचेही आयोजन करण्यात येत आहे. बिहारमध्ये, आरोग्य सेवा सुविधांमध्ये आगीच्या घटना रोखण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी समन्वय चालू आहे. दिल्ली सरकारने सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणेसाठी निर्देश आणि एसओपी जारी केले आहेत. लहान सुविधा केंद्रात फायर एनओसी उपलब्ध नसल्यास, एकतर सरकारी/खासगी संस्थांमध्ये, अग्निशमन योजना आणि अग्निशमन यंत्रणा सुसज्ज ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

* * *

S.Kane/Reshma/Vasanti/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023150) Visitor Counter : 56