भारतीय निवडणूक आयोग
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यात 66.95% मतदान
आतापर्यंत 45 कोटी 10 लाख लोकांनी केले मतदान
मतदारांनी आगामी टप्प्यांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आवाहन
उर्वरित 3 टप्प्यांमध्ये मतदारांना माहिती देणे, प्रोत्साहित करणे आणि सुविधा देणे यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याची मुख्य निवडणूक आयुक्तांची सूचना
"मोठ्या प्रमाणावरील मतदान हा भारतीय मतदारांचा जगाला संदेश"- केंद्रीय निवडणूक आयोग
मतदार जनजागृतीमध्ये सार्वजनिक/खासगी संस्था,प्रसिद्ध व्यक्ती सहभागी
Posted On:
16 MAY 2024 4:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2024
सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणारा दूरध्वनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय आयकॉन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडून तुम्हाला आला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मतदार जनजागृतीचा भाग म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता अशी अनेक पावले उचलली आहेत. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदान केंद्रांवर आतापर्यंत सुमारे 66.95% मतदान झाले आहे. सध्या सुरु असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये जवळपास 45 कोटी 10 लाख लोकांनी मतदान केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक पात्र मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी लक्ष्यीत हस्तक्षेपात वाढ केली आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्यासह मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वातील निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांच्या 5व्या, 6व्या आणि 7व्या टप्प्यात सर्व मतदारांना माहितीची पावती वेळेवर वितरित होईल, याची सुनिश्चिती करण्याचे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमांना अधिक गती देण्याचे निर्देश राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
"मतदार जनजागृतीमध्ये भागीदारी आणि सहयोग हे अत्यावश्यक आधारस्तंभ आहेत, असे आयोगाला ठामपणे वाटते. आयोगाच्या विनंतीनुसार, जनमानसावर पगडा असलेल्या प्रसिद्ध व्यक्ती, प्रभावशाली व्यक्ती, विविध संस्था जनकल्याणासाठी मोठ्या उत्साहाने काम करत आहेत, ही खूप आनंदाची बाब आहे,"असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटले आहे. भारतीय मतदारांकडून मोठ्या प्रमाणात मतदान हा भारतीय लोकशाहीच्या सामर्थ्याबद्दल जगाला संदेश ठरेल, असे ते म्हणाले. मतदानाचा दिवस सुट्टीचा नाही तर अभिमानाचा दिवस असल्याने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन त्यांनी सर्व मतदारांना केले आहे.
संबंधितांकडून राबवल्या जात असलेले विविध मतदार जागृती उपक्रम आणि मोहिमा :
1.भारत संचार निगम लिमिटेड, भारती एअरटेल लिमिटेड, जिओ टेलिकम्युनिकेशन, व्होडाफोन-आयडिया लिमिटेड सारखे दूरसंचार सेवा प्रदाते संबंधित संसदीय मतदारसंघातील प्रत्येक मोबाइल वापरकर्त्यापर्यंत पुश एसएमएस/फ्लॅश एसएमएस, मोबाइल वापरकर्त्यांना आउटबाउंड डायलिंग कॉल, आरसीएस (रिच कम्युनिकेशन सर्व्हिसेस) मेसेजिंग आणि व्हॉट्सॲप मेसेज/ॲलर्ट.पोहोचत आहेत. मतदानाच्या दोन/तीन दिवस अगोदर आणि मतदानाच्या दिवशीही प्रादेशिक भाषांमध्ये मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.
2.आयपीएल सामन्यांदरम्यान मतदार जागरुकता: सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामादरम्यान मतदार जागृती उपक्रमांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी सहयोग साधला आहे.क्रिकेट सामन्यांदरम्यान विविध स्टेडियमवर मतदार जागृती संदेश आणि गाणी वाजवली जात आहेत. या मोहिमेचा सर्वात नाविन्यपूर्ण पैलू म्हणजे आयपीएल सामने होणाऱ्या विविध ठिकाणी,दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्याकडून पूर्व-ध्वनिचित्रमुद्रित व्हिडिओ संदेशात मतदारांना दिली जाणारी शपथ. याखेरीज,मतदार जागरूकता संदेश क्रिकेट समालोचनात समाकलित केले जातात. आयपीएलच्या 10 संघातील क्रिकेटपटू मतदारांना लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणारा ध्वनिचित्रमुद्रित संदेश देतात.
3.देशभरातील सर्व फेसबुक वापरकर्त्यांना सार्वत्रिक निवडणुकांबद्दल माहिती देण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी तसेच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याकरिता मतदानाच्या दिवसाचा अलर्ट पाठवण्यात आला.
4.मतदानाच्या दिवशी व्हॉट्सॲप पर्सनलाइज्ड मेसेजची सुरुवात करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी आयकॉनिक फिचर ऑफ गूगल डुडलच्या माध्यमातून गुगल इंडिया योगदान देत आहे. यूट्यूबवरील बॅनर्स, गूगल पे आणि इतर गूगल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातूनही जागृती केली जात आहे.
5.रिटेल असोसिएशन ऑफ इंडिया त्यांच्या रिटेल नेटवर्कद्वारे मतदार जागरूकता उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी झाली आहे.
6.देशाच्या कानाकोपऱ्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बँका आणि टपाल कार्यालयांच्या विस्तृत जाळ्याचा उपयोग केला.
अ. टपाल विभागाची 1.6 टपाल कार्यालये आणि 1,000 एटीएम तसेच 1,000 डिजिटल स्क्रीन आहेत.
ब. देशभरात सार्वजनिक आणि खासगी बँकांच्या 1.63 लाख शाखा आणि 2.2 लाख एटीएम आहेत.
7.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने, "चुनाव का पर्व, देश का गर्व" हा संसदीय निवडणूक प्रचार लोगो आयआरसीटीसी पोर्टल आणि तिकिटांवर समाविष्ट करण्यात आला आहे.
8.सर्व रेल्वे स्थानकांवरील सार्वजनिक उद्घोषणा प्रणालीमध्ये मतदार जागरूकता घोषणांचा समावेश करण्यात आला आहे.अति जलद रेल्वे गाड्यांच्या डब्यांमध्ये लोगो स्टिकर्सचा वापर केला जात आहे.
9.पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहकार्याने, सुमारे 16,000 किरकोळ विक्री केंद्रावर मतदार जागृतीसाठी फलक लावण्यात आले आहेत.
10.नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने, विमान कंपन्या आगामी निवडणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करणाऱ्या संदेशाची विमानात घोषणा करत आहेत. विमानातील आसनांच्या कप्प्यात मतदार मार्गदर्शक पुस्तिका ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक विमानतळ मतदार जागृती संदेश प्रदर्शित करण्यासाठी जागा उपलब्ध करून देत आहेत. पुढील 10 प्रमुख शहरांमधील विमानतळांवर सेल्फी-पॉइंट्स स्थापित करण्यात आले आहेत - दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, पाटणा, चंदीगड आणि पुणे.
11.देशभरातील चित्रपटगृहे सार्वजनिक सेवा जागरूकता (PSA) सिनेमाचा एक भाग म्हणून भारतीय निवडणूक आयोगाचा मतदार जागरूकता चित्रपट आणि भारतीय निवडणूक आयोगाचे गीत ‘मैं भारत हूं, हम भारत के मतदाता है’ नियमित अंतराने प्रदर्शित करत आहेत.
12.देशाच्या दुर्गम भागातील शेवटच्या टोकावर असलेल्या अनोख्या मतदान केंद्रावरही मतदान सुनिश्चित करण्यासाठी अनेक अडथळे आणि आव्हानांना पार करून निवडणूक साहित्य कसे पोहचवले जाते, हे दाखवणाऱ्या लघुपटांची निर्मिती संसद टिव्ही या वाहिनीकडून केली जात आहे
13.अमुल, मदर डेअरी आणि इतर दूध सहकारी संस्थांनी त्यांच्या दुधाच्या पिशव्यांवर ‘चुनाव का पर्व, देश का गर्व’ असा संदेश छापून तसेच समाज माध्यम व्यासपीठाद्वारे मतदारांना प्रोत्साहित केले आहे. वृत्तपत्रांमध्ये अमुल गर्ल टॉपिकल जाहिरातीद्वारे आपल्या अनोख्या संदेशातून अमुल मतदारांना प्रोत्साहित करत आहे.
14.प्रसार भारती:दूरदर्शनने माननीय राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरन्यायाधीश यांसारख्या संवैधानिक पदाधिकाऱ्यांच्या आवाहनासह विविध लघुपटांची निर्मिती केली आहे. याशिवाय,अद्वितीय मतदान केंद्रांचे दृकश्राव्य दस्तऐवजीकरणासाठी प्रादेशिक केंद्रांद्वारे त्यांचे चित्रिकरण केले जात आहे.
15.संगीतासाठी समर्पित ॲप ‘स्पॉटिफाय’ 'प्ले युवर पार्ट' ही मोहीम चालवत आहे. याशिवाय स्पॉटिफायने मुद्रित जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत आणि त्यांच्या ॲपवर निवडणुकीसाठी गाण्यांच्या विशेष प्लेलिस्ट तयार केल्या आहेत.
16.बाइक ॲप ‘रॅपिडो’ मतदारांना मतदानासाठी मोफत राइड सुविधा प्रदान करुन प्रोत्साहित करत आहे.
17.पेमेंट ॲप ‘फोनपे’ ने त्यांच्या ॲपमध्ये मतदार जागरूकता संदेश समाविष्ट केला आहे आणि ते मतदारांना सक्रियपणे प्रोत्साहित करत आहे.
18.किराणा ॲप ‘ब्लिंकिट’ ने निवडणुकीसाठी त्यांचा लोगो बदलून "इंकइट" असा केला आहे, ज्यामध्ये लोकांना "घराबाहेर पडून मतदान" करण्यासाठी प्रोत्साहन देणारा संदेश टॅगलाइन म्हणून समाविष्ट केला आहे.
19.‘बुकमायशो’ने मतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी "आज पिक्चर नही,बिगर पिक्चर देखो" नावाची अनोखी मोहीम सुरू केली आहे.
20. मेकमायट्रिप ‘माय वोटवाला ट्रिप’ नावाची मोहीम चालवत आहे, ज्याद्वारे मतदानासाठी जाणाऱ्या नागरिकांना सवलती दिल्या जातात.
21. झोमॅटो आणि स्विगी सारखे खाद्यपदार्थ पोहचवणारे ॲप त्यांच्या व्यासपिठाद्वारे आणि समाज माध्यम उपक्रमांद्वारे मतदार जागरूकता संदेश प्रसारित करत आहेत.
22.टाटा समूहाचे समूह-व्यापी ग्राहक मोबाइल ॲप म्हणून सेवा देणारे Tata Neu ॲप, आपल्या मुख्यपृष्ठावर "कास्ट युवर व्होट" हे ॲनिमेटेड बॅनर ठळकपणे प्रदर्शित करत असून त्यांचे याशिवाय इतर अनेक उपक्रम सुरू आहेत.
23.उबर इंडिया मल्टी-चॅनल मेसेजिंगद्वारे (ॲपमधील संदेश, ईमेल, पुश नोटिफिकेशन्स) मतदारांपर्यंत पोहोचत आहे तसेच मतदान केंद्रांवर जाण्यासाठी ग्राहकांना सवलत देत आहे आणि समाज माध्यमावर मतदार जागरूकता संदेश प्रदर्शित करत आहे.
24.मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्बन कंपनीने 'आय हॅव व्होटेड कॅम्पेन' सुरू केले आहे.
25.ट्रूकॉलर आउटबाउंड कॉल दरम्यान मतदार जागरूकता संदेश प्रदर्शित केला जात आहे.
26. मॅनकाइंड फार्मा #VotingVirgin मोहीम, कपड्यांचा ब्रँड नीरू यांची "व्होट की तैयारी" TVC, टिंडरची "एव्हरी सिंगल व्होट काउंट्स" मोहीम, Jeevansathi.com सारख्या विवाह विषयक संकेतस्थळाद्वारे कल्पकतेने तयार केलेले समाज माध्यम संदेश आणि लोकप्रिय ब्रँड जसे की शॉपर्स स्टॉप, मेकमायट्रिप, क्रोमा आणि इतर बरेच ब्रँड यांच्याकडून मतदानासाठी सवलत, हे इतर स्वतंत्र उपक्रम आहेत.
S.Kane/S.Kakade/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020787)
Visitor Counter : 341
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam