माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रसार भारतीच्या सामायिक दृकश्राव्याचे (पीबी- शब्द) प्रसारण आणि प्रसारासाठी केला प्रारंभ


सर्व प्रमुख भारतीय भाषांमधे सुमारे पन्नास श्रेणीत “शब्द” देणार बातम्या

Posted On: 13 MAR 2024 7:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मार्च 2024

 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रीय माध्यम केन्द्र येथे एका कार्यक्रमात प्रसार भारतीची बातमी सामायिकरण सेवा पीबी- शब्द आणि डीडी न्यूज तसेच आकाशवाणी समाचारची संकेतस्थळे तसेच अद्ययावत न्यूज ऑन एअर मोबाइल ॲपचा प्रारंभ केला.

आज देशातील माहिती आणि प्रसारण क्षेत्रासाठी ऐतिहासिक दिवस आहे. "गेल्या काही वर्षांमध्ये, प्रसार भारतीने प्रत्येक प्रादेशिक भाषेत देशाच्या कानाकोपऱ्यात बातम्या गोळा करण्याचे तसेच बातम्या पोहोचवण्याचे विस्तृत जाळे तयार केले आहे. आता हा अचूक आणि अर्थपूर्ण आशय उर्वरित भारतीय मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम उद्योगाशी सामायिक करण्याचा आमचा मानस आहे", असे ते यावेळी म्हणाले. या बातम्यांच्या चित्रफिती/चित्रण दूरदर्शनच्या बोधचिन्हाशिवाय माध्यमांना उपलब्ध केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.  

या अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यातील विविध भाषांमधील मजकूर संकलित केला जाईल. यामुळे वृत्त उद्योगात क्रांती घडेल तसेच विविध माध्यमातील बातम्या गोळा करण्यासाठी व्यापक जाळे नसलेल्या छोट्या वृत्तसंस्थांना मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळेल. अशा सर्व संस्थांसाठी पीबी- शब्द हा सर्व माध्यमातील बातम्यांचा एक मुख्य स्रोत असेल, असे ते म्हणाले.

“शब्द”ची सेवा पहिल्या वर्षासाठी विनामूल्य दिली जात आहे आणि ती पन्नास श्रेणींमध्ये सर्व प्रमुख भारतीय भाषांमध्ये बातम्या प्रदान करेल.

दूरदर्शन न्यूज आणि आकाशवाणीच्या सुधारित संकेतस्थळांविषयी आणि न्यूजऑनएआयआर ॲपबद्दल बोलताना ठाकूर म्हणाले की, व्यापक मोबाईल जोडणीच्या युगात आकाशवाणी अत्यंत प्रासंगिक राहिली आहे आणि अजूनही सरकारी योजना आणि धोरणांविषयी अचूक माहितीचा स्रोत आहे.

या ॲपमध्ये वैयक्तिकृत बातम्यांचे फीड, ब्रेकिंग न्यूजसाठी पुश नोटिफिकेशन्स, मल्टीमीडिया सामग्रीचे एकत्रीकरण, ऑफलाईन वाचन क्षमता, रिअल-टाइम कव्हरेजसाठी थेट प्रक्षेपण, सुलभ समाज माध्यम सामायिकीकरण, स्थान-आधारित बातम्यांचे वितरण, लेख जतन करण्यासाठी बुकमार्किंग आणि शक्तिशाली शोध कार्यक्षमता यासारखी अनेक नवीन वैशिष्ट्ये असतील. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सुरवातीला शब्द च्या प्रारुपाबद्दल आणि नवीन संकेतस्थळ तसेच ॲप सुरू केल्याबद्दल संपूर्ण प्रसार भारती टीमचे अभिनंदन केले. या पोर्टलमुळे मोठ्या प्रमाणावर समन्वय साधला जाऊन देशभरात आशयघन बातम्यांच्या प्रसारणासाठी ते फायदेशीर ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रसार भारती मीडिया संस्थांपर्यंत पोहोचून त्यांच्या नेटवर्कद्वारे संकलित ऑडिओ, व्हिडिओ, फोटो आणि मजकूर आधारित माहिती सामायिक करेल असे प्रसार भारतीचे सीईओ गौरव द्विवेदी यांनी सांगितले.

प्रसारमाध्यम क्षेत्रातील सदस्यांना व्हिडिओ, ऑडिओ, मजकूर, फोटो आणि इतर प्रकारात दैनिक बातम्या पुरवण्यासाठी पीबी शब्द प्लॅटफॉर्मची संरचना करण्यात आली आहे. प्रसार भारती वार्ताहर, प्रतिनिधी आणि स्ट्रिंगर्स यांच्या विशाल नेटवर्कद्वारे समर्थित, ही सेवा तुम्हाला देशाच्या विविध भागांतील ताज्या बातम्या पोहोचवते.

सामायिक केलेली माहिती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सानुकूलित गोषवाऱ्यासाठी वापरली जाऊ शकते. एक प्रास्ताविक ऑफर म्हणून, सेवा विनामूल्य उपलब्ध असतील आणि लहान वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी वाहिन्या आणि डिजिटल पोर्टल्सना खूप मदत होईल. याबाबतची अधिक माहिती https://shabd.prasarbharati.org/  वर उपलब्ध आहे.

डीडी न्यूज आणि आकाशवाणी न्यूजची सुधारित संकेतस्थळे आणि सुधारित न्यूज ऑन एअर ॲप प्रेक्षक/श्रोत्यांना व्यत्ययरहित अनुभव आणि अधिक श्रोतृवृंद प्रदान करेल. ही संकेतस्थळे वापरकर्ता-अनुकूल आणि आकर्षक असतील, तसेच त्याची संरचना अद्ययावत घटकांनी सुसज्ज असेल जेणेकरून वापरकर्त्यांना व्यत्ययरहित अनुभव मिळेल. वापरकर्ते जिज्ञासा जागृत करणाऱ्या बातम्यांचे ऑडिओ ऐकू शकतात, विशेष कार्यक्रमांचा श्रवणानंद घेऊ शकतात आणि दैनिक आणि साप्ताहिक विशेष प्रसारण ऐकू शकतात. सुसंबद्ध मांडणी आणि वैविध्यपूर्ण आशयाद्वारे सुधारित संकेतस्थळे श्रोतृवर्गाला अधिकाधिक बातम्यांद्वारे समृद्ध करतात. समर्पित विभागांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय आणि अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, क्रीडा, पर्यावरण आणि मत यांचा समावेश आहे.

 

* * *

S.Patil/Vinayak/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2014321) Visitor Counter : 73