पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

सशक्त नारी- विकसित भारत कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 11 MAR 2024 10:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2024

 

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी, श्री. गिरीराज सिंह जी, श्री. अर्जुन मुंडा जी, श्री. मनसुख मांडविया जी, आणि देशाच्या विविध भागातून आलेल्या, मोठ्या संख्येने इथे आलेल्या आणि तुमच्यासोबतच व्हिडिओच्या माध्यमातूनही  देशभरातील लाखोंच्या संख्येने दिदी आज आपल्या सोबत सहभागी झाल्या आहेत.  मी तुम्हा सर्वांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.  आणि या सभागृहात मला दिसतंय की कदाचित हा तर छोटा भारतच आहे.  भारतातील प्रत्येक भाषेतील आणि कानाकोपऱ्यातील लोक इथे दिसत आहेत. तर,  तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन.

आजचा कार्यक्रम महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत ऐतिहासिक आहे.  आज मला नमो ड्रोन दीदी मोहिमेअंतर्गत 1000 आधुनिक ड्रोन, महिला बचत गटांना सुपूर्द करण्याची संधी मिळाली आहे.  विविध योजना आणि लाखो प्रयत्नांमुळे देशातील 1 कोटीहून अधिक भगिनी लखपती दीदी झाल्या आहेत.  हा आकडा छोटा नाही.  आणि आताच मी बोलत होतो तेव्हा ती किशोरी भगिनी मला सांगत होती की ती दर महिन्याला 60-70 हजार, 80 हजार कमवते.  आता देशातील तरुणांना प्रेरणा देऊ शकतो, गावातील एक भगिनी तिच्या व्यवसायातून दरमहा 60 हजार, 70 हजार रुपये कमवते. त्यांचा आत्मविश्वास बघा, हो मुलगी तिथेच बसली आहे हात वर करत आहे.  आणि जेव्हा मी हे ऐकतो, पाहतो तेव्हा माझा विश्वास खूप वाढतो.  तुम्हाला आश्चर्य वाटेल, कधी कधी मला तुमच्यासारख्या लोकांकडून छोट्या-मोठ्या गोष्टी ऐकायला मिळतात, तेव्हा माझा आत्मविश्वास वाढतो... हो… , आपण योग्य दिशेने जात आहोत, देशाचे नक्कीच काहीतरी भले होईल.  कारण आम्ही योजना तर बनवतो, परंतु तुम्ही जे या योजनांचा पाठपुरावा करता ना आणि त्यांची फळेही मिळवून दाखवता.  आणि त्या फळांमुळे सरकारी अधिकाऱ्यांनाही वाटते... हो… काही चांगले घडत असेल तर कामही झपाट्याने होते.  आणि म्हणूनच मी ठरवले की मला 3 कोटी लखपती दीदींचा आकडा पार करायचा आहे.  आणि याच उद्देशाने आज या दिदींच्या खात्यात 10 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  आणि मी तुम्हा सर्व भगिनींचे खूप खूप अभिनंदन करतो.

माता भगिनींनो,

कोणताही देश असो, कोणताही समाज असो, स्त्री शक्तीचा सन्मान वाढवून आणि त्यांच्यासाठी नवीन संधी निर्माण करूनच तो पुढे जाऊ शकतो.  पण दुर्दैवाने देशातील आधीच्या सरकारांमध्ये तुम्हा सर्व महिलांचे जीवन, तुमच्या समस्या यांना कधीच प्राधान्य नव्हते आणि तुम्हाला तुमच्या नशिबावर सोडण्यात आले.  माझा अनुभव असा आहे की आपल्या माता-भगिनींना थोडीशी जरी संधी मिळाली, सुरुवातीला थोडाबहुत आधार जरी मिळाला तरी नंतर मग त्यांना आधाराची गरज भासत नाही, त्या स्वतःच लोकांचा आधार बनतात.  आणि जेव्हा मी लाल किल्ल्यावरून महिला सक्षमीकरणाबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा मला हे अधिक जाणवले.  मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरून आपल्या माता-भगिनींना शौचालयाअभावी कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते आणि गावातील भगिनी आपले जीवन कशाप्रकारे जगतात हे बोलून दाखवले होते.

लाल किल्ल्यावरून सॅनिटरी पॅडचा मुद्दा उपस्थित करणारा मी पहिला पंतप्रधान आहे.  मी असा पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरून सांगितले की, स्वयंपाकघरात लाकडं जाळून अन्न शिजवणाऱ्या आमच्या माता-भगिनी  400 सिगारेट एवढा धूर रोज सहन करतात, श्वासावाटे आपल्या शरीरात घेतात.  मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने तुम्हा सर्व महिलांना घरात नळाच्या पाण्याअभावी भेडसावणाऱ्या समस्यांचा उल्लेख केला आणि त्यासाठी जल जीवन मिशनची घोषणा केली.  प्रत्येक महिलेचे बँक खाते असण्याची गरज  लाल किल्ल्यावरून व्यक्त करणारा मी पहिला पंतप्रधान आहे.  मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने लाल किल्ल्यावरून, तुम्हा महिलांबद्दल बोलल्या जाणाऱ्या अपमानास्पद शब्दांचा मुद्दा उपस्थित केला.

मी पहिला पंतप्रधान आहे ज्याने सांगितले की मुलगी संध्याकाळी उशिरा घरी आली तर आई, वडील आणि भाऊ सगळे विचारतात की  कुठे गेली होतीस आणि तिला उशीर का झाला.  पण दुर्दैव असे की आई-वडिलांचा जेव्हा मुलगा उशिरा घरी येतो तेव्हा विचारणा होत नाही की मुलगा कुठे गेला होता, का गेला होता?  तुमच्या मुलालाही विचारा.  आणि हाच मुद्दा मी लाल किल्ल्यावरून मांडला होता.  आणि आज मला हे देशाच्या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक भगिनीला, प्रत्येक मुलीला सांगायचे आहे.  जेव्हा जेव्हा मी लाल किल्ल्यावरून तुमच्या सक्षमीकरणाबद्दल बोललो तेव्हा दुर्दैवाने काँग्रेससारख्या देशातील राजकीय पक्षांनी माझी टर उडवली आणि माझा अपमान केला.

मित्रांनो,

मोदींची संवेदनशीलता आणि मोदींच्या योजना तळागाळातील जीवनानुभवातून समोर आल्या आहेत.  त्यांनी लहानपणी, त्यांच्या परिसरात, आजूबाजूच्या परिसरात जे पाहिले आणि त्यानंतर देशातील प्रत्येक गावात अनेक कुटुंबांसोबत राहताना जे अनुभवले, ते आज मोदींच्या संवेदना आणि योजनांमध्ये दिसून येते.  त्यामुळेच या योजना माझ्या माता, भगिनी आणि मुलींचे जीवन सुसह्य करुन त्यांच्या अडचणी कमी करतात.  फक्त आपल्या कुटुंबाचाच विचार करणाऱ्या, घराणेशाही जपणाऱ्या नेत्यांना हे कधीच अजिबात समजू शकणार नाही.  देशातील कोट्यवधी माता-भगिनींना अडचणीतून मुक्त करण्याचा विचार आमच्या सरकारच्या अनेक योजनांचा पाया राहिला आहे.

माझ्या माता भगिनींनो,

यापूर्वीच्या सरकारांनी एक-दोन योजना सुरु करण्यालाच महिला सक्षमीकरणाचे नाव दिले होते.  मोदीने ही असली राजकीय विचारसरणीच बदलून टाकली.  2014 मध्ये आमचे सरकार आल्यानंतर मी तुमच्या महिलांच्या जीवनचक्राच्या प्रत्येक टप्प्यासाठी योजना तयार केल्या आणि त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली.  आज आपल्या पहिल्या श्वासापासून शेवटच्या श्वासापर्यंत मोदी कुठली ना कुठली योजना घेऊन भारतातील भगिनींच्या सेवेला हजर होतो.  गर्भातच मुलींची हत्या (स्त्रीलिंगी गर्भाची भ्रूणहत्या) रोखण्यासाठी आम्ही बेटी बचाओ-बेटी पढाओ (मुलीला वाचवा मुलीला शिकवा) मोहीम सुरू केली.  गरोदरपणात मातेला योग्य पोषण मिळावे यासाठी प्रत्येक गर्भवती महिलेला 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जन्मलेल्या  मुलीला अभ्यासात अडचण येऊ नये, यासाठी जास्तीत जास्त व्याज देणारी सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली.  मोठी झाल्यावर मुलीला नोकरी करायची असेल तर आज तिच्याकडे मुद्रा योजनेचे एवढे मोठे साधन आहे.  मुलीच्या व्यावसायिक कारकिर्दीवर  परिणाम होऊ नये यासाठी आम्ही गरोदरपणाची रजा 26 आठवड्यांपर्यंत वाढवली आहे.  5 लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी आयुष्मान योजना असो किंवा 80% सवलतीत स्वस्त औषधे उपलब्ध करून देणारे जनऔषधी केंद्र असो, या सगळ्यांचा जास्तीत जास्त फायदा तुम्हा माता, भगिनी आणि मुलींनाच तर होत आहे.

माता भगिनींनो,

मोदी समस्या टाळत नाही, त्यांना समोरासमोर भिडतो, त्यांच्या कायमस्वरूपी निराकरणासाठी काम करतो.  मला माहीत आहे की भारतातील महिलांना सक्षम बनवायचे असेल तर त्यांचा आर्थिक सहभाग वाढवावा लागेल.  त्यामुळे आम्ही आमच्या सरकारच्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक योजनेत हा मुद्दा लक्षात ठेवला.  माता भगिनींनो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो.  तुम्हाला हेही माहीत आहे की आपल्या कडे मालमत्ता-संपत्ती नेहमी पुरुषाच्याच नावावर असे.  कुणी जमीन खरेदी केली तर ती पुरुषाच्या नावावर…..दुकान घेतले तर ते पुरुषाच्या नावावर! घरातील स्त्रीच्या नावावर काही होत असे का?  त्यामुळेच आम्ही पीएम आवास योजने अंतर्गत मिळणाऱ्या घरांची नोंदणी महिलांच्या नावे केली(घरे गृहलक्ष्मीच्या नावावर केली).  तुम्ही स्वतः पाहिले आहे… पूर्वी जेव्हा नवीन गाड्या आणि ट्रॅक्टर यायचे तेव्हा बहुतेक ते पुरुषच चालवत असत.  लोकांना प्रश्न पडायचा की मुलगी कशी चालवणार?  घरात एखादे नवीन उपकरण, नवा टीव्ही, नवा फोन आला की, पुरुषाना वाटे फक्त त्यांनाच त्यातील कळू शकते. आता आपला समाज त्या तशा परिस्थितीतून आणि त्या जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत पुढे जात आहे.  आणि आजचा हा कार्यक्रम याचेच आणखी एक उदाहरण बनला आहे की भारताच्या कृषी क्षेत्राला एक नवीन दिशा देणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या पहिल्या वापरकर्त्या, या  माझ्या मुली आहेत,  माझ्या भगिनी आहेत.  

ड्रोनच्या सहाय्याने आधुनिक शेती कशी केली जाते हे आमच्या भगिनी देशाला शिकवतील.  ड्रोन चालक, नमो ड्रोन दीदींचे कौशल्य, मी स्वतः आत्ता नुकतेच शेतात जाऊन पाहून आलो आहे.  

मला विश्वास आहे आणि मला काही दिवसांपूर्वी 'मन की बात' मध्ये अशाच एका ड्रोन दीदीशी बोलण्याची संधी मिळाली होती .ती म्हणाली होती की,  मी एका दिवसात इतक्या शेतात काम करते,   एका दिवसात इतक्या शेतात काम करून माझी इतकी कमाई होते. आणि ती म्हणाली , माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे आणि गावात माझा मान खूप वाढला आहे, आता गावातील माझी ओळख बदलली आहे.जिला  सायकल कशी चालवायची हे देखील माहित नव्हते तिला   ग्रामस्थ वैमानिक म्हणून संबोधतात. मला विश्वास आहे की, देशातील महिला शक्ती 21 व्या शतकातील भारताची तंत्रज्ञान  क्रांती घडवू शकते. आज आपण अंतराळ  क्षेत्रात पाहतो, माहिती तंत्रज्ञान  क्षेत्रात पाहतो, विज्ञान क्षेत्रात पाहतो, भारतातील महिला आपला झेंडा कशाप्रकारे  फडकावत आहेत. आणि महिला व्यावसायिक वैमानिकांच्या बाबतीत भारत हा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश आहे.विमान उडवणाऱ्या मुलींची संख्या आपल्याकडे सर्वाधिक आहे. आकाशात व्यावसायिक उड्डाणे असो किंवा शेतीतील ड्रोन असो, भारताच्या मुली कुठेही कोणाच्याही  मागे नाहीत.आणि यावेळी 26 जानेवारीला तुम्ही टीव्हीवर बघितलाच असेल, 26 जानेवारीचा कर्तव्यपथावरचा कार्यक्रम संपूर्ण भारत बघत होता, तिथे स्त्री-स्त्री-स्त्री-स्त्रियांच्या शक्तीचे  प्रदर्शन घडत होते.

माता भगिनींनो,

येत्या काही वर्षांत ड्रोन तंत्रज्ञानाचा देशात खूप विस्तार होणार आहे. जर कमी प्रमाणात दूध, भाजीपाला आणि इतर उत्पादने जवळच्या बाजारपेठेत पोहोचवायची असतील तर ड्रोन हे एक सशक्त  माध्यम ठरणार आहे.औषधांचे वितरण असो किंवा वैद्यकीय चाचणीचे नमुने वितरित करणे असो, यातही ड्रोन मोठी भूमिका बजावतात. याचा अर्थ नमो ड्रोन दीदी योजनेतून ड्रोन वैमानिक बनणाऱ्या भगिनींना भविष्यात असंख्य संधींची  दारे खुली होणार आहेत.

माता भगिनींनो,

गेल्या 10 वर्षात भारतात ज्या प्रकारे महिला बचत गटांचा विस्तार झाला आहे तो अभ्यासाचा विषय आहे. या महिला बचत गटांनी भारतात महिला सक्षमीकरणाचा नवा इतिहास घडवला आहे.आज या कार्यक्रमाद्वारे मी बचत गटातील प्रत्येक भगिनीचे कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो.त्यांच्या मेहनतीने महिला बचत गटांना राष्ट्र उभारणीसाठी एक प्रमुख गट बनवले आहे.आज बचत गटातील महिलांची संख्या 10 कोटींच्या पुढे गेली आहे. गेल्या 10 वर्षांत, आमच्या सरकारने केवळ बचत गटांचाच विस्तार केला नाही, तर 98 टक्के गटांची बँक खातीही उघडली आहेत. म्हणजे जवळपास 100 टक्के.  आमच्या सरकारने बचत गटांना दिली जाणारी मदत 20 लाख रुपये केली आहे. 8 लाख कोटी  रुपये आत्तापर्यंत हा आकडा लहान नाही. तुमच्या हातात,  8 लाख कोटींहून अधिक  मदत बँकांमधून  माझ्या या भगिनींपर्यंत  पोहोचली  आहे.इतका पैसा थेट गावोगावी , भगिनींपर्यंत पोहोचला आहे. आणि भगिनींचा स्वभाव आहे, सर्वात मोठा गुण असतो तो म्हणजे 'बचत’ ', त्या वाया घालवत नाहीत, बचत करतात. आणि बचतीची शक्ती देखील उज्ज्वल भविष्याचे  सुचिन्ह आहे.आणि जेव्हाही मी या भगिनींशी   बोलतो तेव्हा त्या मला अशाच  नवीन गोष्टी सांगतात, त्यातून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो. म्हणजेच सामान्य माणसे कल्पनाच  करू शकत नाही.आणि आजकाल खेड्यापाड्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांधलेल्या  रस्ते आणि महामार्गांचा लाभही या गटांना मिळाला आहे. . आता लखपती दीदी आपली उत्पादने शहरात सहज विकू शकत आहेत. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे शहरातील लोकही खेडोपाडी जाऊन या गटांकडून थेट खरेदी करू लागले आहेत. अशाच कारणांमुळे बचत गटांच्या सदस्यांचे उत्पन्न गेल्या 5 वर्षांत 5 पटीने वाढले आहे.

माता भगिनींनो,

ज्या भगिनींची  स्वप्ने आणि आकांक्षांना मर्यादा आणल्या  होत्या त्या भगिनी आज राष्ट्र उभारणीत आपली भूमिका वाढवत आहेत. आज गावा-गावात नवीन संधी निर्माण होत आहेत, नवीन पदे निर्माण झाली आहेत.आज लाखो बँक सखी, कृषी सखी, पशु सखी, मत्स्य सखी आणि सेवा क्षेत्राशी निगडित दीदी गावोगावी सेवा देत आहेत. या दीदी आरोग्यापासून डिजिटल इंडियापर्यंतच्या देशाच्या राष्ट्रीय मोहिमांना नवी गती  देत आहेत. पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान चालवणाऱ्यांपैकी 50 टक्क्यांहून अधिक महिला आहेत आणि 50 टक्क्यांहून अधिक लाभार्थीही महिला आहेत.यशाची ही मालिका  माझा स्त्रीशक्तीवरचा विश्वास आणखी दृढ करते. मी देशाच्या प्रत्येक माता, भगिनी आणि मुलीला विश्वास देतो की, आमचा तिसरा कार्यकाळ  स्त्री शक्तीच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिणार आहे.

आणि मी पाहिले आहे की अनेक भगिनींचा  कदाचित बचत गटात स्वतःचा छोटासा आर्थिक व्यवसायच केवळ  नसतो, मी काही लोकांना गावात अनेक कामे करताना पाहिले आहे.क्रीडा स्पर्धा आयोजित करत आहेत  आणि बचत गटातील भगिनींना प्रोत्साहन देत आहेत.  ती शिकणाऱ्या मुलींना बोलावते आणि लोकांना त्यांच्याशी बोलायला लावते.गावात खेळामध्ये  चांगली कामगिरी करणाऱ्या मुलींचे बचत गटातील भगिनी त्यांचे स्वागत - सन्मान करतात. म्हणजेच मी पाहिले आहे की , काही शाळांमध्ये या बचतगटाच्या भगिनींना भाषणासाठी बोलावले जाते आणि तुमच्या यशाचे कारण सांगा असे त्यांना सांगितले जाते.आणि शाळेतील मुलेही खूप उत्सुकतेने ऐकतात, शिक्षक ऐकतात. म्हणजे एक प्रकारे मोठी क्रांतीच झाली आहे. आणि मी बचत गटाच्या दीदींना सांगेन, मी नुकतीच ड्रोन दीदीसारखी योजना आणली आहे, ती मी तुमच्या चरणी ठेवली आहे, आणि माझा विश्वास आहे, ज्या माता-भगिनींच्या चरणी मी ड्रोन ठेवला आहे ना  त्या माता-भगिनी ड्रोनला केवळ  आकाशातच  घेऊन जाणार नाहीत, तर देशाचा संकल्पही तितक्याच  उंचीवर नेतील.

पण एक योजना अशीही आहे ज्यात आमच्या बचत गटाच्या भगिनी पुढे आल्या. मी ‘पीएम सूर्यघर’ योजना बनवली आहे. ‘पीएम सूर्यघर’चे वैशिष्ट्य म्हणजे ही योजना एक प्रकारे मोफत विजेसाठी आहे. शून्य वीज देयक. आता हे काम तुम्हाला करता येईल की नाही? आपण करू शकता की नाही? जर तुम्ही बोललात तर मी म्हणेन... करू शकता ... नक्कीच करू शकता.  आम्ही ठरवले आहे की, प्रत्येक कुटुंबाने त्यांच्या छतावर सौर संच  लावावेत, सूर्यकिरणांपासून वीज निर्माण करावी आणि ती वीज घरात वापरावी. 300 युनिटपेक्षा अधिक  वीज वापरणारी कुटुंबे फारच कमी आहेत.घरात पंखा, वातानुकूलक, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन असेल तर गाडी 300 युनिटमध्ये चालते. म्हणजे तुम्हाला शून्य देयक, शून्य देयक येईल. इतकेच  नाही तर अधिक  वीज निर्माण केली तर तुम्ही म्हणाल मोठ्या मोठ्या कारखान्यातही  वीज निर्माण होते, मोठे श्रीमंत लोक वीज निर्माण करू शकतात, आम्ही गरीब लोक काय करू शकतो?  मोदी हेच करतात, आता गरीबही वीज निर्माण करतील, त्यांच्या घरी विजेचा कारखाना उभा राहील. आणि जी अतिरिक्त वीज निर्माण होईल ती सरकार खरेदी करेल. यामुळे आमच्या भगिनी  आणि कुटुंबालाही उत्पन्न मिळेल.

त्यामुळे, तुम्ही या पीएम सूर्य घर किंवा तुमच्या ठिकाणच्या कोणत्याही सामान्य केंद्रामध्ये गेल्यास, तुम्ही तेथे अर्ज करू शकता. मी सर्व बचत गटांच्या भगिनींना सांगेन की, मैदानात उतरा आणि ही योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा.तुम्ही हा कारभार हातात घ्या. तुम्ही   बघा कितीतरी मोठे विजेचे काम  आता माझ्या भगिनींद्वारे होणार आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की, जेव्हा प्रत्येक घरात शून्य युनिट वीज देयक  येईल ना ...पूर्ण शून्य देयक तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतील की नाही?  आणि त्यांनी वाचवलेले पैसे त्यांच्या कुटुंबाला उपयोगी पडतील की नाही? तर या योजनेचा सर्वात मोठा लाभ आपल्या  बचत गटातील ज्या भगिनी आहेत ना त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही तुमच्या गावात करून घेऊ शकता.आणि मी सरकारला सुद्धा सांगितले आहे की या कामासाठी जिथे जिथे बचत गटांच्या भगिनी पुढे येतील तिथे आम्ही त्यांना प्राधान्य देऊ आणि शून्य वीज देयकाची  ही मोहीम मला यशस्वीपणे पुढे चालवायची आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला  
खूप खूप शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद.

* * *

NM/Ashutosh/SonalC/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2013713) Visitor Counter : 124