पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवी दिल्लीत आयोजित ‘रिपब्लिक शिखर परिषद 2024’ मधील भाषण

Posted On: 07 MAR 2024 11:58PM by PIB Mumbai

 

तुम्हा सर्वांना नमस्कार !

रिपब्लिकच्या संपूर्ण चमुला या विशेष शिखर परिषदेच्या आयोजनासाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. अर्णबने जे काही सांगितले त्यावर दिवसभर विचार मंथन झाले असेल आणि त्यातूनच हे विषय समोर आले  असतील, असे मी मानतो. हे सगळे विषय मी पचवू शकेन की नाही याबाबत मी साशंक होतो म्हणूनच येण्यापूर्वी मी पाणी पिऊन आलो आहे. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी म्हणालो होतो की, हे दशक भारताचे आहे, आता, जेव्हा आम्ही राजकारणी लोक हे म्हणतो तेव्हा जनता हेच मानते की हे राजनैतिक विधान आहे, हे विधान एका राजकिय नेत्याचे आहे.

पण हे देखील सत्य आहे की आज जग म्हणते आहे की, हे दशक भारताचे आहे. आणि मला याचा आनंद आहे की तुम्ही एक पाऊल पुढे टाकत आता भारताचे आगामी दशकया विषयावर चर्चा सुरू केली आहे. हे दशक विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण दशक आहे. आणि मी असे मानतो की जो कोणी याला प्रभावित करू शकतो, कोणतीही राजनीतिक विचारसरणी असो, कितीही विरोधी विचार असो, पण असे म्हणायला काय हरकत आहे की ही दहा वर्षे काम करण्यासारखी आहेत.

पण काही लोक इतक्या खोल निराशाच्या गर्तेमध्ये अडकले आहेत की त्यांच्यासाठी हा विचार न करणे, हे न ऐकणे आणि हे न बोलणे खूप कठीण झाले आहे. काही लोक विशेष करून आपले स्मितहास्य सामायिक करत आहेत तर हे स्वाभाविक आहे की माझे बोलणे योग्य जागेवर पोहोचत आहे. पण, अशा विषयांवर चर्चा होणे खूप आवश्यक आहे मंथन होणे खूप आवश्यक आहे असे मी मानतो.

 

पण मित्रांनो,

ज्या दशकात आता आपण सर्वजण आहोतजे दशक आता सुरू आहेते स्वतंत्र भारताचे आजवरचे सर्वात महत्त्वाचे दशक आहे असे मला वाटते. आणि म्हणूनच, मी लाल किल्ल्यावरून बोलताना म्हणालो होतो - हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. हे दशक एक सक्षम, समर्थ आणि विकसित भारत बनवण्याचा पाया मजबूत करणारे दशक आहे. हे दशक त्या अपेक्षा आणि महत्त्वकांक्षा पूर्ण करण्याचे आहे ज्या कधीकाळी भारतातील लोकांना अशक्य वाटत होत्या. हा मानसिक अडथळा दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

हे दशक भारताची स्वप्ने भारताच्या सामर्थ्याने पूर्ण करण्याचे दशक असेल. आणि मी हे एक खूप महत्त्वाचे वाक्य बोलत आहे - स्वप्ने भारताची, सामर्थ्य देखील भारताचेच. पुढचे दशक सुरू होण्यापूर्वी आपण भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत असलेले पाहू. पुढचे दशक सुरू होण्यापूर्वी भारतीयांकडे घर, शौचालय, गॅस जोडणी, वीज, इंटरनेट आणि रस्ते अशी प्रत्येक पायाभूत सुविधा उपलब्ध असेल.

हे दशक भारतात जागतिक दर्जाचे द्रुतगती मार्ग, हाय स्पीड रेल्वे, देशव्यापी जलमार्गांचे जाळे अशा अनेक पायाभूत सुविधांच्या अत्याधुनिक सेवांच्या निर्मितीचे दशक असेल. याच दशकात भारताला आपली पहिली बुलेट ट्रेन मिळेल. याच दशकात भारताला पूर्णपणे कार्यरत असणारा मालवाहतुकीसाठी समर्पित कॉरिडॉर मिळेल. याच दशकात भारतातील मोठी शहरे मेट्रो किंवा नमो भारत रेल्वे जाळ्याशी जोडली जातील. म्हणजेच, हे दशक भारताच्या उच्च गतीच्या संपर्क सुविधेचे, उच्च गतीच्या गतीशीलतेचे आणि उच्च गतीच्या समृद्धीचे दशक असेल.

 

मित्रांनो,

हा काळ जागतिक अनिश्चितता आणि अस्थिरतेचा काळ आहे, हे तुम्ही सर्वजण जाणताच. आणि तज्ञांच्या मतानुसार, दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा सर्वात अधिक अस्थिर काळ असल्याचे अनुभवाला येत आहे, याची तीव्रता आणि याची व्याप्ती देखील खूप मोठी आहे. संपूर्ण जगात अनेक सरकारांना सत्ता विरोधी लाटेचा सामना करावा लागत आहे. पण या सगळ्यांमध्ये, भारत एका सशक्त लोकशाहीच्या रूपात विश्वासाचा किरण बनला आहे. मी आशेचा किरण म्हणत नाही, मी विश्वासाचा किरण, असे खूप मोठ्या जबाबदारीने म्हणत आहे. आणि, ही स्थिती तेव्हाच निर्माण झाली आहे जेव्हा आम्ही भारतात खुप सार्‍या सुधारणा घडवून आणल्या आहेत. चांगल्या अर्थव्यवस्थेसोबतच चांगले राजकारण होऊ शकते हे भारताने सिद्ध केले आहे.

 

मित्रांनो,

भारताने हे कसे घडवून आणलेहा आज एक जागतिक जिज्ञासेचा विषय  बनला आहे. हे यामुळेच घडून आले, कारण आम्ही नाण्याची कोणतीही बाजू कधीही दुर्लक्षित ठेवली नाही. हे यामुळे घडू शकले, कारण आम्ही देशाच्या गरजा पूर्ण केल्या आणि स्वप्ने देखील पूर्ण केली. यामुळेच घडू शकले, कारण आम्ही समृद्धीवर लक्ष केंद्रित केले आणि सशक्तीकरणासाठी देखील काम केले. जसे की, आम्ही कार्पोरेट कर विक्रमी रूपाने कमी केला, मात्र त्याचबरोबर आम्ही हे देखील सुनिश्चित केले की व्यक्तिगत कर देखील कमी होईल. आज आम्ही महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्गांच्या निर्मितीवर विक्रमी गुंतवणूक करत आहोत, पण यासोबतच आम्ही गरिबांसाठी करोडो घरे देखील बांधत आहोत, त्यांना मोफत उपचार, मोफत अन्नधान्य वाटप यासारख्या सुविधा देखील प्रदान करत आहोत. आम्ही मेक इन इंडिया अंतर्गत येणाऱ्या उत्पादन आधारित प्रोत्साहन योजनेत सवलत दिली तर शेतकऱ्यांना विम्याद्वारे संरक्षण आणि उत्पन्न वाढवणारी साधने देखील उपलब्ध करून दिली. आणि, तंत्रज्ञान तसेच नवोन्मेषावर मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहोत. मात्र या सोबतच आम्ही तरुणांच्या कौशल्य विकासावर देखील हजारो कोटी रुपये खर्च केले आहेत.

 

मित्रांनो,

स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांमध्ये भारताचा बराच वेळ देशाला चुकीच्या दिशेने घेऊन जाण्यात वाया घालवला गेला. एकाच परिवारावर लक्ष केंद्रित केल्यामुळे देशाचा विकास विकेंद्रित झाला. मी याच्या तपशिलात जाऊ इच्छित नाही. विकसित भारत बनवण्यासाठी आपल्याला हा वाया गेलेला वेळ देखील पुनर्प्राप्त करावा लागेल, ही गोष्ट तुम्ही देखील मान्य कराल. यासाठी अभूतपूर्व प्रमाणावर आणि अभूतपूर्व गतीने काम करणे आवश्यक आहे. भारतात सर्वत्र आज हेच घडत असल्याचे तुम्हाला दिसत असेल. मी जेव्हा गुजरात मध्ये होतो तेव्हा मी त्याकाळी जनतेला आव्हान देत होतो की, कोणत्याही दिशेला 25 किलोमीटर जा, तुम्हाला कोणते ना कोणते विकासाचे, पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे काम सुरू असलेले दिसून येईल. कोणत्याही दिशेला 25 किलोमीटर, कुठूनही सुरुवात करा.

मी आज किलोमीटरच्या भाषेत बोलत नाही, पण मी आज हे नक्कीच म्हणू शकतो की हिंदुस्थानाच्या कोणत्याही भागावर तुम्ही नजर फिरवली तर काही ना काही पूर्वीपेक्षा चांगले घडलेले तुम्हाला दिसून येईल. आणि आज तुम्ही लोक भलेही यावर विवाद करत असाल की तिसऱ्या कार्यकाळात भाजपाला 370 हुन किती जास्त जागा मिळतील. मी देखील तुमच्या सोबतच असतो ना. पण माझे पूर्ण लक्ष देशाच्या विकासाची गती आणि प्रमाण वाढवण्यावर केंद्रित आहे. जर मी तुम्हाला केवळ गेल्या 75 दिवसांचा हिशेब दिला तर, केवळ 75 दिवसांबाबत मी बोलत आहे, फक्त 75 दिवस. तर रिपब्लिक वाहिनीचे दर्शन देखील आश्चर्यचकित होऊन जातील, आणि हे पक्के आहे की ते नक्कीच आश्चर्यचकित होऊन जातील. इथे काही लोक उपस्थित नसतील, देशात कोणत्या गतीने काम होत आहे.

गेल्या 75 दिवसांत मी जवळजवळ 9 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले आहे. हा खर्च 110 अब्ज डॉलर्सहून देखील जास्त आहे. जगातील कित्येक देशांचा संपूर्ण वर्षभराचा खर्च देखील एवढा नसेल आणि आम्ही केवळ 75 दिवसांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे.

गेल्या 75 दिवसांत देशात 7 नव्या एआयआयएमएसचे लोकार्पण झाले आहे. 4 वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालये तसेच 6 राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा सुरु झाल्या आहेत. 3 आयआयएम्स, 10 आयआयटीज, 5 एनआयटीज यांची कायमस्वरूपी उभारणी अथवा त्यांच्याशी संबंधित कार्यांचा कोनशीला आणि लोकार्पण समारंभ झाला आहे. तसेच 3 ट्रिपल आयटीज, 2 आयसीएआर आणि 10 केंद्रीय संस्था यांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले आहे. अवकाश संशोधन क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठीच्या 1800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. याच 75 दिवसांच्या काळात 54 ऊर्जानिर्मिती प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे किंवा त्यांची पायाभरणी झाली आहे.

काक्रापार अणु उर्जा प्रकल्पातील 2 नव्या अणुभट्ट्यांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कल्पक्कम येथील स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टीचे कोअर लोडिंगसुरु झाले असून ही अत्यंत क्रांतिकारक घडामोड आहे. तेलंगणा येथील 1600 मेगावॉट क्षमतेचा औष्णिक उर्जा प्रकल्प देशाला अर्पण करण्यात आला आहे. झारखंड मधील 1300 मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक उर्जा प्रकल्पाचे लोकार्पण झाले आहे. उत्तर प्रदेशात 1600 मेगावॉट क्षमतेच्या औष्णिक उर्जा प्रकल्पाची पायाभरणी झाली आहे. उत्तर प्रदेशातच 300 मेगावॉट क्षमतेच्या सौर उर्जा प्रकल्पाची कोनशीला रचण्यात आली आहे.याच कालावधीत उत्तर प्रदेशातच महा नवीकरणीय पार्कची देखील पायाभरणी झाली आहे.

हिमाचल मधील जलविद्युतनिर्मिती प्रकल्पाचा कोनशीला समारंभ झाला आहे. तामिळनाडू येथे देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन सेल व्हेसलची सुरुवात करण्यात आली. उत्तर प्रदेशात मीरत-सिंभावली पारेषण वाहिन्यांचे उद्घाटन झाले आहे. कर्नाटकात कोप्पळ येथे पवन उर्जा विभागापासून निघणाऱ्या पारेषण वाहिन्या यांचे उद्घाटन करण्यात आले आहे. याच काळात भारतातील सर्वाधिक लांबीच्या केबल आधारित पुलाचे लोकार्पण झाले. लक्षद्वीपपर्यंत समुद्राखालून ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण झाले. देशातील 500 हून अधिक रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाचे काम सुरु झाले. 33 नव्या रेल्वे गाड्यांची सेवा सुरु झाली.रस्ते, उड्डाणपूल, भूमिगत रस्ते यांच्याशी संबंधित 1500 हून अधिक प्रकल्पांची सुरुवात झाली आहे. देशातील 4 शहरांमध्ये मेट्रो सेवेशी संबंधित 7 प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले आहे. कोलकाता शहराला देशातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेची भेट मिळाली आहे.

सुमारे 10,000 कोटी रुपये खर्चाच्या 30 बंदर विकास प्रकल्पांचे लोकार्पण-पायाभरणी झाली. गेल्या 75 दिवसांतच, शेतकऱ्यांसाठीच्या जगातील सर्वात मोठ्या साठवण सुविधा योजनेची सुरुवात झाली आहे. 18,000 सहकारी संस्थांच्या संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 21,000 कोटी रुपयांहून अधिक रकमेचे हस्तांतरण झाले आहे. आणि रिपब्लिक वाहिनीच्या दर्शकांना मी आठवण करून देऊ इच्छितो की या प्रकल्पात मी स्वतः सहभागी झालेलो आहे. आणि आत्ता मी केवळ पायाभरणी आणि लोकार्पण यांची माहिती दिली आहे. आणखीन बरेच कार्य केले आहे ते मी सांगत नाही.

या कार्याखेरीज माझ्या सरकारचे आणखी काही कार्यक्रम, भाजपा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या इतर सरकारांची यादी, असा जर मी बोलत गेलो, तर सकाळ उजाडेल आणि मला नाही वाटत की तुम्ही सर्वांनी सकाळच्या चहाची देखील येथे व्यवस्था केली आहे. तरीही मी आणखी एक उदाहरण देईन ज्यातून आमच्या सरकारच्या कार्याचा आवाका आणि वेग, हे सरकार कसे कार्य करते आहे ते समजून येईल. यावर्षीचा अर्थसंकल्प नुकताच झाला, हे तुम्ही जाणताच. तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात सौर ऊर्जेशी संबंधित एका मोठ्या योजनेची घोषणा करण्यात आली होती.

या घोषणेनंतर, पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्यासाठी आणि ही योजना सुरु करण्यासाठी 4 आठवड्यांपेक्षाही कमी वेळ लागला. आता देशातील 1 कोटी घरांना सूर्य घर बनवण्यासाठी सर्वेक्षण देखील सुरु झाले आहे. या योजनेच्या अंतर्गत 300 युनिट वीजत्या घरांना मोफत देण्याची आणि निर्माण झालेली जास्तीची वीज विकून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आज देशवासीय आमच्या सरकारच्या विकासकार्यांचे प्रमाण आणि वेग त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहत आहेत, त्यांना त्याची जाणीव होत आहे आणि म्हणूनच तर ते सर्वजण म्हणत आहेत, एकदा 400 पार, पुन्हा एकदा 400 पार.

 

मित्रांनो,

बरेचदा लोक मला विचारतात की तुमच्याविरुद्ध इतक्या नकारात्मक मोहिमा चालवल्या जातात, तुमच्यावर इतके शाब्दिक हल्ले होतात....तुम्हाला त्याचे काही वाटत नाही? मी त्यांना एवढेच सांगतो की, जर मी या नकारात्मक मोहिमांकडे लक्ष देऊ लागलो तर मला जी कामे करायची आहेत ती कशी होतील? मी गेल्या 75 दिवसांचे रिपोर्ट कार्ड तुमच्या समोर ठेवले आहे पण त्याचसोबत मी पुढच्या 25 वर्षांचा आराखडा देखील डोळ्यांसमोर ठेवला आहे. आणि माझ्यासाठी एकेक सेकंद अत्यंत मौल्यवान आहे.

देशात निवडणुकीचे वारे वाहत असताना देखील आम्ही आमची कामे घेऊन जनतेपर्यंत पोहोचतो आहोत. मात्र दुसरीकडे काय आहे, दुसरीकडे राग आहे, शिव्याशाप आहेत आणि निराशा आहे. ना यांच्याकडे काही ठोस विषय आहेत ना त्याच्यावर काही उपाययोजना आहेत. असे का होते? असे होते कारण या पक्षांनी सात दशके केवळ घोषणांच्या बळावर निवडणूक लढवली. हे लोक गरिबी हटावम्हणत राहिले, या घोषणाच यांची खरी स्थिती आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये लोकांनी घोषणा न बघता उपाय बघितले आहे. अन्न सुरक्षा असो किंवा खत उत्पादन प्रकल्प पुन्हा सुरु करणे असो, लोकांना वीजपुरवठा करणे असो की देशाच्या सीमांवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे असो, नागरिकांसाठी पक्की घरे उभारण्याची योजना तयार करण्यापासून कलम 370 रद्द करण्यापर्यंत प्राधान्यक्रमांच्या सर्व विषयांबाबत सरकारने एकाच वेळी कार्यवाही केली आहे.

 

मित्रांनो,

रिपब्लिक टीव्ही वाहिनीचे प्रश्नांशी फार जुने नाते आहे. नेशन वॉन्टस टू नो.....असे बोलून तुम्ही भल्या भल्या लोकांना घाम फोडला आहे. पूर्वी देशात प्रश्न विचारला जायचा की आज देश कोठे आहे, कोणत्या स्थितीत आहे. पण बघा बरं, गेल्या 10 वर्षांमध्ये या प्रश्नांचे स्वरूप देखील कसे बदलले! 10 वर्षांपूर्वी लोक विचारायचे- आपल्या अर्थव्यवस्थेचे आता काय होणार? आज लोक विचारतात-आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था कधी होणार. 10 वर्षांपूर्वी लोक म्हणायचे विकसित देशांमध्ये असलेले तंत्रज्ञान आपल्याकडे कधी येणार.

आजघडीला लोक परदेशातून येणाऱ्यांना विचारतात- तुमच्याकडे डिजिटल पद्धतीने पैसे भरता येतात का? 10 वर्षांपूर्वी लोक तरुणांना विचारायचे- नोकरी नाही मिळाली तर काय कराल? आज लोक तरुणांना विचारतात-तुमच्या स्टार्ट अप उद्योगांचे कार्य कसे सुरु आहे. 10 वर्षांपूर्वी लोक आर्थिक विश्लेषकांना विचारायचे- आपल्याकडे इतकी महागाई का आहे? आज तेच लोक विचारतात- संपूर्ण जग आर्थिक संकटात असताना देखील भारतात महागाई नियंत्रणात कशी आहे. 10 वर्षांपूर्वी असा प्रश्न विचारला जात होता-विकास का होत नाहीये? आज अशी विचारणा होते आहे- आपला देश इतक्या वेगाने विकास कसा घडवू शकतोय?

पूर्वी लोक विचारायचे, आता कोणता घोटाळा बाहेर पडला आहे? आज विचारले जाते, आता कोणत्या घोटाळेबाजावर कारवाई झाली? पूर्वी माध्यमांमधील सहकारी विचारत होते, कुठे आहेत Big Bang Reforms? आज विचारले जाते- निवडणुकीच्या काळातील अर्थसंकल्पात देखील सुधारणा कशा येत आहेत? 10 वर्षांपूर्वी लोक विचारत होते, जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 कधी हटवले जाणार? आज विचारले जाते, जम्मू काश्मीरमध्ये किती पर्यटक आले? काश्मीरमध्ये किती गुंतवणूक आली? तसे तर आज सकाळी मी श्रीनगरमध्ये होतो. अनेक नव्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करून आलो आहे. आणि आज दृश्य काही तरी वेगळेच होते मित्रांनो. 40 वर्षांपासून माझे या भूमीसोबत नाते आहे. आज मी वेगळाच नूर पाहिला, वेगळे रुप पाहिले, स्वप्ने पाहिली, आत्मविश्वासाने ओसंडून वाहणारे लोक मी पाहिले.

 

मित्रहो,

अनेक दशके सरकारांनी ज्यांना कमकुवत मानून, आपल्यावरील भार मानून सोडून दिले, आज 10 वर्षात आम्ही त्यांचीच जबाबदारी घेण्याचे काम केले आहे. म्हणूनच मी सांगतो, ज्यांचे कोणीच नाही, मोदी त्यांच्यासोबत उभे आहेत. तुम्ही आकांक्षी जिल्ह्यांचेच उदाहरण घ्या. अनेक वर्षे या जिल्ह्यांना, येथे राहणाऱ्या कोट्यवधी देशवासीयांना मागास ठरवून नशिबाच्या हवाल्यावर सोडून दिले होते. हा मागास भाग आहे. आमच्या सरकारने केवळ ही विचारसरणीच बदलली नाही तर दृष्टीकोनात देखील बदल केला आणि त्याबरोबरच भाग्य देखील बदलले.

अशाच प्रकारची आपल्या सीमेवरील जिल्हे आणि तिथे राहणाऱ्यांची आयुष्ये देखील होती. पूर्वीच्या सरकारांचे धोरण असे होते की सीमेला लागून असलेल्या या भागांचा विकास होऊ नये. याच धोरणामुळे  तिथे राहणाऱ्या लोकांना त्रास व्हायचा, स्थलांतर देखील व्हायचे. आम्ही व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला, ज्यामुळे लोक सशक्त व्हावेत आणि या भागातील परिस्थितीत बदल व्हावा. दिव्यांगांचे देखील उदाहरण घ्या. अनेक वर्षे त्यांच्याकडे कोणीच लक्ष दिले नाही कारण ते व्होट बँक नव्हते. आम्ही केवळ दिव्यांगांना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्यच दिले नाही तर लोकांच्या विचारसरणीत देखील बदल केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितले तर, हे प्रेक्षक देखील कदाचित अस्वस्थ होती. आपल्याकडे राज्यांमध्ये भाषा आपापल्या पद्धतीने विकसित झाली आहे. विविधते अभिमान आहे. पण आपले जे specially abled लोक आहेत. ज्यांना ऐकण्यात बोलण्यात समस्या आहेत. त्यांना सांकेतिक भाषेची गरज असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्या देशात या सांकेतिक भाषेचे देखील वेगवेगळे प्रकार वापरले जात होते.

आता मला सांगा दिल्लीचा माणूस जयपूरला गेला आणि समोर असलेला माणूस वेगळ्या सांकेतिक भाषेत बोलू लागला तर काय होईल त्याचे? स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनी मी आज ते काम केले, समिती स्थापन केली आणि आज संपूर्ण देशात माझ्या दिव्यांगजनांसाठी एकाच प्रकारची सांकेतिक भाषा शिकवली जाते. लोकहो, गोष्ट तशी लहानशी वाटेल. पण जेव्हा एक संवेदनशील सरकार असते ना, तेव्हा त्यांची विचारसरणी, त्यांचा दृष्टीकोन जमिनीसोबत जोडलेला असतो, मुळांसोबत जोडलेला असतो आणि लोकांसोबत जोडलेला असतो. आणि बघा दिव्यांगांविषयी आज समाजाचा दृष्टीकोन बदलला आहे. सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीपर्यंत दिव्यांगांच्या हिशोबाने आणि ज्या architecture  असतात, ते देखील रचना करताना दिव्यांगासाठी बनवून आणत आहेत. असे कित्येक विशेष समूह आणि समुदाय आहेत ज्यांना स्वातंत्र्यानंतर फारसे महत्त्व देण्यात आले नाही. आम्ही अशा भटक्या जमातींसाठी विशेष कल्याण मंडळ स्थापन केले. कोणीही लाखो रस्ते-पदपथ या ठिकाणी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांचा विचार केला नाही. मात्र, कोरोनाच्या काळात आमच्या सरकारने यांच्यासाठी पीएम स्वनिधी तयार केली. कोणीही आमच्या त्या कुशल कारागीरांची पर्वा केली नाही, ज्यांना आज आम्ही विश्वकर्मा म्हणतो. आम्ही हे सुनिश्चित केले की या वर्गाला स्किलिंग पासून फंडिंगपर्यंत कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. यावर केंद्र सरकार आता 13 हजार कोटी रुपये खर्च करत आहे.

 

मित्रहो,

रिपब्लिक टीवीच्या टीमला माहीत आहे की प्रत्येक मोठ्या कामगिरीमागे मेहनत, दृष्टीकोन आणि संकल्पांचा एक मोठा प्रवास असतो. ज्याचा नुकताच अर्नब यांनी देखील थोडा-फार ट्रेलर आपल्याला दाखवला. भारत देखील आपल्या या प्रवासात अतिशय वेगाने पुढे जात आहे. पुढील दशकात भारत ज्या उंचीवर असेल, ती अभूतपूर्व असेल, अकल्पनीय असेल आणि ही देखील मोदींची गॅरंटी आहे.

 

मित्रहो,

तुम्ही देखील एक ग्लोबल व्हिजन घेऊन पुढे जात आहात याचा मला आऩंद होत आहे. तर मला हा ठाम विश्वास आहे, पण जे तुम्ही सांगितले की मी without royalty एक-दोन सूचना करू.  कोणत्याही royalty ची गरज मला नाही. बघा, तुम्ही राज्यांचे जे चॅनेल बनवण्याचा विचार करत आहात.  एकापाठोपाठ एक करत जाल तर त्यांची सांगड घालता येणार नाही. मी, मूलतः माझी विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे, म्हणूनच मी सांगत आहे. तुम्ही एक डेडिकेटेड असे चॅनेल बनवा, ज्यामध्ये तुम्ही वेळ निश्चित करा की दोन तास गुजराती, दोन तास बंगाली, दोन तास मलयालम, एकच चॅनेल असले पाहिजे. आणि  आज गुगल गुरू तुमचे भाषांतर तर करत असतेच. आणि मी एआयच्या विश्वात खूप पुढे नेत आहे देशाला. आता माझे भाषण तुम्ही आठ-नऊ भाषात तर अगदी सहजपणे ऐकू शकता. आता मी भाषण करत आहे ते सर्व भाषांमध्ये खूपच without no time मिळेल, तमिळ लोकांना मिळेल, पंजाबींना मिळेल. तुम्हाला देखील त्यामुळे काय होईल तुमची एक कोअर टीम तयार होईल. आणि ज्या प्रकारे कोअर टीम जास्त तयार होते. जी economically viable बनते. मग तुम्ही 15 दिवसांनी ते dedicate करा. तुम्ही एका दिवसात सहा राज्यांची चॅनेल का चालवत नाही. तुम्ही वेळ निश्चित करा. मला आणि तंत्रज्ञानासाठी कोणतेही काम अवघड नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे ग्लोबल चॅनेल बनवायचे आहे. प्रत्येकाने तुमचे चॅनेल पाहिले पाहिजे हे गरजेचे नाही. सुरुवातीला तुम्ही एक वृत्त संस्था म्हणून सार्क देशांवर काम करू शकता. यामुळे मालदीवच्या लोकांना मदत होईल. नशीद माझे खूप जुने मित्र आहेत, तर मी त्यांना देखील काही तरी सांगू शकतो. पण जर तुम्ही कमीत कमी सार्क देशांमध्ये काम करा, कारण त्या लोकांना भारताच्या बातम्यांमध्ये स्वारस्य असते, सार्क देशांमध्ये.  त्यांची language एका प्रकारे पुन्हा vimset मध्ये जा. हळू-हळू असे मला वाटते, पण कामे अशी होत नाहीत बाबांनो, की या पाच वर्षात मनरेगा करेन, मग पुढील पाच वर्षांपर्यंत त्याचा ढोल पीटत राहीन. देश असा चालत नाही हो. देश  वेगाने चालतो, देशाला खूप मोठी कामे करायची असतात आणि मला तर असे वाटते , तुम्हाला निवडणूक तर लढवायची नाही आहे मग तुम्ही चिंता कशासाठी करत आहात. आणि मला तर लढायचे आहे तरी देखील मी चिंता करत नाही आहे. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप धन्यवाद.

***

H.Akude/S.Mukhedkar/S.Chitnis/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013132) Visitor Counter : 40