पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रीसच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीदरम्यान माध्यमांना दिलेले निवेदन
Posted On:
21 FEB 2024 4:18PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 फेब्रुवारी 2024
माननीय महोदय, पंतप्रधान मित्सो-ताकिस,
दोन्ही देशांचे प्रतिनिधी.
माध्यम प्रतिनिधी,
नमस्कार!
पंतप्रधान मित्सो-ताकिस आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे भारतात स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. गेल्या वर्षीच्या माझ्या ग्रीस भेटीनंतरचा त्यांचा भारत दौरा दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी मजबूत होत असल्याचे निदर्शक आहे. सोळा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर ग्रीसच्या पंतप्रधानांनी भारताला दिलेली भेट, हा एक ऐतिहासिक प्रसंग आहे.
मित्रहो,
आमची आजची बैठक अतिशय फलदायी ठरली. 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाच्या दिशेने आम्ही वेगाने वाटचाल करत आहोत, ही आनंदाची बाब आहे. आमच्या सहकार्याला नवी ऊर्जा आणि दिशा देण्यासाठी आम्ही अनेक नवीन संधींचा शोध घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये कृषी क्षेत्रात घनिष्ट सहकार्याच्या अनेक शक्यता आहेत. गेल्या वर्षी या क्षेत्रात झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न सुरु आहे, याचा मला आनंद आहे. आम्ही औषध निर्माण, वैद्यकीय उपकरणे, तंत्रज्ञान, नवोन्मेष, कौशल्य विकास आणि अवकाश यासारख्या अनेक क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला.
दोन्ही देशांच्या स्टार्ट अप्सना परस्परांशी जोडण्यावरही आम्ही चर्चा केली. जहाज बांधणी आणि कनेक्टिव्हिटी हे दोन्ही देशांसाठी सर्वोच्च प्राधान्याचे विषय आहेत. या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबतही आम्ही चर्चा केली.
मित्रांनो,
संरक्षण आणि सुरक्षेच्या क्षेत्रातील वाढते सहकार्य, परस्परांवरील आमचा विश्वास प्रदर्शित करत आहे. या क्षेत्रात कार्यगट स्थापन करून आम्हाला संरक्षण, सायबर सुरक्षा, दहशतवादाचा बीमोड , सागरी सुरक्षा यासारख्या सामायिक आव्हानांचा सामना करताना परस्परांशी अधिक समन्वय साधता येईल.
भारतात संरक्षण उत्पादनात सह-उत्पादन आणि सह-विकासाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत, ज्या दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरतील. दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांना परस्परांशी जोडण्यावर आम्ही सहमती दर्शवली आहे. दहशतवादा विरोधातील लढाईत भारत आणि ग्रीसच्या चिंता आणि प्राधान्यक्रम समान आहेत. या क्षेत्रात आमचे सहकार्य आणखी मजबूत कसे करता येईल यावर आम्ही सविस्तर चर्चा केली.
मित्रांनो,
दोन प्राचीन आणि महान संस्कृतींच्या रूपाने भारत आणि ग्रीस या देशांमध्ये घनिष्ट सांस्कृतिक आणि मानवीय संबंधांचा इतिहास खूप जुना आहे. सुमारे अडीच हजार वर्षांपासून दोन्ही देशांमधील लोक व्यापारी आणि सांस्कृतिक संबंधांसोबतच विचारांचेही आदान प्रदान करत आहेत.
या संबंधांना आधुनिक स्वरूप देण्यासाठी आज आम्ही अनेक नवीन उपक्रम निश्चित केले आहेत. आम्ही दोन्ही देशांमध्ये स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर चर्चा केली. यामुळे आपले माननीय संबंध आणखी दृढ होतील.
आम्ही दोन्ही देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहयोगाला प्रोत्साहन देण्यावर देखील भर दिला आहे. पुढच्या वर्षी भारत आणि ग्रीस यांच्यातील राजनैतिक संबंधांची 75 वर्ष साजरी करण्यासाठी आम्ही एक कृती आराखडा बनवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आपल्याला दोन्ही देशातील सामायिक वारसा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नवोन्मेष, क्रीडा तसेच अन्य क्षेत्रांमधील कामगिरी जागतिक व्यासपीठावर दर्शवता येईल.
मित्रांनो,
आजच्या बैठकीत आम्ही अनेक क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर देखील चर्चा केली. सर्व विवादांचे आणि तणावांचे निराकरण चर्चा तसेच मुत्सदेगिरीच्या माध्यमातून झाले पाहिजे, याच्याशी आम्ही सहमत आहोत. आम्ही हिंद - प्रशांत क्षेत्रात ग्रीसच्या सक्रिय भागीदारी आणि सकारात्मक भूमिकेचे स्वागत करतो. ग्रीसने हिंद प्रशांत महासागर उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे ही आनंदाची बाब आहे. पूर्व भूमध्य क्षेत्रात देखील सहयोग करण्यासाठी सहमती दर्शवण्यात आली आहे. भारताच्या जी 20 अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात प्रारंभ करण्यात आलेला आय -मैक कॉरिडॉर मानवतेच्या विकासात दीर्घकाळापर्यंत महत्त्वपूर्ण योगदान देईल.
या उपक्रमात ग्रीस देखील एक मुख्य भागीदार बनू शकतो. आम्ही संयुक्त राष्ट्र तथा इतर जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्यासाठी सहमत आहोत. या सुधारणांमुळे या संस्था समकालीन बनवता येतील. भारत आणि ग्रीस विश्वात शांती आणि स्थैर्य स्थापन करण्यासाठी योगदान देण्याचे आपले प्रयत्न सुरूच ठेवतील.
महामहीम,
आज संध्याकाळी आपण रायसीना संवादात प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहात. तेथे आपले संबोधन ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. आपला भारत दौरा आणि आपली उपयुक्त चर्चा यासाठी मी आपले खूप खूप आभार मानतो.
N.Chitale/R.Agashe/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2007732)
Visitor Counter : 120
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam