शिक्षण मंत्रालय
परीक्षा पे चर्चा 2024 पूर्वी आयोजित देशव्यापी चित्रकला स्पर्धेत 60,000 हून अधिक विद्यार्थी सहभागी
परीक्षा पे चर्चा 2024 साठी विक्रमी 2.26 कोटी नोंदणी
देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह, कार्यक्रमात सहभागी होण्यास आणि पंतप्रधानांशी संवाद साधण्यास उत्सुक
Posted On:
24 JAN 2024 3:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 जानेवारी 2024
विद्यार्थ्यांमधील परीक्षेसंबंधी तणाव दूर करण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित केला जाणारा अभिनव उपक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’च्या यंदाच्या आवृत्तीपूर्वी 23 जानेवारी 2024 रोजी देशभरातील 774 जिल्ह्यांमधील 657 केंद्रीय विद्यालये आणि 122 नवोदय विद्यालयांमध्ये देशव्यापी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

60 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी या भव्य स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या एक्झाम वॉरियर्स या पुस्तकातील परीक्षेच्या मंत्रांवर आधारित होती.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असलेला 23 जानेवारी हा दिवस ‘पराक्रम दिवस’ म्हणून पाळला जातो, याचा उद्देश विद्यार्थ्यांना महान नेत्याच्या जीवनाबाबत प्रेरित करणे आणि त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना रुजवणे हा आहे. हा प्रेरणादायी संदेश ही या चित्रकला स्पर्धेची संकल्पना देखील होती.

विद्यार्थ्यांच्या सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी, शिक्षण मंत्रालय देशभरातील सर्व शाळांमध्ये चित्रकला स्पर्धेसह विविध उपक्रमांना प्रोत्साहन देत आहे. 12 जानेवारी (राष्ट्रीय युवा दिन) ते 23 जानेवारी या कालावधीत मॅरेथॉन दौड, संगीत स्पर्धा, मीम स्पर्धा, पथनाट्य, भित्तीपत्रक बनवणे आणि योगसाधना आणि ध्यानधारणा सत्र यासारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
23 जानेवारी 2024 रोजी झालेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात सहभागी झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद, 'परीक्षा पे चर्चा 2024' या कार्यक्रमाच्या सातव्या भागात मायजीओव्ही पोर्टलवर 2 कोटी 26 लाख इतकी विक्रमी नोंदणी झाली आहे. या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये असलेला व्यापक उत्साह यातून दिसून येतो.

या वर्षी, परीक्षा पे चर्चा 2024 हा कार्यक्रम 29 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नवी दिल्लीत आय. टी. पी. ओ., प्रगती मैदान, भारत मंडपम, इथे टाऊन हॉल स्वरूपात आयोजित केला जाईल. या कार्यक्रमात सुमारे 3000 सहभागी पंतप्रधानांशी संवाद साधतील. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दोन विद्यार्थी आणि एक शिक्षक तसेच कला उत्सवाचे विजेते यांना मुख्य कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील (ई. एम. आर. एस.) देशाच्या विविध भागातील शंभर (100) विद्यार्थी प्रथमच या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. युवकांसाठी तणावमुक्त वातावरण निर्माण व्हावे याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील व्यापक चळवळीचा 'परीक्षा पे चर्चा "हा एक भाग आहे.
प्रत्येक बालकाच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाला न्याय मिळावा, त्याला प्रोत्साहन मिळावे आणि स्वतःला पूर्णपणे व्यक्त करता येईल असे वातावरण निर्माण व्हावे याकरता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजाला एकत्र आणणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ही चळवळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पथप्रदर्शक, सर्वाधिक विक्री होणारे पुस्तक 'एक्झाम वॉरियर्स' हे या चळवळीला प्रेरणा देणारे आहे. इंग्रजी, हिंदी आणि इतर प्रमुख प्रादेशिक भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे.
* * *
R.Aghor/Sushma/Vinayak/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1999103)
Visitor Counter : 153
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Nepali
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam