माहिती आणि प्रसारण मंत्रालय

तृतीयपंथीयांचे सक्षमीकरण : विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून समोर आल्या समावेशकतेच्या कथा


पंतप्रधान स्वनिधी- स्वप्ने, समावेशकता आणि उद्योग यांचे सामर्थ्य खुले करुन देणारी योजना

Posted On: 21 DEC 2023 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 डिसेंबर 2023 

 

‘विकसित भारत संकल्प यात्रे’ने भारतातील लाखो लोकांना जोडून घेत आणि विकासाच्या उर्जेची जोपासना करत,  देशभर एक आशेचे वस्त्र विणले आहे. हा उपक्रम वैविध्यपूर्ण पार्श्वभूमी असलेल्या असंख्य व्यक्तींना एकमेकांशी जोडून अधिक उज्ज्वल भविष्याचे सामुहिक स्वप्न जपण्यास मदत करत आहे.

हाती आलेली आकडेवारी प्रगतीचे चित्र रेखाटू शकत असली आणि तसेच चित्र देखील उभे करत असली तरीही यातील काही कथा केवळ संख्यांच्या कक्षेपार जाऊन आपल्या भावनांन खोलवर प्रतिसाद देतात. अशीच एक कहाणी आहे निलेश या तृतीयपंथी व्यक्तीची, जिने अन्न पुरवण्याच्या व्यवसायात यशस्वी कारकीर्द घडवली आहे.

महाराष्ट्रातील वर्धा येथे राहणाऱ्या निलेशला फिरत्या विक्रेत्यांसाठीच्या पंतप्रधान आत्मनिर्भर निधी (पंतप्रधान स्वनिधी)योजनेच्या माध्यमातून 10,000 रुपयांचे कर्ज मिळाले आणि हा निधी एका प्रेरणादायी उद्योजकतेच्या प्रवासाचा उत्प्रेरक ठरला. सुरुवातीला निलेशला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, मात्र तिचा अढळ निश्चय आणि सकारात्मक दृष्टीकोन यांनी तिला एक समृध्द अन्न पुरवठा उद्योग उभारण्यास मदत केली.निलेशने केवळ हा व्यवसायच उभारला नाही तर त्यासोबत ‘मोहिनी बचत गट’ या स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना करून इतरांना प्रेरणा देखील दिली. या स्वयंसहाय्यत बचत गटामध्ये तृतीयपंथी व्यक्ती आणि महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी एकमेकांच्या सहयोगासह काम करतात. निलेशची ही कहाणी इतरांना सामाजिक बंधने झुगारण्यासाठी आणि स्वतःच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी प्रेरणादायक ठरत आहे. निलेशला तिची क्षमता अजमावण्यासाठी तसेच आर्थिक स्वावलंबन मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पंतप्रधान स्वनिधी योजनेला ती एक “वरदान” मानते.

अशीच आणखी एक कहाणी आहे मोना हिची. तिने या यात्रेदरम्यान तिची कथा थेट संवादाद्वारे  पंतप्रधानांशी सामायिक केली आहे.

एका छोट्या चहाच्या टपरीच्या रूपाने लवचिकता आणि स्वावलंबन यांची कास धरत चंदीगड येथून मोनाचा प्रवास सुरु झाला. पंतप्रधान स्वनिधी योजनेतून मिळालेल्या 10,000 रुपयांच्या कर्जाचा वापर करून चहाची टपरी उभारत तिने आर्थिक स्वावलंबनाच्या मार्गावरील वाटचाल सुरु केली.त्यानंतरच्या काळात तिला 20,000 रुपये आणि 50,000 रुपये अशा दोन कर्जांचा लाभ मिळाला ज्यामुळे तिच्या प्रवासाला आणखी बळकटी मिळाली. समाजाच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनांनी जखडलेल्या जीवनातून मुक्त होण्यासाठी आणि बहुतांश वेळा तृतीयपंथीयांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या जगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेने मोनाला मोठी मदत केली.

निलेश आणि मोना यांच्या या परिवर्तनशील वाटचालीच्या कहाण्या म्हणजे केवळ व्यक्तिगत सफलतेच्या कहाण्या नव्हेत तर त्या विकसित भारत संकल्प यात्रेमुळे अनुभवांचे सामायीकीकरण शक्य झाल्यामुळे प्रगती आणि सक्षमीकरण यांच्या अधिक विस्तृत पटलाचे दर्शन घडवतात.रस्त्यावरील फिरत्या विक्रेत्यांना देशाच्या औपचारिक आर्थिक घडीत सामावून घेण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजना अत्यंत महत्त्वाची ठरली असून या विक्रेत्यांना अधिक उंचीवर नेण्यासाठीचे नवे मार्ग ती उपलब्ध करून देत आहे. दिनांक 20 डिसेंबर रोजी प्राप्त माहितीनुसार पंतप्रधान स्वनिधी योजनेचा फायदा देशातील 57 लाखांहून अधिक लोकांना झाला आहे. हे सर्व लोक आपल्याला आठवण करून देतात की प्रगती म्हणजे केवळ संख्यात्मक टप्पा नसून व्यक्तींना त्यांची संपूर्ण क्षमता अजमावणे शक्य करणारी बाब असून ती समृध्द भारताच्या उभारणीत लक्षणीय योगदान देते. विकसित भारत संकल्प यात्रा, लोकांना जोडून घेऊन त्यांना सक्षम करण्याची मोहीम पुढे सुरु ठेवत असताना, आपण आत्मविश्वासाने असे म्हणू शकतो की अशा कथा आपल्यापैकी प्रत्येकासाठी प्रेरणादायक तसेच उज्ज्वल भविष्याच्या दिशेने मार्गदर्शक ठरत राहतील.

संदर्भ:

 

* * *

S.Bedekar/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1989164) Visitor Counter : 94