पंतप्रधान कार्यालय
विकसित भारत संकल्प यात्रा (शहरी) मधील पंतप्रधानांचे भाषण
Posted On:
16 DEC 2023 7:38PM by PIB Mumbai
तुम्हा सर्वांना नमस्कार.
विकसित भारताच्या संकल्पाबरोबरच मोदी की गारंटी वाली गाडी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. हा प्रवास सुरू होऊन एक महिना उलटून गेला आहे. या एका महिन्यात ही यात्रा हजारो गावांबरोबरच दीड हजार शहरांमध्येही पोहोचली आहे. यामध्ये बहुतांश छोटी शहरे आहेत, छोटी गावे आहेत. आणि मी म्हटले तसे, आजपासून राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्येही ही यात्रा सुरू झाली आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे या राज्यांमध्ये आतापर्यंत ही यात्रा सुरू होऊ शकली नव्हती. मी प्रत्येक राज्याच्या नवीन सरकारांना त्यांच्या राज्यात विकासित भारत संकल्प यात्रेचा झपाट्याने विस्तार करण्याचे आवाहन करतो.
मित्रहो,
विकसित भारत संकल्प यात्रा जरी मोदींनी सुरु केली असली, तरी सत्य हे आहे की आज देशवासीयांनी त्याची धुरा सांभाळली आहे. आणि आता मी ज्या लाभार्थींशी बोलत होतो, त्यांच्याशी झालेल्या संवादावरून हे स्पष्ट होते की, देशातील जनता या यात्रेबद्दल किती उत्साहित आहे. ज्या ठिकाणी यात्रा संपते, तिथून दुसऱ्या गावातील किंवा शहरांमधील लोक या यात्रेची धुरा सांभाळायला लागतात. 'मोदी की गारंटी वाली गाड़ी' चे स्वागत सत्कार करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू आहे, अहमहमिका सुरु आहे अशी माहिती मला मिळाली आहे. लोक नवनवीन पद्धतीने स्वागत करत आहेत. आणि मी पाहिले आहे की आज काल तरूण सेल्फीचा बराच वापर करतात, ते गाडी सोबत सेल्फी काढतात आणि अपलोड देखील करतात. आणि मोठ्या संख्येने लोक एक प्रकारे विकसित भारताचे सदिच्छादूत होत आहेत. नमो अॅप डाउनलोड करून त्यात विकसित भारताचे सदिच्छा दूत बनण्याची योजना आहे. प्रत्येकजण त्यात सामील होत आहे. गाव असो वा शहर, प्रश्नमंजुषा स्पर्धेत मोठ्या संख्येने लोक सहभागी होत असतात, प्रश्न-उत्तरांचा अतिशय चांगला कार्यक्रम सुरु आहे. ज्यामुळे ज्ञान देखील वाढते आणि माहिती मिळते. त्या स्पर्धेतही लोक सहभागी होत आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून लोक केवळ बक्षिसेच जिंकत नाहीत तर नवीन माहिती मिळवून ती लोकांपर्यंत पोहोचवत देखील आहेत.
मित्रहो,
ही यात्रा सुरु झाल्यापासून मी चौथ्यांदा या यात्रेशी जोडला जात आहे. मागील कार्यक्रमांमध्ये मी प्रामुख्याने ग्रामीण भागातील लोकांशी संवाद साधला होता . पीएम किसान सन्मान निधी असेल , नैसर्गिक शेती असेल , ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विविध पैलूंसंदर्भात चर्चा असेल. आपल्या गावांना विकसित बनवणाऱ्या वेगवेगळ्या ,छोट्या मोठ्या विषयांवर मी चर्चा केली. आणि जेव्हा मी संवाद साधत होतो, तेव्हा लोक मला इतके तपशीलवार सांगत होते आणि या सरकारी योजना खेड्यापाड्यात आणि गरीबांच्या घरापर्यंत पोहोचतात हे पाहून मला खूप आनंद व्हायचा. आजच्या या कार्यक्रमात शहरी भागातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. त्यामुळे यावेळी माझा भर शहरी विकासाशी संबंधित गोष्टींवर होता आणि मी ज्यांच्याशी संवाद साधला त्यातही त्या गोष्टी होत्या.
माझ्या कुटुंबियांनो,
विकसित भारताच्या संकल्पात आपल्या शहरांची खूप मोठी भूमिका आहे. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ जो काही विकास झाला, त्याची व्याप्ती देशातील काही मोठ्या शहरांपुरती मर्यादित राहिली. मात्र आज आपण देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीच्या शहरांच्या विकासावर भर देत आहोत. देशातील शेकडो लहान शहरे विकसित भारताची भव्य इमारत मजबूत करणार आहेत. त्यामुळे अमृत मिशन असो की स्मार्ट सिटी मिशन, या अंतर्गत छोट्या शहरांमधील मूलभूत सुविधा सुधारल्या जात आहेत. पाणीपुरवठा असेल , मल निःसारण आणि सांडपाणी व्यवस्था असेल , वाहतूक व्यवस्था असेल , शहरांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे असेल , या सगळ्यांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. स्वच्छता असो, सार्वजनिक शौचालये असोत, एलईडी पथदिवे असोत, शहरांमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम झाले आहे. आणि याचा थेट प्रभाव जीवन सुखकर करण्यावर पडला आहे, प्रवास सुलभतेवर झाला आहे, व्यवसाय सुलभतेवर झाला आहे. गरीब असो की नव-मध्यमवर्गीय, जे नुकतेच गरिबीतून बाहेर आले आहेत, एक नवीन मध्यमवर्गीय कुटुंब जन्माला येत आहे. मध्यमवर्गीय असो वा सधन कुटुंब, प्रत्येकाला या वाढत्या सुविधांचा लाभ मिळत आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आमचे सरकार कुटुंबातील सदस्याप्रमाणे तुमच्या सर्व चिंता कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पाहिलं असेल की, जेव्हा कोरोनाचं एवढं मोठं संकट आलं तेव्हा सरकारने तुम्हाला मदत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. कोरोना संकटाच्या काळात आमच्या सरकारने 20 कोटी महिलांच्या बँक खात्यात हजारो कोटी रुपये हस्तांतरित केले. आमच्या सरकारनेच प्रत्येक व्यक्तीला मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. आमच्या सरकारनेच कोरोनाच्या काळात प्रत्येक गरीबाला मोफत अन्नधान्य पुरवण्याची योजना सुरू केली. आमच्या सरकारनेच कोरोनाच्या काळात छोटे उद्योग वाचवण्यासाठी लाखो कोटी रुपयांची मदत पाठवली. जिथे इतरांकडून अपेक्षा संपतात, तिथून मोदींची हमी सुरू होते.
आपले फेरीवाले, ठेले-पटरी, पदपथावर काम करणारे निराश झाले होते. त्यांना वाटायचे की आता असेच जगावे लागणार , काही होणार नाही. त्याला विचारणारे कोणी नव्हते. या मित्रांना प्रथमच बँकिंग व्यवस्थेशी जोडण्याचे भाग्य आमच्या सरकारला मिळाले आहे. आज पीएम स्वनिधी योजनेच्या माध्यमातून या मित्रांना बँकांकडून स्वस्त आणि सुलभ कर्ज मिळत आहे. देशातील अशा 50 लाखांहून अधिक मित्रांना बँकांकडून मदत मिळाली आहे. या यात्रेदरम्यानही सव्वा लाख मित्रांनी पीएम स्वनिधीसाठी याच ठिकाणी अर्ज केले आहेत. पीएम स्वनिधी योजनेचे 75 टक्क्यांहून अधिक लाभार्थी दलित, मागास आणि आदिवासी समाजाचे घटक आहेत. यामध्येही सुमारे 45 टक्के लाभार्थी आपल्या भगिनी आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे बँकेत ठेवण्यासाठी कोणतीही हमी नव्हती, त्यांच्यासाठी मोदींची हमी उपयुक्त ठरत आहे.
मित्रहो,
शहरात राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक सुरक्षेसाठीही आमचे सरकार कटिबद्ध आहे. वयाच्या 60 व्या वर्षांनंतरही सर्वांना सुरक्षा कवच मिळावे यासाठी आमच्या सरकारने गांभीर्याने काम केले आहे. आतापर्यंत देशातील 6 कोटी लोक अटल पेन्शन योजनेत सामील झाले आहेत. यामुळे वयाच्या 60 वर्षांनंतर 5,000 रुपयांपर्यंत नियमित पेन्शन सुनिश्चित होत आहे. शहरात राहणाऱ्या गरीबांसाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आशेचा खूप मोठा किरण बनली आहे. यामध्ये, विमा कंपनीला वर्षातून एकदा फक्त 20 रुपये प्रीमियम भरावा लागतो आणि त्या बदल्यात त्याला 2 लाख रुपयांचे संरक्षण मिळते. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत शहरी गरीबांना वर्षाला केवळ 436 रुपये देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यातही त्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते.
आमचं सरकार या दोन योजनांच्या माध्यमातून लोकांना- म्हणजे ज्यांच्या कुटुंबावर एखादं संकट कोसळलं असेल अशा कुटुंबांना 17 हजार कोटी रूपये- बघा विचार करा- 17 हजार कोटी रूपयांची क्लेम रक्कम या कुटुंबांना मिळाली आहे. संकटप्रसंगी या कुटुंबांनी घरातलं हक्काचं माणूस गमावलं असताना इतकी रक्कम कुटुंबापर्यंत पोहोचली,तर त्याची त्यांना किती मदत होत असेल, तुम्ही अंदाज बंधू शकता.. आज जेव्हा तुम्ही बघू शकता, की अगदी 200-400 कोटींचीही योजना सुरू केली ना, काही राजकीय पक्ष बोलत राहतात-ठळक बातम्या करायला फक्त पुढे-मागे झुलतात. बातम्या तयार करून घेतात . इथे 17 हजार कोटी रूपये गरिबांच्या घरी पोहोचले आहेत. भारत सरकारच्या या योजनांचा लाभ लोकांना मिळत आहे. सर्व सहका-यांना मी असं आवाहन करतो, सरकारच्या या पेंशन आणि विमा योजनांच्या मदतीने स्वतःचं सुरक्षा कवच जरूर मजबूत करा.. यासाठी मोदींची हमी देणारी गाड़ी, तुम्हाला मदत करेल.
मित्रांनो,
आज प्राप्तिकर सवलत असो किंवा स्वस्तात उपचार होण्याची सुविधा- शहरी कुटुंबांचे जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यांची बचत जास्त व्हावी असा प्रयत्न आहे. आतापर्यंत शहरांमधले कोट्यवधी गरीब लोक आयुष्मान भारत योजनेशी जोडले गेले आहेत. आयुष्मान कार्डामुळे गरिबांचे एक लाख कोटी रुपये खर्च होण्यापासून वाचले आहेत. ते एक लाख कोटी रुपये डॉक्टरांकडे गेले असते किंवा मग औषधपाण्यावर खर्च झाले असते, ते आज गरिबांच्या, मध्यमवर्गाच्या खिशात सुरक्षित आहेत. आमच्या सरकारने जी जन औषध केंद्रं उघडली आहेत- आणि मी तर आजच्या सगळ्या श्रोत्यांना सांगेन की- तुम्हाला औषधं विकत घ्यायची असतील तर जन औषध केंद्रांतून घ्या, त्यांवर 80 टक्के सवलत आहे. 100 रूपयांचं औषध 20 रूपयांत मिळेल, तुमचे पैसे वाचतील. शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांनी ज्या जन औषध केंद्रांतून औषधं घेतली असतील, ती केंद्रं नसती तर त्यांचे 25 हजार कोटी रुपये अधिक खर्च झाले असते. त्यांचे 25 हजार कोटी रुपये वाचले आहेत. आता तर सरकार जन औषध केंद्रांची संख्याही वाढवून 25 हजार करणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपण उजाला योजनेतून देशात LED दिव्यांची क्रांती आलेली पाहिली आहे. यामुळे शहरी कुटुंबांची विजेची बिलं खूप कमी झाली आहेत.
माझ्या कुटुंबियांनो,
गावातून शहरात रोजगारासाठी येणाऱ्या गरीब बंधू-भगिनींच्या अडीअडचणी आमचं सरकार समजून घेतं. त्यांची एक समस्या होती, की त्यांच्या गावची शिधापत्रिका / रेशनकार्ड दुसऱ्या राज्यातल्या शहरांमध्ये चालत नसे. त्यामुळेच मोदींनी वन नेशन, वन राशन कार्ड बनवलं. आता कोणतंही कटुंब एकाच शिधापत्रिकेवर गावात असो की शहरात - शिधा घेऊ शकेल.
माझ्या कुटुंबियांनो,
कोणाही गरिबाला नाईलाजाने झोपडीत राहावं लागू नये, सगळ्यांच्या डोक्यावर पक्कं छप्पर असावं, पक्कं घर असावं यासाठी आपल्या सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. गेल्या 9 वर्षांत केंद्र सरकारनं 4 कोटींहून अधिक घरं बांधली आहेत. यापैकी एक कोटीहून अधिक घरं शहरी गरिबांना मिळाली आहेत. मध्यमवर्गीय कुटुंबांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं सरकार शक्य ती सर्व मदत करतं. क्रेडिट लिंक्ड सब्सिडी स्कीमअंतर्गत आजवर लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांना मदत करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे स्वतःचं घर नसेल, त्यांना योग्य त्या भाड्यावर चांगलं घर मिळण्याची काळजीही सरकार घेत आहे. सरकारने शहरी स्थलांतरित, कामगार आणि अन्य कामकरी बांधवांच्या भाड्याच्या घरांसाठी एक विशेष योजना तयार केली आहे. यासाठी अनेक शहरांमध्ये विशेष संकुलंही उभारली जात आहेत.
माझ्या कुटुंबियांनो,
शहरांतल्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना अधिक चांगलं आयुष्य मिळवून देण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं माध्यम असतं ते म्हणजे- सार्वजनिक वाहतूकव्यवस्था. आधुनिक पब्लिक ट्रांसपोर्टसाठी गेल्या दहा वर्षांत जे काम झालं आहे, ते अतुलनीय आहे! तुम्ही कल्पना करू शकता, की 10 वर्षांपेक्षाही कमी काळात 15 नवीन शहरांपर्यंत मेट्रो सेवेचा विस्तार झाला आहे. आज एकूण 27 शहरांमध्ये मेट्रो सुरु तरी झाली आहे किंवा मेट्रोवर काम तरी सुरु आहे. गेल्या काही वर्षांत देशाच्या शहरांत विजेवरच्या बसगाड्या चालवण्यासाठीही केंद्र सरकारने हज़ारों कोटी रुपए खर्च केले आहेत. 'पीएम- ई-बस सेवा अभियानांतर्गत अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रिक बसगाड्या चालवल्या जात आहेत. दोन-तीन दिवसांपूर्वीच दिल्लीतही केंद्र सरकारने विजेवरच्या बसगाड्या सुरु केल्या आहेत. आता दिल्लीत केंद्र सरकारकडून प्रचालित इलेक्ट्रिक बसगाड्यांची संख्या 1300 च्या पुढे गेली आहे.
माझ्या कुटुंबियांनो,
आपली शहरं, आपल्या युवाशक्ती आणि नारीशक्तीलाही बळकट करण्याचं खूप महत्त्वाचं माध्यम आहेत. मोदींची हमी देणारी गाडी, युवाशक्ती आणि नारीशक्ती- दोहोंना सक्षम करत आहे. आपण सर्वांनी याचा अधिकाधिक लाभ घ्यावा आणि विकसित भारताच्या संकल्पाला घेऊन पुढे जावं. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. या यात्रेचा आणखी अनेक लोकांना लाभ मिळावा, अधिक लोक यात्रेशी जोडले जात राहावेत, यात्रा पोहोचण्यापूर्वीच गावात वातावरणनिर्मिती व्हावी, शहराच्या विभिन्न भागांमध्ये वातावरण निर्माण व्हावं. आणि हो, ज्यांना आजवर सरकारांचा लाभ मिळाला आहे, त्यांना जरूर येथे घेऊन या, म्हणजे मग बाकीच्या लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल, की ज्यांना आज आत्ता लाभ मिळाला नसेल, जे बाकी राहिले असतील, त्यांना भविष्यात लाभ मिळेल, ही मोदींची हमी आहे. म्हणून त्यांना जितक्या जास्त संख्येनं आणाल, त्यांना जितकी जास्त माहिती मिळेल, तितकं चांगलं. आणि आपण कितीही काहीही सांगितलं तरी, ज्या व्यक्तीला मिळालं असेल ती स्वतः बोलली तर इतरांचा विश्वास दृढ होतो. आणि यामुळेच माझा तुम्हाला आग्रह आहे की ज्या-ज्या लोकांना- कोणाला स्वयंपाकाच्या गॅसची जोडणी मिळाली असेल, कोणाला विजेची जोडणी, कोणाला नळजोडणी मिळाली असेल, कोणाला घर तर कोणाला आयुष्मान कार्ड मिळालं असेल. कोणाला मुद्रा योजनेचा लाभ मिळाला असेल, तर कोणाला स्वनिधी योजना मिळाली असेल; कोणाला बँकेकडून पैसे मिळाले असतील, कोणाला विम्याचे पैसे मिळाले असतील- त्यांना घेऊन या. अनेक योजनांचे अनेक प्रकारचे लाभ आहेत. जेव्हा लांब असलेल्याला समजेल की, आपल्या गावात त्यालाही लाभ मिळू शकेल, तेव्हा तोही विचार करेलच- चला त्याला मिळालं तर मलाही मिळू शकेल. मीही रजिस्टर करून घेतो. आणि, ज्यांना लाभ मिळाले आहेत त्यांनी जास्त संख्येनं आलं पाहिजे, त्यांनी येऊन सांगावं की, "बघा तर, ही मोदींची योजना आहे, हिचा लाभ घ्या."
मला तर गावातल्या गरिबांपर्यंत, शहरातल्या झोपडीवासियांपर्यंत सरकारचे सर्व लाभ पोहोचवायचे आहेत, तेही अडचणींशिवाय. आणि म्हणूनच ही गाडी निघाली आहे. ही जी 'मोदींची हमी देणारी गाडी' आहे ना, ती तुमच्यासाठीच आहे. तर मग तुम्ही सर्वांनी अधिकाधिक संख्येनं या कार्यक्रमाशी जोडून घ्यावं,आणि कार्यक्रम यशस्वी करावा. 'देशात 2047 मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी सुरु असेल, तेव्हा हा देश विकसित झालेला असेल', ही प्रखर भावना निर्माण करायची आहे. 'आपण सर्व काही चांगलं करू आणि देशालाही चांगलं घडवू.'; हा विचार घेऊन आपल्याला सर्वाना चालायचं आहे. आणि हे वातावरण निर्माण करण्यासाठी ही यात्रा, ही गाडी, हे संकल्प- हे सारं फार उपयोगी पडणार आहे. माझ्याकडून तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा !
धन्यवाद !
***
NM/SushmaK/JaiV/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1987391)
Visitor Counter : 125
Read this release in:
Kannada
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam