पंतप्रधान कार्यालय

विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांनी साधला संवाद


"'मोदींची हमी' हे यान आता देशाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत आहे"

"विकसित भारत संकल्प यात्रा सुरु जरी मोदींनी केली असली, तरी आता देशवासीयांनीच त्याची धुरा उचलली आहे"

"देशाची शेकडो लहान शहरे विकसित भारताच्या भव्य वस्तूला बळ देत आहेत"

"जिथे इतरांकडून असलेल्या अपेक्षा संपतात तिथे मोदींची हमी सुरु होते"

"शहरी कुटुंबांसाठी पैशाची बचत करण्यास सरकार वचनबद्ध आहे"

"गेल्या 10 वर्षांत आधुनिक सार्वजनिक वाहतुकीसाठी झालेले कार्य अतुलनीय आहे"

Posted On: 16 DEC 2023 6:14PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधितही केले. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा कंदील दाखवला.

या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोराममध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला (VBSY) हिरवा कंदील दाखवण्याची संधी मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. "'मोदींची हमी' हे यान आता देशाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचत आहे", असे ते म्हणाले. एक महिन्याच्या प्रवासादरम्यान VBSY सहस्रावधी खेड्यांपर्यंत आणि लहान-मोठ्या 1500 शहरांपर्यंत पोहोचली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. निवडणुकांदरम्यानच्या आचारसंहितेमुळे याआधी VBSY सुरु करता आली नाही असे सांगत, आता त्या पाच राज्यांत VBSY च्या जलद विस्तारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित राज्य सरकारांना केले.

विकसित भारत यात्रा संकल्पातील जन आंदोलनाचा पैलू पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केला. "विकसित भारत संकल्प यात्रा सुरु जरी मोदींनी केली असली, तरी खरे तर आता देशवासीयांनीच त्याची धुरा उचलली आहे", पंतप्रधान म्हणाले. 'मोदींच्या हमीची गाडी' त्या-त्या भागात जात असताना तिचे स्वागत करण्यातील जनतेचा उत्साह आणि त्यासाठीची अहमहमिका यांचे वर्णन पंतप्रधानांनी लाभार्थ्यांशी साधलेल्या संवादात केले.

VBSY च्या प्रवासाशी जोडून घेण्याची ही चौथी वेळ असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ग्रामीण भागातील जनतेशी संवाद साधताना पीएम किसान सम्मान निधी, नैसर्गिक शेती, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पैलू, आणि भारतातील खेड्यांचा विकास- हे मुद्दे त्यावेळी चर्चिले गेल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमात शहरी भागातील बहुसंख्य जनतेचा सहभाग असल्याचे नमूद करत, आजचा भर शहरी विकासावर असेल असे पंतप्रधानांनी सांगितले.

विकसित भारताच्या निर्धारामध्ये आपल्या शहरांची मोठी भूमिका आहे, असे पंतप्रधान म्हणाले. स्वातंत्र्यानंतर बराच काळ जो काही विकास झाला, त्याची व्याप्ती देशातील काही मोठ्या शहरांपुरती मर्यादित होती.  परंतु आज आपण देशातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील  शहरांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत. बळ देत आहोत.  देशातील शेकडो लहान शहरे विकसित भारताची भव्य इमारत मजबूत करणार आहेत, असे सांगत पंतप्रधानांनी या संदर्भात छोट्या शहरांमध्ये मूलभूत सुविधा सुधारणाऱ्या अमृत मिशन आणि स्मार्ट सिटी मिशनची उदाहरणे दिली. या सुधारणांमुळे राहणीमान उंचावण्यासोबतच प्रवास सुलभता आणि व्यवसाय सुलभता यावर थेट परिणाम होत आहे, असे त्यांनी सांगितले. गरीब, नव-मध्यमवर्ग, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत या सर्वांनाच या सुधारित सुविधांचा लाभ मिळत आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

कौटुंबिक सदस्य म्हणून तुमच्या समस्या कमी करण्यावर सरकारचा भर आहे”, अशी टीप्पणी पंतप्रधानांनी केली.  कोरोना विषाणूच्या साथीच्या काळादरम्यान सरकारने पुरविलेल्या मदतीचा उल्लेख करत  पंतप्रधानांनी 20 कोटी महिलांच्या बँक खात्यांमध्ये हजारो कोटी रुपयांचे वितरण, मोफत कोविड लस, गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य आणि लाखो लहान व्यवसायांना कैक कोटी रुपयांच्या मदतीचा उल्लेख केला. जिथे इतरांकडून अपेक्षांचा अस्त होतो तेथून मोदींची हमी सुरू होते”, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाले यांना बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा उल्लेख देखील केला, ज्यामुळे हे लोक आता पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत सहजपणे कर्ज घेऊ शकत असल्याची माहिती दिली.  पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत आतापर्यंत 50 लाखांहून अधिक लोकांनी बँकेच्या मदतीचा लाभ घेतला आहे हे अधोरेखित करत आजवर 1.25 लाख लोकांनी विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे प्रधानमंत्री स्वनिधी साठी अर्ज केले आहेत, अशी माहिती दिली.  पंतप्रधान स्वनिधी योजनेचे 75 टक्क्यांहून अधिक लाभार्थी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायाचे सदस्य आहेत, आणि त्यापैकी सुमारे 45 टक्के महिला लाभार्थी आहेत”, असे त्यांनी सांगितले. ज्यांच्याकडे बँकेची कोणतीही हमी नाही त्यांच्यासाठी मोदींची हमी उपयुक्त आहे, असेही ते म्हणाले.

शहरी रहिवाशांच्या सामाजिक सुरक्षेसाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.  त्यांनी शहरी भागातील लोकांसाठी वाढत्या सुरक्षा प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली. अटल पेन्शन योजनेच्या 6 कोटी लाभार्थ्यांना वयाची 60 वर्षे ओलांडल्यानंतर 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. पीएम सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती योजना 2 लाख रुपयांपर्यंतचे सुरक्षा कवच  प्रदान करतात, असे ते म्हणाले.  या योजनांतर्गत 17 हजार कोटींचे दावे यापूर्वीच निकाली काढण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. प्रत्येकाने या योजनांमध्ये नाव नोंदणी करून आपले सुरक्षा कवच मजबूत करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

शहरी भागातील कुटुंबांचे पैसे वाचवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, मग ती आयकरातील सूट असो किंवा कमी खर्चात वैद्यकीय उपचार मिळणे असो,” असे पंतप्रधान म्हणाले. आयुष्मान भारत योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी या योजनेतील शहरी भागातील कोट्यवधी गरीब नागरिकांच्या समावेशाची बाब ठळकपणे मांडली. आयुष्मान कार्डामुळे या नागरिकांचे वैद्यकीय उपचारांसाठी होणाऱ्या खर्चातील 1 लाख रुपये वाचवण्यास मदत झाली आहे. नागरिकांना 80%सवलतीत औषधे उपलब्ध करून देणाऱ्या आणि त्यायोगे देशातील शहरांमध्ये राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे औषधांवर खर्च होऊ शकणारे 25,000 कोटी रुपयांहून अधिक पैसे वाचवण्यास मदत करणाऱ्या जन औषधी केंद्रांचा देखील त्यांनी उल्लेख केला. देशातील जन औषधी केंद्रांची संख्या वाढवून 25,000 केंद्रांपर्यंत नेण्याच्या सरकारच्या निर्णयाबाबत देखील त्यांनी यावेळी माहिती दिली. शहरी भागात राहणाऱ्या कुटुंबांच्या वीजबिलात लक्षणीयरीत्या कपात शक्य करून देणाऱ्या उज्ज्वला योजनेतून देशभरात एलईडी दिव्यांनी आणलेल्या क्रांतीचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलताना स्थलांतर करणाऱ्या कामगारांसाठी एक देश, एक शिधापत्रिकाही योजना कशी उपयुक्त ठरत आहे याचा देखील उल्लेख केला. गेल्या 9 वर्षांच्या काळात, गरीब कुटुंबांना 4 कोटींहून अधिक घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत आणि त्यापैकी 1 कोटी घरे शहरी भागातील गरीब लाभार्थ्यांना देण्यात आली आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. कर्जाशी संलग्न अनुदान योजना, ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची घरे नाहीत त्यांना किफायतशीर दरातील भाडेपट्टीने घरे उपलब्ध करून देण्याची सुनिश्चिती करणे तसेच स्थलांतर करणाऱ्या कामगारांसाठी विशेष संकुलांची उभारणी करणे इत्यादी उपक्रमांचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले, “देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी देखील आपले सरकार सर्व प्रकारचे पाठबळ पुरवत आहे.

पंतप्रधान म्हणाले, “शहरांमधील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना चांगले जीवन देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक हे आणखी एक प्रमुख साधन आहे. गेल्या 10 वर्षात आधुनिक सार्वजनिक वाहतुकीसाठी जे काम केले आहे ते अतुलनीय आहे.त्यांनी सांगितले की, 27 शहरांमध्ये मेट्रोचे काम पूर्ण झाले आहे किंवा सुरू असून गेल्या 10 वर्षांत 15 नवीन शहरांना मेट्रो सेवा मिळालेली आहे. पीएम-ई बस सेवा अभियानांतर्गत अनेक शहरांमध्ये इलेक्ट्रिक बस चालवल्या जात आहेत. "आताच  दोन-तीन दिवसांपूर्वी, केंद्र सरकारने दिल्लीतही 500 नवीन इलेक्ट्रिक बसेस दाखल केल्या आहेत. आता दिल्लीत केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बसेसची संख्या 1300 च्या पुढे गेली आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नमूद केले की, शहरे ही तरुण आणि महिला दोघांनाही सक्षम करण्यासाठी उत्तम माध्यमे आहेत. पंतप्रधान म्हणाले की, "'मोदी की ग्यारंटी ' हा विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ देखील युवा शक्ती आणि महिला दोघांनाही सक्षम करत आहे." सर्वांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि विकसित भारताचा संकल्प पुढे  न्यावा असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले.

पार्श्वभूमी

या योजनांचा लाभ सर्व लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल याची खात्री करून सरकारच्या प्रमुख योजनांची परिपूर्णता साध्य करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा देशभरात हाती घेण्यात येत आहे.

आज झालेल्या या कार्यक्रमात देशभरातून  विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.

Gladdening to see the impact of Viksit Bharat Sankalp Yatras across the country. https://t.co/11WtwGdGOj

— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2023

देश के सैकड़ों छोटे शहर ही विकसित भारत की भव्य इमारत को सशक्त करने वाले हैं: PM @narendramodi pic.twitter.com/gjOT2QQRda

— PMO India (@PMOIndia) December 16, 2023

Ensuring 'Ease of Living' for the citizens. pic.twitter.com/BOTUQ3kP6s

— PMO India (@PMOIndia) December 16, 2023

हमारी सरकार मिडिल क्लास परिवारों के घर का सपना पूरा करने में भी हर संभव मदद कर रही है: PM @narendramodi pic.twitter.com/5l9VtlEHh1

— PMO India (@PMOIndia) December 16, 2023

***

S.Kane/J.Waishampayan/S.Mukhedkar/S.Chitnis/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987249) Visitor Counter : 70