पंतप्रधान कार्यालय

वल्ललार म्हणूनही ओळखले जाणारे श्री रामलिंग स्वामी यांच्या 200व्या जयंती सोहळ्याला पंतप्रधानांनी केले संबोधित


“वल्लालर यांचा प्रभाव जागतिक आहे”

“ज्यावेळी आपण वल्लालर यांचे स्मरण करतो,आपल्याला त्यांच्या सेवा आणि करुणा या भावनेची आठवण होते”

“भुकेल्यांना अन्न देणे म्हणजे दयाळूपणाचे सर्वात उदात्त कार्य आहे अशी त्यांची धारणा होती”

“सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर काळाच्या पुढे होते”

“वल्लालर यांच्या शिकवणींमध्ये समानतापूर्ण समाजासाठी काम करण्याचा उद्देश आहे”

भारतातील सांस्कृतिक ज्ञानातील वैविध्य एक भारत श्रेष्ठ भारत या सामूहिक कल्पनेला बळ देणार्‍या महान संतांच्या शिकवणीच्या समान धाग्याने काळ आणि अवकाशाच्या पलीकडे जात जोडले गेले आहे

Posted On: 05 OCT 2023 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्री रामलिंग स्वामी ज्यांना वल्लालर म्हणूनही ओळखले जात होते त्यांच्या 200व्या जयंती सोहळ्याला संबोधित केले.

या सोहळ्यामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन वल्लालर यांच्याशी अतिशय जवळचा संबंध असलेल्या वडालूर या ठिकाणी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. वल्लालर हे  भारतामधील सर्वाधिक आदरणीय संतांपैकी एक होते, जे 19व्या शतकात पृथ्वीवर अवतरले आणि त्यांची आध्यात्मिक शिकवण आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे, असे ते म्हणाले. वल्लालर यांचा प्रभाव जागतिक असून  अनेक संघटना त्यांचे विचार आणि सिद्धांतावर काम करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित करून सांगितले.  

ज्यावेळी आपण वल्लालर यांचे स्मरण करतो त्यावेळी आपल्याला त्यांच्या सेवा  आणि करुणा या भावनेची आठवण होते पंतप्रधान म्हणाले.आपल्या सोबतच्या मनुष्यमात्रांविषयी करुणेला प्राथमिक मानणाऱ्या जीवनशैलीवर वल्लालर यांचा विश्वास होता, असे पंतप्रधानांनी सांगितले.उपासमारीचे  उच्चाटन करण्याविषयीचे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान आणि बांधिलकी पंतप्रधानांनी अधोरेखित केली. उपाशी पोटी झोपणाऱ्या मानवाचे दुःख त्यांच्यासाठी सर्वात मोठे दुःख होते. भुकेल्याला आपल्याकडे असलेले अन्न देणे हे दयाळूपणाच्या सर्वात मोठ्या कार्यांमधील अतिशय उदात्त कार्य आहे, अशी त्यांची धारणा होती. वल्लालर यांचे विचार उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले, ज्या ज्या वेळी मी सुकून जात असलेली पिके पाहतो, त्या वेळी मी स्वतः देखील सुकून जातो. सरकार देखील त्यांच्या याच आदर्शाबाबत वचनबद्ध आहेअसे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. यावेळी त्यांनी कोविड महामारीच्या अतिशय मोठ्या आपत्तीदरम्यान सरकारची परीक्षा पाहणाऱ्या काळात 80 कोटी भारतीय बांधवांना मोफत अन्नधान्य पुरवून सरकारने मोठा दिला दिलासा दिल्याचे उदाहरण दिले. 

ज्ञान आणि शिक्षणाच्या शक्तीवर, वल्लालर यांचा प्रगाढ विश्वास होता, असे सांगत, कुणालाही मार्गदर्शनासाठी ते नेहमीच तत्पर असत.  त्यांनी आपल्या आयुष्यात अगणित लोकांना मार्गदर्शन केले. असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. कुरलला अधिकाधिक लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले, तसेच  आधुनिक अभ्यासक्रमाला वल्लालर  यांनी खास महत्त्व दिले होते, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते. युवकांनी तामीळ, संस्कृत आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवावे, असे वल्लालर  यांना वाटत होते, असे सांगून, गेल्या नऊ वर्षात शिक्षणव्यवस्थेतील पायाभूत सुविधा क्षेत्रात आमूलाग्र बदल आणण्यासाठी त्यांच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती पंतप्रधानांनी दिली. देशाला तीन दशकांनंतर नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मिळाले असेही त्यांनी सांगितले. हे धोरण नवोन्मेष, संशोधन आणि विकास अशा गोष्टींवर भर देत, देशातील संपूर्ण शिक्षण परिदृश्य परिवर्तीत करत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले. देशात गेल्या नऊ वर्षात,विक्रमी संख्येने विद्यापीठे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालये स्थापन केली जात असून, आता युवा विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या भाषेत देखील अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतात, ज्यातून त्यांना आणखी अनेक संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान म्हणाले.

सामाजिक सुधारणांच्या बाबतीत वल्लालर  यांचे विचार काळाच्या पुढचे होते.असे सांगत, वल्लालर  यांच्या देवाविषयीच्या कल्पनेला त्यांनी अधोरेखित केले. वल्लालर  यांच्या दृष्टीने,देव, धर्म, जाती आणि वर्ण या सगळ्यांच्या पलीकडे आहे, वल्लालर  यांना ब्रह्मांडातील कणाकणात दिव्यत्व दिसत असे. आज मानवतेने सुद्धा ह्याच दिव्यताची ओळख करून घेणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. समतेवर आधारित समाजाच्या निर्मितीसाठी उपदेश  करणाऱ्या वल्लालर  यांना वंदन करतांना, सबका साथ,सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ ही आमची भूमिका  अधिकच भक्कम होत आहे, असं पंतप्रधान म्हणाले. आज वल्लालर  यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम संमत झाल्याबद्दल आशीर्वादच दिले असते, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. वल्लालर  यांच्या कार्यातील साधेपणा अधोरेखित करण्यासाठी पंतप्रधान म्हणाले की त्यांचे लेखन समजण्यास सोपे आहे, त्यांनी अत्यंत क्लिष्ट असे आध्यात्मिक ज्ञान सोप्या सुलभ भाषेत समजावून सांगितले आहे. असे ते म्हणाले. भारतातील सांस्कृतिक ज्ञानातील वैविध्य एक भारत श्रेष्ठ भारत या सामूहिक कल्पनेला बळ देणार्‍या महान संतांच्या शिकवणीच्या समान धाग्याने काळ आणि अवकाशाच्या पलीकडे जात जोडले गेले आहे, याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

या पवित्र प्रसंगी, पंतप्रधानांनी वल्लालर  यांचे आदर्श पूर्ण करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि प्रत्येकाने त्यांचा प्रेम,दया आणि न्यायाच्या  संदेशाचा प्रसार करण्याचे आवाहन केले.त्यांच्यासाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयांसाठी आपण कठोर परिश्रम करत राहू या.आपल्या आजूबाजूला कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी घेऊया. प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळेल याची खात्री करूया,असे पंतप्रधान समारोप करताना म्हणाले.

NC/Shailesh P/Radhika/PM

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1964648) Visitor Counter : 114