पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी छत्तीसगडमध्ये बस्तरच्या जगदलपूर येथे केली 27000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
एनएमडीसी स्टील लिमिटेडच्या स्टील प्लांटचे केले लोकार्पण
जगदलपूर रेल्वे स्थानकाच्या अदययावतीकरण प्रकल्पाची बसवली कोनशिला
छत्तीसगडमधील विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांची बसवली कोनशिला आणि केले राष्ट्रार्पण
तारुकी-रायपूर डेमू रेल्वे सेवेला झेंडा दाखवून केले रवाना
देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक गाव विकसित होईल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल
विकसित भारतासाठी भौतिक, सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा भविष्यातील गरजांनुरुप असल्या पाहिजेत
मोठे पोलाद उत्पादक राज्य असल्याचा फायदा छत्तीसगडला होत आहे
बस्तरमध्ये तयार होणाऱ्या पोलादामुळे आपले लष्कर बळकट होईल आणि संरक्षण निर्यातीत भारताचा देखील महत्त्वाचा वाटा असेल
छत्तीसगडमधील 30 पेक्षा जास्त स्थानकांचे अमृत भारत स्थानक योजने अंतर्गत अद्ययावतीकरण केले जात आहे
छत्तीसगडमधील लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे
सरकार छत्तीसगडच्या विकासाच्या प्रवासाला पाठबळ देईल आणि हे राज्य देशाचे भवितव्य बदलण्यामध्ये आपली भूमिका बजावेल
Posted On:
03 OCT 2023 7:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगडमध्ये बस्तरच्या जगदलपूर येथे सुमारे 27,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांसहित बस्तर जिल्ह्यातील नागरनार येथील एनएमडीसी स्टील लिमिटेडच्या 23,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या स्टील प्लांटच्या लोकार्पणाचा समावेश आहे.यावेळी त्यांनी तारुकी-रायपूर डेमू ट्रेनला देखील झेंडा दाखवून रवाना केले.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की देशातील प्रत्येक राज्य, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक गाव विकसित होईल तेव्हाच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. या संकल्पांची पूर्तता करण्यासाठी आज 27,000 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले आणि छत्तीसगडच्या जनतेचे या विकास प्रकल्पांबद्दल अभिनंदन केले. विकसित भारतासाठी भौतिक, सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधा भविष्यातील गरजांनुरुप असल्या पाहिजेत, असे पंतप्रधान म्हणाले. यावर्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी 10 लाख कोटी रुपयांची म्हणजे सहा पट जास्त तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
रेल्वे, रस्ते, विमानतळ, ऊर्जा प्रकल्प, वाहतूक, गरीबांसाठी घरे आणि शैक्षणिक आणि आरोग्य संस्थांच्या उभारणीत पोलादाचे महत्त्व अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की गेल्या 9 वर्षात पोलाद क्षेत्रात देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली. “मोठे पोलाद उत्पादक राज्य असल्याचा फायदा छत्तीसगडला होत आहे,” असे पंतप्रधानांनी आज देशातील सर्वात आधुनिक पोलाद प्रकल्पांपैकी एक असलेल्या नागरनारमधील प्रकल्पाच्या उद्घाटनाचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले. या कारखान्यात तयार होणाऱ्या पोलादामुळे स्वयंचलित वाहन उद्योग, अभियांत्रिकी आणि संरक्षण उत्पादन क्षेत्रांना नवी ऊर्जा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“बस्तरमध्ये उत्पादित पोलादामुळे संरक्षण उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळण्याबरोबरच संरक्षण दलांना देखील बळकटी मिळेल,” असे मोदी म्हणाले.या पोलाद कारखान्यामुळे बस्तर आणि जवळच्या भागातील सुमारे 50,000 युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे त्यांनी अधोरेखित केले. “ नव्या पोलाद प्रकल्पामुळे बस्तर सारख्या आकांक्षी जिल्ह्यांच्या विकासाला केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या प्राधान्याला गती मिळेल, असे त्यांनी सांगितले. कनेक्टिविटीवर सरकारचा भर असल्याचा संदर्भ देत पंतप्रधानांनी छत्तीसगडमधील आर्थिक मार्गिका आणि आधुनिक महामार्गांचा उल्लेख केला. 2014 च्या तुलनेत छत्तीसगडसाठीच्या रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये 20 पट वाढ झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतर तारुकीला नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. देशातील रेल्वेच्या नकाशावर तारूकीला डेमू ट्रेनने जोडण्यात आले आहे, ज्यामुळे राजधानी रायपूरला जाणेयेणे सोपे होणार आहे. जगदलपूर आणि दंतेवाडा दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पामुळे ल़ॉजिस्टिक्स खर्चात कपात होईल आणि प्रवास सोपा होईल.
छत्तीसगडमधील रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाचे काम 100% पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी संतोष व्यक्त केला.'वंदे भारत' रेल्वेगाडीही या राज्यातून धावत आहे. “अमृत भारत रेल्वेस्थानक योजनेंतर्गत छत्तीसगडमधील 30 हून अधिक स्थानकांचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहेत. त्यापैकी 7 स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी झाली आहे. बिलासपूर, रायपूर आणि दुर्ग या स्थानकांसोबतच,आज जगदलपूर स्थानकाचा या यादीत समावेश करण्यात आला.पंतप्रधान म्हणाले,“येत्या काही दिवसांत जगदलपूर स्थानक हे शहराचे प्रमुख केंद्र बनेल आणि येथील प्रवासी सुविधांचे देखील नूतनीकरण करण्यात येईल. गेल्या नऊ वर्षांत राज्यातील 120 हून अधिक स्थानकांवर मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे,’असेही त्यांनी यावेळी सांगितले.
“आजचे प्रकल्प, विकासाची गती वाढवतील,नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करतील आणि राज्यात नवीन उद्योगांना प्रोत्साहन देतील, असे सांगत,छत्तीसगडमधील लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे”, हे पंतप्रधान मोदी यांनी अधोरेखित केले.
छत्तीसगडच्या विकासाच्या प्रवासात सरकार आपला पाठिंबा कायम ठेवेल आणि हे राज्य देशाचे भाग्य बदलण्यात आपली भूमिका उत्तम प्रकारे बजावेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना दिले.
छत्तीसगडचे राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन यांनी या प्रसंगी राज्याचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल आणि राज्याच्या विकासाचा विचार केल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे यावेळी आभार मानले.
छत्तीसगडचे राज्यपाल श्री विश्वभूषण हरिचंदन आणि खासदार श्री मोहन मांडवी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
आत्मनिर्भर भारताच्या उद्दिष्टांची गती वाढविण्यातील, एक पाऊल म्हणून, पंतप्रधानांनी बस्तर जिल्ह्यातील नगरनार येथील एनएमडीसी(NMDC) स्टील लिमिटेडचा पोलाद प्रकल्प राष्ट्राला समर्पित केला. 23,800 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेला, हा पोलाद प्रकल्प एक हरीतक्षेत्र प्रकल्प आहे,ज्यातून उच्च दर्जाचे पोलाद निर्माण केले जाईल. एनएमडीसी स्टील लिमिटेडचा नगरनार येथील पोलाद प्रकल्पामुळे हजारो लोकांना या प्रकल्पात तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या सहायक उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. हा प्रकल्प बस्तरला जगाच्या पोलाद नकाशावर आणेल आणि या क्षेत्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देईल.
देशभरातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीनुसार, अनेक रेल्वे प्रकल्पांचे पायाभरणी समारंभ या कार्यक्रमादरम्यान साजरे झाले आणि ते प्रकल्प राष्ट्राला समर्पित करण्यात आले. पंतप्रधानांनी अंतागड ते तारोकी दरम्यानचा नवीन रेल्वे मार्ग आणि जगदलपूर आणि दंतेवाडा दरम्यानचा दुहेरी रेल्वे मार्ग हे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले. त्याचप्रमाणे त्यांनी अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत बोरीदंड-सूरजपूर रेल्वे मार्ग दुहेरीकरण प्रकल्प आणि जगदलपूर स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. तारोकी-रायपूर डेमू रेल्वेसेवेलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. या रेल्वे प्रकल्पांमुळे राज्यातील आदिवासी भागातील संपर्क वाढेल. सुधारित रेल्वे पायाभूत सुविधा आणि नव्याने सुरू झालेल्या रेल्वेसेवेचा स्थानिक लोकांना लाभ होईल आणि या प्रदेशाच्या आर्थिक विकासाला मदत होईल.
पंतप्रधानांनी ‘कुंकुरी ते छत्तीसगड – झारखंड बॉर्डर सेक्शन’ राष्ट्रीय महामार्ग – 43 चा हा रस्ता सुधारणा प्रकल्पही राष्ट्राला समर्पित केला. या नवीन रस्त्यामुळे या भागातील दळणवळण वाढून लोकांना लाभ होणार आहे.
सामाजिक-आर्थिक विकास आणि लोकांसाठी 'जीवन सुलभता' वाढवणे हा ज्याचा उद्देश आहे त्या जगदलपूरमधील अनेक प्रकल्पांचेसाठी समर्पण आणि पायाभरणी पहाण्यासाठी पुढील लिंकला भेट द्या.
https://t.co/7BtXzz4q1e
NM/JPS/Shailesh P/Sampada/PM
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1963802)
Visitor Counter : 106
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam