पंतप्रधान कार्यालय

जी20 शिखर संमेलनातील पंतप्रधानांचे प्रारंभिक निवेदन

Posted On: 09 SEP 2023 12:00PM by PIB Mumbai

 

महामहिम

सन्माननीय अतिथीगण

नमस्कार!

औपचारिक कारवाई सुरू करण्यापूर्वी, आपल्या सर्वांच्या वतीने काही वेळापूर्वी मोरोक्कोमध्ये आलेल्या भूकंपामुळे प्रभावित लोकांप्रती मनापासून सहवेदना व्यक्त करू इच्छितो.

सर्व जखमी लोक लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो. या कठीण काळात संपूर्ण जागतिक समुदाय मोरोक्कोसोबत आहे आणि आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहोत.

 

महामहिम

सन्माननीय अतिथीगण

जी-20 चा अध्यक्ष म्हणून भारत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. सध्या आपण ज्या ठिकाणी जमलो आहोत तिथून काही किलोमीटर अंतरावर सुमारे अडीच हजार वर्षे जुना स्तंभ आहे.

या स्तंभावर प्राकृत भाषेत लिहिले आहे-

"हेवम लोकसा हितमुखे ति,

अथ इयम नातिसु हेवम

अर्थात,

मानवतेचे कल्याण आणि सुख सदैव सुनिश्चित केले जावे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीने संपूर्ण जगाला हा संदेश दिला होता. चला, या संदेशाचे स्मरण करत, या जी-20 शिखर संमेलनाचा आपण शुभारंभ करुया. एकवीसाव्या शतकाचा हा काळ, संपूर्ण जगाला नवी दिशा देणारा एक महत्वपूर्ण काळ आहे. हा तो काळ आहे जेव्हा, अनेक वर्षांपासूनची जुनी आव्हाने आपल्याकडून नवीन उपाय मागत आहे आणि यासाठी आपल्याला मानवकेन्द्री दृष्टिकोनसह आपले दायित्व पार पाडत पुढे जायचे आहे.

 

मित्रांनो,

कोविड-19 नंतर विश्‍वासाच्या अभावाचे मोठे संकट जगावर आले आहे. युद्धामुळे हा विश्वासाचा अभाव अधिकच वाढला आहे. आपण कोविडला पराभूत करू शकतो, तर आपण परस्पर विश्वासाच्या या संकटावरही मात करू शकतो.

आज, G-20 चे अध्यक्ष या नात्याने, भारत सर्व जगाला आवाहन करतो की, प्रथम या जागतिक विश्वासाच्या अभावाचे रूपांतर एका विश्वासात आणि एका आत्मविश्वासात करुया. आपण सर्वांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

आणि म्हणूनच, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मंत्र आपल्या सर्वांसाठी पथदर्शक बनू शकतो.

जागतिक अर्थव्यवस्थेतील उलथापालथ असो, उत्तर आणि दक्षिणे मध्ये विभागणी असो, पूर्व आणि पश्चिम मध्ये अंतर असो, अन्न, इंधन आणि खते यांचे व्यवस्थापन असो. दहशतवाद आणि सायबर सुरक्षा, आरोग्य, ऊर्जा आणि जलसुरक्षा असो, वर्तमान आणि भावी पिढ्यांच्या फायद्यासाठी, आपण या आव्हानांवर ठोस उपायांच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

 

मित्रांनो,

भारताचे जी-20 अध्यक्षपद हे देशात आणि देशाबाहेर समावेशकतेचे "सबका साथ" चे प्रतीक बनले आहे. भारतात हे लोकांचे जी-20 बनले आहे. कोट्यवधी भारतीय यात सहभागी झाले आहेत. देशातील 60 हून अधिक शहरांमध्ये  200 हून अधिक बैठका झाल्या आहेत.

भारताने, सबका साथच्या भावनेतूनच आफ्रिकन महासंघाला जी-20 चे स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मला विश्वास आहे की आपण सर्वजण या प्रस्तावावर सहमत आहोत.

आपल्या सर्वांच्या सहमतीने, पुढील कारवाई सुरु करण्या पूर्वी, मी आफ्रिकन महासंघाच्या अध्यक्षांना जी-20 चे स्थायी सदस्य म्हणून आपले स्थान ग्रहण करण्यासाठी आमंत्रित करतो.

***

S.Pophale/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955777) Visitor Counter : 175