आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 ची सद्यःस्थिती आणि तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांनी आयोजित केली उच्च स्तरीय बैठक
Posted On:
21 AUG 2023 9:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2023
जगभरात आढळून आलेल्या SARS-CoV-2 विषाणूच्या उत्परिवर्तनाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा यांनी कोविड-19 ची जागतिक आणि देशांतर्गत परिस्थिती, नवीन उत्परिवर्तित विषाणूचा प्रादुर्भाव आणि सार्वजनिक आरोग्यावरील त्याचा परिणाम, याचा आढावा घेण्यासाठी एक उच्च स्तरीय बैठक आयोजित केली होती.
सचिवांनी (आरोग्य), जगभरात आढळून आलेल्या BA.2.86 (पिरोला) आणि EG.5 (इरीस) या SARS-CoV-2 विषाणूच्या उत्परिवर्तित प्रकारांसह जगभरातील कोविड-19 बाबतच्या परिस्थितीची माहिती दिली. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार EG.5 (इरीस) या उत्परिवर्तित विषाणूचा जगातील 50 देशांमध्ये, तर BA.2.86 (पिरोला) चा चार देशांमध्ये प्रादुर्भाव नोंदवण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
जागतिक स्तरावर गेल्या 7 दिवसांमध्ये कोविड-19 च्या एकूण 2,96,219 नवीन रुग्णांची नोंद झाली, मात्र जागतिक लोकसंख्येमध्ये जवळजवळ 17% वाटा असलेल्या भारतात गेल्या आठवड्यात कोविड-19 च्या केवळ 223 (जगातील एकूण नवीन रुग्णांच्या 0.075%) नव्या रुग्णांची नोंद झाली, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते पुढे म्हणाले की, देशाची कोविड-19 च्या नव्या रुग्णांची दैनंदिन सरासरी 50 पेक्षा कमी आहे, आणि कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा साप्ताहिक दर 0.2% पेक्षा कमी राखण्यामध्ये आपण यश मिळवले आहे. भारतात प्रादुर्भाव असलेल्या कोविड विषाणूच्या विविध उत्परिवर्तित प्रकारांच्या जनुकीय क्रमनिर्धारणाचा देखील यावेळी आढावा घेण्यात आला.
सविस्तर चर्चेनंतर डॉ. पीके मिश्रा यांनी यावर भर दिला, की देशातील कोविड-19 ची परिस्थिती स्थिर आहे, आणि देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सज्ज आहे, अशा वेळी राज्यांनी ILI/SARI च्या स्थितीकडे लक्ष ठेवून, जनुकीय क्रमनिर्धारणाच्या कामाला गती द्यावी, जगात आढळून येणाऱ्या विषाणूच्या नवीन प्रकारांकडे लक्ष ठेवावे आणि कोविड-19 च्या चाचणीसाठी पुरेसे नमुने पाठवावेत.
* * *
N.Chitale/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1950934)
Visitor Counter : 168
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam