मंत्रिमंडळ

वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रात भारत आणि सुरिनाम या दोन देशांमधील झालेला सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

Posted On: 16 AUG 2023 6:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑगस्ट 2023

 

वैद्यकीय उत्पादने नियमन क्षेत्रातील सहकार्यासाठी, भारत आणि सुरिनाम या दोन देशांमध्ये झालेला सामंजस्य करार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडण्यात आला आणि मंत्रिमंडळाने तो मंजूर केला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन ही केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्था आणि सुरिनामचे आरोग्य मंत्रालय यांनी, भारताच्या राष्ट्रपतींच्या सुरिनाम दौऱ्यात 4 जून 2023 रोजी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या.

वैद्यकीय उत्पादने आणि इतर संबंधित बाबींशी निगडित कायदे आणि नियम, याबाबत दोन्ही देशांमध्ये विधायक सुसंवाद घडावा हा या करारामागचा उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या आणि मापदंड यांना अनुसरून वैद्यकीय उत्पादनांच्या नियमनाबाबत मुद्द्यांवर, भारताची केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्था आणि सुरिनामचे आरोग्य मंत्रालय यांच्यात माहितीची देवाणघेवाण आणि परिणामकारक सहकार्य घडवून आणण्यासाठी एक आराखडा निर्माण करणे हा या करारातील एक मुद्दा आहे.

दोन्ही देशांच्या नियामक प्राधिकरणांमधील सहकार्याची प्रमुख क्षेत्रे खालील प्रमाणे आहेत:

  1. एकमेकांचे नियामक आराखडे, गरजा आणि कार्यपद्धती समजून घेण्याला चालना देणे आणि दोन्ही बाजुंचे भविष्यातील नियमन बळकटीकरण उपक्रम सहजपणे राबवणे.
  2. प्रयोगशाळांमधून वापरल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या चांगल्या पद्धती, चांगल्या वैद्यकीय पद्धती, चांगल्या उत्पादन प्रक्रिया आणि औषधनिर्मिती बाबत दक्षता वाढवण्यासाठीच्या चांगल्या पद्धती यांची देवाणघेवाण करणे
  3. भारतीय औषधे, त्यांची माहिती यांना मान्यता देणे
  4. औषधनिर्मिती बाबत दक्षता आणि एकमेकांना सुरक्षा विषयक प्रतिकूल ठरू शकणारे मुद्दे, यांचा समावेश असलेल्या सुरक्षा विषयक माहितीची देवाणघेवाण. या माहितीमध्ये औषधे आणि औषध विषयक उपकरणे यांच्या सुरक्षिततेचाही समावेश होतो.
  5. दोन्ही देशांनी आयोजित केलेल्या, वैज्ञानिक आणि प्रात्यक्षिक सादरीकरण विषयक परिषदा, परिसंवाद, चर्चासत्रे आणि वेगवेगळे मंच यांच्यामध्ये सहभाग
  6. परस्पर सहमतीच्या क्षेत्रांमध्ये क्षमता निर्मिती
  7. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर समन्वय
  8. परस्पर हिताची सामायिक क्षेत्रे

परकीय चलन मिळवून देणाऱ्या वैद्यकीय उत्पादनांची निर्यात करणे, या करारामुळे सोपे होईल. हे, आत्मनिर्भर भारत घडवण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल ठरेल.

दोन्ही देशांच्या नियामक पद्धतींच्या परस्पर उपयोगामुळे, भारतातून औषधांची निर्यात वाढण्यात मदत होऊ शकते आणि परिणामी औषध निर्मिती क्षेत्रातील प्रशिक्षित व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

औषध निर्मितीसाठीचा कच्चा माल, जैविक उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि सौंदर्य प्रसाधने यासह औषधां संदर्भातील वैद्यकीय उत्पादनांचे नियमन अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे, दोन्ही देशांच्या नियामक प्राधिकरणांमध्ये स्वाक्षरी झालेल्या या सामंजस्य करारामुळे, सुलभ होईल.

दोन्ही देशांच्या अधिकार कक्षेत सामावणाऱ्या, वैद्यकीय उत्पादने आणि संबंधित प्रशासकीय तसेच नियमन विषयक मुद्द्यांच्या संदर्भातील क्षेत्रांमध्ये, माहिती आणि सहकार्याची देवाणघेवाण करण्याला, हा करार चालना देईल.

 

* * *

S.Thakur/A.Save/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1949627) Visitor Counter : 89