पंतप्रधान कार्यालय

77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 15 AUG 2023 11:29AM by PIB Mumbai

माझ्या प्रिय 140 कोटी कुटुंबीयांनो....,

जगातील सर्वात मोठी लोकशाही, आणि आता अनेकांचे असे म्हणणे आहे की लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून देखील आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. इतका मोठा विशाल देश, 140 कोटी लोकांचा देश, हे माझे बंधू-भगिनी, माझे कुटुंबीय, आज स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत आहेत. मी देशाच्या कोटी कोटी लोकांना, देश आणि जगातील भारतावर प्रेम करणाऱ्या, भारताचा सन्मान करणाऱ्या, भारताचा गौरव करणाऱ्या  कोटी कोटी व्यक्तींना मी स्वातंत्र्याच्या या महान सोहोळ्याच्या अनेकानेक शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

पूज्य बापुजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन, सत्याग्रहाची चळवळ आणि भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांच्यासारख्या असंख्य वीरांचे बलिदान. त्या पिढीत क्वचितच अशी एखादी व्यक्ती असेल जिने देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत स्वतःचे योगदान दिले नसेल. देशाच्या स्वातंत्र्य युद्धात ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे, बलिदान दिले आहे, त्याग केला आहे, तपस्या केली आहे त्या सगळ्यांना मी आज आदरपूर्वक प्रणाम करतो, त्यांचे अभिनंदन करतो.

आज 15 ऑगस्टला, महान क्रांतिकारक आणि अध्यात्म जीवनातील ऋषीतुल्य प्रणेता श्री अरविंदो यांची दीडशेवी जयंती पूर्ण होत आहे. हे वर्ष स्वामी दयानंद सरस्वती यांच्या दीडशेव्या जयंतीचे वर्ष आहे, हे वर्ष राणी दुर्गावती यांच्या 500 व्या जयंतीचे अत्यंत पवित्र वर्ष आहे आणि हे वर्ष संपूर्ण देश अत्यंत उत्साहाने साजरे करणार आहे. हे वर्ष, भक्तीयोगाची सर्वश्रेष्ठ संत मीराबाई यांच्या पाचशे पंचविसाव्या वर्षाचे पवित्र पर्व आहे.

या वर्षी जो 26 जानेवारीचा दिवस आम्ही साजरा करणार आहोत, तो आपल्या प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापनदिन असेल. अनेक प्रकारचे, अनेक प्रसंग, अनेक शक्यता, राष्ट्राच्या उभारणीत एकजुटीने काम करत राहण्यासाठी प्रत्येक क्षणी नवी प्रेरणा, दर क्षणी नवी चेतना, प्रत्येक क्षणी स्वप्ने, प्रत्येक क्षणी निश्चय करण्यासाठी बहुधा याहून मोठा दुसरा कोणताच प्रसंग नसेल.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

या वेळी नैसर्गिक संकटांनी देशाच्या अनेक भागांमध्ये अकल्पनीय संकटे कोसळली. ज्या कुटुंबांना ही संकटे सहन करावी लागली त्या सर्व कुटुंबियांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. आणि राज्य तसेच केंद्र सरकार एकत्रितपणे त्या सर्व संकटांवर लवकरात लवकर मात करून जलदगतीने पुढील वाटचाल करतील असा विश्वास मी व्यक्त करतो.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

गेल्या काही आठवड्यांमध्ये ईशान्य भारतात, विशेषतः मणिपुरमध्ये आणि हिंदुस्तानच्या इतर काही भागांमध्ये देखील, पण खासकरून मणिपुरमध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या, अनेकांना त्यांचे जीव गमवावे लागले, माता-भगिनींच्या सन्मानाची हेळसांड झाली. मात्र आता काही दिवसांपासून तेथे शांतता प्रस्थापित झाल्याच्या बातम्या सतत येत आहेत. देश मणिपूरच्या जनतेच्या सोबत आहे, देश मणिपूरच्या लोकांना गेल्या काही दिवसांत जी शांतता प्रस्थापित झाली आहे तेच वातावरण कायम ठेवत पुढे जाण्यासाठी आवाहन करत आहे की शांतीनेच समस्येवर उपाय सापडेल, राज्य आणि केंद्र सरकार मिळून समस्येवर उपाय शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत, करत राहतील.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

जेव्हा आपण इतिहासाकडे नजर टाकतो, तेव्हा आपल्याला दिसते की इतिहासात असे अनेक क्षण येतात जे स्वतःची अमिट छाप सोडून जातात आणि त्याचा प्रभाव अनेक युगांपर्यंत राहतो. आणि कधीकधी सुरुवातीला हा प्रभाव कमी वाटतो. ती छोटीशी घटना आहे असे वाटते. पण ती घटना अनेक समस्यांचे मूळ बनून राहते. आपल्याला आठवते की हजार-बाराशे वर्षांपूर्वी, या देशावर आक्रमण झाले, एका छोट्याश्या राज्याच्या छोट्या राजाचा पराभव झाला मात्र आपल्याला हे माहितच नव्हते की ही एक घटना भारताला हजार वर्षांच्या गुलामीमध्ये जखडून टाकणार आहे. त्यानंतर आपण गुलामीत अधिकाधिक अडकत गेलो, जखडत गेलो. जो परदेशी देशात आला त्याने आपल्याला लुटले, ज्याच्या मनात आले तो आपल्या डोक्यावर येऊन बसला. किती भयानक कालखंड असेल त्या हजार वर्षांचा.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

घटना कितीही लहान असली तरी हजार वर्षांवर ती प्रभाव पाडू शकते. मात्र मी आज याचा उल्लेख अशासाठी करू इच्छितो की, या कालखंडात, कोणताही प्रदेश असा नव्हता अशी वेळ नव्हती की जेव्हा भारताच्या वीरांनी देशाच्या स्वातंत्र्य संघर्षाची ज्योत तेवत ठेवली नाही, बलिदानाची परंपरा सुरु ठेवली नाही. गुलामीच्या बेड्यांमधून मुक्त होण्यासाठी भारतमाता उठून उभी राहिली होती, झडझडून प्रयत्न करत होती आणि देशाची नारीशक्ती, देशाची युवाशक्ती, देशातील शेतकरी, गावातील लोक, कामगार, कोणीही हिंदुस्तानी असा नव्हता जो स्वातंत्र्याची स्वप्ने बघत जगत नसेल, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्राणार्पण करण्याची तयार असणाऱ्यांची एक मोठी फौजच तयार झाली होती. तुरुंगांमध्ये तारुण्य व्यतीत करणारे अनेक महापुरुष आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी प्रयत्नशील होते. 

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

लोकचेतनेचे ते व्यापक रूप, त्याग आणि तपस्येचे ते व्यापक स्वरूप लोकांमध्ये एक नवा विश्वास निर्माण करणारे ते क्षण होते. अखेरीस 1947 साली देश स्वतंत्र झाला. हजार वर्ष जपलेली देशवासीयांची स्वातंत्र्याची स्वप्ने पूर्ण झाली.

मित्रांनो,

मी हजार वर्षांपूर्वीच्या घटनेची चर्चा अशासाठी करतो आहे, कारण मला दिसते आहे की, पुन्हा एकदा देशासमोर एक संधी आली आहे. आपण सर्वजण अशा काळात जगतो आहोत, अशा कालखंडात आपण प्रवेश केला आहे, आणि हे आपले सौभाग्य आहे की आपण भारताच्या अशा अमृतकाळात आहोत. अमृतकाळाचे हे पहिले वर्ष आहे, आत्ता आपण तारुण्यात जगतो आहोत किंवा आपण भारतमातेच्या उदरातून जन्म घेतला आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो, माझे हे शब्द लिहून ठेवा की या कालखंडात आपण जे काम करू, जी पावले उचलू, जितका त्याग करू, जेवढी तपस्या करू, ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ साठी एकामागून एक निर्णय घेऊ, त्यातून येणाऱ्या हजार वर्षांचा देशाचा सुवर्णमय इतिहास त्यातून अंकुरित होणार आहे. या कालखंडात होणाऱ्या घटनांचा प्रभाव आगामी एक हजार वर्षांच्या कालखंडावर पडणार आहे. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला देश पंचनिर्धारांप्रती समर्पित होऊन एकजुटीने आत्मविश्वासासह आज पुढे वाटचाल करतो आहे. नव्या निश्चयांची पूर्तता करण्यासाठी तो दृढतेने जीवापाड कार्य करत आहे. माझी भारतमाता, जिच्यात एकेकाळी उर्जेचे सामर्थ्य असूनही, ती राखेच्या ढिगाऱ्याखाली दबलेली होती, ती भारतमाता, 140 कोटी लोकांच्या पुरुषार्थामुळे, त्यांच्या चैतन्यामुळे, त्यांच्यातील ऊर्जेमुळे पुन्हा एकदा जागृत झाली आहे. भारतमाता जागृत झाली आहे. मला स्पष्टपणे दिसते आहे मित्रांनो, की हाच कालखंड आहे, गेली 9 -10 वर्षे आपण अनुभव घेतो आहोत. जगभरात भारताच्या चैतन्याप्रती, भारताच्या सामर्थ्याप्रती एक नवे आकर्षण, एक नवा विश्वास, नवी आशा निर्माण होत आहे. आणि भारतात निर्माण झालेल्या या प्रकाश पुंजात जगाला स्वतःसाठी एक ज्योत निर्माण झालेली दिसत आहे, जगाला एक नवा विश्वास वाटतो आहे. आपले हे सौभाग्य आहे की अशा काही गोष्टी आपल्याकडे आहेत की ज्या पूर्वजांनी आपल्याला वारशात दिल्या आहेत आणि वर्तमानकाळाने त्या रुजवल्या आहेत. आज आपल्याकडे लोकसंख्येचे बळ आहे, आज आपल्याकडे लोकशाही आहे, आज आपल्याकडे वैविध्यता आहे. लोकसंख्याबळ, लोकशाही आणि वैविध्यतेच्या या त्रिसूत्रीमध्ये भारताचे प्रत्येक स्वप्न साकार करण्याची क्षमता आहे. आज संपूर्ण जगात अनेक देशांचे वय वाढलेले आहे, वृद्धत्वाच्या काठावर आहे, तेव्हा आपला भारत तरुणांप्रमाणे उर्जेसह प्रगती करतो आहे. किती गौरवाची गोष्ट आहे ही, की,आज 30 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील सर्वाधिक लोकसंख्या जगात कुठे असेल तर ती माझ्या भारतमातेत आहे, माझ्या देशात आहे. आणि 30 वर्षांपेक्षा कमी वर्षांचे नवतरुण माझ्या देशात असतील, कोटीकोटी बाहूंचे बळ असेल, कोटीकोटी मेंदू असतील कोटीकोटी स्वप्ने आणि कोटीकोटी निश्चय असतील तेव्हा बंधू भगिनींनो, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, अशावेळी आपण इच्छित परिणाम मिळवून दाखवू शकतो.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

अशा घटना देशाचे भाग्य बदलून टाकतात. हे सामर्थ्य देशाचे भाग्य बदलून टाकते. भारत एक हजार वर्षांची गुलामी आणि आगामी एक हजार वर्षांच्या भवितव्याच्या मधोमध असलेल्या स्थानी आत्ता आपण उभे आहोत. एका उत्तम संधीसह आपण उभे आहोत. आणि म्हणून आपण थांबायचे नाही, द्विधावस्थेत जगायचे नाही. 

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आपल्याला आपल्या विसरलेल्या वारशाचा अभिमान बाळगून, हरवलेली समृद्धी पुन्हा प्राप्त करून आपल्याला पुन्हा एकदा, आणि ही गोष्ट मनात बाळगा की, जे काही आपण करू, जी पावले उचलू, जे निर्णय घेऊ, ते येणाऱ्या एक हजार वर्षांपर्यंतची आपली दिशा निश्चित करणार आहे. भारताचे भाग्य लिहिणार आहे. आज माझ्या देशातील युवकांना, माझ्या देशातील मुलामुलींना मी हे जरुर सांगू इच्छितो की, जे भाग्य आजच्या माझ्या युवावर्गाला मिळाले आहे, असे भाग्य क्वचितच कोणाच्या नशिबी असते, ते भाग्य तुम्हाला मिळाले आहे. आणि म्हणूनच आपल्याला ही संधी दवडायची नाही, युवाशक्तीवर माझा विश्वास आहे, युवाशक्तीमध्ये सामर्थ्य आहे आणि आपली धोरणे, आपल्या पद्धती देखील या युवा सामर्थ्याला अधिक मजबूत करण्यासाठी सक्षम आहेत. आज माझ्या देशातील तरुणांनी जगातील पहिल्या तीन स्टार्ट अप परिसंस्थांमध्ये भारताला स्थान मिळवून दिले आहे.जगभरातील युवा वर्गाला आश्चर्य वाटू लागलंय, भारताचं या सामर्थ्यामुळे, भारताची ही ताकद पाहून.

आज जग टेक्नॉलॉजी ड्रिव्हन आहे. आणि या पुढच्या काळावरही तंत्रज्ञानाचा प्रभाव असणार आहे. आणि त्यावेळी तंत्रज्ञानातलं भारताचं जे कौशल्य आहे, त्याची एक नवी भूमिका असणार आहे.

सहकाऱ्यांनो,

मी मागे जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी बाली इथे गेलो होतो.

आणि बाली इथे जगातील समृद्ध समृद्ध देश, जगातील विकसीत देश सुद्धा, या देशांचे प्रमुख माझ्याकडून भारताच्या डिजीटल इंडियाच्या यशाबद्दल अगदी बारकाईने समजून घ्यायला उत्सुक होते. प्रत्येक जण याबद्दल प्रश्न विचारत होते. आणि जेव्हा मी त्यांना सांगायचो की, भारताने जी ही कमाल करून दाखवली आहे ती दिल्ली, मुंबई, चेन्नई पुरतीच मर्यादीत नाही आहे.

भारताने जी ही कमाल करून दाखवली आहे, माझ्या देशाच्या टियर टू, टियर थ्री श्रेणीत येणाऱ्या शहरांमधला युवा वर्ग देखील आज माझ्या देशाचं भवितव्य घडवत आहे. छोट्या छोट्या ठिकाणचा माझ्या देशाचा युवा वर्ग.

आणि आज मी अत्यंत विश्वासानं सांगू इच्छितो,

आज देशाचं हे जे नवं सामर्थ्य दिसून येतंय,

आणि त्यामुळेच मी म्हणतो, आपल्याकडची छोटी शहरं आकार आणि लोकसंख्येच्या बाबतीत छोटी असू शकतील. ही आपली छोटी छोटी शहरं, शहरांची ठिकाणं, आकार आणि लोकसंख्येच्या बाबतीत छोटी असू शकतील, पण आशा आणि आकांक्षा, प्रयत्न आणि प्रभावाच्या बाबतीत ते कोणाच्याही तुलनेत कमी नाहीत, ते सामर्थ्य त्यांच्यात आहे.

नवी अॅप, नव्या उपाययोजना, नवी तंत्रज्ञानाधारीत उपकरणं.

तुम्ही खेळाचं जग पाहा.

कोणती मुलं आहेत.

झोपड्यांमधून आलेली मुलं आज खेळाच्या जगात पराक्रम गाजवजत आहेत.

छोट्या छोट्या गावांमधले, छोट्या छोट्या शहरांमधला युवा, आपलीच मुलं मुली आज कमाल दाखवत आहेत.

तुम्ही पाहा, माझ्या देशातील किमान १०० अशा शाळा आहेत, ज्यातले विद्यार्थी उपग्रह तयार करून, उपग्रहांचे उड्डाण करण्याची तयारी करत आहेत.

आज हजारो टिंकरींग लॅबमधून नवे वैज्ञानिक जन्माला येत आहेत.  आज हजारो टिंकरींग लॅब लाखो मुलांना विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटेवरून मार्गाक्रमण करण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

मी माझ्या देशातल्या युवा वर्गाला सांगू इच्छितो.संधीची कमरतरता नाही आहे.

तुम्हाला जितक्या संधी हव्या आहेत, या देशाकडे आकाशही ठेंगणं पडेल  इतक्या संधी उपलब्ध देण्याचे सामर्थ्य आहे.

मी आज या लाल किल्ल्याच्या तटावरून, माझ्या देशाच्या माता भगिनी, माझ्या देशाच्या मुलींचं हृदयापासून अभिनंदन करू इच्छितो.   

देशाने आतापर्यंत जी मजल गाठली आहे, त्यात  खास शक्तीही आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. माझ्या माता आणि भगिनींच्या सामर्थ्याची.

आज देश प्रगतीच्या दिशेने मार्गाक्रमण करतो आहे, त्याबद्दल मी माझ्या शेतकरी बंधु भगिनींचे अभिनंदन करू इच्छितो. आपण दाखवलेल्या साहसामुळेच आपल्या पराक्रमामुळेच देश आज कृषी क्षेत्रात पुढे वाटचाल करू लागला आहे. मी माझ्या देशाच्या मजदूरांचे, माझ्या श्रमिकांचे, माझे प्रिय कुटुंबीय, अशा कोटी कोटी कामगारांना मी वंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो .

आज देश ज्या पद्धतीने आधुनिकतेच्या दिशेने वाटचाल करतो आहे, जगात इतरांशी तुलना करता येईल असं आपलं सामर्थ्य जाणवू लागलं आहे, त्यामागे माझ्या देशातल्या मजुरांचं, माझ्या देशातल्या श्रमीकांचं मोठं योगदान आहे. आणि आज ही काळाचीच मागणी आहे की, आज या लाल किल्ल्याच्या तटावरून मी त्यांचं अभिनंदन करावे , मी त्यांना अभिवादन करावे .

आणि हे माझे कुटुंबीय, १४० कोटी देशवासी, माझ्या या श्रमिकांचे, फेरीवाल्यांचा, फुलं भाज्या विकणाऱ्यांचा आम्ही सन्मान करतो.

माझ्या देशाला पुढे नेण्यात, माझ्या देशाला प्रगतीची नवी उंची गाठून देण्यात प्रोफेशनल्सची खूप मोठी भूमिका राहिली आहे, त्यांची भूमिका वाढतीच राहिली आहे. मग वैज्ञानिक असोत, की इंजिनिअर असोत, डॉक्टर असोत, नर्सेस असोत, शिक्षक असोत, आचार्य असोत, विद्यापीठे असोत, गुरुकुल असोत, प्रत्येक जण या भारत मातेचं उज्वल भविष्य घडवण्यासाठी पूर्ण ताकदिनीशी काम करत आहेत.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

राष्ट्रीयत्वाची जाणिव, हा एक असा शब्द आहे, जो आपल्याला समस्यांमधून मुक्त करत आहे.

आणि आज राष्ट्रीयत्वाची जाणिवेनं एक गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे, ती म्हणजे, भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरले आहे ते - विश्वास. भारताचे सर्वात मोठे सामर्थ्य ठरले आहे ते - विश्वास. प्रत्येक नागरिकांवरचा आमचा विश्वास, प्रत्येक नागरिकाचा सरकार विश्वास, प्रत्येक नागरिकाचा देशाच्या उज्वल भवितव्यावर विश्वास, आणि अवघ्या विश्वाचाही भारतावर असलेला विश्वास.

हा विश्वास आमच्या धोरणांचा आहे, आमच्या कार्यपद्धतीचा आहे, भारताच्या उज्वल भवितव्याच्या दिशेने आम्ही ज्या निर्धाराने मजबूत पावलं टाकत आहोत त्यावरचा आहे.

बंधु भगिनींनो , माझ्या प्रिय कुटुंबियांनो

एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे भारताचं सामर्थ्य आणि भारताकडे असलेल्या संधी या विश्वासाची नवी मर्यादा ओलांडणार आहे. आणि विश्वासाच्या नव्या उंचीवर देश नव्या सामर्थ्यासह वाटचाल करत आहेत.

आज देशात जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी आलेल्यांचा पाहुणचार करायची संधी भारताला मिळाली आहे. आणि मागच्या एक वर्षभरापासून हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या प्रकारे जी ट्वेंटी अंतर्गत अनेक प्रकारचं आयोजन केलं गेलं आहे, अनेक कार्यक्रम झाले आहेत, त्यातून देशातल्या सामान्य नागरिकांच्या सामर्थ्याची ओळख जगाला करून दिली. भारताच्या विविधतेची ओळख करून दिली. भारताच्या विविधतेकडे जग आश्चर्याने पाहतं आहे. आणि त्यामुळेच त्यांचं भारताप्रती आकर्षण वाढलं आहे. भारताविषयी जाणून घेण्याची, समजून घेण्याची इच्छा जागृत झाली आहे.

त्याचप्रकारे, आपण देशीची निर्यात पाहा,

आज भारताची निर्यात वेगाने वाढते आहे, आणि मी सांगू इच्छितो की, जगभरातले तज्ञ, या सर्व मानकांच्या आधारे बोलत आहेत की, आता भारत थांबणारा नाही. जगातली कोणतीही मानांकन देणारी यंत्रणा असू दे, ती भारताचा गौरवच करत आहे.

कोरोनानंतरच्या काळात जग नव्याने विचार करू लागलंय. आणि मला अगदी विश्वासानं दिसतं आहे की, ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धानंतर, दुसऱ्या महायुद्धानंतर, जगात एक नवीच जागतिक व्यवस्था आकाराला आली होती, मी अगदी ठळकपणे पाहतोय की, कोरोना नंतर एक नवी जागतिक व्यवस्था, एक नवी जागतिक व्यवस्था, एक नवं भूराजकीय समीकरण, अगदी वेगानं आकार घेऊ लागलं आहे. भूराजकीय समीकरणाची सर्व व्याख्या, परिभाषा बदलू लागल्या आहेत.

आणि माझ्या प्रिय कुटुंबियांनो, याचा आपल्याला अभिमान वाटेल की, या बदलत्या जगाला आकार देण्यात, माझ्या देशाचे १४० कोटी नागरिकांनो, तुमचं सामर्थ्य दिसून येतंय, तुम्ही एका निर्णायक वळणार उभे आहात.

आणि कोरोना काळात भारतानं ज्या पद्धतीनं देशाची वाटचाल सुरू ठेवली, त्यातून जगाला भारताचं सामर्थ्य अनुभवलं आहे.

जेव्हा जगभरातली पुरवठा साखळी उद्धस्त झाली होती. मोठ मोठ्या अर्थव्यवस्था संकटात होत्या, अशावेळी देखील आपण बोललो होतो की, जर आपल्याला जगाचा विकास करायचा असेल तर आपल्याला मानवकेंद्री दृष्टीकोन बाळगायला हवा, आपण मानवी संवेदनां महत्व देता आलं पाहीजे. तरच आपण आपल्या समस्यांवर योग्य उपाययोजना करू शकतो.

आणि कोविडने एक तर आपल्याला धडा दिला किंवा मजबूर केलं, मात्र मानवी संवेदनांना दूर सारून आपण जगाचं कल्याण नाही करू शकत.

आज भारत हा  ग्लोबल साऊथ अंतर्गत येत असलेल्या देशांचा आवाज झाला आहे. भारताची समृद्ध परंपरा, आज जगभरासाठी एक संधी म्हणून समोर आली आहे, जागतिक अर्थव्यवस्था, जागतिक पुरवठा साखळी, भारतासोबतची भागिदारी

मी अगदी आत्मविश्वासाने सांगतो की, आज जी देशाची स्थिती आहे, आज जे भारताने कमावले आहे, त्यातून जगात स्थिरता राहू शकेल याची सुनिश्चिती केली आहे मित्रांनो.

आता ना आपल्या मनात, ना माझ्या १४० कोटी जणांच्या कुटुंबियांच्या मनात, ना अवघ्या जगाच्या मनात, ना IF आहे, ना BUT आहे. विश्वास ठसलेला आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो आता चेंडू आपल्या कोर्टात आहे, आपल्याला ही संधी सोडून चालणार नाही, ही संधी आपण सोडताच कामा नये.

भारतात,

मी माझ्या देशवासीयांचे यासाठीही अभिनंदन करतो की, माझ्या देशवासीयांमध्ये सद्सदविवेकबुद्धीचंही सामर्थ्य आहे. समस्यांच्या मूळापर्यंत जाण्याचं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळेच २०१४ मध्ये माझ्या देशवासीयांनी, ३० वर्षांच्या आपल्या अनुभवावरून एक निर्णय घेतला की, देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर स्थिर सरकार हवं, मजबूत सरकार हवं, पूर्ण बहुमत असलेलं सरकार हवं. आणि मग देशवासियांनी एक मजबूत आणि स्थिर  सरकार बनवलं. आणि तीन दशकांचा जो अनिश्चिततेचा कालखंड होता, अस्थिरतेचा कालखंड होता, ज्या राजनैतिक मजबुरींच्या जोखडात देश अडकून पडला होता, त्यातून सुटका मिळाली.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो

देशाकडे आज एक असं सरकार आहे, ते सर्व जन सुखाय सर्व जन हिताय, देशाच्या समतोल विकासासाठी, वेळेचा अगदी क्षण अन क्षण आणि जनतेची पै अन पै, जनतेच्या भल्यासाठी कामी आणत आहे.

आणि माझा देश, माझं सरकार, माझ्या देशवासीयांचा सन्मान एका गोष्टीशी जोडलेला आहे. आमचे प्रत्येक निर्णय, आम्ही निवडलेली प्रत्येक दिशा, या सगळ्याचा मानदंड एकच आहे नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम.

आणि राष्ट्र प्रथम हाच दूरगामी परिणाम, सकारात्मक परिणाम घडवून आणणार आहे.

देशात मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत.

पण मी सांगू इच्छितो.

२०१४ मध्ये, आपण एक मजबूत सरकार बनवलंत,

आणि मी सांगू इच्छितो, २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये आपण सरकार फॉर्म केलंत, त्यामुळे मोदींनाही रिफॉर्म घडवून आणण्याची हिम्मत मिळाली.

आपण असं सरकार फॉर्म केलंत, की त्यामुळे मोदींना रिफॉर्म घडवून आणण्याची हिम्मत मिळाली.

आणि मग जेव्हा मोदींनी एकामागोमाग एक रिफॉर्म घडवून आणले, तेव्हा माझे नोकरशाहीतले लोग, लाखो हात पाय, जे हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात सरकारचेच एक अंग म्हणून काम करत आहेत, त्यांनी, नोकरशाहीने बदल घडवून आणण्यासाठी, काम करण्याची जबाबदारी अगदी नेटाने पार पाडली. आणि त्यांनी प्रत्यक्षात कामगिरी करून दाखवली. आणि जेव्हा या प्रक्रेयेत जनता जनार्दनही सोबत जोडली गेली तेव्हा बदल घडून येताना दिसू लागले आहेत. आणि त्यामुळेच रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्मचा हा काळ भारताचं भविष्य घडवत आहे. आणि आमचा विचार देशातल्या त्या क्षमतेला चालना देण्याचा आहे, ज्या येणाऱ्या एक हजार वर्षांसाठी आपला पाया मजबूत करू शकतील.

जगाला युवा शक्तीची युवा कौशल्याची गरज आहे. आम्ही नवं कौशल्य मंत्रालय निर्माण केलं. यातून भारताचीही गरज पूर्ण होईल तसंच जगाची गरज पूर्ण करण्याचीही क्षमता आपल्याकडे असेल.

आम्ही जलशक्ती मंत्रालयाचीही स्थापना केली. हे मंत्रालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेचं जर का कोणी विश्लेषण केलं तर या सरकारनं दाखवलेल्या बुद्धीकौशल्याला आपणही समजू शकाल.

आम्ही जलशक्ती मंत्रालयाच्या स्थापना केली

आपलं हे जलशक्ती मंत्रालय, आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पिण्याचं शुद्ध पाणी पोहचावं, पर्यावरण्याच्या संरक्षणासाठी पाण्याच्या बाबतीत संवेदनशील असणारी व्यवस्था निर्माण व्हावी त्यावर आम्ही भर देत आहोत.

आपल्या देशात,

कोरोनाच्या नंतर अवघं जग पाहतंय,

सर्वंकष आरोग्य व्यवस्था ही काळाची गरज झाली आहे. आम्ही वेगळं आयुष मंत्रालय स्थापन केलं. आज योग आणि आयुष जगात आपला ध्वज फडकावत आहेत.

आम्ही जगाला

आपल्या वचनबद्धतेमुळेच जगाचं लक्ष आपल्यावर केंद्रीत झालं आहे.

जर आपणच आपल्या सामर्थ्याला नाकारलं तर जग त्याला कसं स्विकारेल?

पण जेव्हा मंत्रालय स्थापन झालं, तेव्हा जगालाही त्याचं मूल्य लक्षात आलं.

मत्स्यपालन, आपल्या लाभलेला इतका लांब समुद्रकिनारा, आपले कोट्यवधी माच्छिमार बंधु भगिनी, त्यांचं कल्याणही आमच्या मनात आहेच. त्यामुळेच आम्ही वेगळा विचार करून, मत्स्यपालनासाठी, पशुपालनासाठी, डेअरीसाठी वेगळ्या मंत्रालयाची स्थापना केली. एवढ्यासाठीच की समाजातले जे लोक मागे पडलेत त्यांना आपण सोबत घेऊ शकू.

देशात सरकार अर्थव्यवस्थेची विविध अंग असतात, पण त्याचबरोबर सामाजिक अर्थव्यवस्थेचंही एक मोठं अंग आहे सहकारी चळवळ. त्याला बळ देण्यासाठी, या चळवळीत आधुनिकता आणण्यासाठी आणि देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकशाहीतल्या या घटकाला अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही स्वतंत्र सरकार मंत्रालय स्थापन केलं. आणि हे मंत्रालय आपल्या सहकारी संस्थांचं जाळ विस्तारत आहे. जेणेकरून गरिबातल्या गरिबाचा आवाज तिथे ऐकला जाऊ शकेल. त्याच्या गरजांची पूर्ती होऊ शकेल. आणि ते देखील देशाच्या विकासातलं आपलं योगदान म्हणून एक छोटासा घटक होत योगदान देऊ शकतील.

आम्ही, सहकारापासून समृद्धीचा मार्ग स्विकारला आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो जेव्हा आम्ही २०१४ मध्ये आलो होतो, तेव्हा आम्ही जागतिक अर्थव्यवस्थेत दहाव्या क्रमांकावर होतो.

आणि आज १४० कोटी देशवासियांचा अभिमान सार्थ ठरला आहे, आणि आपण जगातल्या पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.

आणि हे सहजच घडलेलं नाही,

जेव्हा भ्रष्टाचाराच्या राक्षसानं देशाला जखडून ठेवलं होतं,

लाखो करोडो रुपयांच्या घोटाळ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती.

प्रशासन, नाजूक विस्कटलेलं अशीच त्याची जगभरात ओळख झाली होती.

आम्ही गळती थांबवली

मजबूत अर्थव्यवस्था बनवली.

गरीब कल्याणासाठी जास्तीत आणि जास्त निधी खर्च करण्याचा आमचा प्रयत्न राहिला आणि आज मी देशवासियांना सांगू इच्छितो की देश जेव्हा आर्थिक दृष्ट्या समृद्ध  होतो,तेव्हा गंगाजळीत भर तर पडतेच त्याच बरोबर देशाचे सामर्थ्य वृद्धिंगत होते, देशवासीयांचे सामर्थ्य वाढते आणि तिजोरीतली पै आणि पै जर इमानदारीने  जनताजनार्दनासाठी खर्च करण्याचा संकल्प घेतलेले  सरकार असेल तर त्याचा प्रभाव कसा असेल ! मी दहा वर्षांचा हिशेब, तिरंगा  ध्वजाला साक्ष  ठेवून, लाल किल्याच्या तटावरून माझ्या देशवासियांना देत आहे.आपल्याला आकडे  पाहून वाटेल इतके मोठे परिवर्तन !इतके मोठे सामर्थ्य ! दहा वर्षांपूर्वी राज्यांना तीस लाख कोटी रुपये केंद्र सरकारकडून दिले जात असत. गेल्या नऊ वर्षात  हा आकडा शंभर लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

 पूर्वी स्थानिक विकासासाठी भारत  सरकारकडून 70 हजार कोटी  रुपये जात असत आज ही  रक्कम तीन लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्त झाली आहे. पूर्वी गरिबांच्या  घरांसाठी  नव्वद हजार कोटी रुपये खर्च केले जात होते. आज ही रक्कम चौपट होऊन चार लाख कोटी पेक्षाही जास्त रक्कम गरिबांसाठी घर उभारण्याकरिता खर्च केले जात आहेत. पूर्वी गरिबांना युरिया स्वस्त मिळावा, जी युरियाची थैली  जगभरातल्या  काही बाजारात तीन हजार रुपयांना विकली जाते ती युरियाची  थैली  माझ्या शेतकऱ्यांना तीनशे रुपयात मिळावी यासाठी देशाचे  सरकार दहा लाख कोटी रुपये,देशाच्या शेतकऱ्यांसाठी युरिया अनुदानापोटी देत आहे.मुद्रा योजना वीस लाख कोटी त्यापेक्षाही जास्त रक्कम माझ्या देशातल्या युवकांना स्व रोजगारासाठी, आपल्या  व्यवसायासाठी, आपला कारभार उभारण्यासाठी देण्यात आले आहेत.आठ कोटी लोकांनी नवा व्यवसाय सुरु केला आहे, आठ कोटी लोकांनी व्यवसाय सुरु केला आहे इतकेच नव्हे तर प्रत्येक व्यावसायिकाने एक किंवा दोन जणांना रोजगार पुरवला आहे. आठ- दहा कोटी लोकांना रोजगार देण्याचे सामर्थ्य या मुद्रा योजनेतून लाभ  घेणाऱ्या आठ कोटी नागरिकांचे राहिले आहे.सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योगांना सुमारे साडे तीन लाख कोटी रुपयांचे सहाय्य देत कोरोनाच्या संकट काळातही त्यांचा व्यवसाय बुडू दिला नाही, त्यांना तग धरता आला.  त्यांना बळ दिले.वन रॅन्क , वन पेन्शन माझ्या देशातल्या जवानांचा एक सन्मानाचा विषय होता.सत्तर हजार कोटी रुपये देशाच्या तिजोरीतून आज पोहोचले आहेत. माझ्या सैन्य दलातल्या निवृत्त नायकांकडे, त्यांच्या कुटुंबात पोहोचले आहेत. सर्व वर्गातल्या, मी काहीच वर्गांचा उल्लेख केला आहे, मी फार वेळ घेऊ इच्छित नाही. प्रत्येक वर्गात पूर्वीच्या तुलनेत अनेक पटीने निधी आम्ही देशाच्या विकासासाठी कानाकोपऱ्यात रोजगार निर्मितीसाठी, पै आणि पैचा उपयोग देशाचे भवितव्य घडवण्यासाठी व्हावा यासाठी आम्ही काम केले  आहे.  

माझ्या प्रियजनहो,

इतकेच नव्हे , आमच्या या सर्व प्रयत्नांचा परिणाम आहे,की आज पाच वर्षांच्या माझ्या एका कार्यकाळात, पाच वर्षांच्या कार्यकाळात , पाच वर्षात साडेतेरा कोटी माझ्या  गरीब बंधू-भगिनी ,गरिबीच्या श्रुंखला तोडत नव मध्यम वर्गाच्या रूपाने उभे राहिले आहेत. जीवनात यापेक्षा आनंददायी काही असूच  शकत नाही.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आणि जेव्हा साडे तेरा कोटी लोक गरिबीच्या खाईतून बाहेर येतात तेव्हा कोणकोणत्या योजनांनी त्यांना  सहाय्य केले आहे , त्यांना आवास योजनांचा लाभ प्राप्त होणे,पीएम स्वनिधी पासून पन्नास हजार कोटी रुपये फेरीवाल्यांपर्यंत पोहोचवले आहेत. येत्या  काही दिवसात येत्या  विश्वकर्मा जयंतीला आम्ही एक  कार्यक्रम अमलात आणणार आहोत.या विश्वकर्मा जयंतीला आम्ही सुमारे 13-15 हजार कोटी रुपयांच्या,हाताने परंपरागत कौशल्य काम करणारे लोक, जे आपल्या हत्यारे  आणि अवजारांच्या सहाय्याने काम करतात त्यांच्यासाठी जास्त करून इतर मागास वर्ग समुदायातले आहेत.आपले सुतार असोत, आपले सोनार असोत की आपले गवंडी असोत, आपले धोबी असोत, केश कर्तन करणारे आपले बंधू-भगिनी असोत,अशा वर्गाला एक नवी  ताकद देण्यासाठी आम्ही येत्या महिन्यामध्ये  विश्व कर्मा जयंतीला विश्व कर्म योजनेचा  प्रारंभ करणार आहोत.आणि सुमारे 13-15 हजार कोटी रुपयांनी त्याचा प्रारंभ करणार आहोत.आम्ही पीएम किसान सन्मान निधी मध्ये अडीच लाख कोटी रुपये माझ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केले आहेत. आम्ही जल जीवन मिशन,प्रत्येक घरामध्ये शुद्ध  पाणी पोहचवण्यासाठी दोन लाख कोटी रुपये खर्च केले आहेत.  आम्ही आयुष्मान भारत योजना, गरिबाला आजारपणामुळे रुग्णालयात दाखल होण्यासाठी जी पैशाची समस्या येत होती त्यातून गरिबाला मुक्त करण्यासाठी, त्याला औषधोपचार मिळावेत, आवश्यकता असल्यास त्याच्यावर शस्त्रक्रिया  व्हावी, उत्तम रुग्णालयात व्हावी, त्याला  आयुष्मान भारत योजने अंतर्गत 70 हजार कोटी रुपये आम्ही खर्च करत आहोत.पशुधन , देशाला  कोरोना  लसीकरण तर स्मरणात  आहे, 40 हजार कोटी रुपये खर्च केले ते तर लक्षात आहे मात्र आम्ही, आपल्याला हे ऐकून आनंद होईल की आम्ही पशुधन वाचवण्यासाठी  सुमारे 15 हजार कोटी रुपये पशुधनाच्या लसीकरणासाठी  उपयोगात आणले आहेत.  

माझ्या प्रिय देशबांधवानो, माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

जन औषधी केंद्रांनी, देशातल्या ज्येष्ठ नागरिकांना, देशाच्या मध्यम वर्गाला, एक नवे सामर्थ्य दिले आहे.एखाद्या एकत्र कुटुंबात एखाद्या सदस्याला मधुमेह झाल्यास औषधाचा खर्च सहज दोन-तीन हजार रुपयांवर जातो.जे औषध बाजारात शंभर रुपयांना मिळत होते ते औषध आम्ही जन औषधी केंद्राद्वारे    दहा रुपये,पंधरा रुपये वीस रुपयांमध्ये दिले आणि आज देशामध्ये एक हजार जन औषधी केंद्रांमधून, ज्यांना आजारपणात औषधांची आवश्यकता होती अशा लोकांची सुमारे 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे आणि यामध्ये बहुतांश मध्यम वर्गातले लोक आहेत, आज याचे यश पाहता  मी सांगू इच्छितो, आम्ही ज्याप्रमाणे विश्वकर्मा योजना आणून समाजातल्या एका वर्गाला मदतीचा हात देणार आहोत, आता  देशात दहा हजार जन औषधी केंद्रावरून  पंचवीस हजार  जन औषधी  केंद्रांचे लक्ष्य  घेऊन येत्या काळात आम्ही काम करणार आहोत.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

जेव्हा देशात गरिबी कमी होते,तेव्हा देशाच्या मध्यम वर्गाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढते.आणि जर जगाने आणि मी आपल्याला विश्वास देतो की येत्या पाच वर्षात मोदी यांची हमी आहे की देश जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये  स्थान मिळवेल, खात्रीने स्थान मिळवेल आज जे साडेतेरा कोटी लोक दारिद्र्यातून बाहेर आले आहेत,ते एक प्रकारे मध्यम वर्गाचे सामर्थ्य बनतात. जेव्हा गरीबाची क्रय शक्ती वाढते तेव्हा मध्यम वर्गाची व्यापार शक्ती वाढते.जेव्हा गावाची क्रय शक्ती वाढते तेव्हा शहरांची अर्थ व्यवस्था अधिक जोर पकडते आणि असेच आपले अर्थ चक्र परस्परांशी जोडलेले असते. त्याला बळ देऊन आम्हाला आगेकूच करायची आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

शहरांमध्ये जे दुर्बल घटकांमधले लोक राहतात, स्वतःच्या घरावाचून राहिल्याने अनेक समस्या झेलाव्या लागतात, जी कुटुंबे स्वतःच्या घराचे स्वप्न पहात आहेत, त्यांच्या साठीही आम्ही येत्या काही वर्षांसाठी  एक योजना घेऊन येत आहोत.  ज्यामध्ये माझे असे कुटुंबीय जे शहरांमध्ये राहतात मात्र भाड्याने घर घेऊन त्यात राहतात,झोपड्यांमध्ये राहतात,चाळीमध्ये राहतात,अनधिकृत वसाहतींमध्ये राहतात असे माझ्या  कुटुंबीयांना जर स्वतःचे घर हवे असेल तर बँकेमधून जे कर्ज मिळेल त्या कर्जाच्या व्याजात सवलत  देऊन लाखो रुपयांची मदत करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. माझ्या मध्यमवर्ग कुटुंबियांना जेव्हा प्राप्तीकराची मर्यादा 2 लाखावरून 7 लाखापर्यंत वाढते तेव्हा सर्वात मोठा लाभ पगारदार वर्गाला होतो, माझ्या मध्यम वर्गाला होतो. 2014 पूर्वी  इंटरनेटचा डेटा अतिशय महाग होता आज सर्वात स्वस्त डेटा मिळत आहे प्रत्येक कुटुंबाचे पैसे वाचत आहेत.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

जग अजून कोरोना महामारीतून सावरलेले नाही.युद्धाने पुन्हा एकदा नवे संकट निर्माण केले आहे.आज जग महागाईच्या संकटाला तोंड देत आहे. अवघ्या जगाच्या अर्थव्यवस्थेला महागाईने ग्रासले आहे.आपणही जगाकडून ज्या गोष्टी खरेदी करण्याची  आवश्यकता आहे अशा गोष्टी आणतो तेव्हा आपण सामान तर आयात करतोच पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याला त्याबरोबर महागाईसुद्धा आयात करावी लागते. संपूर्ण जगाला महागाईने जखडून टाकले आहे.

मात्र माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

भारताने महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहेत.मागच्या काळाच्या तुलनेत आपल्याला काही यशही मिळाले आहे,मात्र यावर समाधान मानता येऊ शकत नाही.जगापेक्षा आपली परिस्थिती चांगली आहे यावर आपण संतुष्ट राहू शकत नाही. मला तर माझ्या देशवासियांवर महागाईचे ओझे कमीतकमी रहावे या दिशेने आणखीही पाऊले उचलायची आहेत आणि आम्ही ही पाऊले नक्कीच उचलू.माझे प्रयत्न अखंड जारी राहतील.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आज देश अनेक क्षमतांनिशी पुढे जात आहे. देश आधुनिकतेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी काम करत आहे. आज देश अक्षय ऊर्जा निर्मितीवर काम करत आहे. आज देश हरित हायड्रोजन वर काम करत आहे. अवकाश क्षेत्रात देशाची क्षमता वाढते आहे, तर देश खोल समुद्रातील अभियानाच्या दिशेनेही यशस्वीपणे पुढे जात आहे. देशात रेल्वे आधुनिक होत आहे, तर वंदे भारत बुलेट ट्रेन देखील आज देशात कार्यरत आहेत. गावागावात पक्के रस्ते बांधले जात आहेत. इलेक्ट्रिक बसेस आणि मेट्रो देखील आज देशात तयार होत आहेत. आज गावागावात इंटरनेट पोहोचत आहे. क्वांटम कॉम्प्युटर च्या दिशेने देखील देश दृढनिश्चयाने पुढे जात आहे. नॅनो युरिया, नॅनो डीएपी वर काम सुरू आहे. तर दुसरीकडे जैविक शेतीवर पण आपण भर देत आहोत. आज शेतकरी उत्पादक संघटना, एफपीओ स्थापन केल्या जात आहेत, तर दुसरीकडे आपण सेमी कंडक्टर चे देखील उत्पादन करण्यासाठी पुढे जात आहोत. आपण दिव्यांग लोकांसाठी सुगम भारताची उभारणी करत आहोत. तर आपण पॅरालंपिक स्पर्धेतही हिंदुस्थानचा झेंडा फडकवण्यासाठी माझ्या दिव्यांग खेळाडूंना सामर्थ्यवान बनवत आहोत. आम्ही खेळाडूंना विशेष प्रशिक्षण देत आहोत. 

आज भारत जुने विचार, जुन्या धाटणीचा त्याग करत, उद्दिष्टे निश्चित करून, ती साध्य करण्याच्या दिशेने काम करत आहे. आणि जेव्हा मी असे सांगतो, की ज्याचे भूमिपूजन आमचे सरकार करते, त्याचे उद्घाटन देखील आमच्याच कालखंडात होते. आता मी ज्या ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन करत आहे ना, तुम्ही लिहून ठेवा, त्याचे उद्घाटन देखील आपण सर्वांनी माझ्याच भाग्यात लिहिले आहे. आमची कार्यसंस्कृती, व्यापक विचार, दूरदृष्टी, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय याचा विचार करणे, ही आमची कार्यशैली राहिली आहे. आणि एखादी गोष्ट विचारांपेक्षाही अधिक, संकल्पापेक्षा जास्त साध्य कशी करायची, असा विचार करुन आमचे सरकार काम करत आहे. आम्ही स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात 75 हजार अमृत सरोवरे बनवण्याचा संकल्प केला होता. त्यावेळी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवरे बनवण्याचा संकल्प केला होता. सुमारे 50-55 हजार अमृत सरोवरे बांधली जातील, अशी आम्ही कल्पना केली होती. मात्र आज, सुमारे 75 हजार अमृत सरोवर निर्मितीचे काम सुरू आहे. हे देखील एक खूप मोठे कार्य आहे. जनशक्ती आणि जलशक्तीची ही ताकद, भारताच्या पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरणार आहे. 18 हजार गावांपर्यंत वीज पोहोचवणे, जनधन बँक खाती  उघडणे, मुलींसाठी शौचालय बनवणे, सगळी लक्ष्य वेळेच्या आधीच संपूर्ण शक्तिनिशी पूर्ण केली जातील. जेव्हा भारत एक लक्ष्य ठरवतो, तेव्हा ते पूर्ण करतोच, हे आमचा ट्रॅक रेकॉर्ड सांगतो.

200 कोटी लसीकरण करण्याचे काम, जग जेव्हा आम्हाला विचारते, 200 कोटी असं जेव्हा ऐकते, तेव्हा हा आकडा ऐकून त्यांचे डोळे विस्फारतात. इतके मोठे काम.. हे काम आपल्या अंगणवाडी कार्यकर्त्या, आशा कार्यकर्त्या, आरोग्य कर्मचारी, यांनी करुन दाखवले. हे माझ्या देशाचे सामर्थ्य आहे.

5-जी ची सुरुवात केली, आणि जगात सर्वाधिक वेगाने 5 -जी ची अंमलबजावणी सुरू करणारा माझा देश आहे. 700 पेक्षा अधिक जिल्ह्यांपर्यंत आता आम्ही पोहोचलो आहोत. आणि आता 6-जी पण तयारी करतो आहोत. त्यासाठी आम्ही कृती दल देखील स्थापन केले आहे.

अक्षय ऊर्जा- आम्ही आमच्या लक्ष्याच्या पुढे वाटचाल करतो आहोत. आपण 2030 चे जे अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले होते, ते उद्दिष्ट आम्ही 2021-22 मध्येच पूर्ण केले. आम्ही इंधनात, 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचा संकल्प केला होता, ते उद्दिष्ट पण आम्ही पाच वर्षांपूर्वीच पूर्ण केले. आम्ही 500 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते, ते देखील आम्ही वेळेच्या आधीच 500 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक केले.

आपल्या देशात 25 वर्षांपासून अशी चर्चा होत होती, की देशात नवी संसद निर्माण व्हावी. संसदेचे एकही सत्र असे नव्हते, ज्यात नव्या संसद भवनाविषयी चर्चा होत नसेल. हा मोदी आहे, ज्याने वेळेच्या आधीच नवी संसद निर्माण करुन ठेवली, माझ्या प्रिय देशबांधवांनो.. हे काम करणारे सरकार आहे, आपली उद्दिष्टे पूर्ण करणारे सरकार आहे. हा नवा भारत आहे. हा आत्मविश्वासाने परिपूर्ण भारत आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी जीव तोडून कष्ट करणारा भारत आहे. आणि म्हणूनच हा भारत न थांबतो, ना थकतो, खचत नाही, ना कधी हार मानतो.

आणि म्हणूनच, माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

देशाची आर्थिक शक्ती वाढली आहे, तर दुसरीकडे आपली सामरिक शक्ती देखील वाढली आहे. आपल्या देशाच्या सीमा अधिक सुरक्षित झाल्या आहेत. आपल्या सीमांवर तैनात असलेले आपले जवान, जे देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत, किंवा मग आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी गणवेशधारी  दले, मी स्वातंत्र्याच्या या पवित्र दिवशी त्यांचेही खूप अभिनंदन करत, माझे भाषण पुढे नेतो.

सैन्याचे सक्षमीकरण असो, किंवा मग सैन्याला अधिकाधिक युवा बनवण्याचा प्रयत्न असो, आपले सैन्य लढाईसाठी सज्ज, युद्धासाठी सतत तैयार असावी यासाठी आपल्या सैन्यदलांमध्ये सातत्याने सुधारणा करण्याचे काम केले जात आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

रोज आपण ऐकत असू, इथे बॉम्बस्फोट झाला, तिथे बॉम्बस्फोट झाला, प्रत्येक ठिकाणी लिहिले गेले असे, “या बॅगला हात लावू नका” उद्घोषणा होत असत. आज देश सुरक्षिततेचा अनुभव घेत आहे. आणि जेव्हा सुरक्षितता असते, शांतता असते, त्यावेळी, प्रगतीची नवनवी उद्दिष्टे आपण गाठू शकतो. साखळी बॉम्बस्फोटांच्या घटना आता इतिहासजमा झाल्या आहेत. निष्पाप लोकांचे जे बळी जात असत, ते सगळे इतिहासजमा झाले आहे. आज, देशात दहशतवादी हल्ले फार कमी झाले आहेत. नक्षलग्रस्त क्षेत्रात देखील, खूप मोठा बदल घडून आलेला आहे. खूप मोठ्या परिवर्तनाचे एक वातावरण निर्माण झाले आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

प्रगतीच्या प्रत्येक मार्गावर, मात्र आपण 2047 पर्यंत आपण एक विकसित देशांचे स्वप्न घेऊन वाटचाल करतो आहोत, तेव्हा; आणि ते स्वप्न नाही- 140 कोटी देशबांधवांचा संकल्प आहे. आणि हा संकल्प सिद्ध करण्यासाठी परिश्रमांची पराकाष्ठा देखील केली जात आहे. आणि त्याची सर्वात मोठी ताकद असते, ती असते राष्ट्रीय चारित्र्य. जगातील ज्या ज्या देशांनी प्रगती केली, जगात जे जे देश संकटांवर मात करून पुढे गेले आहेत, त्या प्रत्येक देशात इतर सर्व गोष्टींसोबत एक अत्यंत महत्वाचा उत्प्रेरक असतो. आणि तो म्हणजे, त्या देशाचे राष्ट्रीय चारित्र्य. आणि आपल्याला राष्ट्रीय चारित्र्यावर अधिक भर देत आपल्याला पुढे जावे लागेल.

आपला देश, आपले राष्ट्रीय चारित्र्य ओजस्वी असावे, तेजस्वी असावे, पुरुषार्थ करणारे असावे, पराक्रमी असावे, प्रखर हो, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आणि येणारी 25 वर्षे, आपण एकच मंत्र घेऊन पुढे वाटचाल करूया की आपले राष्ट्रीय चारित्र्य आपला मुकुटमणी असले पाहिजे. एकतेचा संदेश, भारताच्या एकतेसाठी जगणे, भारताच्या एकतेला झळ पोहोचेल, न अशी माझी भाषा हवी, नया असे कुठले पाऊल मी उचलायला हवे.

प्रत्येक क्षणी देशाला जोडण्याचे प्रयत्न, माझ्याकडूनही सुरूच राहतील. भारताची एकता आपल्याला ताकद देते. उत्तर असो, दक्षिण असो, पूर्व असो किंवा मग पश्चिम असो, गाव असो किंवा शहर, पुरुष असो किंवा स्त्री, आपण सर्वांनीच एकात्मतेच्या भावनेने, आणि विविधतेने नटलेल्या देशात, एकतेला ताकद असते, शक्ती असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट मी बघतो आहे. 2047 साली, आपल्याला आपल्या देशाला विकसित भारत म्हणून बघायचे आहे. आपल्या श्रेष्ठ भारताचा मंत्र आचरणात आणावा लागेल.आपल्याला परिश्रम करावे लागतील.

आपल्या उत्पादनात, मी 2014 मध्ये सांगितले होते, “झीरो डिफेक्ट, झीरो इफेक्ट” जगातील कोणत्याही टेबलवर भारताचे उत्पादन, मेड इन इंडिया वस्तू असेल, तर जगाला विश्वास असला पाहिजे की यापेक्षा उत्तम जगात काहीही असू शकत नाही. अशी विश्वासार्हता विशेष असेल, आपली प्रत्येक वस्तू, आपली प्रत्येक सेवा सर्वश्रेष्ठ असतील. आपल्या शब्दाला किंमत असेल, तरच आपला शब्द श्रेष्ठ मानला जाईल. आपल्या संस्था असतील, तर त्याही श्रेष्ठ असतील. आपली निर्णय प्रक्रियाही असेल, तर ती सर्वोत्तम असेल. ही श्रेष्ठतेची भावना घेऊनच आपल्याला वाटचाल करावी लागेल.

तिसरी गोष्ट म्हणजे, देशाला पुढे नेण्यासाठी, एका अतिरिक्त शक्तीचे सामर्थ्य भारताला पुढे घेऊन जाणार आहे. आणि ती शक्ती म्हणजे महिला -प्रणित विकास. आज भारत, अभिमानाने सांगू शकतो, की हवाई वाहतूक क्षेत्रात जगात सर्वाधिक वैमानिक जगात कोणत्या देशात असतील, तर त्या भारतात आहेत. आज चांद्रयानची गती हो, मून मिशनची चर्चा असो, माझ्या महिला वैज्ञानिक त्याचे नेतृत्व करत आहेत. आज महिला स्वयंसहाय्यता बचत गट असोत, माझ्या सुमारे दोन कोटी भगिनी, लखपती दीदी चे उद्दिष्ट घेऊन आज महिला बचत गटांच्या कार्यात आपल्या महिला कार्य करत आहेत. आपण आपल्या नारी शक्तीच्या सामर्थ्याला चालना देत, महिला प्रणित विकासाचे, आणि जेव्हा जी-20 मध्ये, मी महिला प्रणित विकासाशी संबंधित विषय पुढे नेले आहेत, तेव्हा संपूर्ण जी-20 समूह, त्याचे माहात्म्य मान्य करतो आहे. आणि त्याचे माहात्म्य स्वीकारून, ते त्यावर भरही देत आहेत. त्याचप्रमाणे, भारत, विविधतांनी भरलेला देश आहे. आपण असमतोल विकासाचे बळी ठरलो आहोत. माझे-आपले, या भावनेमुळे आपल्या देशातील बरेच प्रदेश त्याचा बळी ठरले. आता आपल्याला प्रादेशिक आशा आकांक्षांना आणि समतोल विकासाला ताकद द्यायची आहे. आणि प्रादेशिक आशा आकांक्षांचा विचार करत, त्या भावनांना सन्मान देत,जसे, आपल्या भारतमातेचाच विचार करा. जर आपल्या शरीरातील एखादा अवयव अविकसित राहिला, तर आपले शरीर, विकसित नाही मानले जाणार. आपल्या शरीराचा एखादा भाग दुर्बल राहिला, तर आपले शरीर निरोगी नाही समजले जाणार. त्याचप्रमाणे, माझी भारतमाता, त्याचा कुठलाही एक भूभाग देखील, समाजातील कोणताही घटक असो, तो जर दुर्बळ राहिला तर माझी भारतमाता समर्थ आहे, निरोगी आहे, असा अभिमान आपण नाही बाळगू शकत. आणि म्हणूनच प्रादेशिक आशा-आकांक्षांचा विचार करण्याची आपल्याला गरज आहे. म्हणूनच आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वंकष विकास व्हावा, भूभागावरील प्रत्येक प्रदेशाला, त्याची स्वतःची क्षमता वाढवण्याची संधी मिळेल, या दिशेने आम्ही वाटचाल करु इच्छितो.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

भारत लोकशाहीची जननी आहे. भारतात विलक्षण विविधता देखील आहे. भाषा अनेक आहेत, बोली अनेक आहेत, वस्त्रे-पोशाख अनेक आहेत, विविधताही खूप आहेत. आपल्याला ह्या सगळ्यांच्या आधारावरच पुढे जायचे आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

देशाच्या एकात्मतेविषयी जेव्हा मी बोलतो, तेव्हा जर घटना माणिपूरमध्ये घडत असेल, तर त्याच्या वेदना महाराष्ट्रात जाणवतात. जर पूर आसामला आला तर केरळचा माणूस अस्वस्थ होतो. भारताच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात काहीही झाले, तरी आपण एकसंध असल्याच्या भावनेची अनुभूती घेतो. माझ्या देशातील मुलींवर अत्याचार न व्हावेत, हे आपली सामाजिक जबाबदारी आहे. ही आपली कौटुंबिक जबाबदारी देखील आहे. आणि देशाचे नागरिक म्हणूनही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आज जेव्हा अफगाणिस्तान मधून गुरु ग्रंथ साहिब आणतो, तेव्हा संपूर्ण देशाला अभिमान वाटतो. जेव्हा आज जगातील कोणत्याही देशात, कोविड काळात, माझा एखादा सिख बांधव लंगर सुरु करतो, उपाशीपोटी असलेल्यांना अन्न देतो, आणि जेव्हा त्याची जगभरात प्रशंसा होते, तेव्हा भारताचा उर अभिमानाने भरून येतो.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आमच्यासाठी -आम्ही जेव्हा स्त्रीसन्माना विषयी चर्चा करतो, तेव्हा- मला आताच, एका देशाचा दौरा करण्याची संधी मिळालेली होत, तेव्हा तिथे असलेल्या एक ज्येष्ठ नेत्यांनी मला एक प्रश्न विचारला... त्यांनी विचारलं की आपल्या देशातील मुली विज्ञान आणि अभियांत्रिकी शिकत आहेत का? मी त्यांना उत्तर दिलं, आज माझ्या देशात मुलांपेक्षा जास्त मुली आज स्टेम, स्टेम म्हणजे, सायन्स, टेक्नॉलजी, इंजिनीयरिंग आणि मॅथ्स (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित), जास्तीत जास्त सहभाग माझ्या मुली घेत आहेत. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आज आपल्या देशाचे हे समर्थ्य दिसत आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आज 10 कोटी महिला, महिला बचत गटांशी जोडलेल्या आहेत, आणि महिला बचत गटांसोबत तुम्ही गावांत गेलात, तर तुम्हाला बँकवाली दीदी भेटेल, तुम्हाला आंगडणवाडी दीदी भेटेल, तुम्हाला औषधं  देणारी दीदी भेटेल, आणि आता, माझं  स्वप्न आहे, दोन कोटी लखपती दीदी बनविण्याचे. गावांत दोन कोटी लखपती दीदी! आणि यासाठी एक नवीन संदेश दिला. विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपल्या गावांतल्या महिलांचे देखील सामर्थ्य मी बघतो. आणि यासाठी आम्ही एक नवीन योजनेवर विचार करत आहोत, की आपल्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान यावे. अॅग्रीटेकला बळ मिळावे यासाठी, महिला बचत गटांच्या भगिनींना आम्ही प्रशिक्षण देऊ. ड्रोन उडविण्याचे, ड्रोन दुरुस्तीचे प्रशिक्षण देऊ. आणि अशा हजारो महिला बचत गटांना भारत सरकार ड्रोन देईल, प्रशिक्षण देईल. आणि आपल्या शेतीच्या कामात ड्रोन सेवा उपलब्ध व्हाव्यात याची आम्ही सुरवात करणार आहोत. सुरुवात आम्ही 15 हजार महिला बचत गटांच्या मार्फत, ड्रोनचे उड्डाण आम्ही करतो आहोत. ड्रोन च्या उड्डाणाची आम्ही सुरुवात करतो आहोत. मला विश्वास आहे, की यामुळे, आमच्या कुटुंबियांचा .. आज देश आधुनिकतेच्या दिशेने पुढे जातो आहे. महामार्ग असो, किंवा मग रेल्वे असो, विमान मार्ग असो, आय (इन्फॉर्मेशन) वे असो, जलमार्ग असोत, कुठलेही क्षेत्र असे नाही, ज्याला पुढे नेण्यासाठी आज देश काम करत नाहीये.

गेल्या नऊ वर्षात, किनारी क्षेत्रात आम्ही, आदिवासी क्षेत्रात, आपल्या डोंगराळ भागात विकास करण्यावर खूप भर दिला आहे. आम्ही पर्वतमाला, भारतमाला अशा योजनांच्या माध्यमातून, समाजाच्या या वर्गाला आम्ही आधार दिला आहे. आम्ही, गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून आपल्या पूर्व भारताला जोडण्याचे काम केले आहे. आम्ही रुग्णालयांची संख्या वाढवली आहे. आम्ही डॉक्टरांच्या जागा वाढवल्या आहेत. जेणेकरून आपली मुळे, डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करु शकतील. आम्ही मातृभाषेत शिक्षण घेण्यावर भर दिला आहे. आपल्या मुलांना आता मातृभाषेत शिक्षण घेता येईल, या दिशेने.. आणि मी सर्वोच्च न्यायालयाचे देखील आभार मानतो, की भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने देखील म्हटले आहे, की आता ते जे निकाल देतील, त्यातील जो कार्यवाहीचा भाग असेल, तो, जो न्यायालयात आलेला पक्षकार आहे, त्याला त्याच्या भाषेत उपलब्ध करुन दिला जाईल. मातृभाषेचे माहात्म्य आज वाढत आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आजपर्यंत, आपल्या देशातील जी सीमावर्ती गावे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही व्हायब्रंट बॉर्डर व्हीलेज म्हणून एक कार्यक्रम सुरू केला. आणि व्हायब्रंट बॉर्डर व्हीलेज- ज्यांना आजपर्यंत असे म्हटले जात होते, की देशातील शेवटचे गांव, आम्ही ती मानसिकताच बदलली. ते देशातील शेवटचे गांव नाही, तर सीमेवर असलेले आपले गांव, माझ्या देशातील पहिले गांव आहे. जेव्हा सूर्य पूर्वेला उगवतो, तेव्हा त्याची पहिली किरणे या गावात पडतात, आणि सूर्य पश्चिमेला अस्ताला जातो, तेव्हा इकडच्या सीमेवेरील गावांना शेवटच्या सूर्यकिरणाचा लाभ मिळतो.

ही माझी पहिली गावे आहेत , आणि मला आनंद आहे की , ही जी पहिली गावे आहेत सीमावर्ती गावे आहेत त्या गावांचे सहाशे प्रमुख आज आपल्या या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे म्हणून  या लाल किल्याच्या तटबंदीवरील एका महत्वाच्या कार्यक्रमाचा भाग   होण्यासाठी आले आहेत. पहिल्यांदाच ते इतक्या दूरवर आले आहेत. नवे संकल्प आणि सामर्थ्याशी जोडले जाण्यासाठी इथे आले आहेत.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

संतुलित विकासासाठी आम्ही  आकांक्षी जिल्हे, आकांक्षी तालुक्यांची संकल्पना मांडली. आणि आज त्याचे सुखद परिणाम प्राप्त होत आहेत. आज राज्याचे जे सामान्य मापदंड आहेत त्यानुसार जे आकांक्षी जिल्हे कधी काळी खूप मागास होते , ते जिल्हे आज राज्यातही चांगली कामगिरी करत आहेत. आणि मला विश्वास आहे की, आगामी काळात हे आपले आकांक्षी जिल्हे ही आकांक्षी तालुके निश्चितच प्रगती करतील. भारताच्या चारित्र्याविषयी बोलताना जसे  मी म्हटले होते , मी पहिल्यांदा सांगितले होते की भारताची एकता. दुसरी गोष्ट सांगितली होती की, भारताने उत्कृष्टतेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे,  आणि महिलांच्या नेतृत्वाखालील विकास ही तिसरी गोष्ट मी सांगितली होती. प्रादेशिक आकांक्षा ही मी चौथी गोष्ट सांगितली होती, यातील पाचवी महत्वाची गोष्ट आहे ती  म्हणजे ज्या दिशने भारताने वाटचाल सुरु केली आहे की, आपले राष्ट्रीय चरित्र हे विश्वमंगल म्हणजेच जगाच्या प्रगतीचा विचार करणारे असायला हवे.  जगाच्या प्रगतीसाठी योगदान देणारे ठरेल अशाप्रकारे आपल्या देशाला आपल्याला बळकट करायचे आहे. आणि आज कोरोना महामारीनंतर मी पहात आहे की, ज्या प्रकारे संकटाच्या काळात देशाने जगाची मदत केली त्याचेही फलित असे मिळाले आहे की, आज जगात  एका विश्वामित्राच्या रूपात, जगाच्या अतूट मैत्रीच्या रूपात आज आपल्या देशाची ओळख बनली आहे. आपण जेव्हा विश्वमंगल म्हणजेच जगाच्या प्रगतीबद्दल बोलतो तेव्हा, भारताचा जो  मूलभूत विचार आहे त्या विचाराला पुढे नेणारे  आपण लोक आहोत. आणि मला आनंद आहे की, आज अमेरिकी संसदेतील काही निवडक मान्यवर प्रतिनिधी देखील आज आपल्या 15 ऑगस्टच्या या सोहळ्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. भारताचा विचार कशाप्रकारचा  आहे? आपण विश्वमंगल या संकल्पनेला कशाप्रकारे पुढे घेऊन जात आहोत ? आता बघा, आपण  जेव्हा विचार करतो तेव्हा काय सांगतो की, आपण  जगासमोर जे  तत्वज्ञान ठेवले आहे त्या तत्वज्ञानासोबत जग जोडले जात आहे. आपण सांगितले की, एक सूर्य, एक जग, एक ग्रीड हे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातले आमचे खूप मोठे विधान आहे, याला आज जग स्वीकारत आहे.कोविड नंतर आम्ही जगाला सांगितले की, एक पृथ्वी, एक आरोग्य हा आपला दृष्टिकोन असला पाहिजे.  मानवाच्या  , पशूंच्या  , झाडेझुडुपांच्या आजारांच्या बाबतीतल्या आव्हानांवर समानतेने मात करता येईल तेव्हाच समस्यांचे निराकरण होऊ शकेल. आपण  जी- ट्वेन्टी समूहासाठी जगासमोर एक जग , एक कुटुंब , एक भविष्य हे संकल्पना मांडली आहे. हाच विचार घेऊन आपण वाटचाल करत आहोत.  आपण हवामानाच्या बाबतीत जग ज्या संकटाचा सामना करत आहे, त्यावर मात करण्यासाठी आपण मार्ग दाखवला आहे. लाईफ अभियानाचा, पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा  प्रारंभ केला आहे  आपण जगासाठी  आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार केली आणि आता जगातले काही देश  आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा  भाग बनत आहेत. आपण जैवविविधतेचे महत्व जाणून घेत माजंर कुळातील  वन्य प्राण्यांसाठी आघाडी म्हणजेच बिग कॅट अलायन्स सहकार्याला आपण पुढे नेले आहे. आपण नैसर्गीक आपत्तीमुळे पायाभूत सुविधांचे होणारे आणि तापमान वाढीमुळे होणारे  नुकसान टाळण्यासाठी दूरगामी व्यवस्थांची गरज लक्षात घेऊन या समस्येवर मात करण्यासाठी  आपण  आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठीची  आघाडी जगाला दिली आहे. जग आज सागराला संघर्षाचे केंद्र बनवत असताना आपण जगाला सागरातील व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून हे जागतिक सागरी शांततेची हमी देऊ शकते. आपण पारंपरिक चिकित्सा पद्धतींना बळ देत, जागतिक आरोग्य संघटनेचे  जागतिक स्तरावरचे केंद्र हिंदुस्थानात बनवण्याच्या दिशने काम केले आहे . आपण योग आणि आयुषच्या माध्यमातून विश्वकल्याण आणि जगाच्या आरोग्य निरामयतेच्या दिशेने काम केले आहे. आणि आज भारत विश्वमंगलचा एक बळकट पाया तयार करत आहे.

या बळकट पायाला पुढे नेणे हे आपले सर्वांचे कार्य आहे. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

स्वप्न अनेक आहेत, संकल्प ठोस आहेत,धोरणे स्पष्ट आहेत , हेतूच्या बाबतीत   कोणतेही प्रश्नचिन्ह नाही,  मात्र काही सत्य आपल्याला स्वीकारावी लागतील. आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी माझ्या प्रिय कुटुंबियांनो, मी आज लाल किल्ल्यावरून तुमची मदत मागण्यासाठी आलो आहे. मी लाल  किल्ल्यावरून तुमचे आशीर्वाद मागण्यासाठी आलो आहे, कारण गेल्या काही वर्षात ज्याप्रमाणे  देश मला समजला आहे.देशाच्या आवश्यकता मी समजून घेतल्या आहेत आणि अनुभवाच्या आधारावर मी सांगत आहे की, आज गांभीर्याने काही गोष्टी आपल्याला घ्यावा लागतील . स्वातंत्र्याच्या अमृतकाळात 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल त्यावेळी जगात भारताचा तिरंगा झेंडा विकसित भारताचा तिरंगा झेंडा व्हायला हवा. अगदी काही क्षणासाठी देखील आपल्याला थांबायचे नाही , मागे हटायचे नाही. आणि यासाठी सुचिता , पारदर्शकता आणि निःपक्षता यांना प्राधान्याने बळकटी  देण्याची गरज आहे. आपल्याला या बळकटीला जितके जास्त बळ देऊ शकतो, तितके संस्थांच्या माध्यमातून देऊ शकतो, नागरिक या नात्याने देऊ शकतो, कुटुंब म्हणून देऊ शकतो,  हे आपले सामूहिक उत्तरदायित्व असायला हवे, त्यामुळे गेल्या 75 वर्षांचा इतिहास पाहिला  तर भारताच्या सामर्थ्यात कोणत्याही प्रकारे कमतरता नव्हती. ज्या देशाला कधी काळी  ' सोने की चिड़िया' असे म्हटले जात असे त्या देशाच्या सामर्थ्याचा उपयोग करून तो देश पुन्हा का नाही उभा राहू  शकणार? माझा अतूट विश्वास आहे मित्रांनो, माझ्या प्रिय कुटुंबियांनो, माझा अखंड अतूट एकनिष्ठ विश्वास आहे की, 2047 मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्याचे शतक साजरे करेल तेव्हा माझा देश विकसित भारत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे मी आपल्या देशाच्या सामर्थ्याच्या आधारावर सांगत आहे. उपलब्ध स्रोतांच्या आधारावर मी हे म्हणत आहे आणि    तीस वर्षांपेक्षा कमी वयोगटातील आपल्या युवा शक्तीच्या सर्वाधिक   भरवशावर मी हे सांगत आहे. माझ्या माताभगिनींच्या सामर्थ्याच्या भरवशावर मी हे म्हणत आहे. मात्र यासमोर जर काही अडथळा असेल काही विकृती गेल्या पंचाहत्तर वर्षात घर करून असतील , आपल्या समाजव्यवस्थेचा भाग बनून असतील, कधी कधी आपण डोळ्याला पट्टी बांधत  दुर्लक्ष करतो मात्र आता डोळ्याला पट्टी बांधण्याची ही वेळ नाही. जर स्वप्नांना साकार करायचे असेल , संकल्पांची पूर्तता करायची असेल तर आपल्याला डोळ्याला पट्टी बांधून चालणार नाही तर डोळ्यात डोळे घालून तीन वाईट गोष्टींशी लढावे लागेल आणि ही काळाची गरज आहे. आपल्या देशाच्या सर्व समस्यांच्या मुळाशी भ्रष्टाचाराने वाळवीच्या रूपात देशाच्या सर्व व्यवस्थांना , देशाच्या सामर्थ्याला पूर्णपणे पोखरून काढले आहे. भ्रष्टाचारापासून मुक्तता , भ्रष्टाचाराविरोधात लढा हा प्रत्येक संस्थेत  प्रत्येक क्षेत्रात आहे . आणि माझ्या देशवासियांनो माझ्या  प्रिय कुटुंबियांनो ही मोदींच्या जीवनातील वचनबद्धता आहे, ही माझी व्यक्तिगत वचनबद्धता आहे की, मी  भ्रष्टाचाराविरोधातील लढा लढतच राहणार आहे. दुसरी समस्या जी आपल्या देशाला पोखरत आहे ती म्हणजे घराणेशाही. या घराणेशाहीने ज्या प्रकारे देशाला जखडून ठेवले आहे, त्या घराणेशाहीने देशाच्या लोकांचा अधिकार हिरावून घेतला आहे. तुष्टीकरण ही तिसरी वाईट गोष्ट आहे. तुष्टीकरणाने देशाच्या मूलभूत विचाराला , देशाच्या सर्वसमावेशक आपल्या राष्ट्रीय चारित्र्याला कलंक लावला आहे.  उध्वस्त करून टाकले या लोकांनी आणि म्हणून माझ्या प्रिय देशवासियांनो आणि म्हणूनच माझ्या प्रिय कुटुंबियांनो या तीन वाईट गोष्टींच्या विरोधात संपूर्ण सामर्थ्यनिशी आपल्याला लढायचे आहे. भ्रष्टाचार, घराणेशाही , तुष्टीकरण ही आव्हाने अशा गोष्टी पेरतात ज्या आपल्या देशातील लोकांच्या आकांक्षाना दडपून  टाकतात.   आपल्या देशातील काही लोकांकडे जे काही लहान मोठे  सामर्थ्य आहे त्याचे या गोष्टी  शोषण करतात. या गोष्टी आपल्या लोकांच्या आशा आणि आकांक्षांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.आपले गरीब असोत, दलित असोत, मागासलेले असोत, वंचित असोत, आपले आदिवासी बंधू-भगिनी असोत, आपल्या माता-भगिनी असोत, आपल्या हक्कासाठी आपल्या या तिन्ही वाईट गोष्टींपासून  मुक्ती मिळवायची आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध द्वेषाचे वातावरण निर्माण करावे लागेल. घाण जशी आपल्या मनात द्वेष निर्माण करते, ती  घाण आपल्याला आवडत नाही, सार्वजनिक जीवनात यापेक्षा मोठी घाण असूच शकत नाही. आणि म्हणूनच भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी  आपल्या स्वच्छता मोहिमेला नवे वळण देखील द्यायचे आहे . तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार मुक्तीसाठी   सरकार खूप प्रयत्न करत आहे.तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या देशात गेल्या 9 वर्षांत मी असे एक काम केले आहे की ; जर तुम्ही आकडा ऐकलात तर तुम्हाला ते जाणवेल की, मोदी हे करतात म्हणजेच  सुमारे दहा कोटी लोकांनी घेतलेला चुकीचा फायदा मी थांबवला आहे. तर तुमच्यापैकी कोणी म्हणेल की तुम्ही लोकांवर अन्याय केला आहे तर नाही, हे दहा कोटी लोक कोण होते, हे दहा  कोटी लोक असे लोक होते ज्यांच्याकडून ज्यांचा जन्मही झाला नव्हता आणि त्यांच्या नावावर विधवा म्हणून , म्हातारे म्हणून  दिव्यांग म्हणून लाभ घेतला जायचा. अशा दहा कोटी बेनामी गोष्टींना आळा घालण्याचे पुण्यकर्म करत , भ्रष्टाचाऱ्यांची जी संपत्ती आपण जप्त केली आहे, ती पूर्वीपेक्षा 20 पटीने जास्त आहे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

तुमच्या कष्टाच्या कमाईचे  पैसे घेऊन हे लोक पळून जात होते. 20 पट अधिक मालमत्ता जप्त केल्यामुळे   लोकांचा माझ्याबद्दलचा रोष अतिशय स्वाभाविक आहे. पण मला भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई पुढे न्यायची आहे. आपल्या सरकारी यंत्रणेमुळे, पूर्वी कॅमेऱ्यासमोर काहीतरी घडायचे, पण नंतर गोष्टी अडकून पडायच्या. यापूर्वीच्या तुलनेत आम्ही न्यायालयात अनेक पटींनी आरोपपत्रे दाखल केली आहेत

आता जामीन देखील मिळत नाहीत, अशी पक्की व्यवस्था घेऊन आम्ही पुढे जात आहोत. कारण आम्ही प्रामाणिकपणाने भ्रष्टाचाराविरोधात लढत आहोत. आज घराणेशाही आणि तुष्टीकरण याने देशाचे खूप मोठे नुकसान केले आहे. लोकशाहीमध्ये हे कसे काय होऊ शकते, की राजकीय पक्ष... आणि मी हा विशेष भर देत आहे की राजकीय पक्ष.... आज माझ्या देशाच्या लोकशाहीत एक अशी विकृती आली आहे जी कधीच भारताच्या लोकशाहीला बळकट करू शकत नाही आणि तो आजार कोणता आहे. घराणेशाहीवाला पक्ष... त्यांचा मंत्र काय आहे ‘पार्टी ऑफ द फॅमिली,  बाय द फॅमिली अँड फॉर द फॅमिली. यांच्या जीवनाचा मंत्रच हा आहे, की त्यांची पॉलिटिकल पार्टी, त्यांचा राजकीय पक्ष कुटुंबाचा, कुटुंबाकडून आणि कुटुंबासाठी आहे. घराणेशाही आणि आप्तस्वकीयांचं हित जोपासण्याची वृत्ती गुणवत्तेचे शत्रू असतात. योग्यतेला नाकारतात. सामर्थ्याचा स्वीकार करत नाहीत. आणि म्हणूनच घराणेशाहीचे उच्चाटन या देशाच्या मजबुतीसाठी गरजेचे आहे. सर्वजनहिताय सर्वजनसुखाय. प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळावा यासाठी आणि सामाजिक न्यायासाठी देखील हे अतिशय गरजचे आहे. त्याच प्रकारे तुष्टीकरण...., तुष्टीकरणाने सामाजिक न्यायाचे सर्वात जास्त नुकसान केले आहे. सामाजिक न्यायाला जर कोणी उद्ध्वस्त केले असेल तर ती आहे तुष्टीकरणाची विचारसरणी, तुष्टीकरणाचे राजकारण. तुष्टीकरणाचा सरकारी योजनांचा प्रकार, याने सामाजिक न्यायाचा बळी दिला आहे आणि म्हणूनच आपल्याला तुष्टीकरणापासून दूर राहिले पाहिजे. भ्रष्टाचार हा विकासाचा सर्वात मोठा शत्रू आहे. जर देशाला विकास हवा असेल, देशाला 2047 मध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची इच्छा असेल, तर आपल्यासाठी हे गरजेचे आहे की आपण कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचार खपवून घेता कामा नये. ही मनस्थिती सोबत घेऊन चालले पाहिजे.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

आपल्या सर्वांचे एक महत्त्वाचे दायित्व आहे, तुम्ही ज्या प्रकारे आपले आयुष्य जगला आहात, आपल्या भावी पिढ्यांना अशाच प्रकारचे आयुष्य जगायला भाग पाडणे हा आपला गुन्हा आहे. आपले हे दायित्व आहे की आपल्या भावी पिढीला आपण असा समृद्ध देश देऊ की, असा संतुलित देश देऊ, सामाजिक न्यायाचा वारसा असलेला देश देऊ, जेणेकरून लहानसहान गोष्टी मिळवण्यासाठी त्यांना कधीही संघर्ष करावा लागणार नाही. आपल्या सर्वांचे हे कर्तव्य आहे, आपण सर्व नागरिकांचे हे कर्तव्य आहे आणि हा अमृतकाळ कर्तव्यकाळ आहे. आपल्याला कर्तव्यापासून मागे हटता येणार नाही. आपल्याला तो भारत निर्माण करायचा आहे जो पूज्य बापूंच्या स्वप्नात होता, आपल्याला तो भारत निर्माण करायचा आहे जो आपल्या स्वातंत्र्य सेनानींचे स्वप्न होता, आपल्याला तो भारत बनवायचा आहे जो आपल्या वीर शहीदांचा होता, आपल्या वीरांगनांचा होता, ज्यांनी मातूभूमीसाठी आपले जीवन अर्पण केले होते.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

मी जेव्हा 2014 मध्ये तुमच्याकडे आलो होतो, त्यावेळी 2014 मध्ये परिवर्तनाचे आश्वासन घेऊन आलो होतो. 2014 मध्ये मी तुम्हाला आश्वासन दिले होते मी परिवर्तन आणेन, आणि माझ्या 140 कोटी कुटुंबीयांनो, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलात आणि मी हा विश्वास पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘ रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म’. ती पाच वर्षे, जे आश्वासन होते त्याचे विश्वासात रुपांतर झाले आहे. कारण मी ‘ रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्स्फॉर्म’द्वारे  परिवर्तनाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला मी विश्वासात रुपांतरित केले आहे. कठोर परिश्रम केले आहेत, देशासाठी केले आहेत, मानाने केले आहेत, फक्त आणि फक्त ‘नेशन फस्ट’… सर्वात आधी देश या भावनेने केले आहेत. 2019 मध्ये कामगिरीच्या आधारावर तुम्हा सर्वांनी पुन्हा एकदा आशीर्वाद दिले. परिवर्तनाचे आश्वासन मला इथे घेऊन आले. कामगिरी मला दुसऱ्यांदा घेऊन आली आणि आगामी पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. 2047 चे स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आगामी पाच वर्षे आहेत. आणि पुढच्या वेळी 15 ऑगस्टला याच लाल किल्ल्यावरून मी तुम्हाला देशाने साध्य केलेली कामगिरी, तुमचे सामर्थ्य, तुमचे संकल्प, त्यावर झालेली प्रगती, त्याचे जे यश आहे त्याचे गौरवगान त्याहीपेक्षा जास्त आत्मविश्वासाने तुम्हा सर्वांसमोर मी सादर करेन.

माझ्या प्रिय कुटुंबियांनो,

मी तुमच्यामधलाच आहे, मी तुमच्यामधूनच आलो आहे, मी तुमच्यासाठी जगत आहे, जर मला स्वप्नं पडत असतील तर ती सुद्धा तुमच्यासाठीच असतात, जर मी घाम गाळत असेन, तर तुमच्यासाठी गाळत असतो, कारण यासाठी नाही की तुम्ही मला दायित्व दिले आहे, मी यासाठी करत आहे कारण तुम्ही माझे कुटुंबीय आहात आणि तुमच्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून, मी तुमचे कोणतेही दुःख सहन करू शकत नाही. मी तुमच्या स्वप्नांचा चक्काचूर होताना पाहू  शकत नाही. मी तुमच्या स्वप्नांच्या संकल्पांना साध्य करणारा एक सहकारी बनून, एक सेवक बनून, तुमच्यासोबत संपर्कात राहून, तुमच्यासाठी जगण्याचा, तुमच्यासाठी संघर्ष करण्याचा संकल्प करून वाटचाल करणारा माणूस आहे. आणि मला खात्री आहे की आपले पूर्वज स्वातंत्र्यासाठी जी लढाई लढले , जी स्वप्ने पाहिली होती, ती स्वप्ने आपल्या सोबत आहेत. स्वातंत्र्याच्या लढाईत ज्यांनी बलिदान दिले त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत आणि 140 कोटी देशवासियांसाठी एक अशी संधी आली आहे, ही संधी आपल्यासाठी एक खूप मोठी ताकद घेऊन आली आहे.

आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशवासियांनो,

आज ज्यावेळी मी अमृतकाळात तुमच्यासोबत बोलत आहे, हे अमृतकाळाचे पहिले वर्ष आहे. या अमृतकाळाच्या पहिल्या वर्षात मी तुमच्यासोबत बोलत आहे, तर मी तुम्हा सर्वांना हे ठाम विश्वासाने सांगेन,

“ चलता, चलाता कालचक्र, चलता चलाता कालचक्र, अमृत काल का भालचक्र,  चलता चलाता कालचक्र, अमृतकाल  का भालचक्र,

सबके सपने अपने सपने, सबके सपने अपने सपने, सबके सपने अपने सपने, पनपे सपने सारे

सबके सपने अपने सपने, पनपे सपने सारे

तीर चले, वीर चले, चले युवा हमारे

तीर चले, वीर चले, चले युवा हमारे

नीती सही... नीती सही

रीती नई

नीती सही, रीती नई...

गती सही..... गती सही, राह नई

चुनो चुनौती

चुनो चुनौती सीना तान

चुनो चुनौती सीना तान

जगमे बढाओ देश का नाम

चुनो चुनौती सीना तान

जगमे बढाओ देश का नाम”

माझ्या प्रिय कुटंबियांनो,

हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माझ्या कुटुंबियांनो, जगाच्या कानाकोपऱ्यात स्थायिक झालेल्या माझ्या कुटुंबियांनो,

तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वाच्या मी शुभेच्छा देत आहे.

हा अमृत काळ आपल्या सर्वांसाठी कर्तव्य काळ आहे.

हा अमृत काळ आपल्या सर्वांसाठी भारतमातेसाठी काही तरी करण्याचा काळ आहे.

देशाच्या स्वातंत्र्याची जेव्हा लढाई सुरू होती, 1947 च्या आधी ज्या पिढीचा जन्म झाला त्यांना देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी मिळाली होती. देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी ते गमावत नव्हते. पण आपल्याकडे देशासाठी प्राण अर्पण करण्याची संधी नाही आहे, पण आपल्याकडे देशासाठी जगण्याची यापेक्षा मोठी संधी देखील नाही, आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी देशासाठी जगायचे आहे, याच संकल्पासह या अमृतकाळात 140 कोटी देशवासियांची स्वप्ने संकल्प देखील बनवायची आहेत, 140 कोटी देशवासियांच्या संकल्पांचे सिद्धीमध्येही रुपांतर करायचे  आहे आणि 2047 चा तिरंगा ध्वज  जेव्हा फडकेल तेव्हा जग एका विकसित भारताचे गुणगान करत असेल, याच विश्वासाने, याच संकल्पासह मी तुम्हा सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा देत आहे. खूप खूप अभिनंदन करतो.

जय हिंद, जय हिंद, जय हिंद

भारतमाता की जय, भारतमाता की जय, भारतमाता की जय

वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्

खूप खूप धन्यवाद!

***

NM/JPS/S Tupe/S Thakur/SC/TP/NC/RA/SBC/SP/CY

Follow us on social media: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1948878) Visitor Counter : 431