पंतप्रधान कार्यालय

भारताच्या अध्यक्षतेत एससीओ शिखर परिषदेचे आयोजन

Posted On: 30 MAY 2023 8:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2023

समरकंद येथे 16 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या शिखर परिषदेत भारताने एससीओचे फिरते अध्यक्षपद स्वीकारले. भारताकडे प्रथमच आलेल्या या अध्यक्षीय जबाबदारीअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आभासी पद्धतीने 4 जुलै 2023 रोजी राष्ट्रप्रमुखांच्या एससीओ मंडळाची 23 वी शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे.

चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गीझीस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान अशा सर्व एससीओ सदस्य देशांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. त्याच बरोबर इराण, बेलारूस आणि मंगोलिया या देशांना निरीक्षक राष्ट्रे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. एससीओच्या परंपरेनुसार, तुर्कमेनिस्तान या देशाला सन्माननीय अतिथी म्हणून या परिषदेचे आमंत्रण देण्यात आले आहे. एससीओ संघटनेच्या सचिवालय आणि एससीओ आरएटीएस या दोन संस्थांचे प्रमुख देखील या बैठकीला उपस्थित असतील. त्याच सोबत, संयुक्त राष्ट्रे, आसियान, सीआयएस, सीएसटीओ, ईएईयु आणि सीआयसीए या सहा आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांचे प्रमुख देखील यावेळी उपस्थित असतील.

‘सुरक्षित एससीओच्या दिशेने’ ही यावर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे. त्यातील सुरक्षित म्हणजेच ‘सेक्युअर’ हा शब्द पंतप्रधानांनी वर्ष 2018च्या एससीओ शिखर परिषदेत सुचवला असून त्यामध्ये सुरक्षितता, अर्थव्यवस्था आणि व्यापार, संपर्क, ऐक्य, सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकात्मता यांच्याविषयीचा आदर तसेच पर्यावरण या तत्वांचा अंतर्भाव आहे. भारताच्या अध्यक्षतेदरम्यान या सर्व मूल्यांवर अधिक भर देण्यात येणार आहे.

भारताने स्वतःच्या अध्यक्षतेच्या काळात सहकार्याच्या नव्या स्तंभांची उभारणी केली आहे. ते स्तंभ म्हणजे स्टार्ट अप्स आणि नवोन्मेष; पारंपरिक औषधयोजना; डिजिटल समावेशन; युवा सक्षमीकरण आणि सामायिक बौद्ध वारसा. त्याचबरोबर, भारताने सदस्य देशांदरम्यान असलेले ऐतिहासिक तसेच नागरी संस्कृतीविषयक बंध साजरे करण्यासाठी नागरिकांच्या दरम्यान असलेले संबंध जोपासण्याच्या दृष्टीने कार्य केले आहे. यामध्ये वर्ष 2022-23 साठी पहिल्या एससीओ सांस्कृतिक आणि पर्यटन राजधानीच्या आराखड्याच्या अंतर्गत वाराणसीच्या यजमानपदात आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

एससीओची भारताची अध्यक्षता हा सदस्य देशांतील सक्रीय उपक्रम आणि परस्पर लाभदायक सहकार्याचा कालावधी ठरला आहे. भारताने या दरम्यान मंत्रीस्तरावरील 14 बैठकांसह एकूण 134 बैठका आणि कार्यक्रमांचे आयोजन केले. भारत या काळात संघटनेमध्ये सकारात्मक आणि रचनात्मक भूमिका बजावण्याप्रती कटिबद्ध राहिला आहे आणि अध्यक्षपदाची प्रगती गाठण्याच्या दृष्टीने एससीओ शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाच्या बाबतीत आशादायी आहे. 

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1944986) Visitor Counter : 77