उपराष्ट्रपती कार्यालय

एस. फांगनॉन कोन्याक या राज्यसभेचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या नागालँड मधील पहिल्या महिला सदस्या ठरल्या आहेत


राज्यसभा अध्यक्षांनी उपाध्यक्षपदाच्या पॅनलमध्ये पहिल्यांदाच चार महिला खासदारांची केली नियुक्ती

Posted On: 25 JUL 2023 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2023

नागालँडच्या राज्यसभेतील पहिल्या महिला सदस्या, फांगनॉन कोन्याक यांनी आज राज्यसभेचे अध्यक्षपद भूषवले, हे पद भूषवण्याऱ्या नागालँडच्या पहिल्या महिला म्हणून त्यांची राज्यसभेच्या इतिहासात नोंद होईल. यापूर्वी 17 जुलै 2023 रोजी उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्या म्हणून त्यांनी इतिहास रचला होता.

स्त्री-पुरुष समानता प्रत्यक्षात आणण्यासाठी एक उल्लेखनीय पाऊल उचलत, राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी गेल्या आठवड्यात चार महिला सदस्यांना (एकूण संख्येच्या 50%) उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नामांकित केले होते.

एका ऐतिहासिक पाऊल उचलत, राज्यसभा अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी 50% महिला संसद सदस्यांसह उपसभापतींच्या पॅनेलची पुनर्रचना केली.

नामनिर्देशित झालेल्या चारही महिला खासदार पहिल्यांदाच सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.

या समितीमध्ये नामनिर्देशित सर्व महिला सदस्य पहिल्यांदाच निवडून आलेल्या संसद सदस्य आहेत, हे ही विशेष उल्लेखनीय. पावसाळी अधिवेशनापूर्वी पुनर्गठित केलेल्या या समितीमध्ये एकूण आठ नावे आहेत, त्यापैकी निम्म्या महिला आहेत. वरिष्ठ सभागृहाच्या इतिहासात उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये महिला सदस्यांना समान प्रतिनिधित्व देण्याची ही पहिलीच वेळ आहे.उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये गेल्या आठवड्यात नामनिर्देशित करण्यात आलेल्या महिला सदस्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

पी.टी.उषा

  • या पद्मश्री सन्मान विजेत्या आणि सुप्रसिध्द धावपटू आहेत. जुलै 2022 मध्ये राज्यसभेसाठी त्यांची निवड करण्यात आली.
  • त्या संरक्षणविषयक समिती, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची सल्लागार समिती तसेच नीतीशास्त्र समितीच्या सदस्य आहेत.

एस. फांगनॉन कोन्याक:

  • त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्य आहेत. एप्रिल 2022 मध्ये नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत तर नागालँड राज्यातून संसदेच्या दोन्हीपैकी एका सभागृहात किंवा राज्य विधानसभेवर निवडून आलेल्या दुसऱ्या महिला आहेत.
  • त्या वाहतूक, पर्यटन आणि संस्कृती समिती तसेच केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाची सल्लागार समिती, महिला सक्षमीकरण समिती, सदन समिती यांच्या सदस्य आहेत आणि शिलाँगच्या इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या ईशान्य प्रदेशाच्या  प्रशासकीय परिषदेच्या सदस्य आहेत.

डॉ.फौजिया खान:

  • त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य आहेत.  एप्रिल 2020 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती.
  • त्या महिला सक्षमीकरण समिती, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समिती तसेच  कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.

सुलता देव:

  • त्या बिजू जनता दलाच्या सदस्य आहेत. जुलै 2022 मध्ये त्यांची  राज्यसभेवर निवड झाली होती.
  • त्या उद्योग समिती, महिला सक्षमीकरण समिती, लाभाच्या पदासंबंधीची संयुक्त समिती, खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) समिती तसेच महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.

 

S.Patil/Radhika/Sanjana/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 (Release ID: 1942558) Visitor Counter : 198