आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
पहिल्या जागतिक अन्न नियामक शिखर परिषद 2023 चे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते उद्घाटन, केंद्रीय शेती आणि कृषी कल्याणमंत्री नरेंद्र तोमर आणि नेपाळचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री डॉ. बेडू राम भुसाल यांची कार्यक्रमाला उपस्थिती
अन्नधान्य, अन्नाचे संरक्षण आणि जागतिक शाश्वत विकासासाठी अन्न सुरक्षा या विषयांचा सखोल अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. ‘एक आरोग्य’ दृष्टीकोनांतर्गत एक व्यवस्था निर्माण करण्याची अतिशय महत्त्वाची जबाबदारी अन्न नियामकांवर आहे- डॉ. मांडविया
भारतातील कृषी क्षेत्र आणि अन्न उद्योगाचा आकार आणि आकारमान यांचा विचार करता अन्न सुरक्षा आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी कृषी क्षेत्रातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे उत्पादने अखेरच्या टप्प्यात ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळीचा विचार करणे अतिशय गरजेचे- नरेंद्र सिंह तोमर
Posted On:
20 JUL 2023 3:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जुलै 2023
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि विशेष अतिथी म्हणून नेपाळचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री डॉ. बेडू राम भुसाल यांच्या उपस्थितीत आज पहिल्या वहिल्या जागतिक अन्न नियामक शिखर परिषद 2023चे उद्घाटन केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रोफेसर एस. पी. सिंग बाघेल आणि डॉ. भारती प्रवीण पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या कक्षेत असलेल्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून अन्न मूल्य साखळी अंतर्गत नियामक चौकट आणि अन्न सुरक्षा प्रणाली बळकट करण्यासंदर्भात विचार आणि दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी अन्न नियामकांना जागतिक मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
“सुरक्षित अन्न आणि चांगले आरोग्य हे परस्परपूरक असते. संतुलित, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न रोगप्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे काम करते आणि आपले आरोग्य आणि निरामयता सुनिश्चित करते,” डॉ. मांडविया म्हणाले. अन्न सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले की अन्नधान्य, अन्नाचे संरक्षण आणि जागतिक शाश्वत विकासासाठी अन्न सुरक्षा या विषयांचा सखोल अभ्यास करणे अतिशय महत्त्वाचे आहे. एक आरोग्य दृष्टीकोनांतर्गत, आरोग्यदायी वातावरण, मानव, पशु आणि वनस्पती याकडे एकत्रितपणे पाहणारा एक एकात्मिक मंच उपलब्ध करून देणारी एक प्रणाली तयार करण्याची अतिशय मोठी जबाबदारी अन्न नियामकांवर आहे, असे त्यांनी सांगितले. सध्या सुरू असलेल्या भारताच्या जी-20 अध्यक्षते अंतर्गत एक आरोग्य ही आरोग्य कार्यगटासाठी एक महत्त्वाची प्राधान्याची बाब बनली आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करताना डॉ. मांडविया म्हणाले, “ ‘वसुधैव कुटुंबकम् : एक पृथ्वी, एक देश’ या भारताच्या या वर्षाच्या जी-20 अध्यक्षतेच्या संकल्पनेसोबत ही परिषद अतिशय सुसंगत आहे.” विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये कृषी आणि हवामानविषयक विविधता असल्याने अन्न सुरक्षाविषयक नियमावलीमध्ये कोणतेही एक मानक लागू करता येणार नाही. त्यामुळे आपल्याला प्रादेशिक विविधतांचे जागतिक सर्वोत्तम पद्धतींमध्ये कशा प्रकारे वर्गीकरण करता येईल, त्याचा विचार करणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
डॉ. मांडविया यांनी अन्न आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून मृदा आरोग्याच्या पैलूवर प्रकाश टाकला. सरकारने अलीकडेच घोषित केलेल्या PM-PRANAM योजनेची ठळक वैशिष्ट्येही त्यांनी सांगितली. ही योजना धान्य लागवडीमध्ये रसायने आणि खतांचा संतुलित वापर करण्यास प्रोत्साहन देते तसेच शेतकऱ्यांना सेंद्रिय उत्पादन घेण्यासारखी आणि नैसर्गिक आणि पर्यायी शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करते. सर्व देशांनी वसुधैव कुटुंबकम या भावनेने एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन डॉ. मांडविया यांनी केले. कारण अन्नाचा तुटवडा ही जागतिक समस्या असून ही समस्येचे निराकरण करण्यासाठी एकत्रितपणे उपाययोजना आवश्यक आहेत, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे नरेंद्रसिंग तोमर म्हणाले की, अन्न हा मूलभूत अधिकार आहे आणि त्याची उपलब्धता तसेच परवडणाऱ्या दरात ते उपलब्ध होईल, हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. “भारतातील कृषी क्षेत्र आणि अन्न उद्योगाचा विस्तार आणि परिमाण लक्षात घेता, अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी कृषी उत्पादकांपासून ती उत्पादने अंतिम ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी जाळ्याचा विचार करणे अत्यावश्यक आहे" असेही ते म्हणाले.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांनी आपल्या ध्वनीमुद्रित व्हिडिओ संदेशाद्वारे, ही पहिली जागतिक अन्न नियामक परिषद आयोजित केल्याबद्दल केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI ) यांचे अभिनंदन केले. "सर्वांना, सर्वत्र सुरक्षित आणि पौष्टिक अन्नाचा लाभ घेता येईल हे आपण सर्वांनी एकत्रितरित्या सुनिश्चित केले पाहिजे" असे हे डॉ. टेड्रोस गेब्रेयसस आपल्या संदेशात म्हणाले.
यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सामान्य नियामक व्यासपीठ 'संग्रह' - राष्ट्रांसाठी सुरक्षित अन्न: जागतिक अन्न नियामक प्राधिकरण पुस्तिका देखील प्रकाशित केली. ही पुस्तिका म्हणजे, जगभरातील 76 देशांच्या अन्न नियामक प्राधिकरणांचा डेटाबेस असून यात त्या देशांचे आदेश, अन्न सुरक्षा व्यवस्था, अन्न चाचणी सुविधा, अन्न प्राधिकरणांचे संपर्क तपशील, SPS/TBT/Codex/WAHO इत्यादींचा समावेश आहे. 'संग्रह' हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त गुजराती, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या सहा प्रादेशिक भाषांमध्ये देखील उपलब्ध आहे.
डॉ. मांडविया यांनी जागतिक अन्न नियामक शिखर परिषद - 2023 दरम्यान दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनही केले. हे प्रदर्शन अन्न सुरक्षा, अन्न मानके, अन्न चाचणी क्षमता, उत्पादन सुधारणा आणि अन्न तंत्रज्ञानातील प्रगती याविषयी कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एक मार्ग प्रदान करेल. या प्रदर्शनात 35 तज्ञ आपले अनुभव आणि योगदान याविषयी माहिती देतील. प्रदर्शनात श्री अन्न (भरड धान्य) वरील स्टॉल्स देखील लावण्यात आले आहेत.
या व्यासपीठाचा उपयोग, शिकण्यासाठी, अन्न सुरक्षा सुधारण्यासाठी, संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि शाश्वत मार्गाने अन्न सुरक्षेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक यंत्रणा तयार करावी असे आवाहन जी-20 शेर्पा अमिताभ कांत यांनी केले. लवचिक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्याची गरज ओळखून अन्नाची नासाडी कमी करणे, अन्न पुरवठा वाढविण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करणे आणि भरड धान्यासारख्या सर्व हवामानात टिकणाऱ्या पिकांच्या वापरास प्रोत्साहन देणे यावर अमिताभ कांत यांनी भर दिला.
* * *
R.Aghor/Shailesh/Shraddha/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941005)
Visitor Counter : 205