पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान 7-8 जुलै रोजी 4 राज्यांना भेट देणार ; सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार


पंतप्रधान 7 जुलैला छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देणार; तर 8 जुलै रोजी तेलंगण आणि राजस्थानचा दौरा

पंतप्रधान रायपूरमध्ये सुमारे 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार

पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी,पंतप्रधान छत्तीसगडमधील पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार

गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान सहभागी होणार

गोरखपूर - लखनौ आणि जोधपूर - अहमदाबाद (साबरमती) यांना जोडणाऱ्या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार

पंतप्रधानांच्या हस्ते होणार गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी

पंतप्रधान वाराणसीमध्ये 12,100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार

समर्पित मालवाहतुकीसाठीच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन - सोन नगर रेल्वेमार्गाचे पंतप्रधान करणार उद्घाटन

वाराणसी ते लखनौ सुलभ आणि जलद प्रवासासाठीच्या राष्ट्रीय महामार्ग -56 च्या वाराणसी-जौनपूर चौपदरीकरण क्षेत्राचे पंतप्रधान करणार लोकार्पण

मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान करणार पायाभरणी

पंतप्रधान उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी कर्ज, पीएमएवाय ग्रामीण घरांच्या चाव्या आणि आयुष्मान कार्डचे वाटप करणार

वरंगलमध्ये सुमारे 6,100 कोटी रुपयांच्या अनेक रस्ते आणि रेल्वे पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी पंतप्रधान करणार पायाभरणी

बिकानेरमध्ये पंतप्रधान 24,300 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार

पंतप्रधान अमृतसर - जामनगर आर्थिक कॉरिडॉरचा सहापदरी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे खंड आणि हरित ऊर्जा कॉरिडॉरसाठी आंतर-राज्य पारेषण वाहिनीचा टप्पा-1 राष्ट्राला समर्पित करतील

बिकानेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान करणार पायाभरणी

Posted On: 05 JUL 2023 7:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2023

पंतप्रधान  नरेंद्र मोदी 7-8 जुलै 2023 रोजी चार राज्यांचा दौरा करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशला भेट देतील. तर  8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगण आणि राजस्थानला भेट देणार आहेत.

दिनांक 7 जुलै रोजी, सकाळी 10:45 च्या सुमाराला, पंतप्रधानांच्या हस्ते  रायपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांची  पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होईल.  उत्तर प्रदेशमधील गोरखपूर  येथे दुपारी 2:30 च्या सुमाराला  पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे  गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात ते  सहभागी होतील.  त्यानंतर ते  गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, संध्याकाळी 5 च्या सुमारास, वाराणसी येथे पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे  ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण  करतील.

दिनांक 8 जुलै रोजी, सकाळी 10:45 वाजता, तेलंगण राज्यातील वरंगल येथे पंतप्रधानांचे आगमन होणार असून ते  एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात  ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधानांचे  दुपारी 4:15 च्या सुमारास  बिकानेर येथे आगमन होईल.  तिथे  ते राजस्थानमधील विविध  विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण  करतील.

पंतप्रधानांचा रायपूर दौरा

पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी पंतप्रधान सुमारे 6,400 कोटी रुपयांच्या पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करतील. राष्ट्रार्पण केल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये  जबलपूर-जगदलपूर राष्ट्रीय महामार्गावरील 33 किमी लांबीच्या रायपूर ते कोडेबोड चौपदरी क्षेत्राचा समावेश आहे. पर्यटनाला चालना देण्याबरोबरच, हे क्षेत्र जगदलपूरजवळील पोलाद प्रकल्पातून  तयार उत्पादने व कच्च्या मालाच्या वाहतुकीसाठी  अत्यंत महत्त्वपूर्ण असून ते लोहखनिज समृद्ध भागांना जोडते. पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग -130 च्या बिलासपूर ते  अंबिकापूर पट्ट्यातील  53 किमी लांबीचे   बिलासपूर-पत्रापली  चौपदरी क्षेत्रही  राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे  छत्तीसगड आणि  उत्तर प्रदेश अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाण्यास मदत होईल  आणि लगतच्या भागात कोळसा खाणींना कनेक्टिव्हिटी मिळून कोळसा वाहतुकीला चालना मिळेल.

रायपूर-विशाखापट्टणम कॉरिडॉरच्या सहा पदरी  ग्रीनफिल्ड क्षेत्रातल्या   छत्तीसगड विभागासाठी तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग  130 सीडीवरील 43 किमी लांबीच्या सहा लेनच्या झांकी-सर्गी विभाग, राष्ट्रीय महामार्ग 130 सीडीवर 57 किमी लांबीचा सहा पदरी  सरगी-बसनवाही विभाग; आणि राष्ट्रीय महामार्ग -130 सीडीचा  25 किमी लांबीचा सहा पदरी  बसनवाही-मरंगपुरी विभाग यांचाही विकास यात समाविष्ट आहे. उदंती  वन्यजीव अभयारण्य क्षेत्रातील  वन्यजीवांच्या अनिर्बंध हालचालीसाठी प्राण्यांचे  27रस्ते  आणि  माकडांसाठी 17 वितान असलेला 2.8 किमी लांबीचा सहा  पदरी  बोगदा यात महत्त्वपूर्ण आहे. या प्रकल्पांमुळे धमतरीमधील भात गिरण्यांना  आणि कांकेरमधील बॉक्साईट समृद्ध भागाला अधिक  चांगली कनेक्टिव्हिटी  मिळेल आणि कोंडागावमधील हस्तकला उद्योगालाही फायदा होईल. एकूणच, या प्रकल्पांमुळे या प्रदेशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला मोठी चालना  मिळेल.

103 किमी लांबीच्या, 750 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या रायपूर-खरियार रोड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणच्या कामाचेही पंतप्रधान राष्ट्राला समर्पण करतील. या मार्गामुळे छत्तीसगडमधील उद्योगांसाठी बंदरांमधून कोळसा, पोलाद, खते आणि इतर वस्तूंची वाहतूक करणे, सुलभ होईल.  केओटी - अंतागड यांना जोडणारा 17 किमी लांबीचा नवीन रेल्वे मार्गही ते राष्ट्राला समर्पित करतील. 290 कोटी रुपये खर्च करून विकसित केलेला हा नवीन रेल्वे मार्ग भिलाई पोलाद कारखान्याला दल्ली राजहरा आणि रोघाट भागातील लोह खनिज खाणींच्या भागाशी जोडेल तसेच घनदाट जंगलांमधून जाणाऱ्या दक्षिण छत्तीसगडच्या दुर्गम भागांना जोडेल.

कोरबा येथे 130 कोटी रुपयांहून अधिक खर्च करून बांधण्यात आलेला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचा वार्षिक 60 हजार मेट्रिक टन क्षमतेचा बॉटलिंग प्रकल्पही पंतप्रधान राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर, पंतप्रधान आयुष्मान भारत अंतर्गत लाभार्थ्यांना 75 लाख कार्ड वितरण करण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात होईल.

पंतप्रधान-गोरखपूर दौरा

पंतप्रधान गोरखपूर येथील गीता प्रेसला भेट देतील आणि या ऐतिहासिक मुद्रणालयाच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान ते चित्रमय शिवपुराण ग्रंथाचे प्रकाशन करतील. गीता प्रेसमधील लीला चित्र मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत.

गोरखपूर रेल्वे स्थानकावरून पंतप्रधान दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना  हिरवा झेंडा दाखवतील. या दोन गाड्या आहेत:  गोरखपूर – लखनऊ वंदे भारत एक्सप्रेस आणि जोधपूर – अहमदाबाद (साबरमती) वंदे भारत एक्सप्रेस.

गोरखपूर - लखनऊ वंदे भारत एक्स्प्रेस अयोध्येतून जाईल आणि उत्तरप्रदेश राज्यातील महत्त्वाच्या शहरांशी संपर्क साधेल आणि पर्यटनालाही चालना देईल. जोधपूर – साबरमती वंदे भारत एक्सप्रेसमुळे जोधपूर, अबू रोड, अहमदाबाद यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणांशी संपर्क करणे सुलभ होईल आणि या प्रदेशातील सामाजिक आर्थिक विकासाला चालना मिळेल.

गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणीही पंतप्रधान करणार आहेत. सुमारे रु. 498 कोटी खर्च करून या स्थानकाचा पुनर्विकास होत असून जागतिक दर्जाच्या सुविधा प्रवाशांना पुरविण्यात येणार आहे.

मणीकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांची पुनर्रचना आणि पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी देखील पंतप्रधान करतील. या घाटांच्या पुनर्विकासामुळे लोकांच्या सोयीसुविधा, प्रतीक्षा क्षेत्रे, लाकूड साठवणूक, कचऱ्याची विल्हेवाट आणि पर्यावरण स्नेही दहनाच्या चिता आदि सुविधांची तरतूद करण्यात येईल.

दशाश्वमेध घाटावरील कपडे बदलण्यासाठी केलेल्या तरंगत्या जेट्टींच्या धर्तीवर वाराणसीमध्ये गंगा नदीवर महत्त्वाच्या 6 धार्मिक स्नान घाटांवर कपडे बदलण्यासाठी तरंगत्या जेट्टी उभारणी प्रकल्पाचा आणि सीआयपीईटी संकुल करसरा येथील विद्यार्थी वसतिगृह यांचा देखील पायाभरणी होणाऱ्या इतर प्रकल्पांमध्ये समावेश आहे.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या कर्जांचे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांच्या चाव्यांचे आणि आयुष्मान भारत कार्डांचे उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांना वितरण करतील. यामुळे प्रधानमंत्री आवास योजनेच्या पाच लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेशाचा, 1.25 लाख पीएमस्वनिधी कर्जाचे पात्र लाभार्थ्यांना वितरण करण्याचा  आणि 2.88 कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा प्रारंभ होईल.

वरंगलमध्ये पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगणमध्ये 6100 कोटी रुपये खर्चाच्या विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांची पायाभरणी करतील.

5500 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या 176 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील. या प्रकल्पांमध्ये नागपूर- विजयवाडा मार्गिकेच्या मंचेरियल- वरंगल या 108 किमी. लांबीच्या सेक्शनचा समावेश आहे. यामुळे मंचेरियल आणि वरंगल यामधील अंतर सुमारे 34 किमीने कमी होईल आणि त्यामुळे प्रवासाच्या वेळेत कपात होईल आणि एनएच-44 आणि एनएच-65 यावरील वाहतूककोंडी कमी होईल. पंतप्रधान एनएच-563 च्या करीमनगर- वारंगळ या 68 किमी लांबीच्या सेक्शनचे अद्ययावतीकरण करून सध्या दोन मार्गिका असलेल्या या प्रकल्पाचे चार मार्गिकांमध्ये रुपांतर  करण्याच्या प्रकल्पाची देखील पायाभरणी करतील. यामुळे  हैदराबाद-वारंगळ औद्योगिक मार्गिका, काकतीया मेगा टेक्स्टाईल पार्क आणि वरंगल येथे एक एसईझेड यांच्या सोबतच्या कनेक्टिविटीमध्ये सुधारणा होईल.

काझीपेठ येथे रेल्वे उत्पादन केंद्राच्या उभारणीच्या प्रकल्पाची देखील पंतप्रधान पायाभरणी करतील.  500 कोटी  रुपयांहून जास्त खर्चाने उभारण्यात येणाऱ्या आधुनिक उत्पादन केंद्रामध्ये वॅगन उत्पादनाची जास्त क्षमता निर्माण होईल. हे केंद्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मानकांसह आणि वॅगन्सचे रोबोटिक पेंटिंग, आधुनिक सामग्री साठवणूक आणि हाताळणी  यांसारख्या सुविधांसह सुसज्ज असेल. यामुळे स्थानिक रोजगारांची निर्मिती आणि जवळच्या भागांमध्ये पूरक सामग्री पुरवणाऱ्या उद्योगांचा विकास होईल.

पंतप्रधान बिकानेरमध्ये

पंतप्रधान बिकानेरमध्ये या भागातील पायाभूत सुविधा आणि कल्याणात वाढ करण्याच्या उद्देशाने उभारल्या जाणाऱ्या 24,300 कोटी रुपयांहून जास्त खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील.

पंतप्रधान अमृतसर- जामनगर आर्थिक मार्गिकेच्या सहा पदरी ग्रीनफील्ड एक्स्प्रेसवे सेक्शनचे लोकार्पण करतील. राजस्थानमध्ये हनुमानगड जिल्ह्यातील जाखडवाली गावापासून खेतलावास गावापर्यंत 500 किमीपेक्षा जास्त अंतरावर पसरलेल्या या सेक्शनची उभारणी सुमारे 11,125 कोटी रुपये खर्चाने होणार आहे. या द्रुतगती मार्गामुळे महत्त्वाची शहरे आणि औद्योगिक मार्गिकांसोबतच्या कनेक्टिविटीमध्ये सुधारणा होईल आणि प्रवासाचा वेळ कमी होईल. या द्रुतगती मार्गामुळे केवळ मालवाहतूकच सहजतेने होणार नाही तर या मार्गावर पर्यटन आणि आर्थिक विकासाला देखील चालना मिळणार आहे.

या भागाच्या ऊर्जा क्षेत्राला बळकट करण्यासाठी पंतप्रधान सुमारे 10,950 कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा मार्गिकेसाठी आंतरराज्य पारेषण वाहिनीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करतील. हरित ऊर्जा मार्गिका सुमारे 6 गिगावॉट अक्षय ऊर्जा एकात्मिकरण करेल आणि पश्चिम भागात औष्णिक वीजनिर्मिती आणि उत्तर भागात जलविद्युतनिर्मितीने अक्षय ऊर्जेच्या ग्रीड संतुलनात मदत करेल आणि उत्तर आणि पश्चिम भागातील पारेषण क्षमतेला बळकटी देईल. पंतप्रधान बिकानेर ते भिवाडी पारेषण वाहिनीचे देखील लोकार्पण करतील. सुमारे 1340 कोटी रुपये खर्चाने पॉवर ग्रिडकडून विकसित होणाऱ्या बिकानेर ते भिवाडी या पारेषण वाहिनीमुळे राजस्थानमध्ये 8.1 गिगावॉट सौर ऊर्जेचे वहन करता येणार आहे.

पंतप्रधान बिकानेर येथे 30 खाटांच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळ(ESIC) रुग्णालयाचे देखील लोकार्पण करतील. या रुग्णालयाचा 100 खाटांपर्यत विस्तार करण्याची क्षमता आहे. हे रुग्णालय स्थानिक समुदायांच्या आरोग्यविषयक गरजा भागवणारे, सहजतेने उपलब्ध असणाऱ्या दर्जेदार आरोग्यसुविधा पुरवणारे महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून सेवा करणार आहे.     

त्याबरोबरच पंतप्रधान बिकानेर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची देखील पायाभरणी करतील. सुमारे 450 कोटी रुपये खर्चाने होत असलेल्या या विकास प्रकल्पात सर्व फलाटांचे नवीन लाद्या आणि छतासह नूतनीकरण करण्यात येईल. या कामादरम्यान रेल्वे स्थानकाच्या सध्याच्या रचनेचे वारसास्थानाचे स्वरुप जतन करून हा प्रकल्प राबवण्यात येईल. 

43 किमी लांबीच्या चुरु- रतनगड सेक्शनचे दुहेरी मार्गात रुपांतर करण्याच्या प्रकल्पाची देखील पंतप्रधान पायाभरणी करणार आहेत. हा रेल्वेमार्ग दुहेरी केल्यामुळे कनेक्टिविटीमध्ये वाढ होणार आहे आणि  जिप्सम, चुनखडी, अन्नधान्य आणि खत उत्पादनांची बिकानेरहून देशाच्या उर्वरित भागात वाहतूक करणे अतिशय सोपे होणार आहे.

 

JPS/SRT/NC/Sonali/Sampada/Shailesh P/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1937607) Visitor Counter : 139