गृह मंत्रालय

“अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिना” निमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांच्या बाबतीत जे शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले आहे त्याचे चांगले परिणाम आज दिसू लागले आहेत

आम्ही निर्धार केला आहे की आम्ही भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालू देणार नाही आणि भारताच्या माध्यमातून अंमली पदार्थांचा जगात कोठेही प्रसार होऊ देणार नाही

Posted On: 26 JUN 2023 11:55AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 26 जून 2023  


केंद्रीय गृह तसेच सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमली पदार्थांच्या बाबतीत जे शून्य सहिष्णुता धोरण स्वीकारले आहे त्याचे चांगले परिणाम आज दिसू लागले आहेत. मोदी सरकारचे “संपूर्णतः सरकार” हा दृष्टीकोन या धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. या दृष्टीकोनानुसार सरकारच्या विविध विभागांमधील समन्वयातून धोरणाला आणखी प्रभावी बनवण्यात येते.

“अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिना”निमित्त पाठवलेल्या संदेशात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, आज 26 जून 2023 रोजी होत असलेल्या “अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी दिन” प्रसंगी अंमली पदार्थांच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संस्थांचे आणि लोकांचे मी मनापासून अभिंनदन करतो. अंमली पदार्थ विरोधी विभाग या वेळेस देखील अखिल भारतीय पातळीवर ‘नशा मुक्त पंधरवड्या’चे आयोजन करत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले.
 
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की आम्ही भारतात अंमली पदार्थांचा व्यापार चालू देणार नाही आणि भारताच्या माध्यमातून अंमली पदार्थांचा जगात कोठेही प्रसार होऊ देणार नाही असा निश्चय आम्ही केला आहे. देशातील सर्व प्रमुख संस्था, विशेषतः “अंमली पदार्थ विरोधी विभागा”ने, अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा सतत सुरु ठेवला आहे असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, या अभियानाला आणखी बळ देण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने 2019 मध्ये एनकॉर्ड (एनसीओआरडी)ची स्थापना केली तसेच प्रत्येक राज्याच्या पोलीस दलामध्ये अंमली पदार्थ विरोधी कृती दलाची (एएनटीएफ) स्थापना केली. यावर्षी एप्रिल महिन्यात दिल्लीमध्ये या कृती दलाचे पहिले राष्ट्रीय संमेलन पार पडले अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि दुषप्रभावांच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर सहाय्यकारी व्यासपीठांच्या माध्यमातून युद्ध स्तरीय अभियान चालवले जात आहे, असे अमित शहा यांनी सांगितले. 2006 ते 2013 दरम्यान केवळ 768 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, मात्र अमली पदार्थांच्या विरोधात आपण देत असलेल्या समन्वयित आणि व्यापक लढ्याचाच हा परिणाम आहे की ज्यामुळे 2014 ते 2022 या काळात सुमारे तीस पट अधिक म्हणजेच 22 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. आणि अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या लोकांच्या विरोधात पूर्वीच्या तुलनेत 181% अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. यातून अमली पदार्थ मुक्त भारताप्रति मोदी सरकारची कटीबद्धता दिसून येते. यासोबतच जून 2022 मध्ये जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांचा पुनर्वापर रोखण्यासाठी एक अभियान चालवण्यात आले ज्या अंतर्गत आजवर देशभरात जप्त करण्यात आलेले सुमारे 6 लाख किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले आहेत.

अमली पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या शेताची विल्हेवाट लावणे असो किंवा जनजागृती कार्यक्रम असो गृहमंत्रालय, सर्व संस्था आणि राज्यांच्या समन्वयाने अमली पदार्थ मुक्त भारत निर्माण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. पण ही लढाई लोकसहभागाशिवाय जिंकली जाऊ शकत नाही, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले. तुम्ही स्वतःला तसेच आपल्या परिवाराला अमली पदार्थांपासून दूर ठेवावे, असे आवाहन मी याप्रसंगी सर्व देशवासीयांना करत आहे, असेही शहा म्हणाले. अमली पदार्थ केवळ युवा पिढी आणि समाजाला जर्जर करत नाही तर याच्या तस्करीतून प्राप्त झालेले धन देश सुरक्षेच्या विरोधात वापरले जाते. या धनाच्या दुरुपयोगाच्या विरोधी युद्धात आपण सर्वांनी हिरीरीने सहभागी झाले पाहिजे. तुमच्या आसपास होत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यापाराची माहिती सुरक्षा संस्थांना अवश्य द्या. आपण सर्वजण सामूहिक प्रयत्नातून मली पदार्थांची समस्या समूळ नष्ट करण्यात सफल होऊ आणि अमली पदार्थ मुक्त भारताचे आपले उद्दिष्ट साध्य करू, असा मला विश्वास असल्याचे अमित शहा म्हणाले. पुढे अमित शहा म्हणाले की, मोदी सरकारच्या अमली पदार्थ मुक्त भारताच्या संकल्प पूर्तीसाठी योगदान देणाऱ्या अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) आणि अन्य संस्थांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि अशी अपेक्षा करतो की जोपर्यंत आपण हे युद्ध जिंकणार नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

 

***

S Tupe/Sanjana C/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935347) Visitor Counter : 319