माहिती आणि प्रसारण मंत्रालय
फ्रान्समधील ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात भारताची सृजनशील अर्थव्यवस्थेचे दर्शन
माहिती आणि प्रसारण सचिवांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने मंत्रालयाने एव्हीजीसी क्षेत्राला दिलेले प्रोत्साहन अधोरेखित केले ; भारतात आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सव आयोजित करण्याच्या शक्यतांवर केली चर्चा
Posted On:
14 JUN 2023 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2023
भारत या वर्षी प्रथमच ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात सहभागी होत आहे. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शिष्टमंडळ ऍनिमेशन उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत एनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवात जगभरातील प्रेक्षकांसाठी ऍनिमेशन आणि व्हीएफएक्स सामग्री निर्मितीतील भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देत आहेत.
भारत अलीकडे जगभरातील निर्मात्यांसाठी व्हीएफएक्स आणि ऍनिमेशन सामग्रीसाठी एक पसंतीचे ठिकाण म्हणून उदयाला आला आहे. 2021 मध्ये भारतातील ऍनिमेशन आणि व्हीएफएक्स बाजारपेठेचे मूल्य 109 अब्ज रुपये राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता , यापैकी व्हीएफएक्स व्यवसाय केवळ 50 अब्ज रुपये असेल. E&Y अहवालानुसार 2024 पर्यंत हा आकडा 180 अब्ज रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खरेदीदारांसमोर या क्षेत्रातील आपली क्षमता देशाने प्रदर्शित केल्यामुळे ऍनेसीमधील भारताच्या सहभागाला अधिक महत्त्व आहे.
भारताच्या सहभागाबद्दल बोलताना चंद्र म्हणाले, "भारतातील ऍनिमेशन , गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्र जागतिक दर्जाची तंत्रे आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून, प्रचंड प्रतिभावान व्यावसायिकांच्या समूहासह प्रगती करत आहे.भारत काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जो भारतात एव्हीजीसी सामग्री बनवण्यासाठी परदेशी कंपन्यांना रोख स्वरूपात प्रोत्साहन देत आहे. भारतात चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनासारखेच हे आहे. याचा फायदा घेण्याची कंपन्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. एक देश म्हणून आम्ही उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी , तसेच भारतात निर्मिती-पूर्व आणि निर्मिती नंतरच्या कामांना देखील मदत करण्यासाठी वचनबद्ध आहोत आहे. "
महोत्सवात चंद्र यांनी ऍनेसी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन महोत्सवाचे संचालक मायकेल मारिन यांची भेट घेतली आणि एनेसीमध्ये भारताचा सहभाग बळकट करण्याच्या शक्यता तसेच भारतात ऍनिमेशन महोत्सव आयोजित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील संभाव्य सहकार्याबाबत चर्चा केली. चंद्र यांनी सरस्वती यंत्राच्या संकल्पनेवर आधारित इंडिया पॅव्हेलियनचे उद्घाटन केले आणि 2023 मध्ये प्रतिष्ठित ऍनेसी महोत्सव स्पर्धेत प्रवेश मिळवलेल्या भारतीय सर्जनशील समुदायाशी संवाद साधला. युवा निर्माते अरविंद जीना, निकिता प्रभुदेसाई जीना, उपमन्यू भट्टाचार्य, कल्प संघवी यांच्यासह सरस्वती वाणी बालगम, किरीट खुराना, बिरेन घोष, अनिल वानवारी आणि अॅनी दोशी यांसारखी उद्योग क्षेत्रातील मान्यवर मंडळी या महोत्सवात उपस्थित होती.
याशिवाय चंद्र यांनी इतर देशांतील प्रतिनिधींशी संवाद साधला आणि एव्हीजीसी क्षेत्राशी संबंधित मंत्रालयाच्या विविध उपक्रमांविषयी तसेच भारत सरकारने या क्षेत्रात व्यवसाय सुलभतेसाठी दिलेले प्रोत्साहन यावर चर्चा केली.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1932328)
Visitor Counter : 165