मंत्रिमंडळ सचिवालय
azadi ka amrit mahotsav

अरबी समुद्रात येऊ घातलेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (NCMC) बैठक

Posted On: 12 JUN 2023 6:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2023

अरबी समुद्रात येऊ घातलेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यासाठी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. या बैठकीत त्यांनी  गुजरात सरकार आणि केंद्रीय मंत्रालये/संस्थांच्या तयारीचा आढावा घेतला.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) महासंचालकांनी समितीला पूर्व मध्य अरबी समुद्रावरील अत्यंत तीव्र चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ च्या सद्यस्थितीची माहिती दिली. 14 तारखेच्या सकाळपर्यंत हे चक्रीवादळ जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, नंतर ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकून 15 जूनच्या दुपारपर्यंत सौराष्ट्र आणि कच्छ तसेच जखाऊ बंदर, मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यानची लगतची पाकिस्तान किनारपट्टी पार करेल. यावेळी या चक्रीवादळाची तीव्रता 125-135 किमी प्रतितास असेल आणि यावेळी150 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (NDRF) याआधीच 12 तुकड्या तैनात केल्या आहेत आणि 3 अतिरिक्त तुकड्या गुजरातमध्ये सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय, 15 तुकड्या, म्हणजे, अरकोनम (तामिळनाडू), मुंडली (ओडिशा) आणि भटिंडा (पंजाब) येथे प्रत्येकी 5 तुकड्यांना तात्काळ हवाई  कारवाईसाठी सतर्क ठेवण्यात आले आहे. जहाजे आणि विमानांसह तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.

यावेळी कॅबिनेट सचिव म्हणाले की, समुद्रातील मच्छीमारांना परत बोलावण्यात यावे आणि हे चक्रीवादळ जमिनीवर धडकण्यापूर्वी असुरक्षित भागातील लोकांना वेळेत बाहेर काढले जाईल याची खात्री केली पाहिजे. कॅबिनेट सचिवांनी गुजरात सरकारला आश्वासन दिले की, सर्व केंद्रीय संस्था कारवाईसाठी तयार आहेत आणि मदतीसाठी उपलब्ध असतील.

या बैठकीला गुजरातचे मुख्य सचिव, केंद्रीय गृह सचिव, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव, ऊर्जा, बंदरे, जहाज आणि जलमार्ग, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिवटेलिकॉम विभागाचे महासंचालक, एनडीएमए, सीआयएससी आयडीएसचे सदस्य सचिव, आयएमडी चे महासंचालक एनडीआरएफचे महासंचालक, कोस्ट गार्ड आणि गृह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

 

S.Bedekar/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1931752) Visitor Counter : 178