Posted On:
27 MAY 2023 5:44PM by PIB Mumbai
समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आज नवी दिल्लीत विज्ञान भवनात एकत्र आले असून, त्यांनी, “जन जन का विश्वास” या सत्रात आपली मते मांडली. गेल्या नऊ वर्षात, केंद्र सरकारची धोरणे आणि कार्यक्रम, यातून देशाचा सर्वसमावेशक विकास होण्यास कसा हातभार लागला आहे, यावर या सत्रात सांगोपांग चर्चा झाली. “नऊ वर्षे : सेवा, सुशासन, गरीब कल्याण” या विषयावरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान हे चर्चासत्र झाले. प्रसार भारतीने आयोजित केलेल्या या चर्चासत्रात, मुष्टियोद्धा निखत झरीन, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी; भारतातील युनिसेफ प्रतिनिधी सिंथिया मॅकाफ्रे, परिचारिका आणि पद्मश्री पुरस्कारप्राप्त शांती तेरेसा लाक्रा; पर्यावरणतज्ज्ञ अनिल प्रकाश जोशी आणि सीखो संस्थेच्या सहसंस्थापक दिव्या जैन सहभागी झाल्या होत्या. सत्राचे सूत्रसंचालन पत्रकार रिचा अनिरुद्ध यांनी केले.
खेलो इंडियामुळे, देशातील क्रीडा नैपुण्याला जागतिक पातळीवर आपला ठसा उमटवण्याची संधी मिळाली आहे : निखत झरीन
भारतीय बॉक्सर आणि दोनदा विश्व अजिंक्यपद पटकावलेल्या निखत झरीनने यावेळी सांगितले की सरकारची पथदर्शी योजना, “खेलो इंडिया’ मुळे, देशातील क्रीडा नैपुण्य असलेल्या युवा खेळाडूंना उंच आकाशात भरारी घेण्याची संधी मिळाली आणि हे प्रतिभावान खेळाडू आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहेत, असे ती म्हणाली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचा, आपल्यासारख्या मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी झालेल्या आमूलाग्र परिवर्तनाविषयी देखील ती बोलली.
‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ मोहिमेमुळे, मुलींप्रतीच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे : नवाजुद्दीन सिद्दीकी
गेल्या काही वर्षात, वाहतूक व्यवस्था अतिशय सुलभ झाली आहे, असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी या चर्चासत्रात सांगितले. आज कोणत्याही युवकाला काही मोठी स्वप्ने बघायची असतील, तर त्यांची ही स्वप्ने साकार करण्यासाठी एक व्यवस्था उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबद्दल बोलताना, नवाजुद्दीनने सांगितले की, या अभियानामुळे मुलींप्रतीचा दृष्टीकोन आणि मानसिकता आता बदलली आहे.आज पालकांचा मुलींबद्दलचा दृष्टिकोन आणि मुली विविध क्षेत्रात मिळवत असलेले यश यातून त्याचेच प्रतिबिंब दिसते, असे त्यांनी सांगितले. महिलांना स्वतःची ओळख होऊ लागली असून, त्यांचा आजवर दबलेला आवाज आता बाहेर येतो आहे, आणि समाजही त्याला स्वीकारतो आहे, असे त्यांनी सांगितले.
“भारताला जागतिक पातळीवर प्रासंगिक बनवण्यात सरकारने उत्कृष्ट भूमिका बजावली आहे” -दिव्या जैन
सीखो या संस्थेच्या सहसंस्थापक दिव्या जैन, यांनी यावेळी सांगितले की, महिला प्रणित विकास हा एक मोठा बदल अलीकडच्या काळात घडला आहे. गेल्या नऊ वर्षात सात कोटी महिला, स्वयं सहायता बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. सरकारी योजनांची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, ज्यामुळे महिलांना देखील पुढे येण्याची संधी मिळाली आहे.
“आयुष्मान भारत,ने देशाच्या दुर्गम आणि अंतर्गत भागातील नागरिकांना सक्षम केले आहे”
अंदमान आणि निकोबार इथे कार्यरत,पद्मश्री पुरस्कार विजेत्या, परिचारिका आणि वैद्यकीय व्यावसायिक शांती तेरेसा लाक्रा यांनी सांगितले, की आयुष्मान भारत अंतर्गत, सुरु करण्यात आलेली निरामयता केंद्रे, हे लोकांना सक्षम करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल आहे. या योजनेअंतर्गत जी आर्थिक मदत दिली जाते, ती लोकांसाठी, विशेषतः देशाच्या दुर्गम भागात आणि जंगलात राहणाऱ्या अनुसूचित जमातीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक ठरली आहे, असेही त्या म्हणाल्या.
“सरकार गावाच्या विकासावर भर देत असल्यामुळे, इंडिया नाही, तर भारत प्रगती करतो आहे.”
पर्यावरण तज्ञ अनिल प्रकाश जोशी म्हणाले, की आज देश सर्वसमावेशक आणि पर्यावरणपूरक विकासाचा विचार करून, समृद्धी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात, विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी, गावांच्या विकासाचा विचार करण्यात येत आहे, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे. सरकार गावाच्या विकासावर भर देत असल्यामुळे, इंडिया नाही, तर भारत प्रगती करतो आहे.”
“स्टार्टअप इंडिया ने देशात युवा आणि स्वयंउद्योजकांना प्रगतीची दारे खुली केली आहेत.”
बायोकॉन लिमिटेड आणि बायोकॉन बायोलॉजिक्स लिमिटेडच्या संस्थापक, आणि कार्यकारी अध्यक्ष किरण मुझुमदार शॉ यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे चर्चासत्रात आपले मत मांडले. सरकारने अनेक परिवर्तनात्मक उपक्रम घेतले आहेत, ज्यांचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. कोविड महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी, आपल्याला सक्षम करण्यात, आरोग्य सेतू आणि कोविन अॅप हे पथदर्शी तंत्रज्ञान ठरले, ज्याद्वारे, आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे व्यापक लसीकरण करता आले, असे त्या म्हणाल्या. आयुष्मान भारत विषयी त्या म्हणाल्या, की जनऔषधी केंद्रांमुळे अनेकांना जीवनावश्यक औषधे सहज उपलब्ध झाली आहेत.
“राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे सर्वसमावेशक शिक्षणाला पाठबळ मिळत आहे.”
युनिसेफ मधल्या भारतातल्या प्रतिनिधी, सिंथिया मॅकाफ्रे, म्हणाल्या की, भारत सरकारने राष्ट्रीय कामगिरी सर्वेक्षण केले, ज्याद्वारे, मुले काय शिकत आहेत आणि भारतीय विद्यार्थ्यांना खरोखर काय माहित आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला.“स्वच्छ भारत मिशन, आयुष्मान भारत हे सर्व मुलांच्या जीवनातील महत्त्वाचे भाग ठरले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मूलभूत शिक्षण, व्यावसायिक शिक्षण आणि उद्योजकीय शिक्षणावर भर देण्यात आल्याने मुलांचे सक्षमीकरण झाले आहे आणि त्यांना सर्वांगीण शिक्षण मिळण्यास सक्षम केले आहे, असे त्या म्हणाल्या.
***
N.Chitale/R.Aghor/P.Kor