पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील मध्यवर्ती क्रीडांगणात 3200 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण


कोची वॉटर मेट्रोचे केले लोकार्पण

या प्रकल्पांसह विविध रेल्वे प्रकल्पांची आणि तिरुवनंतपुरम येथील डिजिटल सायन्स पार्कची पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी

“केरळची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस, कोची वॉटर मेट्रो आणि आज पायाभरणी झालेले विविध प्रकल्प राज्याच्या विकासाचा प्रवास आणखी गतिमान करतील“

“कठोर परिश्रम आणि विनयता ही केरळच्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख आहे”

“जगाच्या नकाशात भारत हा एक तेजस्वी तारा आहे”

“सरकारचा भर सहकारी संघराज्यावर आहे आणि राज्यांच्या विकासातूनच राष्ट्राचा विकास साध्य होतो, अशी सरकारची धारणा आहे”

“भारत अभूतपूर्व वेगाने आणि प्रमाणात प्रगती करत आहे”

“संपर्क यंत्रणा अर्थात कनेक्टिव्हिटी साठी केलेल्या गुंतवणुकीमुळे केवळ सेवांची व्याप्ती आणि आवाका वाढतो असे नव्हे तर त्यामुळे अंतर कमी होते आणि जात, धर्म, गरीब आणि श्रीमंत यांमध्ये कोणताही भेदभाव न करता विविध संस्कृती एकत्र जोडल्या जातात”

“जी 20 बैठका आणि कार्यक्रमांमुळे केरळला जागतिक स्तरावर अधिक व्यापक प्रमाणात ओळख मिळत आहे”

“केरळची संस्कृती, पाकशास्त्र आणि हवामानात अंतर्बाह्य समृद्धी अंतर्भूत आहे"

“मन की बात ची शतकपूर्ती राष्ट्र उभारणीसाठी देशवासीयांनी केलेल्या प्रयत्नांना आणि एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला समर्पित आहे”

Posted On: 25 APR 2023 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 एप्रिल 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळ मधील तिरुवनंतपुरम येथील मध्यवर्ती क्रीडांगणात 3,200 कोटी रुपयांहून अधिक  खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये कोची वॉटर मेट्रोचे लोकार्पण, विविध रेल्वे प्रकल्प आणि तिरुवनंतपुरम येथील डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी यांचा समावेश आहे. याआधी सकाळी, पंतप्रधानांनी तिरुवनंतपुरम आणि कासारगोड दरम्यानच्या  केरळच्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसला झेंडा दाखवून रवाना केले.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी सर्वाना  विशूच्या शुभेच्छा दिल्या. केरळच्या विकास आणि संपर्क यंत्रणेशी संबंधित विविध प्रकल्पांचे आज अनावरण करण्यात आले आहे, ज्यामध्ये राज्याची पहिली वंदे भारत एक्सप्रेस, कोचीची पहिली वॉटर मेट्रो आणि अनेक रेल्वे विकास कार्यांचा समावेश आहेअसे आजच्या प्रकल्पांचा उल्लेख करून पंतप्रधानांनी सांगितले. या सर्व विकास प्रकल्पांबद्दल त्यांनी केरळच्या जनतेचे अभिनंदन केले.

कठोर परिश्रम आणि विनयता ही केरळच्या लोकांची वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी ओळख आहे, असे पंतप्रधानांनी केरळ मधील शिक्षण आणि जागरूकतेचा स्तर याविषयी बोलताना सांगितले.  जागतिक परिस्थिती समजून घेण्यात केरळचे लोक सक्षम आहेत आणि कठीण परिस्थितीत ही भारत कशाप्रकारे  विकासाचा चैतन्यदायी भूभाग म्हणून ओळखला जातो आणि भारताने दिलेले विकासाचे आश्वासन जगभरात  कशाप्रकारे स्वीकारले गेले आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

जगाने भारतावर जो विश्वास ठेवला आहे, त्याचे श्रेय  देशाच्या हितासाठी जलद आणि ठोस निर्णय घेणाऱ्या केंद्रातील निर्णायक सरकारला जाते,  भारतातील पायाभूत सोयीसुविधांचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरण करण्यासाठी केलेली अभूतपूर्व गुंतवणूक , युवकांच्या कौशल्यविकासाकरता केलेली गुंतवणूक आणि सुखकर जीवन आणि व्यवसायाला अनुकूल वातावरण निर्मिती यासाठी केंद्र सरकारची वचनबद्धता, या गोष्टींना जाते, असे पंतप्रधान म्हणाले.

सरकारचा भर सहकारी संघराज्यावर आहे आणि राज्यांच्या विकासातूनच राष्ट्राचा विकास साध्य होतो, अशी सरकारची धारणा आहे, असे ते म्हणाले. आम्ही सेवा केंद्रित दृष्टिकोनातून कार्य करत आहोत. जर केरळची प्रगती झाली तरच राष्ट्र अधिक वेगाने प्रगती करू शकेल, असे ते म्हणाले.

देशाने गाठलेल्या उंचीचे आणखी एक कारण म्हणजे  परदेशातील भारतीयांशी सतत संपर्कात राहण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या  प्रयत्नांमुळे परदेशस्थ   केरळवासीयांना लाभ झाला आहे. भारताच्या वाढत्या सामर्थ्यामुळे भारतीय समुदायाला खूप मदत होत आहे, असे ते म्हणाले.

गेल्या 9 वर्षांत संपर्क व्यवस्थेच्या पायाभूत सुविधांवर अभूतपूर्व वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली आहेत.  यंदाच्या अर्थसंकल्पातही पायाभूत सुविधांवर 10  लाख कोटींहून अधिक खर्च करण्याचे प्रस्तावित असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.  "देशात सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळण क्षेत्र पूर्णपणे बदलले आहे. आपण भारतीय रेल्वेच्या सुवर्णयुगाकडे वाटचाल करत आहोत,  रेल्वेच्या 2014 पूर्वीच्या सरासरी अर्थसंकल्पाचा विचार करता त्यात आता पाच पटीने वाढ झाली आहे.

केरळमध्ये गेल्या 9 वर्षात झालेल्या रेल्वेच्या विकासावर प्रकाश टाकत, गेज रूपांतरण, दुहेरीकरण आणि रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण यासंदर्भात केलेल्या कामांचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. बहुआयामी वाहतुक केन्द्र बनवण्याच्या उद्देशाने केरळमधील तीन प्रमुख रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम आजपासून सुरु केल्याचे त्यांनी नमूद केले. वंदे भारत एक्सप्रेस ही रेल्वे, महत्वाकांक्षी भारताची ओळख आहे, असे ते म्हणाले.  अशाप्रकारच्या निम-जलद गाड्या सहजतेने चालवणे शक्य होत आहे त्यामागील आधारस्तंभ असलेल्या भारतातील बदलत्या रेल्वेजाळ्यावर त्यांनी  प्रकाश टाकला. 

आतापर्यंतच्या सर्व वंदे भारत गाड्या  सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि पर्यटन दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे जोडत आहेत.  केरळची पहिली वंदे भारत ट्रेन उत्तर केरळला दक्षिण केरळशी जोडेल. यामुळे कोल्लम, कोट्टायम, एर्नाकुलम, थ्रिसूर आणि कन्नूर सारख्या तीर्थक्षेत्रांचा प्रवास सुलभ होईल, असे ते म्हणाले. आधुनिक ट्रेनमुळे होणाऱ्या पर्यावरणीय फायद्यांविषयीही त्यांनी सांगितले.  निमजलद ट्रेनसाठी तिरुअनंतपुरम-शोरानूर विभाग तयार करण्याचे काम आज सुरू करण्यात आले आहे. ते  पूर्ण झाल्यावरतिरुअनंतपुरम ते मंगळुरूपर्यंत निम-जलद  ट्रेन चालवणे शक्य होईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पायाभूत सुविधांच्या संदर्भात स्थानिक गरजांनुसार भारतात निर्मित (मेड इन इंडिया) उपाय प्रदान करण्याचा प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.  सेमी-हायब्रीड ट्रेन, प्रादेशिक जलद वाहतुक व्यवस्था, रो-रो फेरी आणि रोपवे यांसारखे उपायांचा उल्लेख केला. यामुळे संपर्क व्यवस्थेसाठी परिस्थितीनुरुप-विशिष्ट उपाय प्रदान केले जातात.  त्यांनी मेड इन इंडिया वंदे भारत आणि मेट्रो डब्यांचे स्वदेशी मूळ अधोरेखित केले. छोट्या शहरांमधील मेट्रो-लाइट आणि शहरी रोपवे यांसारख्या प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला.

कोची वॉटर मेट्रो हा मेड इन इंडिया प्रकल्प असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि त्यासाठी बंदरांचा विकास केल्याबद्दल कोची शिपयार्डचे अभिनंदन केले. कोचीच्या जवळील बेटांवर राहणाऱ्या लोकांसाठी आधुनिक आणि स्वस्त वाहतुकीची साधने कोची वॉटर मेट्रो सुलभ करेल आणि बस टर्मिनल तसेच मेट्रो नेटवर्क यांमधे आंतर-संपर्क व्यवस्थाही प्रदान करेल असे त्यांनी सांगितले.  शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यासोबतच राज्यातील बॅकवॉटर पर्यटनालाही याचा फायदा होईल, असेही पंतप्रधान म्हणाले. कोची वॉटर मेट्रो देशातील इतर राज्यांसाठी आदर्श ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भौतिक संपर्क व्यवस्थेसोबतच डिजिटल संपर्क व्यवस्थेलाही देशाचे प्राधान्य  असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. तिरुवनंतपुरममधील डिजिटल विज्ञान पार्कसारख्या प्रकल्पांमुळे डिजिटल इंडियाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले. भारताच्या डिजिटल प्रणालीबद्दल जागतिक स्तरावर होत असलेल्या कौतुकावर त्यांनी प्रकाश टाकला. स्वदेशात विकसित 5G हे या क्षेत्रात नवीन संधी निर्माण करेल, असे ते म्हणाले.

संपर्क वाढविण्यासंदर्भात केलेल्या गुंतवणुकी केवळ सेवांची व्याप्तीच वाढवीत नाहीत तर त्या स्थानांच्या दरम्यान असलेली अंतरे कमी करतात तसेच जात आणि पंथ तसेच गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही भेदभावाविना विविध संस्कृतींना देखील जोडतात याकडे पंतप्रधानांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. हे देशभरात पाहता येऊ शकणारे विकासाचे योग्य मॉडेल आहे  आणि त्यातून ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला मजबुती मिळते यावर त्यांनी अधिक भर दिला.

देशाला आणि जगाला देण्यासारखे केरळ राज्याकडे खूप काही आहे असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. केरळच्या संस्कृती, खाद्य परंपरा आणि वातावरणात समृद्धतेचे स्त्रोत अंतर्भूत आहेत, पंतप्रधानांनी सांगितले. कुमारकोम येथे नुकत्याच पार पडलेल्या जी-20 बैठकीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की अशा कार्यक्रमांमुळे केरळला जागतिक पातळीवर अधिक ओळख मिळते.

पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केरळमधील रागी पट्टू  श्री अन्नाचा म्हणजे भरड धान्यांचा उल्लेख केला. स्थानिक पिके तसेच इतर उत्पादने यांच्या प्रोत्साहनासाठी प्रयत्न करण्याचा आग्रह त्यांनी व्यक्त केला. जेव्हा आपली उत्पादने जागतिक बाजारांपर्यंत पोहोचतील, तेव्हा विकसित भारताचा मार्ग अधिक बळकट होईल, ते म्हणाले.

मन की बात कार्यक्रमामधील नागरिकांच्या यशोगाथांविषयी बोलताना, पंतप्रधान म्हणाले की, 'व्होकल फॉर लोकल’ च्या उद्दिष्टासह केरळच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांविषयी ते नेहमीच माहिती देत असतात. या रविवारी ‘मन की बात ‘ या कार्यक्रमाचा शंभरावा भाग सादर होणार आहे आणि हा भाग देशाच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांना तसेच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’या संकल्पनेला समर्पित केलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली.विकसित भारताच्या उभारणीसाठी देशातील प्रत्येकाला  देशाप्रती समर्पित व्हावे लागेल असे सांगून पंतप्रधानांनी त्यांचे  भाषण संपविले.

केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय राज्यमंत्री व्ही.मुरलीधरन, थिरूवनंतपुरम  येथील संसद सदस्य  डॉ.शशी थरूर आणि केरळ राज्य सरकारमधील मंत्र्यांसह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

पार्श्वभूमी :-

पंतप्रधानांनी आज 3200 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांची कोनशीला बसविली आणि या प्रकल्पांचे लोकार्पण केले. पंतप्रधानांनी कोच्ची जल मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण केले. हा अत्यंत वैशिष्टयपूर्ण प्रकल्प बॅटरीवर संचालित विद्युत मिश्र प्रकारच्या बोटींचा वापर करून कोच्ची परिसरातील 10 बेटांना कोच्ची शहराशी सुलभतेने जोडतो.

कोच्ची जल मेट्रो प्रकल्पासह, पंतप्रधानांनी रेल्वेच्या दिंडीगुल-पलानी-पलक्कड विभागाच्या विद्युतीकरण प्रकल्पाचे देखील लोकार्पण  केले. याच कार्यक्रमात, पंतप्रधानांनी थिरूवनंतपुरम, कोझिकोडे आणि वारकला शिवगिरी रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास, नेमन आणि कोचुवेली सह संपूर्ण थिरूवनंतपुरम  भागाचा व्यापक विकास तसेच थिरूवनंतपुरम-शोरानुर या टप्प्यातील रेल्वे मार्गाच्या गतीत वाढ करण्यासह विविध रेल्वे प्रकल्पांची कोनशीला रचली.

या सर्व प्रकल्पांसह, पंतप्रधानांनी थिरूवनंतपुरम येथील डिजिटल विज्ञान केंद्राची कोनशीला बसविली. हे डिजिटल विज्ञान केंद्र म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या सहयोगासह, उद्योग आणि व्यापारी संस्थांनी डिजिटल उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी महत्त्वाची संशोधन सुविधा असेल. तिसऱ्या जगातील विज्ञान केंद्र असलेल्या या  डिजिटल विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धीमत्ता, डाटा अॅनालिटिक्स, सायबर सुरक्षा, स्मार्ट साहित्य इत्यादींसारख्या उद्योग 4.0 श्रेणीच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील उत्पादने विकसित करण्यासाठी सामायिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. या ठिकाणच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा उद्योगांद्वारे उभ्या केल्या जाणाऱ्या उच्च पातळीवरील अप्लाईड संशोधन  क्षेत्राला पाठबळ पुरवतील आणि विविध विद्यापीठांच्या सहकार्याने उत्पादनांच्या सह-विकसनात मदत करतील. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी सुमारे 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून या संपूर्ण प्रकल्पाच्या उभारणी साठी अंदाजे 1515कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

 

 

 

 

 

JPS/SRT/GC/Bhakti/Vinayak/Sanjana/PM

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 1919492) Visitor Counter : 164