माहिती आणि प्रसारण मंत्रालय
100 व्या भागाच्या उंबरठ्यावर आयआयएमने केलेल्या सर्वेक्षणानुसार मन की बातच्या श्रोत्यांची संख्या 100 कोटीवर पोहचली आहे
'मन की बात'चे नियमित श्रोते 23 कोटी इतके आहेत तर 96% लोकांना रेडिओवरील या प्रसिद्ध कार्यक्रमाची माहिती आहे: आयआयएम रोहतक अहवाल
शक्तिशाली आणि निर्णायक नेतृत्व, श्रोत्यांबरोबर भावनिक बंध ही लोकप्रियतेमागची कारणे असल्याचे श्रोत्यांचे मत
'मन की बात' वर्तनावर प्रभाव पाडते, 60% लोकांना राष्ट्र उभारणीत रस आहे तर 73% लोकांना वाटते की देश योग्य दिशेने वाटचाल करत आहे
Posted On:
24 APR 2023 8:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
देशातील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला आकाशवाणीवरून दर महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रोत्यांशी साधत असलेल्या मन की बात संवादाबाबत माहिती आहे. हा कार्यक्रम 100 कोटी लोकांपर्यंत पोहोचला आहे, त्यांना याची माहिती आहे आणि त्यांनी एकदा तरी हा कार्यक्रम ऐकला आहे. प्रसार भारती आणि रोहतक येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटने केलेल्या एका विस्तृत अभ्यासात ही आकडेवारी समोर आली आहे. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आयआयएम रोहतकचे संचालक धीरज पी. शर्मा यांनी पत्रकार परिषदेत या अभ्यासाचे निष्कर्ष सादर केले.
अभ्यासाच्या निष्कर्षांबद्दल बोलताना शर्मा म्हणाले की 23 कोटी लोक नियमितपणे हा कार्यक्रम ऐकतात तर इतर 41 कोटी अधूनमधून ऐकतात आणि ते नियमित श्रोते बनू शकतात.
या अहवालात आकाशवाणीवरील पंतप्रधानांच्या संवादामागच्या लोकप्रियतेच्या कारणांचा शोध घेण्यात आला असून लोकांना या प्रसारणाकडे आकर्षित करणारी सर्वाधिक पसंतीची वैशिष्ट्ये नमूद केली आहेत. श्रोत्यांशी भावनिक बंध प्रस्थापित करण्यासाठी संवाद साधणारे शक्तिशाली आणि निर्णायक नेतृत्व हे या कार्यक्रमाचे मुख्य कारण असल्याचे नमूद केले आहे. पंतप्रधान हे सर्वांगीण ज्ञान तसेच सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोन असलेले नेते असल्याचा देशाच्या जनतेचा विश्वास आहे. नागरिकांशी थेट संवाद आणि मार्गदर्शन हे देखील या कार्यक्रमाने प्रस्थापित केलेल्या विश्वासाचे कारण असल्याचे म्हटले आहे.
आतापर्यंतच्या 99 भागांमध्ये ‘मन की बात’चा लोकसंख्येवर किती प्रभाव पडला आहे याचे मूल्यमापन करण्याचा प्रयत्न या अभ्यासात केला आहे. त्यात असे म्हटले आहे की बहुतेक श्रोत्यांना सरकारच्या कामकाजाची जाणीव झाली आहे आणि 73% आशावादी आहेत आणि त्यांना वाटते की देश प्रगती करत आहे. 58% श्रोत्यांनी त्यांच्या राहणीमानात सुधारणा झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर तितक्याच श्रोत्यांनी (59%) सरकारवरील विश्वास वाढल्याचे म्हटले आहे. सर्वेक्षणानुसार 63% लोकांनी सरकारकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सकारात्मक झाल्याचे सांगितले आहे आणि 60% लोकांनी राष्ट्र उभारणीसाठी काम करण्यात स्वारस्य दाखविले आहे, यावरून सरकारबद्दलची सर्वसाधारण भावना समजली जाऊ शकते.
या अभ्यासात श्रोत्यांचे 3 श्रेणीत विभाजन केले आहे , ज्यामध्ये 44.7% लोक टीव्हीवर हा कार्यक्रम पाहतात तर 37.6% मोबाईलचा वापर करतात. कार्यक्रम ऐकण्यापेक्षा पाहणे काहीजण पसंत करतात , कारण 19 ते 34 वयोगटातील 62% लोक तो टीव्हीवर पाहणे पसंत करतात.
मन की बातच्या श्रोत्यांचा हिंदीकडे अधिक कल असून 65% श्रोते इतर कोणत्याही भाषेपेक्षा हिंदीला प्राधान्य देतात तर इंग्रजी 18% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे .
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांबाबत बोलताना संचालक धीरज शर्मा यांनी माहिती दिली की या अभ्यासासाठी एकूण 10,003 नमुन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते ज्यात 60% पुरुष तर 40% महिला होत्या. हे लोक विविध 68 व्यवसाय क्षेत्रांमधील होते , ज्यात 64% अनौपचारिक आणि स्वयंरोजगार क्षेत्रातील होते तर 23% विद्यार्थी होते.
शर्मा पुढे म्हणाले की, भारतातील उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम प्रांतातून एका सायकोमेट्रिकली प्युरिफाईड सर्वेक्षण साधनाद्वारे प्रत्येक प्रांतातील अंदाजे 2500 सहभागींवर स्नोबॉल सॅम्पलिंगचा वापर करून डेटा गोळा करण्यात आला.
गौरव द्विवेदी यांनी उपस्थितांना सांगितले की, मन की बात 22 भारतीय भाषा आणि 29 बोलींव्यतिरिक्त,इंग्रजी वगळता फ्रेंच, चीनी, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन, दारी आणि स्वाहिली या 11 परदेशी भाषांमध्ये प्रसारित केला जातो. ते म्हणाले की 'मन की बात' आकाशवाणीच्या 500 हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे प्रसारित केला जात आहे.
अभ्यास सुरू करण्यामागील विचारप्रक्रियेबद्दल द्विवेदी म्हणाले की, अनेकदा असा विचार आला की आपल्याला केवळ विशिष्ट भागांपुरता नाही तर संपूर्ण कार्यक्रमाच्या बाबतीत अधिक चांगला अभिप्राय मिळायला हवा. ते पुढे म्हणाले की मन की बात बाबत डिजिटल प्रतिक्रिया सहज उपलब्ध असतात , मात्र काही मर्यादांमुळे पारंपारिक माध्यमांच्या बाबतीत असे होत नाही. याच दृष्टिकोनातून, 18 एप्रिल 2022 रोजी सर्वेक्षणाची जबाबदारी आयआयएम रोहतककडे सोपवण्यात आली.
मन की बात बद्दल:
पंतप्रधानांचा मन की बात हा आकाशवाणीवरील लोकप्रिय कार्यक्रम 3 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झाला आणि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जातो.
30-मिनिटांचा कार्यक्रम 30 एप्रिल 2023 रोजी 100 भाग पूर्ण करत आहे. आकाशवाणीने 'मन की बात' च्या भागांचे इंग्रजी व्यतिरिक्त 22 भारतीय भाषा, 29 बोली आणि 11 परदेशी भाषांमध्ये अनुवाद केले आहेत. यामध्ये हिंदी, संस्कृत, पंजाबी, तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराती, मल्याळम, ओडिया, कोकणी, नेपाळी, काश्मिरी, डोगरी, मणिपुरी, मैथिली, बंगाली, आसामी, बोडो, संथाली, उर्दू, सिंधी या भाषांचा समावेश आहे. बोलींमध्ये छत्तीसगढ़ी, गोंडी, हलबी, सरगुजिया, पहारी, शीना, गोजरी, बाल्टी, लद्दाखी, कार्बी, खासी, जैंतिया, गारो, नागामासी, हमार, पायते, थाडौ, काबुई, माओ, तंगखुल, न्याशी, आदि, मोनपा, आवो , अंगामी, कोकबोरोक, मिझो, लेपचा, सिक्कीमीज (भूतिया) या बोलींचा समावेश होतो.
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919312)
Visitor Counter : 260
Read this release in:
Punjabi
,
Hindi
,
Urdu
,
Telugu
,
Assamese
,
Manipuri
,
English
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada