पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कर्नाटकातील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
शिवमोग्गा विमानतळाचे केले उद्घाटन
दोन रेल्वे प्रकल्प आणि विविध रस्ते विकास प्रकल्पांची केली पायाभरणी
बहु-ग्राम योजनांचे केले उद्घाटन आणि पायाभरणी
44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे केले उद्घाटन
"हा केवळ विमानतळ नाही तर एक अभियान आहे ,जिथे युवा पिढीची स्वप्ने भरारी घेऊ शकतील "
"रेल्वे, रोडवेज, एअरवेज आणि आयवेजच्या प्रगतीमुळे कर्नाटकच्या प्रगतीचा मार्ग सुकर झाला आहे"
"भारतात विमान प्रवासाचा उत्साह सार्वकालीन उच्चांक पातळीवर असताना शिवमोग्गा येथील विमानतळाचे उद्घाटन होत आहे"
“आजची एअर इंडिया ही नवीन भारताची क्षमता म्हणून ओळखली जात असून ती यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे”
"उत्तम कनेक्टिव्हिटीसह पायाभूत सुविधा संपूर्ण प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणार आहेत"
"हे दुहेरी इंजिन सरकार गावांचे, गरीबांचे, आमच्या माता-भगिनींचे आहे"
Posted On:
27 FEB 2023 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे 3,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. तसेच शिवमोग्गा विमानतळाचे उद्घाटनही त्यांनी केले आणि तिथल्या सुविधांची पाहणी केली. पंतप्रधानांनी शिवमोग्गा येथे दोन रेल्वे प्रकल्पांची पायाभरणीही केली, ज्यात शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर नवीन रेल्वे लाईन आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपो यांचा समावेश आहे. तसेच 215 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध रस्ते विकास प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली. त्यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केली. शिवमोग्गा शहरात 895 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटनही त्यांनी केले.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी राष्ट्रकवी कुवेंपू यांच्या भूमीला वंदन केले, त्यांची एक भारत श्रेष्ठ भारत प्रति समर्पणाची भावना आजही कायम आहे. शिवमोग्गा येथे उद्घाटन करण्यात आलेल्या नव्या विमानतळाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, आज बऱ्याच काळानंतर नागरिकांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत. विमानतळाचे भव्य सौंदर्य आणि बांधकाम यावर बोलताना पंतप्रधानांनी कर्नाटकच्या परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम अधोरेखित केला. हा केवळ विमानतळ नाही तर एक अभियान आहे, ज्यात युवा पिढीची स्वप्ने भरारी घेऊ शकतील असे ते म्हणाले. ‘हर घर नल से जल’ प्रकल्पांसह ज्या प्रकल्पांची आज पायाभरणी होत आहे अशा रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांचाही त्यांनी उल्लेख केला आणि त्या जिल्ह्यातील नागरिकांचे अभिनंदन केले.
पंतप्रधानांनी आज बी एस येडियुरप्पा यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आणि सार्वजनिक जीवनातील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले. त्यांनी अलिकडेच विधानसभेत केलेले भाषण सार्वजनिक जीवनातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे ते म्हणाले. मोबाईलचे फ्लॅश लाइट उंचावून बीएस येडियुरप्पा यांना शुभेच्छा देण्याच्या पंतप्रधानांच्या विनंतीला उपस्थितांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी या ज्येष्ठ नेत्याप्रति आपले प्रेम व्यक्त केले.
कर्नाटकच्या विकासाची वाटचाल सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. प्रगतीचा हा मार्ग रोडवेज, एअरवेज आणि आयवेज (डिजिटल कनेक्टिव्हिटी) मधील प्रगतीमुळे प्रशस्त झाला आहे असे पंतप्रधान म्हणाले. कर्नाटकचे दुहेरी इंजिन सरकार कर्नाटकच्या प्रगतीचे सारथ्य करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वीच्या काळातील केवळ मोठ्या शहराभोवती केंद्रित विकासाच्या तुलनेत कर्नाटकातील द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांचाही मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे असे त्यांनी अधोरेखित केले. "शिवमोग्गाचा विकास या विचार प्रक्रियेचा परिणाम आहे", असे ते म्हणाले.
भारतात विमान प्रवासाचा उत्साह सार्वकालीन उच्चांक पातळीवर असताना शिवमोग्गा येथील विमानतळाचे उद्घाटन होत असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. एअर इंडियाने नुकतेच जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान खरेदी करण्याचा करार पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. 2014 पूर्वी कॉंग्रेस सत्तेवर असताना एअर इंडियाबाबत साधारणपणे नकारात्मक चर्चा केली जात होती आणि तिची ओळख नेहमी घोटाळ्यांशी जोडली गेली होती आणि तोट्यात चालणारे व्यवसाय मॉडेल म्हणून त्याकडे पाहिले जात होते याकडे त्यांनी लक्ष वेधले. आजची एअर इंडिया ही नवीन भारताची क्षमता म्हणून ओळखली जात आहे आणि ती यशाची शिखरे पादाक्रांत करत आहे असे पंतप्रधान म्हणाले .
भारताच्या विस्तारणाऱ्या विमान बाजारपेठेकडे त्यांनी लक्ष वेधले आणि माहिती दिली की नजीकच्या भविष्यात देशाला हजारो विमानांची गरज भासेल जिथे हजारो तरुण नागरिकांची कार्यशक्ती म्हणून आवश्यकता असेल. आज जरी आपण ही विमाने आयात करत असलो तरी तो दिवस दूर नाही जेव्हा भारतातील नागरिक मेड इन इंडिया प्रवासी विमानातून उड्डाण करतील, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
विमान वाहतूक क्षेत्राच्या अभूतपूर्व विस्ताराला कारणीभूत ठरणारी सरकारची धोरणे पंतप्रधानांनी विशद केली. त्यांनी माहिती दिली की, पूर्वीच्या सरकारांप्रमाणे दृष्टिकोन न ठेवता , सध्याच्या सरकारने छोट्या शहरांमध्ये विमानतळ उभारणीवर भर दिला आहे. स्वातंत्र्याच्या पहिल्या 7 दशकात 2014 पर्यंत देशात 74 विमानतळ होते, तर गेल्या 9 वर्षात आणखी 74 विमानतळ वाढले, ज्यामुळे अनेक लहान शहरे जोडली गेली आहेत. हवाई चप्पल घालणाऱ्या सामान्य नागरिकांना विमान प्रवास करता आला पाहिजे हे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधानांनी किफायतशीर हवाई प्रवासासाठी उडान योजनेचा देखील उल्लेख केला.
"नवीन विमानतळ निसर्ग, संस्कृती आणि शेतीची भूमी असलेल्या शिवमोग्गासाठी विकासाची दारे उघडणार आहे", पंतप्रधान म्हणाले. त्यांनी माहिती दिली की शिवमोग्गा हे पश्चिम घाटासाठी प्रसिद्ध असलेल्या मालेनाडू प्रदेशाचे प्रवेशद्वार आहे आणि हिरवळ, वन्यजीव अभयारण्य, नद्या, प्रसिद्ध जोग फॉल्स आणि एलिफंट कॅम्प, सिंह धाममधील लायन सफारी आणि अगुंबेच्या पर्वतराजींसाठी प्रसिद्ध आहे. ज्यांनी गंगेत डुबकी मारली नाही आणि तुंगभद्रा नदीचे पाणी प्राशन केले नाही त्यांचे जीवन अपूर्ण आहे या वाक्प्रचाराची आठवण पंतप्रधानांनी करून दिली.
शिवमोग्गाच्या सांस्कृतिक समृद्धीबद्दल बोलताना पंतप्रधानांनी राष्ट्रकवी कुवेंपू आणि जगातील एकमेव जिवंत संस्कृत गाव मत्तूर आणि शिवमोग्गामधील अनेक श्रद्धा केंद्रांचा उल्लेख केला. इसुरू गावाच्या स्वातंत्र्यलढ्याचाही त्यांनी उल्लेख केला.
शिवमोग्गाच्या कृषी वैशिष्ट्याचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की, हा देशातील सर्वात सुपीक प्रदेशांपैकी एक आहे. त्यांनी या भागातील पिकांच्या विविधतेबद्दल सांगितले. डबल-इंजिन सरकारने हाती घेतलेल्या मजबूत कनेक्टिव्हिटी उपायांमुळे या कृषी संपत्तीला चालना मिळत आहे. पंतप्रधान म्हणाले की नवीन विमानतळामुळे पर्यटन वाढण्यास मदत होईल आणि परिणामी आर्थिक उपक्रम आणि रोजगाराच्या संधी वाढतील. रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठ उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले.
शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणीबेन्नूर हा नवीन मार्ग पूर्ण झाल्यावर हावेरी आणि दावणगेरे जिल्ह्यांनाही फायदा होईल यावर पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी अधोरेखित केले की या मार्गावर कोणतेही लेव्हल क्रॉसिंग नसून हा सुरक्षित रेल्वे मार्ग बनवला जाईल जिथे जलद गाड्या सुरळीतपणे धावू शकतील. त्यांनी अधोरेखित केले की अल्पावधीचा थांबा असणाऱ्या कोटागंगौर स्थानकाच्या क्षमतेत, नवीन रेल्वे यार्डच्या बांधकामानंतर वाढ होईल. ते आता 4 रेल्वे मार्गिका, 3 फलाट आणि एक रेल्वे दुरुस्ती डेपोसह विकसित केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. शिवमोग्गा हे या प्रदेशाचे शैक्षणिक केंद्र असल्याचे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, वाढीव कनेक्टिव्हिटीमुळे जवळपासच्या भागातील विद्यार्थ्यांना शिवमोग्गाला भेट देणे सोपे होईल. त्यांनी असेही नमूद केले की ते या क्षेत्रातील व्यवसाय आणि उद्योगांसाठी नवीन द्वार खुली होतील. "चांगल्या कनेक्टिव्हिटीसह पायाभूत सुविधा संपूर्ण प्रदेशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणार आहेत", पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी या प्रदेशातील जल जीवन मिशनला शिवमोग्गा येथील महिलांचे जीवन सुखकर करण्यासाठीची एक मोठी मोहीम म्हणून संबोधले. जलजीवन अभियान सुरू होण्यापूर्वी शिवमोग्गा येथील 3 लाख कुटुंबांपैकी केवळ 90 हजार कुटुंबांकडेच नळ जोडणी होती, अशी माहिती त्यांनी दिली. आता, डबल-इंजिन सरकारने 1.5 लाख कुटुंबांना नळजोडणी दिली आहे आणि पूर्तता सुनिश्चित करण्यासाठी काम सुरू आहे. गेल्या 3.5 वर्षात 40 लाख कुटुंबांना नळ जोडणी मिळाली आहे.
"डबल इंजिन सरकार हे गावांचे, गरिबांचे, आमच्या माता-भगिनींचे आहे", पंतप्रधान म्हणाले. शौचालये, गॅस जोडणी आणि नळाद्वारे पाणी पुरवठ्याची उदाहरणे देताना पंतप्रधान म्हणाले की, माता-भगिनींशी संबंधित सर्व समस्यांवर मात करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. डबल इंजिन सरकार प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
पंतप्रधानांनी टिप्पणी केली, "कर्नाटकच्या लोकांना हे चांगले ठाऊक आहे की हा भारताचा अमृत काळ आहे, विकसित भारत बनवण्याची वेळ आली आहे." त्यांनी अधोरेखित केले की भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी संधी दार ठोठावत आहे आणि भारताचा आवाज जागतिक स्तरावर ऐकू येत आहे. जगभरातील गुंतवणूकदार भारतात गुंतवणूक करू इच्छितात आणि त्याचा फायदा कर्नाटक आणि येथील तरुणांना होत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी सर्वांना आश्वासन दिले की कर्नाटकच्या विकासाची ही मोहीम आणखी वेग घेईल. “आपल्याला एकत्र वाटचाल करायची आहे. आपल्याला एकत्र मार्गक्रमण करायचे आहे,” असे म्हणत पंतप्रधानांनी सांगता केली.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
शिवमोग्गा विमानतळाच्या उद्घाटनामुळे संपूर्ण देशातील हवाई संपर्क सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांना आणखी चालना मिळेल. नवीन विमानतळ सुमारे 450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आले आहे. विमानतळाची पॅसेंजर टर्मिनल इमारत ताशी 300 प्रवाशांची हाताळणी करू शकते या विमानतळामुळे
मलनाड प्रदेशातील शिवमोग्गा आणि इतर शेजारील भागांची संपर्कता आणि सुलभता सुधारेल.
शिवमोग्गा येथे दोन रेल्वे प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधानांनी केले. यात शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर नवीन रेल्वे मार्ग आणि कोटेगांगरु रेल्वे कोचिंग डेपोचा समावेश आहे. शिवमोग्गा - शिकारीपुरा - राणेबेन्नूर हा नवीन रेल्वे मार्ग 990 कोटी रुपये खर्चून विकसित केला जाईल. यामुळे मलनाड प्रदेशात बंगळुरू-मुंबई मेनलाइनसह अधीक संपर्कता प्रदान वाढायला मदत मिळेल. शिवमोग्गा शहरातील कोटेगांगुरु रेल्वे कोचिंग डेपो 100 कोटींहून अधिक रूपये खर्च करून विकसित केला जाईल, ज्यामुळे शिवमोग्गा येथून नवीन गाड्या सुरू करण्यात मदत होईल त्याचबरोबर बेंगळुरू आणि म्हैसूर येथील देखभाल सुविधांचा ताण कमी करण्यात मदत मिळेल.
यावेळी पंतप्रधानांनी अनेक रस्ते विकास प्रकल्पांचीही पायाभरणी केली. 215 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात येणार्या प्रकल्पांमध्ये, राष्ट्रीय महामार्ग(NH) 766C वरील शिकारीपुरा शहरासाठीच्या नवीन बायपास रस्त्याच्या बांधकामाचा, राष्ट्रीय महामार्गावरील (NH)-169A मेगारावल्ली ते अगुंबे पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण; आणि राष्ट्रीय महामार्ग(NH) 169 वरील तीर्थहल्ली तालुक्यातील भरतीपुरा येथे नवीन पुलाच्या बांधकाम कामांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी कार्यक्रमादरम्यान जल जीवन मिशन अंतर्गत 950 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बहु-ग्राम योजनांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यामध्ये गौथमापुरा आणि इतर 127 गावांसाठीच्या एका बहु-ग्राम योजनेचे उद्घाटन आणि एकूण 860 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या तीन अन्य बहु-ग्राम योजनांसाठीच्या पायाभरणी कार्यक्रमांचा समावेश आहे. या चार योजना नळाद्वारे पाणी प्रदान करतील करतील आणि या योजनांमुळे एकूण 4.4 लाखांहून अधिक लोकांना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.
शिवमोग्गा शहरातल्या 895 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 44 स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. या प्रकल्पांमध्ये 110 किमी लांबीच्या 8 स्मार्ट रोड पॅकेजेसचा समावेश आहे; एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सेंटर आणि बहु-स्तरीय कार पार्किंग; स्मार्ट बस निवारा प्रकल्प; प्रभावी घन कचरा व्यवस्थापन प्रणाली; शिवप्पा नाईक पॅलेस सारख्या हेरिटेज प्रकल्पांचा परस्परसंवादी संग्रहालयात विकास, 90 संवर्धन मार्ग, उद्यानांची निर्मिती आणि नदी किनारे विकास प्रकल्प यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.
* * *
N.Chitale/Sushma/Vasanti/Vikas/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1902770)
Visitor Counter : 186
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam