पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसार माध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 25 JAN 2023 9:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जानेवारी 2023

 

सन्माननीय महोदय, राष्ट्राध्यक्ष सिसी,

दोन्ही देशांचे मंत्रिगण आणि प्रतिनिधी मंडळ

प्रसार माध्यमातील मित्रांनो,

सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष सिसी आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतामध्ये हार्दिक स्वागत करू इच्छितो. राष्ट्राध्यक्ष सिसी उद्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये  प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होत आहेत. संपूर्ण भारतासाठी ही  सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की, इजिप्तच्या सैन्याची एक तुकडीसुद्धा आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पथसंचलनाची शोभा वृद्धिंगत करत आहे.

मित्रांनो,

भारत आणि इजिप्त, विश्वातल्या सर्वात प्राचीन सभ्यतांपैकी आहेत. उभय देशांमध्ये अनेक हजार वर्षांपासून अनवरत नाते आहे. चार हजार वर्षांच्याही आधी, गुजरातमधल्या लोथल बंदराच्या माध्यमातून इजिप्तबरोबर व्यापार केला जात होता. आणि विश्वामध्ये इतक्या प्रकारे परिवर्तन घडून आल्यानंतरही आपल्या संबंधांमध्ये एक प्रकारची स्थिरता राहिली आहे. आणि आपसातील सहकार्य निरंतर सुदृढ होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सहकार्यामध्ये अधिकाधिक सखोलता आली आहे. आणि मी त्याचे खूप मोठे श्रेय माझे स्नेही राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या कुशल नेतृत्वाला देऊ इच्छितो.

यावर्षी भारताने आपल्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळामध्ये इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित केले आहे. यावरून उभय देशातील विशेष मैत्री दर्शविते.

मित्रांनो,

अरबी समुद्राच्या एका किना-यावर भारत आहे तर दुस-या किनाऱ्यावर इजिप्त आहे. दोन्ही देशांमध्ये असणारे  सामरिक समन्वय संपूर्ण क्षेत्रामध्ये शांती आणि समृद्धीसाठी सहाय्यकारी ठरणारे आहे. म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये उभय देशातल्या व्दिपक्षीय भागीदारीला ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’’- व्यूहरचनात्मक भागिदारीच्या स्तरावर घेऊन जाण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष सिसी आणि मी एकत्रित घेतला आहे. भारत-इजिप्त यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अंतर्गत , राज, सुरक्षा, आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये अधिक व्यापक सहयोग करण्यासाठी दीर्घकालीन पायाभूत आराखडा विकसित करायचे आम्ही ठरवले आहे.

अवघ्या जगभरामध्ये होत असलेल्या दहशतवादाच्या प्रसारामुळे भारत आणि इजिप्त चिंतेमध्ये आहेत. आमच्यामध्ये एकमत आहे की, दहशतवाद हा मानवतेच्या सुरक्षेला सर्वात गंभीर धोका निर्माण करत आहे. दोन्ही देश या गोष्टीवर सहमत आहेत की, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. आणि यासाठी आम्ही एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध करण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत.

आमच्यामध्ये सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या क्षेत्रात  काम करण्याच्या अपार शक्यता आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या सैन्यदलांमध्ये संयुक्त सराव प्रशिक्षण तसेच क्षमता निर्माण कार्यांमध्ये उल्लेखनीय वृद्धी झाली आहे. आम्ही आजच्या बैठकीमध्ये आपल्या संरक्षण उद्योगांमध्ये सहयोग अधिक मजबूत करणे आणि सीमेपलीकडून होणा-या दहशतवादी कारवायांविषयी सूचना तसेच गुप्तवार्तांचे आदान-प्रदान कार्य वृद्धिगंत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरेकी विचारप्रवाह तसेच कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी होत असलेला सायबर स्पेसचा दुरूपयोग, या संकटाची व्याप्ती वाढत आहे. याविरूद्धही  आम्ही सहयोग वाढवणार आहोत.

मित्रांनो,

कोविड महामारीच्या काळामध्ये आम्ही आरोग्य दक्षता पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच वैश्विक पुरवठा साखळीवर जे दुष्परिणाम झाले, ते आपण अगदी जवळून पाहिले, अनुभवले आहेत. राष्ट्राध्यक्ष सिसी आणि मी या आव्हानात्मक काळामध्ये अगदी निकटवर्ती बनून एकमेकांच्या संपर्कामध्ये होतो. आणि दोन्ही देशांनी ज्यावेळी अत्यंत आवश्यकता होती, अशा काळामध्ये एकमेकांना अगदी तात्काळ मदत पाठवली.

आज आम्ही कोविड आणि त्यानंतर उद्भवलेल्या युक्रेन संघर्षामुळे प्रभावित झालेली अन्न आणि वैद्यकीय पुरवठा साखळी, मजबूत करण्याच्या दिशेने व्यापक चर्चा केली आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये सहकार्याने गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्याच्या आवश्यकतेवरही सहमत आहोत. आम्ही मिळून असा निर्णय घेतला आहे की, आगामी पाच वर्षांमध्ये आम्ही, आमचा व्दिपक्षीय व्यापार 12 अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाणार आहोत.

मित्रांनो,

कॉप-27 चे यशस्वीपणे यजमानपद भूषविणे, आणि हवामान परिवर्तन क्षेत्रामध्ये विकसनशील देशांचे हित सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांसाठी, आम्ही इजिप्तचे कौतुक करतो.

संयुक्त राष्ट्र तसेच  इतर आंतरराष्ट्रीय आघाड्यांमध्ये भारत आणि इजिप्त यांच्यामध्ये दीर्घकाळापासून आणि अतिशय उत्तम सहयोगाचे नाते राहिले आहे. आंतरराष्ट्रीय समस्या, वाद यावर तोडगे काढण्यासाठी मुत्सेद्देगिरी आणि संवाद साधण्याच्या आवश्यकतेवरही उभय देश सहमत आहेत.

महोदय,

मी पुन्हा एकदा आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतामध्ये मनापासून स्वागत करतो. मी आपल्याला आणि इजिप्तच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देतो.

खूप खूप धन्यवाद!!

 

 

 

 

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1893795) Visitor Counter : 200