पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

Posted On: 24 JAN 2023 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीपी) विजेत्या बालकांची प्रशंसा केली आहे. नवोन्मेष, समाज सेवा, विद्वत्ता, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य या सहा क्षेत्रांमध्ये अद्वितीय कामगिरी करणाऱ्या मुलांना भारत सरकारतर्फे पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात येते. यावर्षी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार 2023 देण्यासाठी विविध श्रेणीअंतर्गत देशभरातील 11 बालकांची निवड करण्यात आली. यामध्ये 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 6 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे.

ट्विट संदेशांच्या मालिकेत पंतप्रधान म्हणाले:

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या मुलांशी फार उत्कृष्ट संवाद घडला

उल्लेखनीय काटकपणा असलेल्या आदित्य सुरेश याचा अभिमान वाटतो. हाडाच्या आजाराचे निदान झाल्यावर देखील त्याने धीर सोडला नाही. त्याने गायनकलेचा अभ्यास केला आणि आता तो एक प्रतिभावान गायक आहे. त्याने 500 हून अधिक कार्यक्रमांमध्ये गाणी गायली आहेत.

एम. गौरी रेड्डी ही एक सर्जनशील नृत्यांगना आहे. विविध कार्यक्रमांमध्ये ती नृत्यकला सादर करते आणि भारतीय संस्कृतीबद्दल तिला विशेष आस्था आहे. तिला  पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे याचा आनंद झाला आहे.

माझा छोटा मित्र संभव मिश्रा फार सर्जनशील मुलगा आहे. विविध लेख लिहिण्याचे श्रेय त्याच्या नावे जमा असून त्याने अनेक प्रतिष्ठित फेलोशिप्स मिळविल्या आहेत. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्याचे अभिंनदन करतो.

पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आलेली श्रेया भट्टाचार्यजी ही बालिका तबला वादक असून सर्वात जास्त वेळ सलग तबला वाजविण्याचा विक्रम तिने नोंदवला आहे. कला क्षेत्रातील सांस्कृतिक ऑलिम्पियाड सारख्या मंचांवर देखील तिचा सन्मान करण्यात आला आहे. तिच्याशी फार उत्तम संवाद झाला.

रोहन रामचंद्र बाहीर याच्याबद्दल मला अभिमान वाटतो. त्याने नदीत उडी मारून एका महिलेला बुडण्यापासून वाचवले. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भविष्यातील कामगिरीसाठी त्याला माझ्या शुभेच्छा.

विशेष नैपुण्य असलेल्या आदित्य प्रताप सिंग चौहान याला नवोन्मेषविषयक कार्याबद्दल पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. स्वच्छ पाण्याचा खात्रीशीर पुरवठा करू शकणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम करत आहे.

युवकांमधील अभिनव संशोधन साजरे करत आहोत! ऋषी शिव प्रसन्ना याला अॅप विकसित करण्याचे आकर्षण आहे. तसेच त्याला विज्ञानात आणि विज्ञानाला युवा वर्गात लोकप्रिय करण्यात रुची आहे. या पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्याला भेटून आनंद झाला.

अनुष्का जॉलीसारख्या युवती उल्लेखनीय दयाभाव आणि अभिनव संशोधन यांचे दर्शन घडवतात. छळवणूकीविरुद्ध जागरूकता निर्माण करणारे ॲप आणि इतर ऑनलाईन कार्यक्रमांच्या विकसनावर अथकपणे मेहनत घेते आहे. ती आता पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती आहे याचा आनंद झाला आहे.

खेळांना लोकप्रिय करण्यासाठी तसेच तंदुरुस्तीवर अधिक भर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विविध मार्शल आर्ट्स स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारी हनाया निसार ही पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती ठरली आहे. तिने आतापर्यंत विविध सन्मान प्राप्त केले आहेत. तिच्या कामगिरीचा अभिमान वाटतो.

2022 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल शौर्यजीत रणजीतकुमार खैरे याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आहे. मल्लखांबाच्या बाबतीत तो प्रचंड प्रतिभावान आहे. त्याला पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळाल्याबद्दल मी त्याचे अभिनंदन करतो आणि आगामी काळात भरीव कामगिरीसाठी त्याला सुयश चिंततो.

कुमारी कोलागटला अलाना मीनाक्षी ही अत्यंत उल्लेखनीय बुद्धिबळपटू आहे आणि आता तिने पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देखील मिळवला आहे. बुद्धिबळाच्या खेळातील यशामुळे जागतिक पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तिचे नाव चमकले आहे. उभरत्या बुद्धिबळ खेळाडूंना तिने केलेल्या कामगिरीमुळे नक्कीच प्रेरणा मिळेल.

 

  https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1893391

 

 

 

 

S.Kane/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1893418) Visitor Counter : 251