युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
युथ 20 गटाची पहिली बैठक 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या काळात गुवाहाटी इथे होणार
परिषदेच्या निमित्ताने आसामच्या 34 जिल्ह्यांमधील 50 पेक्षा जास्त विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधली 12,000 पेक्षा जास्त विद्यार्थी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून परिषदेच्या पाच संकल्पनांवर चर्चा करणार
चर्चेतील मुद्दे आणि शिफारसी, वाय- 20 बैठकीदरम्यान प्रतिनिधींसमोर मांडल्या जाणार
आयआयटी गुवाहाटी इथे होणार असलेल्या मुख्य संलग्नित कार्यक्रमात आसाममधील निवडक 400 विद्यार्थी सहभागी होणार
Posted On:
22 JAN 2023 5:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जानेवारी 2023
जी-20 परिषदेच्या निमित्ताने भारत पहिल्यांदाच युथ 20 (Y20 / वाय20)शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे. याअंतर्गत वाय 20 गटाची पहिली बैठक 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या काळात गुवाहाटी इथे होणार आहे. ऑगस्ट 2023 मध्ये युथ20 ची अखेरची शिखर परिषद होईल. त्याआधी देशभरात वाय 20 शी संबंधीत पाच विषयांवर विविध बैठका होतील. गुवाहाटी इथं होणारी बैठक ही या पाच बैठकांपैकी पहिलीच बैठक असणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने आसाममध्ये तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमात जगभरातून 250 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यंदाच्या वाय 20 परिषदेत कामांचं भविष्य या विषयाशी निगडीत, हवामान बदल आणि आपत्तीकाळातील धोक्यांत घट साधणे, शांतता आणि सामंजस्य प्रस्थापित करणे, लोकशाही आणि आरोग्य व्यवस्थेतील युवा वर्गाचा सहभाग, युवा कल्याण आणि क्रीडा या पाच पैलुंवर भर दिला गेला आहे.
युथ 20 हा जी 20 च्या छताखाली जे आठ अधिकृत संलग्नित गट आहेत, त्यांपैकी एक आहे. जी 20 च्या फिरत्या अध्यक्षपदाच्या पद्धतीनुसार, त्या वेळचे अध्यक्षपद असलेल्या देशाकडेच युवा शिखर परिषदेच्या यजमानपदाची जबाबदारी असते. ही परिषद सामान्यत: पारंपारिक शिखर परिषदे आधी काही आठवड्यांपूर्वी आयोजित केली जाते, जेणेकरून युवा वर्ग नेमका काय विचार करीत आहेत हे जाणून घेता येईल, आणि त्याद्वारे युवा वर्गाच्या सूचना त्यांच्याकडूनच येणाऱ्या धोरणात्मक प्रस्तावांमध्ये समाविष्ट केल्या जाऊ शकतील. जी 20 समूहातील देशांची सरकारे आणि त्या देशांमधील स्थानिक युवा वर्गाला जोडणारा दुवा निर्माण करण्याचा प्रयत्न म्हणून ही परिषद आयोजित केली जाते. यंदा 2023 या वर्षात भारतात होत असलेल्या वाय 20 इंडिया शिखर परिषदेतून, भारताचे युवा-केंद्रित प्रयत्न जगासमोर मांडायचा आणि यातून जगभरातील युवा वर्गाला आपल्या देशाची मूल्ये आणि धोरणात्मक उपाययोजनांची ओळख करून घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.
वाय 20 च्या बैठकांकरता सहभागपूर्ण आणि सर्वसमावेशक चर्चेचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ही बैठक सुरू होण्यापूर्वी आसामच्या 34 जिल्ह्यांमधील 50 पेक्षा जास्त विद्यापीठे आणि महाविद्यालये, 19 जानेवारीपासून बैठकीच्या आधीपर्यंत त्यांच्या प्रांगणात चर्चासत्रे, कार्यशाळा, वादविवाद आणि तज्ञांसोबतच्या चर्चा असे उपक्रम आयोजित करणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधले 12,000 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यासोबत राज्यातली उच्च शिक्षणाशी संबंधित प्रत्येक संस्था, आपल्या आसपासच्या 10 शाळांमध्ये जनजागृती मोहीमा राबवून, त्या त्या शाळांना जी 20 समूह गट आणि या गटाचे कामकाज तसेच कार्यपद्धतीविषयीची माहिती दिली जाणार आहे.
यानिमित्ताने 7 फेब्रुवारी 2023 ला आयआयटी गुवाहाटी इथे होणार असलेल्या मुख्य संलग्नित कार्यक्रमात सहभागी झालेली विविध विद्यापीठे आणि महाविद्यालांमधील स्पर्धांच्या पारितोषिक विजेत्यांसह, एकूण 400 जण सहभागी होणार आहेत. यावेळी सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला नवोन्मेष आणि उद्योग - शैक्षणिक व्यवस्थेचे संबंध समजून घेण्यासाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. या युवा वर्गाला परस्परांच्या एकसामायिक भविष्याशी संबंधित विचारांची देवाणघेवाण करता यावी यासाठी, या सहभागींना आंतरराष्ट्रीय युवा प्रतिनिधींसोबत संवाद साधण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
For further details refer:
https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1889239
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1888943
* * *
R.Aghor/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1892824)
Visitor Counter : 248