आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जी 20 भारताचा आरोग्यविषयक आराखडा


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ भारती प्रवीण पवार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री, एस व्ही मुरलीधरन यांचे केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पहिल्या जी 20 आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला संबोधन

महामारी प्रतिबंधक धोरण हा आपल्या आरोग्य धोरणाचा एक व्यवच्छेदक भाग असला पाहिजे कारण आज कोणतेही आरोग्य संकट जगाच्या परस्परांशी निगडित बहुक्षेत्रीय स्वरूपामुळे आर्थिक संकटाला कारणीभूत ठरत आहे: डॉ भारती प्रवीण पवार

“महामारीपासून मिळालेल्या धड्यातून आपली सज्जता आणि प्रतिसाद यांचा एकत्रित अजेंडा तयार केला पाहिजे. आपल्याला आपल्या क्षमतांमध्ये वैविध्य आणण्याची गरज आहे आणि सामूहिकपणे, आपण कोणत्याही आरोग्य संकटाचा सामना करताना स्वसंरक्षण करू हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे."

Posted On: 18 JAN 2023 11:47AM by PIB Mumbai

जानेवारी १८, २०२३

“महामारी प्रतिबंधक धोरण हा आपल्या आरोग्य धोरणाचा एक व्यवच्छेदक भाग असला पाहिजे कारण आज कोणतेही  आरोग्य संकट जगाच्या परस्परांशी निगडित  बहुक्षेत्रीय स्वरूपामुळे आर्थिक संकटाला कारणीभूत ठरत आहे”. असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज केरळमधील तिरुअनंतपुरम येथे जी 20 भारतीय अध्यक्षते अंतर्गत पहिल्या आरोग्य कार्यगटाच्या बैठकीला संबोधित करताना सांगितले.

 केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एस व्ही मुरलीधरन आणि नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल हे देखील यावेळी उपस्थित होते.

डॉ. पवार यांनी नमूद केले की महामारीचा प्रतिबंध, तयारी आणि प्रतिसाद यासाठी विविध बहु-क्षेत्रीय, बहु-संस्थात्मक समन्वयित प्रयत्नांची आवश्यकता आहे. भविष्यातील आरोग्य विषयक आणीबाणीच्या परिस्थितीत तत्पर राहण्यासाठी समुदायांना बळकट आणि सक्षम बनवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. त्या म्हणाल्या की, "कोविड 19 ही शेवटची महामारी खचितच नाही. या धड्यातून आपल्या सज्जतेचा आणि प्रतिसादाचा एकत्रितपणे अजेंडा तयार केला पाहिजे. आपण आपल्या क्षमतांमध्ये वैविध्य आणले पाहिजे आणि कोणत्याही आरोग्य संकटाचा सामना करताना आपण एकत्रितपणे स्वसंरक्षण करू हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे".

लवचिक आरोग्य प्रणाली तयार करण्याचे आणि जीवनरक्षक लसी, उपचार आणि निदानामध्ये गुंतवणूक करण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

भारताच्या वैद्यकीय पद्धती आणि नवोन्मेषाच्या कणखर संस्कृतीवर प्रकाश टाकताना,एस व्ही मुरलीधरन यांनी नमूद केले की माननीय पंतप्रधानांचे "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" यासाठीचे आवाहन हा पृथ्वीग्रह-समर्थक दृष्टिकोन आहे, जो वाढत्या जागतिकीकरणासंदर्भात निसर्गाशी सुसंगत आहे.

 "कोणत्याही आरोग्य आणीबाणीला प्रभावीपणे तोंड देण्यासाठी सक्षम होण्यासाठी सज्जता आणि प्रतिसादासाठी आमचा अजेंडा संरेखित करण्याची गरज" यावर त्यांनी भर दिला. भविष्यात आरोग्याच्या कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी आपण एकत्रितपणे तयार असले पाहिजे, असे ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी जी 20 अध्यक्षपद कार्यकाळातील अध्यक्ष या नात्याने आरोग्य सहकार्यात गुंतलेल्या विविध बहुपक्षीय मंचांवरील चर्चेत अभिसरण साध्य करण्याच्या भारताच्या उद्दिष्टावर प्रकाश टाकला. त्यांनी जी 20 आरोग्य विषयक आराखड्यासाठी तीन प्राधान्यक्रमांचा पुनरुच्चार केला, ते म्हणजे, आरोग्य आपत्कालीन प्रतिबंध, सज्जता आणि प्रतिसाद (एक आरोग्य आणि एएमआर वर लक्ष केंद्रित करून); सुरक्षित, परिणामकारक, दर्जेदार आणि परवडणारे वैद्यकीय प्रतिबंधात्मक उपाययोजना (लस, उपचार आणि निदान) यांच्या प्रवेशावर आणि उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करून औषध निर्माण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे; आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा उपलब्धतेत मदत करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सेवा पुरवठा सुधारण्यासाठी डिजिटल आरोग्य नवोन्मेष आणि उपाय हे होत.

इंडोनेशियन आणि ब्राझिलियन ट्रोइका सदस्यांनी तीन आरोग्य प्राधान्यक्रम निश्चित केल्याबद्दल भारतीय अध्यक्ष्यतेची प्रशंसा आणि कौतुक केले. त्यांनी सांगितले की, महामारीने आपल्या आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची संधी दिली आहे आणि सार्वत्रिक आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी आपल्या प्रयत्नांना गती देण्याची आज गरज आहे.

आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. राजीव बहल, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव अग्रवाल, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभय ठाकूर, जी 20 सदस्य देशांचे प्रतिनिधी, विशेष आमंत्रित देश, आंतरराष्ट्रीय संस्था, मंच आणि जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, जागतिक आर्थिक मंच इत्यादी भागीदार आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.


***

Gopal C/Vasanti/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa


(Release ID: 1891932) Visitor Counter : 325